वो नहीं मेरा, मगर उससे मुहब्बत है तो है…!

साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’
-वसुंधरा काशिकर
वो नहीं मेरा, मगर उससे मुहब्बत है तो है
बेदरकार, बंडखोर, स्वतंत्र अशा जबाबदार आणि ताकदवान स्त्रीची ही गझल आहे. तसंच समाज, प्रथा, परंपरा, संस्कृती, रिती-रिवाज गेले उडत म्हणणाऱ्या अशा सर्व मनस्वी लोकांची ही गझल आहे. मला ही गझल ऐकताना कृष्णावर प्रेम करणारी मीरा, सार्त्रवर प्रेम करणारी सीमाँन द बुवा, बाजीराव पेशव्यांची मस्तानी आणि अमिताभ बच्चनवर प्रेम करणारी रेखा या स्त्रियांची खूप आठवण येते.
प्रेम करणं हा खरं तर स्त्रीचा मूळ स्वभाव! प्रेमाची परिणती अनेकदा कायमस्वरूपी मिलनात होतेच असं नाही. कमीच लोकांच्या वाटयाला ज्यावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न झालं असा भाग्य(?)योग येतो. खूपदा जात, धर्म, वंश, पंथ, आर्थिक स्तर या कारणांमुळे एकत्र येण्यात अडथळे येतात. पुढे दोघांचेही मार्ग वेगवेगळे होतात. संसाराचा रहाटगाडा सुरू होतो. क्वचित कधीतरी जुन्या आठवणी आल्या तेवढ्याच…वास्तवाचा स्वीकार केलेला असतो. पण इथे मात्र वास्तवाला धुडकावत ती म्हणते, तो नाहीये माझा…तो दुसऱ्या कोणाचा असेल…तर काय? तरीही माझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि ही प्रथा-परंपरांशी बंडखोरी असेल तर ती तशी आहे असंच समजा…
ये अगर रस्मों रिवाजों से बग़ावत है तो है..
या गझलेतली स्त्री ही पारंपरिक, गरीब, मुकी बिच्चारी कुणी हाका अशी अजिबातच नाही. ती आव्हान देणारी स्त्री आहे. ती प्रश्न विचारणारी स्त्री आहे. ती रिती-रिवाज धुडकावणारी स्त्री आहे. ती स्वत:च्या मनाचा कौल मानून जगणारी स्त्री आहे…ती स्वत्व सांभाळणारी स्त्री आहे…ती स्वतंत्र रुह असलेली स्त्री आहे…आणि त्यासाठी किंमत चुकवण्याची तयारी असलेली स्त्री आहे…
ये सोचके बैठी हूँ
इक राह तो वो होगी
तुम तक जो पहुचती है
इस मोड से जाती हैं….
अशी ‘गुलज़ार’ आस लावूनही ती बसलेली नाही. त्याच्यापर्यंत कोणताच रस्ता जात नाही. किंबहुना आता त्याच्याकडे जाण्यासाठी रस्ताच नाही हे कठोर वास्तव तीनं स्वीकारलं आहे. पण वास्तव स्वीकारलं तरी तीनं हार मानली नाही. ती त्याचं घर तोडून त्याला मिळवूही पाहत नाहीये. दुसऱ्याच्या दु:खावर तीला आपली सुखाची इमारतही उभी करायची नाहीये…
त्याचा संसारही मोडायचा नाही, त्याचं आपल्यासोबत नसणंही स्वीकारायचं, त्याच्यावरच्या हक्कावरही पाणी सोडायचं…पण सोडायचं नाही ते त्याच्यावर प्रेम करणं…असं हे अफलातून प्रेम आहे.
म्हणूनच मग ती म्हणते, जे सत्य आहे त्याला मी सत्य म्हटलं…आणि आता म्हटलं आहे तर म्हटलं आहे…मी शब्द फिरवणारी वा स्वार्थासाठी, हितसंबंध जपण्यासाठी शब्द मागे घेणारी स्त्री नाही..लोकांच्या नजरेत कदाचित हा मूर्खपणा असू शकेल…पण आहे हे असं आहे…
सच को मैने सच कहा, जब केह दिया तो कह दिया..
