उद्धव अन कळसूत्री बाहुले ? मुळीच नाही !

-प्रवीण बर्दापूरकर

शिवसेनेची सूत्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडन स्वीकारल्यापासून सप्टेबर २०१९ पर्यंत नुसतीच टीका नाही तर मोठी अवहेलना उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आली . इतकी अवहेलना आणि अनेकदा तर अपमानास्पद भाषा वाटयाला आलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या समकालीन राजकरणातले एकमेव नेते आहेत . त्यात बहुसंख्य माध्यमं , त्यातही विशेषत: मुंबईतील पत्रकार तर जास्तच आघाडीवर होते . ‘शिवसेना संपणार’, ‘वाघाची शेळी झाली’ ही या टीकेची फार सौम्य ऊदाहरणे झाली . नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी बंड केल्यावर तर पत्रकारितेच्या सुसंस्कृतपणाचे अलिखित संकेत सोडून कांही पत्रकारांनी लेखण्या सॉरी , की-बोर्ड दणादणा बडवले , बूम सरसावले . आता कोकणातलं साम्राज्य लयाला गेलेले नारायण राणे यांनी तर पत्रकार परिषदा , बाईटस आणि जाहीर सभात उद्धव ठाकरे यांचा शेलक्या आणि एकेरी शब्दात केलेला उद्धार अनुदारतेचा कळस होता . या काळात महाराष्ट्रातले अगदीच मोजके पत्रकार उद्धव  ठाकरे आणि त्यांच्या राजकीय भविष्याच्या संदर्भात टीका करण्याची भूमिका घेत नव्हते . ‘उद्धव ठाकरे हे लंबे रेस का घोडा आहेत’ , ‘शिवसेनेला एक गंभीर राजकीय पक्ष म्हणून उद्धव ठाकरे आकार देत आहेत’ , ‘शिवसेनेची ‘राडेबाज’ ही प्रतिमा ते बदलू पाहात आहेत’ असं बरंच काही मी त्या काळात लिहित आणि विविध व्यासपीठांवरुन बोलत असे तेव्हा साहित्य जगत तसंच माध्यमांतले माझे दोस्तयारही कुत्सितपणे हसत असत .

हे आठवण्याचं कारण म्हणजे , उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे राजकारण तसंच माध्यमांतले त्यांचे सर्व टीकाकार एका क्षणात ‘यू टर्न’ घेते झाले . एका रात्रीत उद्धव ठाकरे लोकशाहीवादी , सर्वधर्म समभाववादी , सुसंवादी असल्याचा साक्षात्कार या सर्व टीकाकारांना झाला . कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर लाईव्ह संवादातून भावलेली संवाद शैली , साधी मध्यमवर्गीय राहणी अनुभवला मिळाल्यानं उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कळसाला पोहोचली , महाराष्ट्राला आश्वासक मुख्यमंत्री मिळाल्याचा स्वाभाविक ( ! ) आनंद जुने टीकाकार आणि बहुसंख्य जनतेला झाला . अशात दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाच्या विरोधात लिहिलं तर साहित्य जगत आणि माध्यमातील  तिघे-चौघे मान्यवर म्हणाले , ‘तू उद्धव ठाकरेंवर टीका नको करत जाऊस’ इतके उद्धव ठाकरे ‘होली काऊ’ बनले !

आता ‘मुख्यमंत्री’ म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता काही निर्णयांमुळे ओसरु लागल्याचा सूर उमटू लागला आहे . उद्धव ठाकरे यांच्या काही निर्णयांवर मीही टीका केलेली असली तरी ते मुख्यमंत्री म्हणून कुणाच्याही हातचं कळसूत्री बाहुले आहेत किंवा त्यांच्यावर कुणाचा  रिमोट कंट्रोल आहे असं मुळीच वाटत नाही . ज्यांनी उद्धव ठाकरे यांची कामाची शैली काळजीपूर्वक बघितलेली आहे त्यांचंही हेच मत असणार याबद्दल तीळमात्र शंका नाही .

