इस्रोचं अभिमानास्पद यश आणि इस्रोप्रमुखांचा देवभोळेपणा

अंतराळ म्हणजे स्वर्ग आणि अंतराळविश्‍व म्हणजे आपल्या ३३ कोटी देवांच्या राहण्याची जागा, एवढीच अंतराळ या विषयातील आपली समज भाबडी आणि मूर्खपणाची असल्याने या क्षेत्रात घडणार्‍या कुठल्याही घडामोडींशी बहुतांश भारतीयांना काही देणंघेणं नसतं. त्यामुळेच भारताने जीएसएलव्ही (जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल) अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याचं काय महत्त्व आहे, हेसुद्धा अनेकांना माहीत असण्याची शक्यता फारच कमी आहे. राजकारण्यांच्या भानगडी, सिनेस्टारची लफडी आणि क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर चर्चा हा या देशाचा कायमस्वरूपी उद्योग असल्याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन माहिती घेण्याची तसदी तशीही येथे कोणी घेत नाही. वैज्ञानिक प्रगतीचा लौकिक आयुष्य सुखकर करण्यासाठी पुरेपूर फायदा घ्यायचा. मात्र आपल्या विचारपद्धतीत विज्ञान वा वैज्ञानिक दृष्टिकोनाला चुकूनही स्थान मिळू द्यायचं नाही, हे आपलं एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य. अशा वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय ‘निरुत्साही’ असलेल्या या देशातील वैज्ञानिक मात्र एका निष्ठेने व सातत्याने आपलं काम करत असतात. 


भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) वैज्ञानिकांनी अशाच पद्धतीने निराश न होता केलेल्या सातत्यपूर्ण मेहनतीतून जीएसएलव्हीचं यश खेचून आणलं आहे. अशा प्रकारचा अग्निबाण असणारा भारत हा अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीननंतर जगातील केवळ सहावा देश आहे. यावरून हे यश किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल.

दळणवळण, हवामानाचा अंदाज, मॅपिंग, हेरगिरी अशा अनेक कारणांसाठी उपयोगात आणले जाणारे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यासाठी पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल) आणि जीएसएलव्ही असे दोन प्रकारचे अग्निबाण वापरले जातात. पीएसएलव्ही अग्निबाणाचे आपण गेल्या २0 वर्षांत जवळपास २५ वेळा यशस्वी प्रक्षेपण केले आहे. त्याच्या साहाय्याने दोनशे किलोपर्यंतच्या वजनाचे उपग्रह आपण पृथ्वीलगतच्या कक्षेत सोडले होते. मात्र त्यापेक्षा अधिक वजनाचे आणि दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती घडवू शकणारे बहुउद्देशीय उपग्रह अंतराळात पाठविण्यासाठी जीएसएलव्ही अग्निबाणाची आवश्यकता होती. जीएसएलव्हीसाठी आवश्यक असणारे अवकाश प्रक्षेपक तंत्रज्ञान आपण अमेरिका, फ्रान्सला मागितले होते. मात्र भारताने अणुबॉम्बची चाचणी केल्याचा आकस मनात असल्याने कुठले तरी थातूरमातूर कारण देऊन त्यांनी भारताला हे तंत्रज्ञान नाकारले. त्यानंतर भारताने रशियाकडे धाव घेतली. मात्र अमेरिकेने रशियावरही दबाब आणला. प्रक्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी झालेल्या आंतरराष्ट्रीय कराराची आठवण करून देऊन त्यांनी रशियाला आपल्याला मदत करण्यापासून रोखले. रशियानेही हात वर केल्याने आपली परिस्थिती मोठी अवघड झाली. आपल्याला आपले वजनी उपग्रह पाठविण्यासाठी फ्रॉन्सच्या ‘एरिअन’ या अंतराळ संस्थेची मदत घ्यावी लागत होती. ही संस्था एक उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी सरासरी ४00 कोटी रुपये आकारत असते. भारतासारख्या गरीब देशासाठी ही किंमत खूप अधिक होती.

