उकळ चाटून दुष्काळ हटतो का?

-माणिक बालाजी मुंढे
……..
महारूद्र मंगनाळे पोटार्थी शेतकरी नाहीत. त्यांचं पोट शेतीवर नाही. ते रुढ कवीही नाहीत. पण ते पत्रकार आहेत. असे दुर्मिळ पत्रकार जे आता ना कुठल्या पेपरमध्ये दिसतात, ना टीव्ही चॅनल्समध्ये. त्यांची तीन पुस्तकं-‘रूद्रहटच्या फेसबूक नोंदी’, ‘शेतीचं दुखणं’ आणि ‘माळझरे’ हे त्याचा पुरावा आहेत. शेतीकडं ते एवढ्या डोळसपणे पहाऊ शकतात कारण ते हाडाचे शेतकरी नाहीत. तुम्हाला एखाद्या समस्येची उकल करायची असेल, प्रश्न सोडवायचा असेल तर अगोदर त्या समस्येच्या वर्तूळाबाहेर असायला लागतं किंवा मग आत राहूनही कोरड्या नजरेनं पहाता यायला हवं. कदाचित याच कारणामुळे शेती न कसणाऱ्यांना शेतीची जाण अधिक असते, खरी उत्तरं त्यांच्याकडे असतात. तुम्ही शरद जोशींचं उदाहरण घेऊ शकता. रूढ अर्थानं ते शेतकरी नव्हते म्हणून शेतीच्या प्रश्नांची उकल करण्यात ते समर्थ होते. मंगनाळेंचं ‘शेतीचं दुखणं’ असो की फेसबूक नोंदी, दोन्ही वाचताना त्यांच्या विचाराचं कुळ याच पंगतीतलं असल्याचं जाणवत राहातं.

शेतीचं दुखणं हे पुस्तक पाटपोट ९६ पानांचं आहे. पण गेल्या दोन दशकात गाव, खेतीबाडीत केवढी उलथापालथ झालीय हे अनुभवायचं असेल तर त्यातले सालगडी, जनावरांचा बाजार उठणार? माझा म्हशीपालनाचा अनुभव असे तीन लेख वाचले तरी आपला थरकाप होतो. सालगड्याचा आवाका तर एखाद्या कादंबरीएवढा आहे. अन्न सुरक्षा कायद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान करून केवढा मोठा ऐतखाऊ, आयंदी वर्ग तयार केलाय हे उदाहरणासह वाचणं डोक्यात उजेड पाडणारं आहे. शंभर रूपयात महिन्याभराचा गहू, तांदूळ, मका मिळतो, ३५ रूपये किलोने तुरदाळ मिळतेय, आठवड्यातून दोन तीन दिवस काम केलं की खाण्यासाठीच्या पुरक गोष्टी आणि दारूची सोय होते, घरात रंगीत टीव्ही, हातात डाटा असलेला मोबाईल, व्हॉटस अप जोरात चालू, मोबाईलवर महाराजांची किर्तनं, भजन चालू आहेत, २४ तास सगळं उपलब्ध आहे तर मग शेतीत काम करायला मजूर मिळतील कुठून हा सवाल मानवतावाद्यांची अडचण करणारा आहे पण विदारक वास्तही मांडतो. एकीकडे प्रचंड मोठी बेकारी आणि दुसरीकडे शेतीला न मिळणारे मजूर अशी स्थिती का झाली असेल याचं उत्तर शोधायचं असेल तर तुम्ही दोन्ही पुस्तकं वाचायला हवीत.

मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुठली मागणी केली की तोंड वाकडे करणारा एक मोठा मध्यमवर्ग आहे. विशेषत: कर्जमाफी वगैरे. पण सरकारचं एक एक धोरण, किंवा कायद्यानं शेतीचं कसं वाटोळं होतंय हे लेखकानं उदाहरणासह ठिकठिकाणी मांडलंय. त्यातलं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे गावोगावचे ओस पडलेले जनावरांचे बाजार.
सरकारनं गोवंश हत्या बंदी सारखा कायदा आणून जनावरांचे बाजार कसे उठवले यावर खरं तर एखादी डॉक्यमेंटरी होईल एवढं मटेरियल मंगनाळेंच्या फेसबूकच्या नोंदी आणि शेतीचं दुखणंमध्ये सापडतं. मोठे बाजार छोटे होऊ लागलेत, छोटे बाजार बंद पडू लागलेत, सरकारच्या या कायद्यामुळे गायी, बैल असे प्राणी दुर्मिळ होतील असं त्याचं अफलातून निरिक्षण विचार करायला भाग पाडणारं आहे. पटणारं आहे.

