आपण सारे भयंकराच्या जबड्यात ….

-अतुल विडूळकर

————————–

देशात रोजचे कोरोनाचे रुग्ण लाखाच्या आसपास संख्येने सापडायला सुरुवात झाली आहे. येणारा काळ हा अति भयंकर असणार आहे, याचे दुर्दैवी पुरावे शेकड्याने देता येतील इतक्या करुण कहाण्या रोज कानावर आदळत आहे. सामान्य माणूस म्हणून आपल्या हातात काहीही उरलेले नाही. तुम्हाला साधा सर्दी ताप, त्यातून पुढे न्यूमोनिया आणि तुमच्या दुर्दैवाने श्वसनविकारासंबंधी त्रास असेल, तर तुमच्या हाती फक्त मरणाची वाट बघणं उरलेलं आहे.

हे मी अती नकारात्मक, वैफल्यग्रस्त मानसिकतेतून लिहीत नाही आहे. तर अनेक करुण कहाण्यामधून पुढे आलेले भयाण अनुभव आहेत.

आता दवाखान्यात बेड उरलेले नाहीत. सरकारी-खाजगी सारी आरोग्य यंत्रणा अपुरी पडायला लागलेली आहे. कोरोना पोजिटिव्ह असो की निगेटिव्ह, रुग्णाला वेळेत उपचार मिळतील याची कुठलीही खात्री नाही.

दोन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्ण आढळला की तो परिसर कडकडीत सील व्हायचा. तो आता भूतकाळ झाला आहे. प्रत्येक मोहल्यात एक अशा रीतीने आता रुग्ण सापडत आहेत. आपल्या भोवतीचं जग आणि आपण अत्यन्त Casual approach ने जगत आहोत. ही बेफिकरी जीवघेणी ठरत असतानाही डोळे उघडत नसतील तर उपाय नाही. ‘आपल्याला कोरोना होत नाही’, असा विश्वास असणाऱ्या लोकांबद्दल मला आदर आहे, पण भाऊ कोरोना गेला उडत; तुला सर्दी, ताप, खोकला, न्यूमोनिया होणार नाही याची तुला खात्री आहे का ? यापैकी काहीही एक आजार झाला तर तुझ्यावर उपचार करायला कुणी तयार आहे का, याची आधी माहिती घे !!

दररोज नव्याने गंभीररित्या भयाण होत जाणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण; केंद्र की राज्य सरकार, समाज की डॉक्टर, खाजगी की सरकारी यंत्रणा अशी चर्चा आज आता या क्षणाला फिजुल आहे. पण, सरकारी यंत्रणेने सुरुवातीला घेतलेले काही निर्णय आज जीवावर उठल्याचे स्पष्ट आहे.

कोरोनाचा उद्रेक व्ह्यायला सुरुवात झाली असतानाच, अत्यंत सिरियसली सरकारने हा विषय हाताळला. त्याबाबद्दल दुमत नाही. पण, एक दिवस असा येईल की देशात रोजचे लाखभर आणि आपल्या गावात दोन-अडीचशे पेशंट मिळतील, नागपूर-पुणे सारख्या शहरात रोजचे दीड-दोन हजार रुग्ण सापडतील याचा अंदाज कुणालाच नव्हता. इतक्या प्रचंड संख्येत ऑन रेकॉर्ड, with testing reports रुग्ण सापडत असतानाही, ‘कोरोना नावाचं काहीच नाही, हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे’, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या लोकांची संख्या कोरोनारुग्णांच्या तुलनेत दुप्पट आहे. त्या लोकांची अर्थातच दखल घेण्याची गरज नाही. पण, पोजिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये टेस्ट पोजिटिव्ह येण्याचे false percentage किती आहे, याची चर्चा न करणे हे आणखी एक मोठं भयंकर आहे.

उद्रेकाच्या सुरुवातीला एक निर्णय ऐकायला मिळाला. आता त्याचा स्रोत शोधतो म्हटलं तर अधिकृत असं काही हाती लागत नाही. “सर्दी, ताप, खोकला या आजाराचे गोळ्या-औषध डॉक्टरच्या चिट्ठीशिवाय देणे बंद झाले. मेडिकल स्टोरच्या मालकांना तशा कडक सूचना मिळाल्या. दुसरीकडे प्रत्येक गावात, शहरात असलेल्या MBBS/BAMS फॅमिली डॉक्टरांनी या आजाराचे रुग्ण तपासणे बंद केले. असे रुग्ण सरकारने उभारलेल्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये पाठवणे अनिवार्य करण्यात आलं. कोरोनाबाधितांची लक्षणे आणि या आजारातील लक्षणे सारखी असल्याने सरकार रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नव्हते, हे स्वाभाविक आहे. पण, प्रत्येक सर्दी ताप खोकल्याचा पेशंट हा कोरोनाचा रुग्ण असेलच असं नाही, ही जनजागृती कुणीच केली नाही.