शेवटी इस्रोने स्वत:च हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथे याविषयात संशोधन सुरू झाले. काही वर्षांच्या संशोधनानंतर भारताने १५ एप्रिल २0१0 ला जीएसएलव्ही ४ चे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. मात्र उड्डाणानंतर काही क्षणातच उपग्रहास वाहून नेणार्‍या प्रक्षेपणाने मान टाकली आणि ते समुद्रात कोसळले. भारतीय वैज्ञानिक आणि इस्रोसाठी हा निराशाजनक क्षण होता. त्यानंतर गेल्या वर्षी दुसर्‍यांदा प्रय▪केला. तोसुद्धा फसला. दोन्ही वेळा अग्निबाणातील क्रायोजेनिक इंजिनाने दगा दिला होता. जीएसएलव्हीच्या उड्डाणात क्रायोजेनिक इंजिनाची सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका असते. हे इंजिन प्रक्षेपणाच्या शेवटच्या टप्प्यात वापरण्यात येते. ज्या वेळी प्रक्षेपकाच्या पहिल्या दोन टप्प्यांचे ज्वलन पूर्ण झाले असते, अशा वेळी दोनशे ते चारशे किलो वजनाच्या उपग्रहाला अपेक्षित कक्षेत पोहोचविण्यासाठी सुमारे ८00 सेकंद ढकलत नेऊ शकेल, अशी यंत्रणा आवश्यक असते. हेच काम क्रायोजेनिक इंजिन पार पाडते. या इंजिनाला आवश्यक असलेले इंधन अतिशय थंड असल्याने त्याला क्रायोजेनिक इंजिन म्हणतात. या इंजिनामध्ये इंधन म्हणून उणे २५३ अंश तापमान असलेले द्रवरूप हायड्रोजन, तर ऑक्सिडायझर म्हणून उणे १८३ अंश तापमान असलेले द्रवरूप ऑक्सिजन वापरले जाते. द्रवरूप हायड्रोजन व ऑक्सिजनचे एकत्रित ज्वलन करून जड उपग्रहाला ढकलण्यासाठी आवश्यक शक्ती निर्माण केली जाते. अवकाश क्षेत्रातील हे अतिशय अवघड तंत्रज्ञान मानले जाते. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर उपग्रह हे पृथ्वीपासून जवळपास ३६ हजार किमी अंतरावर प्रस्थापित करावयाचे असतात. उपग्रहाची भ्रमण कक्षा भूस्थिर राहण्यासाठी त्याला पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून एवढय़ा अंतरावर न्यावे लागते. यात क्रायोजेनिक इंजिनाचा मोठा रोल असतो. हेच तंत्रज्ञान देण्यास अमेरिकेसह विकसित देश नकार देत होते. शेवटी दोन अपयशानंतर का होईना स्वदेशी क्रोयोजेनिक इंजिन तयार करण्यास आपल्याला यश मिळाले. जीएसएलव्हीचं हे यश भारतासाठी खूपच महत्त्वाचं आहे. यामुळे अंतराळ तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळविणार्‍या देशात तर आपला समावेश झालाच आहे, सोबतच आर्थिक लाभही मोठा होणार आहे. आतापर्यंत आपण आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी फ्रान्स आणि इतर देशाला पैसे मोजत होतो. आता केवळ अग्निबाण बांधणी आणि प्रक्षेपणाचा खर्च करून उपग्रहांचे प्रक्षेपण आपण करू शकणार आहोत. जीसॅट-६, जीसॅट-७ ए आणि जीसॅट-९ यापुढील उपग्रहांसोबतच चांद्रयान मोहिमेसाठीही हे अग्निबाण आपल्याला वापरता येणार आहे. यामुळे अब्जावधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. मात्र आनंद तेवढाच नाही. आता इतर देश त्यांच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी आपल्याकडे गर्दी करतील. र्जमनी, ब्रिटन व मलेशियाने तशी विचारणाही केली आहे. अमेरिका व फ्रान्सच्या अंतराळ संस्थेच्या तुलनेत इस्रोच्या माध्यमातून उपग्रह पाठविण्यासाठी खर्च कमी येणार असल्याने आता परदेशी चलन मोठय़ा प्रमाणात आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. या यशाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ व इस्रोचा सर्वांनाच अभिमान वाटायला हवा.

