देह दाह@सिगारेट्स

समीर गायकवाड

सिगारेट पिणाऱ्या लोकांची एक वेगळीच दुनिया असते.

काही पट्टीचे धूरसोडे असतात, काही स्ट्रेसपायी ओढतात,

काही चोरून पिणारे तर काही हौशी तर काही थ्रिलपायी पिणारे असतात.

काही आहारी गेलेले गंजेडी सिगारेटी असतात !

काही किक बसावी म्हणून पितात तर काहींना पूर्ण ब्लँक झाल्यागत वाटते तेंव्हा तलफ येतेच !

काही मात्र निव्वळ रिबेलर असतात, मात्र हे काही बंडाचे खरे प्रतीक नव्हे हे त्यांना पचनी पडत नसते !

भकाभका धूर सोडणारे वेगळे आणि शांतपणे धुम्रवलये सोडणारे वेगळे.

पिवळा हत्ती, चारमिनार, फोर स्क्वेअर यांचे जग वेगळे आणि मर्लबोरो, डनहिल, नेव्ही कट, रेड अँड व्हाईट यांचे जग वेगळे.

काही दारू पिताना सिगारेट्स ओढतात तर काही पिऊन झाल्यावर ओढतात तर काही सिपगणिक कश मारतात. काही दारूच्या लास्ट सिपमध्ये सिगारेट संपवून टाकतात !

काहींची सिगारेट पिण्याची स्टाईल बाबा बुवा लोकांसारखी गांजा टाईप असते तर काही अव्वल लपूट स्टाईलमध्ये मुठीच्या आतल्या बाजूस निखाऱ्याची बाजू लपवून धूर सोडतात. काहीं आपल्या दोन बोटात तर क्वचित कुणी एखादा अंगठा तर्जनी यांच्या धनुष्यात सिगारेट खोवून बसलेला असतो !

एका कशिशमध्ये एक सिगारेटचं अख्खं पाकीट काहीजण फुकतात तर काहींना दिवसाकाठी एक कांडी पुरेशी असते.

सिगारेट पिणाऱ्या लोकांच्या सिगारेट्स पेटवायच्या स्टाईल्सही भिन्न असतात. काहींना दुसऱ्याच्या जळत्या सिगारेट्सना सक करून कश मारायला आवडतं तर काहींना हे प्रकरण अजिबात आवडत नाही !

काडी कशी पेटवली जाते आणि जळत्या काडीने सिगारेट कशी पेटवून ओढली जाते यावरून त्याचं चालचलन बऱ्यापैकी उमगतं.

काडीपेटीला माचिस म्हणणारे आणखी वेगळेच असतात,

काडीपेटी न वापरता लायटर युज करणाऱ्या जनतेचा स्वॅग अजूनच वेगळा असतो !

लायटरने सिगारेट पेटवल्यानंतर तो लायटर लगेच खिशात न ठेवता त्याच्याशी खेळणारे अजूनच वेगळे !

सिगारेटला धग येताच ओठांचा चंबू करणाऱ्या कॉमन पब्लिकपासून ते ओठाच्या या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत तिला खेळवत जाळणाऱ्यापर्यंत हरेकाची स्टाईल अगदी हटके नसली तरी त्यात लाखो अदा दिसतात.

रेल्वेने धूर सोडावा तसा पाठोपाठ धूर सोडणारे जसे एका कॅटेगरीत मोडतात तशीच एक कॅटेगरी असते नाकपुड्यातून धूर सोडणाऱ्यांची ! काही जण इतक्या लयबद्धतेने धूर सोडत असतात की त्यांचा शौक कळून यावा !

अट्टल चेन स्मोकर लगेच ओळखू येतात, लोक त्यांच्या काळया जांभळ्या ओठांवरून ओळखतात.

तर काही वासावरून ओळखले जातात, अलीकडे पुदिनहरा मुळे निदान गंधसंवेदना कमी केल्या जातात !

याहीपलीकडे आणखीही दोन मार्ग आहेत अट्टल चेन स्मोकर्सना ओळखण्याचे ! (ते नंतर कधी तरी…)

काही सकाळी उठल्याबरोबर ‘हलके होण्यासाठी’ सिगारेट पितात तर काही रात्री झोपी जाण्याआधी एक कश मारून झोपी जातात.

आपण पानपट्टीवर गेल्यावर आपल्याला पाहून नाव न सांगता आपल्या ब्रँडची सिगारेट दिली जाते याचा या मंडळींना अपार अभिमान असतो.

आपला ब्रँड मिळाला नाही तर थोडी पायपीट होते वा हातउसने एखादे पाकीट दिले घेतले जाते,

काहींना दुसऱ्याच्या थोबाडावर धूर सोडायची सवय असते. काही मोजके असे असतात की धूर सोडताना दक्षता घेतात !

ऍशट्रे मध्ये सिगारेटची राख झटकण्याचेही एक शास्त्र आहे, काही ते पाळतात तर काही निव्वळ माजोरडे असतात हेतुतः कुठंही राख करतात तर काहींना याच्याशी सोयरसुतकच नसते.

काही फुकाचे नाटक करतात, तुफान नौटंकी करतात आणि तोंडावर पडतात.

सिगारेटऐवजी बिडी ओढणारे बहुधा अतिव कष्टकरी श्रमिक आणि अल्पउत्पन्न गटातले असतात, काही हौसेने पिणारेही असतात.

