अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थी विसर्जन करणाऱ्या नमिता भट्टाचार्य कोण आहेत?

सौजन्य- बीबीसी (मराठी), महाराष्ट्र टाइम्स

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं हरिद्वार येथे अस्थिविसर्जन झालं. वाजपेयींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी गंगा नदीत अस्थिविसर्जन केलं.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत याप्रसंगी उपस्थित होते. नमिता भट्टाचार्य यांनीच वाजपेयींना मुखाग्नी दिला होता. पण नमिता भट्टाचार्य कोण आहेत? आणि त्यांचं वाजपेयींशी काय नातं आहे?

नमिता राजकुमारी कौल आणि प्राध्यापक B. N. कौल यांची मुलगी आहे. त्यांना वाजपेयींनी दत्तक घेतलं होतं.

वाजपेयी पंतप्रधान असताना नमिता यांचे पती ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होते. त्यांचा हॉटेलचा व्यवसायही होता. “वाजपेयींच्या कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र, सचिव N.K. सिंह यांच्यानंतर तिसरी महत्त्वाची व्यक्ती रंजन भट्टाचार्य होती,” असं ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता एका लेखात सांगतात.

आपली मुलगी आणि जावई यांच्यावर वाजपेयींना खूप विश्वास होता, असं मेहता लिहितात.

वाजपेयी पंतप्रधानपदी असेपर्यंत 7 रेस कोर्स रोड या निवासस्थानी नमिता आणि रंजन यांची मजबूत पकड होती. आजीवन अविवाहित राहिलेल्या अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांचे नातेसंबंध नेहमी चर्चेत राहिले. असं असलं तरी, वाजपेयी या नातेसंबंधांवर कधीच बोलले नाहीत.

विनोद मेहतांच्या लेखानुसार, वाजपेयी पंतप्रधान असताना राजकुमारी कौल या मुलगी नमिता आणि जावई रंजन यांच्यासोबत पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहत असत.

‘मी अविवाहित आहे पण ब्रह्मचारी नाही’

अटलजींचं राजकीय जीवन हे एखाद्या खुल्या पुस्तकासारखं होतं. विरोधकही त्यांचा आदर करत.

Image copyright Getty Images

पण अटलजींचं वैयक्तिक आयुष्य अथवा प्रेमरुपी आयुष्य तितकंच छुपं राहिलं.

वाजपेयी यांनी लग्न केलं नाही. पण जेव्हा लग्नाशी संबंधित प्रश्न त्यांना विचारलं गेला, तेव्हा त्यांचं उत्तर होतं की, “मी अविवाहित आहे, पण ब्रह्मचारी नाही.”

एक ओजस्वी नेता, कवी, स्वतंत्र भारताचे एक मोठे नेते आणि तीनदा पंतप्रधान बनलेले वाजपेयी आयुष्यभर एकटेच होते का?

वाजपेयी यांचं कुटुंब

वाजपेयी यांच्या कुटुंबाबद्दल दबक्या आवाजात नेहमी चर्चा होत होती, पण त्याचा परिणाम त्यांच्या राजकारणावर झाला नाही.

वाजपेयी यांचं नाव त्यांची कॉलेजची मैत्रीण असलेल्या राजकुमारी कौल यांच्याशी नेहमी जोडलं गेलं. दोघंही ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये (राणी लक्ष्मीबाई कॉलेज) शिकत होते.

 ( हा फोटो 2003च्या चीन दौऱ्यातला आहे. यात वाजपेयींच्यासोबत त्यांची दत्तक मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिका आणि जावई रंजन भट्टाचार्य उपस्थित आहेत.)

नंतर राजकुमारी कौल यांनी दिल्ली विद्यापिठात प्राध्यापक असलेल्या बी. एन. कौल यांच्याशी लग्न केलं.

वाजपेयी हे राजकुमारी कौल यांच्याप्रमाणेच त्यांच्या पतीचेही चांगले मित्र होते.

जुन्या आठवणींना उजाळा देताना पुष्पेश पंत सांगतात, “50 वर्षांपूर्वी मी दिल्लीतल्या रामजस कॉलेजमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. प्राध्यापक कौल हॉस्टेलचे वॉर्डन होते. छोटा भाऊ मानत त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांसाठी कौल यांचं व्यक्तिमत्व वात्सल्यपूर्ण होतं.”

