उपयोगशून्य स्वामी

साभार – दैनिक लोकसत्ता

प्रजासत्ताक भारतात कोणी राजे अस्तित्वात आहेत काय? असतील तर आधुनिक लोकशाहीत त्यांचे प्रयोजन काय?

निवडणुका सत्तास्पर्धा वगैरे आहेतच. पण ही स्पर्धा जिंकण्याच्या नादात आपण कोणापुढे मान तुकवीत आहोत, याचा विचार राज्याच्या धुरीणांनी करायला हवा. ते होत नसेल, तर त्याची गंभीर दखल राज्यातील प्रत्येक विवेकी आणि लोकशाहीमूल्यप्रेमी व्यक्तीने घ्यायलाच हवी..

कोणी कोणास लवलवून मुजरा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. इतरांस त्यात उठाठेव करायचे कारण नाही. तथापि ज्यास मुजरा केला गेला, त्या व्यक्तीविरोधात गंभीर गुन्ह्य़ांची नोंद असेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे मुजरा करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची महसूलमंत्री,  मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाची अधिकारी व्यक्ती आणि भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाची प्रदेशाध्यक्ष असेल, तर मात्र हा मुजरा वैयक्तिक राहत नाही. त्यात पुन्हा तो मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने केला गेला असेल आणि छत्रपतींचा (?) आदेश शिरसावंद्य मानण्याची हमी खुद्द मुख्यमंत्री देत असतील, तर या मुजऱ्याची दखल घेणे भाग पडते. किंबहुना राज्यातील प्रत्येक विवेकी व्यक्तीचे ते कर्तव्यच ठरते. एरवी व्यक्ती या नात्याने चंद्रकांतदादा पाटील यांना खासदार उदयनराजे भोसले हे प्रात:स्मरणीय वाटले तरी कोणाची तक्रार असावयाचे कारण नाही. पण सध्या चंद्रकांतदादा ही एक साधी व्यक्ती नाही आणि उदयन हे राजे नाहीत. तेव्हा या मुजऱ्यानिमित्ताने जे काही घडले, त्याचा समाचार घ्यायला हवा.

सदरहू प्रसंग घडला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सातारा मुक्कामी. गेले काही आठवडे मुख्यमंत्री निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार यात्रेवर असून त्याबाबत कोणाचा आक्षेप असायचे काही कारण नाही. ही यात्रा आणि सत्ताधारी पक्षातील महाभरती समांतर सुरू असून अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक भाजपत प्रवेश करीत आहेत. निवडणूक काळात हे असे होतेच. बुडत्या जहाजातून उंदरांनी आधी उडय़ा माराव्यात तद्वत विजयाची शक्यता नसलेल्या पक्षास या काळात गळती लागतेच. हे काही यंदाच अक्रीत घडले असे नाही. या यात्रेत भाजपच्या हाती गवसलेले असे एक नामांकित रत्न म्हणजे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले. वास्तविक छत्रपतींचे वंशज ही एकमेव काय ती त्यांची कागदोपत्री ओळख. तो केवळ अर्थातच योगायोग. एरवी छत्रपतींच्या घराण्यात जन्मास आलेल्या या देहाने आपल्या आयुष्यात काही लोकोत्तर केल्याचा इतिहास नाही. उलट यांच्यावर दाखल असलेले गुन्हे पाहता, यांनी छत्रपतींचे नाव लावण्यापूर्वी दहा वेळा विचार करायला हवा अशीच स्थिती. असे हे उदयनराजे साक्षात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले. खरे तर अशा या वादग्रस्त इसमास आपल्या पक्षात यावेसे वाटले आणि त्यानुसार त्यास प्रवेशही दिला गेला याबद्दल भाजपस चिंता वाटायला हवी.

याचे कारण या राजांचा लौकिक. तरीही त्यांचे प्रस्थ निर्माण झाले ते आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यामुळे. मराठा राजकारणात सोयीचे आणि उपयुक्त प्यादे म्हणून या दोघांनी उदयन यांचा वापर केला. म्हणजे हे या दोघांचे पाप. अशा वेळी खरे तर ही ब्याद भाजपने ओढून घेण्याचे काहीही कारण नव्हते. १९९५ साली जेव्हा राज्यात सेना-भाजपची सत्ता आली, त्या वेळी या राजांनी अपक्ष राहूनही भगवी वस्त्रे परिधान केली होती. १९९९ साली युतीचा पराभव झाल्यानंतर राजांनी ती उतरवली आणि काही काळ तुरुंगवासात घालवल्यानंतर आपली सेवा आधी काँग्रेसच्या आणि मग राष्ट्रवादीच्या चरणी रुजू केली. या दोन्ही पक्षांनीही त्यांना गोड मानून घेतले. म्हणजे भाजपच्या कळपात त्यांनी येण्यावर तसे काही अप्रूप नाही. ते याहीआधी भाजपचरणी विलीन झालेच होते. या काळात आधीही आम्ही या राजांच्या फुकाच्या मस्तवाल राजकारणावर टीका केली आहे. ही बाब अशासाठी नमूद करायची, कारण ते भाजपत आले म्हणून टीकेचे धनी झाले असे झालेले नाही. त्यांच्यावर टीका करू नये अशी एकही संधी उदयनराजेंनी या राज्यातील विवेकी आणि लोकशाहीमूल्यप्रेमी व्यक्तीस दिलेली नाही. म्हणून या वेळी त्यांचे आगमन इतके काही साजरे करावे असे नाही. परंतु हल्ली बालवाडीत उत्तीर्ण झाल्यावरही गावभर पेढे वाटायची आणि रोषणाई करण्याची प्रथा असल्याने भाजपने उदयनराजेंच्या आगमनाचे मोठे जंगी स्वागत केले. तेही एक वेळ क्षम्य म्हणता आले असते.