टोकाची प्रतिकूल टीका आणि अवहेलनाही होत असतांना उद्धव ठाकरे त्या संदर्भात साधारणपणे शांत राहिले , अजूनही असतात . त्या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांनी आधी पक्षावर पकड मजबूत केली , न दुखावता प्रस्थापित जुनं नेतृत्व बाजूला केलं , स्वत:ची नवीन टीम तयार केली आणि पक्ष संघटन अधिक व्यापक करण्यावर भर दिला . केवळ मुंबई-ठाणे आणि मराठवाड्याच्या काही  भागापुरता मर्यादित असणार्‍या पक्षाचा त्यांनी पश्चिम महाराष्ट्र , खानदेश , पश्चिम विदर्भ असा विस्तार केला . ‘शहरी’ लोकांचा पक्ष हा शिक्का पुसतांना ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांना शिवसेनेनं या काळात हात घातला . या काळात शेतकर्‍यांचे प्रश्न राजकीय पटलावर विविध मार्गानी उचलून धरणारा शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष महाराष्ट्रात दिसत होता .

प्रकृतीच्या गंभीर तक्रारी निर्माण झाल्यावरही राज्याच्या ग्रामीण भागात त्या काळात सर्वाधिक फिरणारा नेता अशी उद्धव ठाकरे यांची प्रतिमा होती . आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या सांत्वनासाठी निघालेली यात्रा असो की की मोर्चा की दिंडी , उद्धव ठाकरे त्यात आघाडीवर राहून सहभागी होत . राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर गावोगावच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी साधलेल्या संपर्काचा प्रस्तुत पत्रकार एक साक्षीदार आहे ( खरं तर त्या काळात आम्ही फारच नियमित संपर्कात होतो ) . राज ठाकरे आणि नारायण राणे यांचं बंड , त्यातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन अशा अनेक आघातांना सामोरं जात असतांना शिवसेनेचा एक राजकीय पक्ष म्हणून विस्तार झाला नसेल पण , विरोधकांना अपेक्षित असलेला मोठा संकोच मात्र संकोच झाला नाही , हे मान्य करायलाच हवं .

जनात एक आणि मनात वेगळं, असा काही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव नव्हता . उद्धव ठाकरे यांचा स्वभाव मात्र तसा नाही . त्यांच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज त्यांच्या चेहेर्‍यावरुन किंवा त्यांच्या बोलण्यातून येत नाही . समोर आलेल्याचं म्हणणं नीट ऐकून घ्यायचं किंवा समोर आलेला विषय नीट समजून घ्यायचा आणि तयारी करुन योग्य वेळी ठामपणे व्यक्त व्हायचं ही उद्धव ठाकरे यांची शैली आहे . विचारपूर्वक कोणताही निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे .  म्हणून एकदा निर्णय घेतला की ते ठाम असतात आणि त्या संदर्भात होणार्‍या कोणत्याही टीकेकडे ते साफ दुर्लक्ष करतात . बेफाम टीका अवहेलना सहन करतांनाही उद्धव ठाकरे यांनी कधी घाई-घाईनं प्रतिक्रिया व्यक्त केली नाही .  त्यांची तयारी कशी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणात नारायण राणे झालेलं पतन आहे . दुसरं उदाहरण संजय राऊत यांचं आहे . मधल्या काळात प्रकाश वृत्त वाहिन्यांनी ‘संजय राऊत म्हणजे शिवसेना’ , ‘आजच्या युगाचे चाणक्य’ अशी प्रतिमा निर्माण केली आणि जणू उद्धव ठाकरे यांचं पक्षातलं  स्थान संजय राऊत यांच्यावर अवलंबून असल्याच चित्र निर्माण केलं गेलं , तरी उद्धव ठाकरे शांत होते . वेळ येताच संजय राऊत यांनी त्यांच्या बंधूंच्या मंत्रीपदासाठी लावलेली फिल्डिंग उधळून लावली आणि राऊतांच्या फुग्याला टांचणी लावतांना शिवसेनेत ते म्हणतील तीच पूर्व दिशा असेल हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं  .