शेतीचं दुखणंमध्येच एक दीड पानाची ‘कथा सुबेदीनची’ नावाची गोष्ट आहे. ती एखाद्या सिनेमाची, कथेची,कादंबरीची गोष्ट होऊ शकते एवढी तगडी आहे. सोयाबीनची रास करायला राजस्थानहून सुबेदीन येतो. सोबत मशिन आणि सात आठ मजूर आहेत. पण मजूर एकेदिवशी अचानक त्याला सोडून जातात असा तो मजकूर आहे. पण तो दिर्घकाळ डोक्यात रहाणारा आहे. हे असे काही मजकूर संवेदनशील मजकूर सुरु होण्याआधीच संपतातही.

काही सुविचार व्हावीत किंवा ज्यांना ब्रह्मवाक्य म्हणता येतील असे काही वाक्य पुस्तकात दर काही पानावर सापडतात जसे की-सरकारं शेतकऱ्यांसाठी काँग्रेस गवतासारखी आहेत, फक्त अडथळा आणण्याचं काम करतात, शेतीत पैसा घालणं बंद एवढाच न बुडण्याचा खरा मार्ग दिसतोय, माणसाची भूक प्रचंड आहे, तो ह्या पृथ्वीतलावरचं काय काय खाईल ते सांगणं अवघड, आई बनत असलेली कालवड आक्रमक असते, चांगल्या जगण्याची प्रेरणा नसणं हे काही प्रगतीचं लक्षण नाही, उकळ चाटून दुष्काळ हटतो का? केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांनी शेती सोडावी.

माळझरेमध्ये लेखकाच्या ४७ कविता आहेत. पण तुम्ही जर चंद्र तारे किंवा रोमँटीक असं काही शोधत असाल, फिल्मी टाईपचं किंवा उसनवारी केलेल्या अनुभवाचं तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही. पण खूप काळानंतर मी काही तरी प्रभावहीन वाचलं. म्हणजे मंगनाळेंच्या कवितेवर कुणाचीच सावली नाही. जसं त्याचं जगणं स्वच्छंद आहे तशीच त्यांची कविता. एक ४० नंबरची कविता आहे माळरानाबद्दलची. त्यात ते लिहितात-माळ कधीच मरत नाही..मला वाटलं आमच्या घरी काही एकर माळरान आहे पण आपल्याला हे भयंकर वास्तव कधीच उमगलं नाही. त्यांच्या सर्वच्या सर्व कविता नंबरशिवाय वाचल्या तरी त्या एका दीर्घ कवितेचा अनुभव देतात.

म्हशी राखणारा, राजकीय दौरे करणारा, शेती करणारा पण शेतीवर पोट नसणारा, फेसबूक सक्रिय असणाऱ्या लेखकाचं लिखाण तुम्हाला नक्की आवडेल पण त्यासाठी धैर्यही लागेल. पुस्तकं ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. किंमतही मराठी पुस्तकांची असते तशी बऱ्यापैकी आहे. फुकट्या वाचकांना ती जास्त वाटू शकते. पण त्यांनी सालगड्यासारखा लेख दर आठवड्याला लिहायचं ठरवलं तर मी वरवा लावायलाही तयार आहे.

महारूद्र मंगनाळे यांचा मोबाईल नंबर- 9422469339

(तुम्ही जर एखादं पुस्तक लिहिलं असेल तर मला पाठवा, त्यावर लिहायला मला नक्की आवडेल. कथा, कादंबरी, वैचारीक, ललित, शैक्षणिक काहीही चालेल.)

-(लेखक ‘टीव्ही ९  मराठी’ चे कार्यकारी संपादक आहेत.)

9833926704

माझा पत्ता-
माणिक बालाजी मुंढे,
भूमीसागर सोसायटी, बी विंग,
फ्लॅट नंबर-305, प्लॉट नंबर- 112, 113,
सेक्टर-22, कामोठे, नवी मुंबई )

Previous articleसम्यक क्रांतीचे धगधगते चांदणे
Next articleकोण होते वेरियर एल्विन?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.