माझ्या मैत्रिणी

‘माझ्या मैत्रिणी’ maitrren

मी वाट पाहतो आहtे
माझ्या मैत्रिणी
एका टोटल डिझास्टरची
तुझ्याकडून

अजून किती काळ तू
ही धीराची वात लांबवत नेणार आहेस
या सनातन युद्धात?

शतकानुशतकांचे तह करून
तुझ्या विजयावर होत नाहीए शिक्कामोर्तब.
दोन पावलं पुढं जाण्यासाठी
दोन पावलं मागं घेण्याची
ही तुझी रणनीती
तुलाच किती पावलं मागे घेवून गेलीय
हे तुझ्या लक्षात कधी येणार
माझ्या प्रिय मैत्रिणी?

मोहन जो दारोच्या दरबारातील
नग्न नर्तिका ते लेडिजबार
किती लांब हा तुझा सांस्कृतिक दुपट्टा?

गादीचा कापूस टाक्यासहित सांभाळण्याचे
सनातन भरतकाम आणि
मातृत्वाच्या नवरात्र उत्सवातले
उत्सवी दांडिया रास
आणि तुझी छाती फुटतेय घागर फुंकून

तू का घालत नाहीस खो
यांच्या सात मिनिटांच्या खेळाला?
तू का धरत नाहीस तंगडी
आणि जिंकत बिछान्यातली कबड्डी?
तुला टोकावर तोलणारे मल्लखांब व
तुझी तारेवरची कसरत
ट्रॅडिशनल जिम्नॅस्टिकमध्ये
तू का फोडत नाहीएस
जेंडरची लगोरी?

तू ही का जात नाहीएस
घरदार, पोरंबाळं सोडून संन्याशांसारखी
न सांगता निघून जाण्याची
त्यांची परंपरा गौतमापासूनची
पण मैत्रिणी, एखादाच गौतम
परतताना बुध्द होतो
बाकी साले कॉमिक्समधले फॅंटम!
छटाक पेगने त्यांची विमाने उडतात
नी रात्री बेरात्री येऊन बायकोला कुथवतात
म्हणून का तू त्यांना सुपरमॅन म्हणणार?
आणि त्यांच्याच गोष्टी सांगत
पोरांना थोपटवत झोपवणार?
या थोपटवण्याचा पेटंट
तू का नाही टाकत आहेस विकून
या इंटरनॅशनल मार्केटमध्ये?

तू व्हर्जिन मेरी होऊन येशूला थोपटलेस
यशोधरा होऊन बुध्दाला थोपटलेस
कुंती होऊन अग्नीगोलालाच शांत केलेस
सावित्री, रमा होऊन फुले आंबेडकरांना थोपटलेस
कस्तुरबा होऊन गांधीही जोजवलेस
आता पाळण्याच्या दोरीची वात करून
उडवून दे भडका
लल् बाय ला करून करून टाक बाय बाय
आता इथून पुढे मारून टाक तुझ्याच नाळेला गाठ
एरव्ही हे साले तुझी सोडणार नाहीत पाठ

पाठ आणि पोट
यांच्या स्पेअर कपॅसिटीच्या जाहिराती देणं
आता तू बंद कर
तू भूलू नकोस यांच्या ओव्या अभंगांना
समानतेचे आणि सहजीवनाचे पोवाडे
ऐकून उर भरून येऊ देऊ नकोस
या पोवाड्यातही तूला
जिरं रं जिरं रं जी म्हणण्याशिवाय
विशेष भूमिका नाहीए
हे तुझ्या लक्षात येतंय का मैत्रिणी?

पारंपारिक सौभाग्य भांडारातली
सौभाग्य टिकली आणि
महात्म्यांच्या सावलीचे पुरोगामी वस्त्र भांडार
एक घराजवळ, दूसरं गल्लीच्या टोकावर
एवढंच अंतर
मधला रस्ता तोच
म्हणून म्हणतो,
जरा थंडे दिमागसे सोच, ऐ मेरे दोस्त.