म्हणूनच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कोणाच्या हातचं कळसूत्री बाहुलं बनतील किंवा त्यांच्यावर कोणी रिमोट कंट्रोल असण्याच्या टीकेत मुळीच तथ्य असणार नाही . प्रशासनात ते नवखे आहेत यात शंकाच नाही पण या काळात त्यांनी विषय समजून घेण्याचा जो तडाखा लावला आहे तो त्यांच्या अभ्यासू वृत्तीला साजेसा आहे . विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसनं जास्तीचा उमेदवार दिल्यावर चर्चेच गु-हाळ न घालता मुख्यमंत्रीपदच नको , असा अनेकांना चकित करणारा अराजकीय पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतला आणि काँग्रेसला नमवलं . अजोय मेहता यांची प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध होता , प्रशासनात आणखी एक समांतर सत्ता केंद्र स्थापन होण्यास नोकरशाही प्रतिकूल होती पण , अजोय मेहता यांच्या या नियुक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी रेटून नेला . त्या निर्णयावर झालेल्या टीकेचाही त्यांनी प्रतिवाद केला नाही आणि ते त्यांच्या आजवर अनुभवायला मिळालेल्या स्वभावाला साजेसं आहे .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी मंत्री मंडळाशी चर्चा न करता परस्पर घेतला म्हणून काँग्रेसनं थयथयाट केला तरी उद्धव ठाकरे बधले नाहीत . त्यातली केवळ २ कि . मी. अंतराची अट त्यांनी मागे घेतली .  मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत  न करता ( खरं तर संमती न घेता ) मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या बदल्या करण्याच्या राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी रद्दबातल ठरवलं . मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी येणार्‍या येणार्‍या काँग्रेसच्या मंत्र्यांना चक्क ताटकळवत ठेवण्याचा खमकेपणा दाखवला . राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात रदबदली करण्यासाठी ( प्रकाश वृत्त वाहिन्या त्यासाठी ‘कान उघाडणी’ करण्यासाठी असा शब्द प्रयोग करतात ) महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार जवळपास दर आठवड्याला उद्धव ठाकरे यांची भेट घेतात , अशा बातम्या येतात पण उद्धव ठाकरे यांनी कोणते निर्णय बदलले याचा तपशील मात्र पुढच्या बातम्यात कधीच नसतो . शरद पवार यांना वारंवार मुख्यमंत्र्यांच्या दारी जावं लागतं याचा अर्थ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पवार यांना फार कांही दाद देत नाहीत , असा त्याचा खरं तर काढायला हवा . हे सरकार एवढ्यात तरी पडू द्यायचं नसल्यानं शरद पवार यांना अशा चकरा बर्‍याच माराव्या लागणार आहेत , असं दिसतंय .  मुख्यमंत्र्यांना कांही अधिकार असतात आणि त्याने ते वापरायचे असतात याचा विसर अलीकडच्या काही वर्षात  ( म्हणजे  १९९९पासून ) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पडला असला तरी मुख्यमंत्री म्हणून असणार्‍या अधिकारांची जाणीव उद्धव ठाकरे यांना झालेली आहे आणि ते अधिकार उद्धव ठाकरे बजावत आहेत असा याचा अर्थ आहे .

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून मातोश्रीच्या बाहेर पडावं , मंत्रालयात ठिय्या मारुन पूर्ण क्षमतेनं , अशाच तडफेनं काम करावं मात्र त्याच वेळेस पक्षाकडे लक्ष द्यावं आणि ‘कुणी चार म्हणजे सरकार’ अशा समजात राहू नये , यासाठी शुभेच्छा .

पारनेरचा इशारा-  पारनेरच्या नागरसेवकांचं ‘सेना ते राष्ट्रवादी ते सेना’  हे पक्षांतर तशी क्षुल्लक घटना मात्र , त्यातून दिला जाणारा इशारा महत्वाचा आहे . खरं तर , एकदा खरेदी केलेला माल घरी गेल्यावर पसंत पडला नाही म्हणून परत करावा तसं हे प्रकरण पण , पक्षात अंतिम निर्णय घेणारा ‘सुप्रीमो’ मीच आहे हा इशारा शरद पवार यांनी हे पाच नगरसेवक पुन्हा मातोश्रीच्या चरणी लीन होण्यासाठी पाठवतांना अजित पवार यांना दिला . मंत्रीमंडळ स्थापन  करतांना संजय राऊत यांना असाच इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता , अगदी तस्साच !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२०५५७९९

 

Previous article‘लग जा गले’ ची दर्दभरी दास्तान…
Next articleइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here