दुसऱ्या बाजूने कोरोना रुग्ण आणि त्याच्या कुटुंबावर अघोषित सामाजिक बहिष्काराची परिस्थिती निर्माण झाली. ज्यांनी दिवे लावले, टाळ्या वाजवल्या त्यांनीही ही बेवकुफी केली. पुढे त्यांनाही या बहिष्कार आणि बदनामीची भीती वाटायला लागली. परिणामी, लोक सर्दी ताप अंगावर काढायला लागले. मेडिकलवाले गोळी देणार नाही, फॅमिली डॉक्टर उपचार करणार नाही, सरकारी दवाखान्यात गेलो तर कोरोना पोजिटिव्ह यायची भीती, मग बदनामी आणि बहिष्कार अशा कात्रीत सापडलेले अनेक जण आपला आजार वाढवून बसले.

लॉकडाऊन कडकडीत पाळणारे, कुणाच्याही संपर्कात न आलेले पण सर्दी ताप झालेले असे अनेक लोक केवळ गोळ्या, औषध, उपचार न मिळाल्याने आजार बळावून कोरोनाच्या दाढेत गेले आहेत.

प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. कोरोना संसर्गाची शक्यता वाटत असताना कुणी घरात लपून बसले नसते. पण भीतीचे जे वातावरण मीडियाने तयार केले, त्यामुळे लोकांना धड सर्दी तापाची देखील ट्रीटमेंट मिळाली नाही.

दुसरीकडे, रुग्णसंख्या आटोक्यात असताना सरकारने उपचाराची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. भयाचे वातावरण निर्माण झालेच होते. त्यामुळे खाजगी डॉक्टरने दवाखाना बंदची पाटी लगोलग लावली.  मी एक पत्रकार म्हणून दरवर्षी “जिल्हा तापाने फणफणला” अशा अनेक बातम्या दर पावसाळ्यात लिहिल्या. वाचक म्हणून तुम्हालाही अशा अनेक बातम्या आठवत असतील. सरकारी दवाखान्यात प्रसूतीला आलेल्या महिलेला बेड न मिळाल्याने जमिनीवर झोपावे लागल्याची उदाहरणे हजारो आहेत. अशी परिस्थिती असताना आरोग्य आणीबाणी काळात सरकारी यंत्रणा खरोखरच हे आव्हान पेलायला सक्षम होती का, याचं उत्तर सरकारी यंत्रणेने शोधायला पाहिजे. त्यामुळे आज कोरोना रुग्णाला बेड मिळत नाही, याची नवल कसे वाटणार ?

सरकारी यंत्रणा अपुरी पडत असताना खाजगी यंत्रणेबाबत बोलणं कुणालाही परवडणारं नाही. अधिक माहितीसाठी आमदार अमोल मिटकरी आणि यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते प्रा. घनश्याम दरणे सरांची व्हायरल झालेली पोस्ट आवर्जून वाचा. खाजगी हॉस्पिटलमधले दर निश्चित केल्याचा दावा सरकार करते. पण अजूनही “आधी 2 लाख रुपये भरा, मग ऍडमिट करून घेतो”, असं उत्तर लोकांना ऐकावं लागत आहे. तुम्ही जास्तच कायदा शिकवला तर बेड शिल्लक नाहीत म्हणून उत्तर मिळते.

या सर्व भयाण स्थितीमध्ये सर्वात गंभीर, जीवघेणी गोष्ट असेल तर ती म्हणजे Non-Covid पण गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची हेळसांड. असे रुग्ण आपापल्या गावातील सरकारी रुग्णालयातून कोरोना टेस्ट करून गेले असले तरी त्यांची संबंधीत खाजगी डॉक्टर पुन्हा टेस्ट करतो. खाजगी लॅबोरेटरी मधले हे रिपोर्ट कसे येईल, हे फक्त चित्रगुप्तच्या हातात आहे. एकदा तुमच्यावर कोविड पोजिटिव्ह चा शिक्का बसला की मग तुम्ही कितीही नास्तिक असला तरीही तुम्हाला देव आठवल्याशिवाय राहत नाही.

कोरोना पोजिटिव्ह म्हणून तुम्हाला कोविड सेंटरमध्ये पाठवलं जातं. तिथे तुम्ही कोविडने मरणार नाही हे पक्के असले तरीही तुमच्या आजारांवर आवश्यक ती ट्रीटमेंट मिळेलच का, याची खात्री कुणीही देऊ शकणार नाही. तिथे कोरोनाच्या ट्रीटमेंटला प्राधान्य असते. तुमचा आजार बळावला तर आयसीयूमध्ये शिफ्ट करतात. पण, आता आयसीयू फुल्ल झाले आहेत……..

यापुढे लिहिण्यासारखं काही उरत नाही.

(लेखक ‘मीडिया वॉच’ चे उपसंपादक आहेत)

8408858561

Previous articleसमुद्राच्या पोटात नक्की काय आहे?
Next articleमाझा मराठवाडा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here