पण साताऱ्यात जे काही घडले ते केवळ व्यथित करणारे नाही. तर चिंतादेखील निर्माण करणारे आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात झालेल्या सोहळ्यात या राजांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पगडय़ा चढवल्या. यातही काही टीका करावी असे नाही. हल्ली पुणेरी पगडीचा संबंध ज्याप्रमाणे विद्वत्तेशी असायलाच हवा असे मानले जात नाही, त्याप्रमाणे या पगडीचा संबंधही शौर्य आदींशी असायलाच हवा असे नाही. तथापि यातील अत्यंत आक्षेपार्ह बाब म्हणजे, ही पगडी स्वीकारताना चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांना केलेले नमन. त्याची गरज होती का? उदयनराजे कोणत्या अंगाने चंद्रकांतदादांना इतके वंदनीय वाटले? हेही घटना पाहणाऱ्यांना पडलेले काही महत्त्वाचे प्रश्न. यावर ते ‘गादीचे प्रतीक’ असल्याचे भाबडे उत्तर दिले जाईल. ते जर खरे मानायचे, तर उदयनराजे मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतानाही तितकेच वंदनीय वाटावयास हवेत. तसे ते होते का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल, तर त्या आणि आताच्या वंदनीयतेत नक्की फरक काय? असेल तर तो सरकारने सांगायलाच हवा आणि नसेल तर मग त्यांस आपल्या पक्षात घेऊन नक्की कोणाचे कोणते मूल्यवर्धन झाले, हे भाजप नेत्यांनी महाराष्ट्रास सांगायला हवे.

या महाराष्ट्राचे त्यातल्या त्यात सुदैव हे की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी असा काही मुजरा या राजांना घातला नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पाय घसरला नाही. पण त्यांनी विवेकास सोडचिठ्ठी दिली, असे म्हणावे लागेल. ‘‘छत्रपतींनी आदेश द्यायचा,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले. कोण छत्रपती? या प्रजासत्ताक भारतात असे कोणी छत्रपती अस्तित्वात आहेत काय? असतील तर मग सरदार पटेल यांनी सर्व संस्थाने बरखास्त केली त्याचे काय झाले? आणि अजूनही या छत्रपतींचे आदेशच शिरसावंद्य मानावयाचे असतील, तर मग मुख्यमंत्रिपद हवेच कशाला? सर्व कारभार छत्रपतींच्या हातीच सोपवलेला बरा. म्हणजे मग निवडणुका वगैरेची कटकटच नाही. या छत्रपतींच्या शब्दास जर इतकी किंमत द्यावयाची असेल, तर घटनेस स्मरून घेतलेल्या शपथेचे काय? बरे, आपण ज्यांच्या शब्दास इतका मान देत आहोत, त्या ‘राजां’च्या विरोधात गंभीर गुन्ह्य़ांच्या तक्रारी आहेत आणि त्यासंदर्भातील खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तेव्हा त्यांचा आदेश मस्तकी धारण करण्याची भाषा करताना आपण आपल्याच हाताखालच्या सरकारी यंत्रणेस काय संदेश देत आहोत, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला काय? आणि उदयनराजे ‘छत्रपती’ म्हणून इतके वंदनीय असतील, तर ते कोणत्याही पक्षात असताना तसेच असायला हवेत. ते तसे होते काय?

निवडणुका सत्तास्पर्धा वगैरे आहेतच. पण ही स्पर्धा जिंकण्याच्या नादात आपण कोणापुढे मान तुकवीत आहोत, याचा विचार फडणवीस यांनी तरी करायला हवा. याआधी कोणा ढोंगी, भ्रष्ट, वादग्रस्त स्वत:स ‘स्वामी’ म्हणवून घेणाऱ्यासमोरही फडणवीस यांच्यातील विवेकाने रजा घेतली होती. हे अयोग्य आहे. या अशा सत्तापिपासू, उपयोगशून्य स्वामींसमोर लोटांगण घालणे हा लोकशाहीचा अपमान आहे. फडणवीस यांनी तो करू नये.

साभार – दैनिक लोकसत्ता

Previous articleडेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट
Next articleसंजय वानखडे नावाचा कस्तुरीमृग
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.