सकाळी पूजा करुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते. जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही. पोटाला तड लागते.एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो.जेवणाच्या पात्रावरुन उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे खाल्लेले अन्न पचवण्यासाठीचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा दुसऱ्या कोपीवर जाऊन जेवायचे। एकेकाळी १२ बलुतेदार, १८ अलुतेदार यांनाही आग्रहाने जेवायला बोलवून हे सगळे खाऊ घातलं जात असे .
संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावरात तो पेटवून रान ओवाळून काढायचे, आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा. मोठी आग करुन ती शमली की तिच्या राखेत विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे. असा हा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे….. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार गाढवांचा बाजार , सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले तृतीयपंथी दर्शनाला येतात (तृतीयपंथांचे माळेगाव अशीही ओळख ) ,तमाशाचे मोठ मोठे फड….. यामुळे पूर्वी या जत्रेला पुरुष मंडळींना खऱ्या अर्थाने चांगभलं असे. असा हा सण आणि त्याची परंपरा आजही मोठ्या हौसेने सांभाळली जाते.