केसावर भांडे…

-सारिका उबाळे

‘केसावर भांडे…’

“केसावर भांडे घ्या… केसावर भांडे…

चारशे रुपये किलो घ्या… केसावर भांडे…”

चिरक्या घोगर्या आवाजात सकाळी सकाळीच आरोळी देत फिरतात त्या दर रविवारी.खांद्याला कापडी झोळी, त्यात छोटी छोटी स्टीलची भांडी, एका कप्प्यात जमा केलेले केस, एका हातात थोडी आकाराने मोठी असलेली भांडी,कडीचे डब्बे.अंगावर साधारण जुनीच वाटणारी साडी ,अंगापिंडाने मजबूत, बुटक्या बांध्याच्या,काळ्यासावळ्या,नीटस नाकाच्या,काळ्याभोर लांब केसांना तेल लावून चापूनचोपून घट्ट वेणी घातलेल्या, कधीतरी अंबाडा त्यात एखादं फूल खोचलेलं, उजवी नाकपुडी टोचलेल्या, कानात, नाकात बारीकशी गोल्डन फुले, हातात एक दोन काचेच्या बांगड्या किंवा बेन्टेक्सची एखादी. पायात चपला नाहीतच त्यांच्या.

थंडी ऊन वाऱ्यापावसातही. त्यांची कांती तुकतुकीत आणि मुलायम आहे.

‘है दीदी बाल है ?

‘ नही… बाल तो नही है.

‘देखो दीदी दिखाव कितने है ?चारसो रुपये किलो है’

इतने बाल? एक किलो कहा से आयेंगे बाई,  ? ‘

नही है तो जमा करो दीदी,हम आते फिर.’ ‘और चोटे चोटे बर्तन भी है दिदी.चटाक दो चटाक बी लेते हम बाल. है क्या? लाव दिदी.’

दुरून कुठून आंध्रप्रदेश, तेलंगणातून केस जमा करण्यासाठी वेगवेगळ्या शहरात, गावात येऊन राहिलेली त्यांची कुटुंबे रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत पाल मांडून नाहीतर एखादी स्वस्तातली स्वस्त खोली भाड्याने घेऊन राहतात. कुठल्यातरी परक्या शहरात परक्या गावात आपल्या गावच्या इतर नातेवाईकांसोबत. कधी नवरा कधी भाऊ असतो सोबतीला. नाहीतर एक- दोन लहान मुलांना घेऊन एकट्याच राहतात. दोनेक महिने किंवा त्यापेक्षा जास्त राहून,वेगवेगळ्या कॉलनीत फिरून केस गोळा करत राहायचं. त्याबदल्यात छोटी-मोठी स्टीलची भांडी वाट्या- टोपल्या द्यायच्या.ही भांडी अतिशय पातळ आणि हलक्या दर्जाची असली तरी घरोघरच्या काटकसरी बाया गळणाऱ्या आणि फेकून देण्यात येणाऱ्या केसांच्या बदल्यात भांडी मिळत असल्यामुळे त्यासाठी त्यांची वाट पहातात.

” केसांवर भांडे… घ्या केसांवर भांडे… चारशे रुप्याला किलो केसावर भांडे …” एक जण बोलवते तिला, “ओ बाई इकडे या….” खूप दिवसांपासून निगुतीने जपून ठेवलेले छटाक दोन छटाक केस घेऊन येते घरातून,एका कॅरीबॅगमध्ये ठेवलेले, गुंता झालेले, पांढुरके -भुरके बोटांवर गुंडाळून वेटोळे केलेले .देते तिच्या हातात. “देखो इतने है, क्या देती इसका ?” ती बोटांनी, नजरेनीच वजनाचा अंदाज घेते. पिशवीतूनन पातळ, डिझायनर, स्टीलच्या दोन मोठ्या वाट्या त्या बाईला देऊ करते. तर केस देणारी बाई ते न घेता दुसऱ्या मोठ्या भांड्यासाठी तिच्याशी तंटत राहते .’इत्तेसे बाल मे इतना ही आयेगा दीदी’.

“क्युँ वो बडा देव ना …”

‘ अं अं…..कंपनी नायी देती दिदी. पैसे काटती हमारे.’

“कुछ नही होता, दे दो बडावाला.” नाही हो करत शेवटी केस देणारी बाई मोठ्ठ भांड घेतेच तिच्याकडून, छटाकभर केसांच्या बदल्यात. विजयी मुद्रेने स्मित हास्य करत जुजबी चौकशी करते तिच्या गावची घराची मुलाबाळांची. खरंतर त्या दोघींनाही एकमेकींची भाषा येत नसते पण व्यवहारात पुरतं जुजबी हिंदी येत असतं त्यांना.तोडक्या मोडक्या हिंदीचा आधार घेत बोलत, तंटत राहातात दोघीही.

केस देणारीच्या अंगणात चपला असतात खूप. नव्या-जुन्या, दोरीवर कपडे असतात वाळत घातलेले, केस विकणारी निरखत असते अंगण,रांगोळी,फुलांच्या, झाडांच्या कुंड्या, नव्या-जुन्या चपला, दोरीवरचे लहान मुलांचे कपडे. तिला आठवतो उसवल्या कपड्यातला आपला कृश मुलगा घरी वाट पाहणारा. ती पाहात राहते दोरीवरचा वाळत घातलेला शाळेचा युनिफॉर्म.कधीच शाळेत न जाऊ शकणाऱ्या आपल्या मुलाच्या मापाचा आहे का, नजरेनीच जोखून घेते आणि पाहून घेते तो कसा दिसेल अशा कपड्यात. केस देणाऱ्या बाईची लालसा वाढत जाते अजून. या भांड्याऐवजी एक दुसरा मोठा कडीचा डब्बा मागु लागते ती तिला .

“गिनंते एठंकलुकू इन्ता डब्बा पेद्दा'( एवढुश्या केसात एवढं मोठं भांड मागत आहे बाई )

‘गिन्ना इसते इपुडू डब्बा आडगुतुनदी'(वाटी दिली तर आता डब्बा मागते)

आ रे इ आमे मस्तु तेलवीदी आनपीसतुन्नयी'( वा रे वा खुपच हुशार दिसते ही)

‘पो नेनू इया ‘(जा नाही देत)

‘नेनू येमना पिसदानया इन्ता पेद्दा डब्बा इयातंदूकू’ ( मी काय पागल आहे का एवढा मोठा डबा द्यायला)

हातातला केसांचा पुंजका झोळीतल्या कप्प्यात टाकत, अंगणावरची नजर काढत,थोडीशी धुमसतच माघारी वळते ती अनवाणी पायाने.

पुन्हा आरोळी देत चिरक्या घोगऱ्या आवाजात “केसावर भांडे घ्या… केसावर भांडे.. चारशे रुपये किलो घ्या केसावर भांडे..”

(पूर्वप्रसिद्धी – ‘मिळून साऱ्याजणी’)

…………………………

(सारिका उबाळे या नामवंत कवयित्री आहेत)

9423649202

[email protected]

Previous articleमुद्दा , कुणी पक्ष सोडण्याचा नाही !
Next articleनवनीत राणा यांचे बनावट जात प्रमाणपत्र: मुंबई उच्च न्यायालयाची निरीक्षणे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.