“वाजपेयी हे कौल कुटुंबाचे मित्र होते. जेव्हा ते कौल यांच्या घरी असत तेव्हा आपण एक मोठा नेता आहोत, अशा आविर्भावात वावरत नसत. विद्यार्थ्यांसाठी अनौपचारिकरित्या जे जेवण बनत असे तेच वाजपेयी खात असत,” पंत पुढे सांगतात.

पंतप्रधान कार्यालयात श्रीमती कौल

प्राध्यापक कौल अमेरिकेला निघून गेल्यानंतर श्रीमती कौल वाजपेयी यांच्या निवासस्थानी राहायला आल्या.

वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर कौल यांचं कुटुंब तत्कालिन 7 रेस कोर्स रोडवरील पंतप्रधानांच्या निवासस्थानीच राहत होतं. कौल यांना 2 मुली होत्या. यातली लहान मुलगी नमिता यांना वाजपेयी यांनी दत्तक घेतलं होतं.


वाजपेयी आणि कौल यांनी कधीच आपल्या नात्याला नाव दिलं नाही. “मला आणि अटल यांना आपल्या नात्याला काही नाव द्यावं, अशी कधीच आवश्यकता वाटली नाही,” असं राजकुमारी कौल यांनी सैवी पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

वाजपेयी यांच्या जीवनावर कौल यांचा किती परिणाम होता, याची माहिती आम्हाला करण थापर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘डेविल्स अॅडव्होकेट: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकातून मिळाली.

“वाजपेयी यांची मुलाखत घेण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची असल्यास नेहमी कौल यांच्याशीच बोलावं लागायचं. कौल यांनी मुलाखतीसाठी हो म्हटलं तर मग वाजपेयीसुद्धा नकार देत नसत,” असं करण लिहितात.

2014मध्ये राजकुमारी कौल यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाल कृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि रवी शंकर प्रसाद हजर होते.


कौल यांच्या निधनानंतर काही दिवसांनी बीबीसीनं त्यांची मैत्रीण तलत झमीर यांच्याशी चर्चा केली.

“कौल खूप सुंदर काश्मिरी महिला होत्या. खूपच गोड बोलायच्या. उर्दू तर अस्खलित होतं त्यांचं. मी जेव्हाही पंतप्रधान कार्यालयात त्यांना भेटायला जायचे तेव्हा सर्व लोक त्यांना माताजी म्हणून हाक मारायचे,” झमीर सांगतात.

“अटलजींच्या जेवणाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. जेवायला काय बनवायला हवं, असं त्यांना स्वयंपाकी विचारत असे. त्यांना टीव्ही पाहायला प्रचंड आवडायचं आणि मालिकांवर चर्चा करायलाही. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा जन्म झाला तेव्हा आपण त्यांना पाहण्यासाठी दवाखान्यात गेलो होतो, कारण अख्तर यांचे वडील जानिसार अख्तर ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजात आम्हाला शिकवायला होते असं कौल सांगत. जावेद यांच्याशी त्या सतत संपर्कात असत,” झमीर पुढे सांगतात.

अटल आणि कौल यांच्या नात्याला काही नाव नव्हतं. पण या नात्याचे अनेक किस्से राजकीय नेत्यांमध्ये आणि पत्रकारांकडे आहेत.

वाजपेयींनी कौल यांच्या मुलीला दत्तक घेतलं, पण राजकुमारी कौल यांच्याबरोबर असलेल्या नात्याबद्दल त्यांनी नेहमीच मौन धारण करणं पसंत केलं. या नात्याबद्दल कदाचित वाजपेयींनी आपल्याच या ओळींमध्ये सर्व काही सांगितलं असेल…

जन्म-मरण अविरत फेरा

जीवन बंजारों का डेरा

आज यहाँ, कल कहाँ कूच है

कौन जानता किधर सवेरा

अंधियारा आकाश असीमित,प्राणों के पंखों को तौलें!

अपने ही मन से कुछ बोलें!

एक सुफळ संपूर्ण प्रेमकहाणी…

विजय चोरमोरे

राजधानी दिल्लीतल्या वरिष्ठ राजकीय वर्तुळात राजकुमारी कौल यांना सगळे ओळखत होते. त्यांचं निधन चार मे २०१४ रोजी झालं. त्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं पहिल्या पानावर सविस्तर प्रसिद्ध केली. त्यानंतर सर्वसामान्यांना राजकुमारी कौल यांच्याबद्दल कळलं. एका अज्ञात प्रेमकहानीच्या पुस्तकाची काही पानं उलगडली गेली. राजकुमारी कौल यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं, तेव्हा त्यासंदर्भात जी प्रेसनोट काढण्यात आली होती त्यामध्ये, ‘वाजपेयी यांच्या कुटुंबातील सदस्य’ असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता.