                                           वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनापासून दूरच

इस्रोचे यश आणि शास्त्रज्ञांच्या कौतुकाच्या बातम्यांनी सारी वर्तमानपत्रं सजली असताना इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन हे जीएसएलव्हीचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याबद्दल तिरूपती बालाजीच्या मंदिरात जाऊन बालाजीचे आभार मानून आल्याची बातमी व छायाचित्रही दुसर्‍या दिवशी पाहायला मिळाले. हे तेच राधाकृष्णन आहेत, जे स्वत:ला शास्त्रज्ञ म्हणवून घेतानाही इस्रोच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेअगोदर प्रक्षेपण यानाची प्रतिकृती तिरूपती बालाजीच्या चरणी वाहतात आणि प्रार्थना करतात. बालाजीमुळे इस्रोच्या मोहिमा यशस्वी होतात, असं त्यांना मनोभावे वाटतं. आता तिरूपतीचा बालाजीच जर इस्रोची मोहीम यशस्वी करणार असेल, तर इस्रोची गरज काय? शास्त्रज्ञ नेमण्याची काय गरज? मोहीम यशस्वी झाली, तर बालाजींनी केली मग गेल्या दोनवेळा अपयश आलं, ते कोणामुळं आलं? अर्थात असे प्रश्न राधाकृष्णनसह आपल्याकडे कोणालाही पडणार नाही. हे असं वागणं हे राधाकृष्णनच्या श्रद्धेचा भाग आहे, असं सर्मथन केलं जाईल. यात काहीही चुकीचं नाही, त्याची चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही, असं ठासून सांगितलं जाईल. मात्र इतर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने हे केलं असतं, तर समजून घेता आलं असतं, पण अंतराळ संशोधन संस्थेचा प्रमुख हे असं करतो, याचं मोठं आश्‍चर्य वाटतं. अर्थात, यातही नवल काही नाही. असं करणारे आणि असा विश्‍वास बाळगणारे राधाकृष्णन हे काही पहिले शास्त्रज्ञ नाहीत. ज्यांचा आपण सारेच आदर करतो ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनीही आपल्या ‘अग्निपंख’ या आत्मचरित्रपर पुस्तकात अनेकदा अज्ञात शक्तीचे आभार मानले आहेत. ही अशी अतार्किक विचारसरणी विज्ञानाला मान्य नसली, विज्ञानविरोधी असली तरी तो आपल्या संस्काराचा भाग आहे. आपल्या सश्रद्ध वर्तणुकीचा, जगण्याचा अविभाज्य घटक आहे., हे येथे समजून घ्यावे लागते. सर्वसामान्य भारतीय माणूस असो वा शास्त्रज्ञ, त्याने आपल्या मेंदूचे दोन टप्पे करून टाकले आहेत. एका कप्प्याने तो विज्ञान शिकतो. प्रयोगशाळेत वैज्ञानिक प्रक्रिया वापरतो. त्याच्या आधारावर डॉक्टरेट मिळवितो. वैज्ञानिक म्हणून मान्यता प्राप्त करतो. इस्रोचा प्रमुख होतो. अंतराळ संशोधन संस्थेत मानाचं पद प्राप्त करतो. त्यावर पोट भरतो. मानसन्मान मिळवितो. राष्ट्रपतीही होतो. मात्र ज्यामुळे तो हे सारं मिळवितो त्या वैज्ञानिक प्रक्रिया विचारांना तो मेंदूच्या दुसर्‍या कप्प्यात मात्र अजिबात शिरकाव करू देत नाही. तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक विचार प्रत्यक्ष जीवनाचं भाग बनविणे त्याला आवश्यक वाटत नाही. याचं कारण म्हणजे लहान असतानापासून त्याच्यावर संस्कार असतात. ‘विज्ञान जेथे संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. त्या जगाला विज्ञानाचे नियम लागू पडत नाही.’ वगैरे..वगैरे.! राधाकृष्णन, डॉ. कलाम व इतरही शास्त्रज्ञ असे का वागतात, याचं उत्तर या संस्कारात आहे. उत्तर जरी मिळत असले तरी यातून मेसेज मात्र अतिशय चुकीचा जातो. एवढे मोठे शास्त्रज्ञ, तेसुद्धा पाहा, सारं श्रेय देवाला देतात., अशी उदाहरणं नवीन पिढीसमोर जातात. आपल्या वागणुकीतून वैज्ञानिक विचारांचा, तत्त्वज्ञानाचा अपमान होतो, हे मात्र शास्त्रज्ञांच्या गावीही नसतं. देव, दैव, नशीब, नियती, कर्मकांडाला प्राधान्य देणार्‍या देशात हे असंच व्हायचं. आपण मात्र वैज्ञानिक जगतातील एकच म्हण लक्षात ठेवायची. ती म्हणजे, ‘न्यूटन जे सिद्ध करतो, तेवढंच महत्त्वाचं. तो काय म्हणतो ते बिनमहत्त्वाचं.’

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे

कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleसाध्या माणसांच्या मोठय़ा कहाण्या
Next articleमराठा सेवा संघ बदलतो आहे?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.