हे असे शिळेची अहिल्या होण्याचे कोर्सेस
त्यांचे ठराविक सिलॅबस आणि
सुधारकी विद्यापीठची मोहोर
यातून कुणाचं होतेय शिक्षण?
अशा पदवीदानांच्या डगल्यांनी झाकून शरीर
किती काळ झळकशील मातीच्या भिंतींवर?
मला वाटलं होतं
भिंतीशीच घेशील टक्कर

स्वातंत्र्य कुणी देत नाही माझ्या मैत्रिणी,
ते मिळवावं लागतं
कुणी ते पाणी पेटवून मिळवतं
कुणी ते मीठ उचलून मिळवतं
तू कशाची तयारी केली आहेस मैत्रिणी?

अस्पृश्यांच्या पंगतीत बसवलेली तू
किंचीत सुधारकीच्या स्पर्शानेही
किती मोहरतेस तू!
कसे फुलतात लगेच तुझ्या गाली गुलाब
आणि कशी गातेस तू गोड गोड गाणी
गणिकांच्या बाजारापासून
लेदर करंसीच्या करंट मार्केटपर्यंत
कशी घेतेस तू ही xxx गाढवं अंगावर
किती अमोघ हे तुझं सामर्थ्य
ट्रॅक बदलून मी म्हणू का तुझ्यासाठी वंदे मातरम

बेलगाम शुक्रजंतूंच्या फौजा
निर्वासितांच्या लोंढ्यांसारख्या
अखिल करूणेने तू घेतेस सामावून
तुझ्या ओटीपोटात आणि
तुझ्या योनीमार्गावर सनातनी पहारे बसवून
श्रीमंत राष्ट्रांच्या फौजांसारखी
त्यांची दबावयुक्त घुसखोरी
कुठल्याही नवीन भोगोलिक सीमा भेदून
हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कट कारस्थान
तुझ्या लक्षात कसं येत नाही माझ्या मैत्रिणी

विसर तुझी काया, विसर तुझी माया
विसर तू होतीस शतकानुशतकांची आया

तू किती सहज चुलीत घातलेस
तुझ्या जवळचे होते नव्हते आरडीएक्स
तू साक्षात ह्यूमन बॉम्ब
सती म्हणून चितेवर चढत होतीस तेव्हापासून

आता फक्त एक कर
जळत्या अंगानिशी उडी बाहेर मार
लग्न आडवं आलं त्याला मिठी मार
कुटूंब आडवं आलं त्याला मिठी मार
संस्कृती आडवी आली तर तिला मिठी मार
आता आग बाहेर येऊ दे
आगीला शरण जाऊ नकोस
आगीवर हो स्वार

माझ्या मैत्रिणी,
एकवार तरी आवाज चढवून म्हण,
भाड में गया तेरा चूल्हा,
भाड में गयी तेरी संतान
मै तो चली, जिधर चले रस्ता

मी किती अधिरतेने वाट पाहतोय
तू करणाऱ्या स्फोटाची
उत्तुंग इमारतीसारखे पुरूषी लिंग गंड
नामशेष होताना,
उडणाऱ्या धुराळ्यातही
मी जावाचे कान करून ऐकत राहीन
तुझ्या विजयी टापांचे आवाज
त्यातूनही जमलंच तर
पुरूषी साम्राज्य जळताना
निरो व्हायला आवडेल मला
मी फिडेलवर तुझ्या मुक्तीचा गाणे वाजवीन

नीरो, साम्राज्य, फिडेल
सगळ्याच कंसेप्ट
बदलत जातानाची धुंवाधार बारिश
किती आतुरतेने मी वाट पाहतो आहे
माझ्या मैत्रिणी,
एका टोटल डिझास्टरची
तुझ्याकडून.

– संजय पवार (writingwala@gmail.com)

One Comment

  1. xxx says:

    Very nicе post. I just stumbled սpon your weЬlog
    and wanted to say that I’ve truly enjoyed sսrfing around your blog posts.
    After all I ԝill bе subscribing to your feed and I hope you write again very soon!

Leave a Comment