खरोखर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाचा त्या अविभाज्य भाग होत्या. चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांची वाजपेयी यांच्यासोबत मैत्री होती. पती प्रा. बी. एन. कौल हयात असताना वाजपेयी यांनी त्या दोघांसोबत खूप काळ व्यतीत केला. प्रा. कौल यांच्या निधनानंतर वाजपेयी यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा स्वीकार केला. त्या वाजपेयी यांच्या घरातल्या महत्त्वाच्या व्यक्ति बनल्या. अशी व्यक्ती सत्तेच्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींमध्ये ढवळाढवळ करीत असते आणि त्यामुळे वादग्रस्त ठरते. परंत राजकुमारी कौल यांनी राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवले आणि संबंध केवळ व्यक्तिगत पातळीवरच जपले. त्याला छान कौटुंबिक उबदारपणाचे आवरण दिले.
अटलबिहारी वाजपेयींसाठी येणारे फोन राजकुमारी कौल याच घेत होत्या. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आगत-स्वागतही त्याच करायच्या. त्यांचं निधन झालं तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धामधुमीचा काळ होता. त्यावेळच्या व्यस्ततेतूनही वेळ काढून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वाजपेयींच्या घरी  जाऊन त्यांना आदरांजली वाहिली होती. यावरून राजकुमारी कौल यांचं वाजपेयींच्या कुटुंबातलं स्थान किती महत्त्वाचं आणि सन्मानाचं होतं, हे लक्षात येतं.

राजकुमारी कौल आणि अटलबिहारी वाजपेयी यांची ही कहाणी एखाद्या चित्रपटाची कथा बनावी अशी  तरल होती. त्यातली तरलता आणि त्या कहानीचा खानदानी आब अखेरपर्यंत टिकून राहिला. सोशल मीडियाच्या सवंग कालखंडातही त्याला गॉसिपचे स्वरुप आले नाही, तसे कुणी देण्याचा प्रयत्नही केला नाही. अटलजींचं आदरणीय आणि निर्मळ व्यक्तिमत्त्वच त्याला कारणीभूत होतं.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या व्यस्ततेमुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी राजकुमारी कौल यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. बाकी भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. ‘बहुत ममता से भरी हुयी थी’ ही सुषमा स्वराज यांची त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांचं नेमकं वर्णन करणारी होती.

वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. बाकीच्याही कुणी त्या फंदात पडले नाही. ‘मिसेस कौल’ म्हणूनच त्या स्वत:ची ओळख करून द्यायच्या आणि आपण वाजपेयींच्या मित्र असल्याचं सांगायच्या. वाजपेयी पंतप्रधान असताना ७, रेसकोर्स येथेही मिसेस कौल म्हणूनच त्या राहिल्या.

ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये (सध्याचे लक्ष्मीबाई कॉलेज) शिकत असल्यापासून अटलबिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांची ओळख होती. ग्वाल्हेरच्या मोरार परिसरात कौल यांचे कुटुंबीय राहात होते. नंतर त्यांनी शहर सोडले. कॉलेजमध्ये असताना वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांच्यात अनोखे भावबंध निर्माण झाले होते. परंतु काही कारणांनी ती प्रेमकहाणी अधुरीच राहिली. वाजपेयींनी राजकुमारींना प्रेमपत्र लिहून आपल्या भावना कळवल्या होत्या, परंतु त्यांना त्या पत्राचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळं ते मनातून दुखावले होते. पुढं दोघांचे रस्ते वेगळे झाले.
राजकुमारी यांचा विवाह प्रा. बी. एन. कौल यांच्याशी झाला. ते दिल्लीच्या रामजस कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि कॉलेजच्या होस्टेलचेही वॉर्डन होते. पतीसोबत राजकुमारी कौल दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर वाजपेयी यांच्याशी त्यांचा पुन्हा संपर्क सुरू झाला.

