रतन खत्री ‘मटका किंग’ कसे झालेत?

१९६०च्या दशकात मटका व्यवसायाच्या अवैध धंद्यात कल्याण भगत आणि रतन खत्री अशी दोनच नावे होती. असे सांगितले जाते की कल्याण भगत यांनी  १९५० नंतर हा व्यवसाय सुरू केला. परंतु खऱ्या अर्थाने राज्याच्या कानाकोपऱ्यात मटका पोहचविला तो रतन खत्री यांनी. एकेकाळी ग्रामीण भागात बस जायची नाही , पण रतन खत्रीचा मटका मात्र तिथे पोहचला असायचा. राज्यातील प्रत्येक शहरात, गावात रतन खत्रींच्या मटक्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायची. ‘मटका किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रतन खत्री यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.त्यांची ही रंजक कहाणी .

………………………………………………………………………..

मूळचे पाकिस्तानच्या कराची येथील रहिवासी असलेले रतन खत्री हे भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी भारतात आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी  बर्‍याच व्यवसायात हात आजमावला. पण तेव्हा मटका व्यवसायात मोठं नाव असलेल्या कल्याण भगत यांच्यासोबत  भेट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

कल्याण  भगत कोण होते?
कल्याण भगत गुजरातमधील कच्छ भागातील रहिवासी आहेत. ते १९४१ मध्ये मुंबईत आले होते. भगत यांनी जवळपास १५ वर्षे बर्‍याच व्यवसायांमध्ये हात आजमविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. किराणा दुकानातील व्यवस्थापकापासून मसाले विक्रीपर्यंत त्यांनी काम केले. मात्र यश मिळाले नाही . नंतर त्यांनी न्यूयॉर्क आणि बॉम्बे कॉटन मार्केटच्या

सुरूवातीच्या व मार्केट बंद होण्याच्या वेळच्या दराबाबत सट्टेबाजी केली जात होती. एक वेळ अशी होती जेव्हा कापसाच्या भावाबाबतचे कल्याण भागात यांचे अंदाज तंतोतंत खरे उतरत.  कापसाच्या किंमतीचा चढ उतराचा अंदाज बांधण्यात त्यांचा हात कोणी पकडत नव्हतं.  त्यातूनच त्यांच्या डोक्यात मटका व्यवसायाची कल्पना आली .

कल्याण भगत यांचा मुलगा विनोद भगत यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की ‘मटका’ हे नाव आपल्या वडिलांनी ठेवले होते. रस्त्यावर गर्दी केलेले काही लोक मटक्यातून (मडके) चिट्ठी काढून सट्टा लावायचे त्यावरून त्यांना हे नाव सुचले . वास्तविक प्रत्यक्षात  मटक्याचा आकडा काढण्यासाठी कधीही मटक्याचा (मडके) वापर करण्यात येत नव्हता.

कल्याण भगत यांनी जेव्हा मुंबईत मटका बेटिंग सुरू केला तेव्हा सुरुवातीच्या काळात व्यवस्थापक म्हणून रतन खत्री काम पाहात होते . तेव्हा याला ‘वरळी मटका’ असे म्हटले जात असे. १९६० मध्ये मुंबईतील कामगार व इतर कष्टकरी वर्गात हा मटका चांगलाच लोकप्रिय झाला होता.  मात्र १९६२ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने  आपल्या प्रक्रियेत बदल केल्याने हा व्यवसाय धोक्यात आला.

अशावेळी रतन खत्री यांनी डोके लावून कापसाच्या दराशिवाय इतर गोष्टींच्या दराबाबत बोली घेण्यास सुरुवात केली होती. याला चांगलेच यश मिळाले . व्यवसाय जरी अवैध असला तरी सारे व्यवहार चोख असल्याने आणि ज्यांना मटका लागेल त्यांना लगेच रोख पैसे मिळत असल्याने रतन खत्री यांची विश्वासार्हता वाढली आणि बघता बघता राज्याच्या कानाकोपऱ्यात व्यवसाय फोफावला . यामुळे आत्मविश्वास वाढलेले रतन खत्री  कल्याण भगत यांच्यापासून  वेगळे झाले. काही काळातच या अवैध व्यवसायात त्यांच्या नावाची जोरात चर्चा व्हायला लागली.

रतन मटका

कल्याण भगत पासून वेगळं झाल्यावर खत्री यांनी ‘रतन मटका’ सुरू केला. आपल्या व्यवसाय कौशल्यामुळे आणि पोलीस आणि इतर यंत्रणांना व्यवस्थित त्यांचा वाटा पोहचविल्यामुळे  बेकायदेशीर जुगार असूनही हा व्यवसाय चांगलाच बहरला.  पुढे तर देशाच्या इतर प्रांतातही मटका पोहचला . मटक्याचे मुख्य केंद्र मुंबईत असले तरी देशाच्या वेगवेगळ्या भागातून बोली स्वीकारली जात असे . एकीकडे कल्याण भगत चोरीछुप्या पध्ततीने हा व्यवसाय करू इच्छित असताना खत्री यांनी उघडपणे हा व्यवसाय चालू ठेवला. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील ‘प्रतिष्ठित’ म्हणवित असलेल्या वर्तमानपत्रांना हाताशी घेतले . त्या  वर्तमानपत्रांमध्ये  मटक्याचे आकडे प्रसिध्द होण्यास सुरुवात झाली . त्यासाठी त्यांना दर महिन्याला भरभक्कम रक्कम देण्यात येत असे . अजूनही देण्यात येते. यामुळे काही वर्तमानपत्र केवळ मटक्याच्या आकड्यांसाठी वाचक विकत घ्यायला लागलेत. (अजूनही हा प्रकार जोरात आहे )या व्यवसायाची उलाढाल एवढी वाढली की १९७५ मध्ये मटक्याची रोजची उलाढाल दोन कोटी रुपयांच्या वर गेली होती.

१९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा रतन खत्री यांना अटक तुरूंगात टाकण्यात आले.जवळपास १९ महिने तुरुंगात राहावे लागल्याने काही महिने मटका बंद होता . मात्र सुटका झाल्यानंतर खत्री यांनी पुन्हा नव्या जोमाने हा व्यवसाय सुरू केला. पुढे अवैध व्यवसायाच्या जगात रतन खत्री हे नाव सर्वांच्या तोंडी होते असे सांगितले जाते की फिरोज खान, हेमामालिनी रेखाच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटातील धर्मात्मा हे पात्र (प्रेमनाथने ही भूमिका केली होती) हे रतन खत्रीवर आधारित होते.

(साभार: न्यूज 18 हिंदी)

हे सुद्धा वाचा-आठवणी मटक्याच्या …रतन खत्रीच्या!https://bit.ly/2YRg79d

Previous articleग्रेस: स्त्रीत्वाच्या सनातन दुःखाचा अंधारगर्भ
Next articleकरोना महामारी: एक आव्हान
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here