बिडीच्या ब्रँडवरून बिडीवाल्यांत उच्च कनिष्ठ भेद नसतो हे वेगळेपण सिगारेट्सवाल्यांच्यात नसते !

सिगार आणि पाईप ओढणारे अजून वेगळ्या जगात वावरत असतात.

अलीकडे हुक्का नव्याने बस्तान बसवत असला तरी तसा तो जुनाच आहे.

फ्लेवर्ड, फिल्टर्ड, नॉन फिल्टर्ड, स्मॉल, कट, ई हुक्का पेन अशा भानगडी वाढल्या असल्या तरी खरा धूरसोड्या जुन्या पद्धतीनेच सिगारेट ओढत नाक्यानाक्यावरच्या पान टपरीनामक ऐतिहासिक इमारतीपाशी दिसतो !

धूम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या मानाने स्त्रियांना खूप अवहेलनेस सामोरे जावे लागते. कोत्या मनाची समाजरचना !

काहीना हे हवेहवेसे असते मात्र कथित बंधनांच्या परिघात होरपळून निघत असल्याने त्या यांच्यावर जळत असतात, काहींना एकदा तरी सिगारेट ओढायची असते.

खेड्यांनी पूर्वी म्हाताऱ्या बायका बिनधास्त बिड्या ओढत, अजूनही वाड्या वस्त्यांवर अशा बायका दिसतात. तुलनेने अन्य ग्रामीण भागात असं काही नजरेस पडत नाही. अलीकडे कॉर्पोरेट जग नावाचा शब्द अस्तित्वात आल्यापासून स्त्रियांच्या धूम्रपानास त्या सर्कलमध्ये तरी नाके मुरडली जात नाहीत !

वेश्यांची घरे तुडवताना अनेकींना सिगारेट्स पिताना पाहिलेय, त्याचे व्यसन कसे जडले हे ऐकताना ढसढसा रडलेलो !

त्यातल्या काहींना इतके भयानक व्यसन जडले की परिणामी त्यांच्याकडे येणाऱ्या हराम्यांनी अवघ्या काही पाकिटांच्या बदल्यात त्यांना भोगलं !

त्यांचं कारुण्यकथन ऐकल्यावर सिगारेट्स सोडून दे असं सांगायची हिंमतच झाली नाही.

शरीराला अपाय करणारे कोणतेही छंद नाद करू नयेत, त्यांचे व्यसन कधी जडेल याचा पत्ता नसतो.

जे व्यसनांच्या आहारी जातात त्यांनी तर हे नाद करूच नयेत मात्र व्यसने ज्यांच्या काबूत असतात ते हवे तसे जगत असतात, जगाला कोलत असतात, फाट्यावर मारून जगतात आणि येईल त्या मरणाला हसतमुखाने सामोरे जातात.

काहीजण नव्हे बरेच जण अशा सगळ्याच नादांना नावे ठेवतात, त्यांच्या मते हे निषिद्ध होय ! जगण्यासाठी याचा उपयोग शून्य आणि अपाय लाखो सहस्र, याला प्रतिवाद करणारी पियक्कड मंडळी म्हणतात मग जगण्याला अर्थ काय ? अर्थातच हा वाद अनएंडिंग आहे.

ज्याचे त्याचे संतुलन आणि जडण घडण, परिस्थिती आणि वाट्याला आलेला भवताल यातून माणसाचे सामाजिक वर्तन घडत बिघडत जाते. अतिरेक केल्यावर घरदार मातीत जाते, अंगाचा पिंजर होतो आणि भयाण मरण येते !

माझी सिगरेट सुटून आता कैक वर्षे लोटलीत. त्याचं कारण मस्तक सुन्न करणारं असंच होतं. असो..

सरते शेवटी. …

पुरुष मंडळी सिगारेट्स केवळ पितातच असे नव्हे तर पेटवलेल्या सिगारेट्स इतरांना छळण्यासाठीही वापरतात.

रेड लाईट एरियातील हरेक अड्ड्यावर किमान एक तरी बाई अशी असतेच जिच्या देहावर सिगारेट्सच्या चटक्यांचे काळेजांभळे कोरडे व्रण असतात आणि याच व्रणांच्या जखमा त्या बायकांच्या काळजाला कायम सलत असतात.

ती बाई जेंव्हा चितेवर जळते तेंव्हा कुठे त्या चटक्याची धग संपते,

तोवर सिगारेटचा तो व्रण तिला रोज देह दाह देत असतो.

न ऐकणाऱ्या, न जुमानणाऱ्या बाईला पेटवून टाकायचे हे शास्त्र इथे लघुरूपात दिसते.

या बायकांचे तळतळाट खरे होवोत, यांचे शिव्याशाप लागोत.

हातात जळती सिगारेट घेऊन कुणी आसपास फिरताना दिसला की या बायका आठवतात आणि उस्मरायला होतं ! मस्तकातून धूर निघू लागतो…

कपडे जळून गेलेली बाहुली दिसते, भांबावून गेलेली चुरगाळलेली तिची इवलीशी मैत्रीण दिसते आणि कडेला अनाहुतासोबत निजलेली देह दाह वागवत जगणारी तिची म्लान आई दिसते !

भडभडून येतं !

लेखक नामवंत स्तंभ लेखक ब्लॉगर आहेत.

8380973977

…………………………………….

समीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleसारा खेळ निवडणुकांचा !
Next articleउत्तरप्रदेशात योगी एकाकी ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.