अलिकडेच दिवंगत झालेले ज्येष्ठ पत्रकार गिरीश निकम यांनी राजकुमारी कौल यांच्या निधनानंतर त्यांच्यासंदर्भातील काही आठवणींना उजाळा दिला होता.
भाजपचे बीट कव्हर करीत असताना निकम यांना वारंवार वाजपेयींच्या निवासस्थानी फोन करावा लागायचा. तो लँडलाइनचा जमाना होता. रात्री कधीही फोन केला तरी एक महिला फोन उचलायची. अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आवाज होता. निकम लिहितात, ‘मी त्यांना वाजपेयींच्याबद्दल विचारल्यावर त्या फोन होल्डवर ठेवायला सांगायच्या आणि नंतर वाजपेयी फोनवर यायचे. हे वारंवार घडायचं. अतिशय सभ्य, सुसंस्कृत आवाजात पलीकडून आपली ओळख करून दिली जायची, ‘मी मिसेस कौल बोलते.’ असं बऱ्याचवेळा घडलं. म्हणजे फोन मिसेस कौल उचलायच्या आणि थोड्या वेळानं वाजपेयी फोनवर यायचे.’
एके दिवशी निकम यांनी फोन केल्यावर ‘मिसेस कौल बोलते’, असा नेहमीचा आवाज आला. वाजपेयींच्याबद्दल विचारल्यावर त्या पुन्हा म्हणाल्या, ‘मी मिसेस कौल बोलतेय’. त्यावर कोणतंही कुतूहल न दाखवता निकम म्हणाले, ‘होय मॅडम, मला ठाऊक आहे.’ हे असं झाल्यावर नेहमीच्या आदबशीरपणे आणि आश्चर्यानं त्यांनी विचारलं, ‘तुम्हाला माहीत नसावं मी कोण आहे ते!’
‘नाही मॅडम’, निकम यांनी थोडं अपराधीपणानं उत्तर दिलं.
‘मी मिसेस कौल, राजकुमारी कौल. वाजपेयीजी आणि मी खूप वर्षांपासून म्हणजे चाळीस वर्षांपासून मित्र आहोत. तुम्हाला ठाऊक नाही?’ त्यांनी आश्चर्ययुक्त कुतूहलानं विचारलं.
‘ओह, सॉरी मॅडम, मला ठाऊक नव्हतं.’ निकम यांनी उत्तर दिलं. त्या हसल्या आणि त्यांनी वाजपेयी आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगितलं. त्या आणि त्यांच्या पतीसोबत वाजपेयी राहात असल्याच्या आठवणीही सांगितल्या.

वाजपेयींनी आपल्या कॉलेजच्या काळातील या मैत्रिणीबद्दल कधी सार्वजनिकरित्या काही सांगितलं नाही. एका मुलाखतीमध्ये राजकुमारी कौल म्हणाल्या होत्या की, ‘मला आणि अटलजींनाही कधी आपल्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली नाही.’

राजकीय, सामाजिक जीवनात अटलजींच्याबद्दल एवढा आदर होता, की या नात्याबद्दल कधी माध्यमांनी बातम्या रंगवल्या नाहीत किंवा राजकीय वर्तुळात कधी गॉसिपिंग झालं नाही. वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान झाले, त्या तिन्ही वेळेला त्यांचं घर मिसेस कौल आणि वाजपेयींची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य याच सांभाळत होत्या. वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांचं हे नातं वाजपेयींच्या कौटुंबिक आणि राजकीय वर्तुळातल्या नेत्यांनी सहज स्वीकारलं होतं.

कोणत्याही प्रेमकहाणीचा शेवट दोन प्रकारे होत असतो. एकतर ताटातूट होते. किंवा दोघं लग्न करतात. वाजपेयी आणि राजकुमारी यांची प्रेमकहाणी वेगळी आहे. दोघांची ताटातूट झाली. पैकी एकाचं लग्न झालं. त्यानंतर दोघं भेटले. अखेरच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले. त्याअर्थानं विचार केला, तर ही प्रेम कहाणी सुफळ संपूर्ण ठरली, असं म्हणता येईल.

मे २०१४ मध्ये राजकुमारी कौल गेल्या.  १६ ऑगस्ट २०१८ अटलजींनी अखेरचा श्वास घेतला.

– विजय चोरमारे

सौजन्य- बीबीसी (मराठी), महाराष्ट्र टाइम्स

 

Previous articleबहुमताचे असत्य, अल्पमताचे सत्य
Next articleदुर्जन माणसा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here