तो माझा आणि मी त्याची व्हावी असाही काही आग्रह नाही. It’s ok we are not together…and will not be ever…पण तो परका होऊ नये…मनानं दूर जाऊ नये ही इच्छा जरुर आहे…आणि आहे तर आहे…
गैर ना हो जाये वो, बस इतनी हसरत है तो है…
प्रेमाच्या आगीत एखादा जळतोय…तर त्यात आगीला आपण दोष देऊ शकत नाही…एखाद्याचं प्राक्तनच जळणं असेल तर त्याला कोण काय करणार?
मित्र असूनही एखाद्या शत्रूसारखा मला तो त्रास देतोय..सतावतोय..आणि त्याच्या या दुष्टपणाची जाणीव असून देखील मी त्याच्यावर प्रेम करणं थांबवू शकत नाही…आता हा माझा स्वभाव म्हणा, हतबलता म्हणा वा लाचारी आहे हे असं आहे… जमीन आणि आकाश यात नेहमीच अंतर होतं आणि राहिल…पण तरीही या दोघांमध्ये जवळीक आहे ती आहेच…
या दोन्ही शेरमध्ये between the lines शाइरा खूप सांगून जाते….एखाद्या माणसावर आपलं इतकं प्रेम असतं की, त्याचे सर्व दुर्गुण माहित असूनही, आपण प्रेम करणं थांबवू शकत नाही…माणूस अगदी लाचार म्हणजे लाचार होतो…हतबल, अगतिक, लाचार….
पण बघितलं तर यात काय सौंदर्य आहे…ते ज्याने कधी या तर्हेचं प्रेम केलंय त्यालाच समजणं शक्य आहे…आत्यंतिक प्रेमात मिलन, एकत्र येणं हे अनेकदा दुय्यम होतं…ठरतं…कुठेतरी वाचलं होतं…Intimacy is not purely physical. It’s an act of connecting so deeply. You feel like you can see into their soul. म्हणूनच मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा न कोई असं मीरा कृष्णासाठी म्हणू शकते.
एका छताखाली राहूनही लोक अघोषित घटस्फोटितासारखे राहू शकतात..राहत असतात…अनेक वर्ष एकाच छताखाली, एकाच घरात राहूनही एकमेकांबद्दल कोरडया ठाक भावना असू शकतात…आणि कोसो दूर असूनही फक्त नाव उच्चारायचा अवकाश ह्रदयात प्रेमाच्या धारा वाहायला लागतात…त्याचा सोबत राहण्याशी, सहवासाशी संबंध नाही….
दूरियों के बाद भी दोनो में क़ुर्बत है तो है… किंवा
फासला तो है मगर, कोई फासला नहीं
मुझसे तुम जुदा सही, दिल से तो जुदा नहीं..
तसंही आत्मा दिसला आहे अन् शरीरही एकत्र आलंय..फारच कपिलाषष्ठीचा योग. याची जाणीव दिप्ती यांना आहे. म्हणून त्या एके ठिकाणी म्हणतात.
रूह का रुख़ इधर जिस्म का रुख़ उधर, अब ये दोनों मिले तो मिलें किस तरह
रूह से जिस्म तक जिस्म से रूह तक रास्ता एक भी सीधा-सादा नही
दिप्ती मिश्रा यांनी लिहिलेली ही गझल. गझलेच्या प्रांतात स्त्रिया खूप कमी दिसतात. पण ज्या काही मोजक्या ताकदीच्या शाइरा आहेत त्यात आता दिप्ती मिश्रा हे महत्वाचं नाव आहे. त्या अभिनेत्री आहेत, शाइरा आहेत. अनेक हिंदी मालिकांची शीर्षक गीतं त्यांनी लिहिलं आहे. लिहिणं ही त्यांची पॅशन आहे. त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती वो नहीं मेरा मगर उससे मोहब्बत है तो है या गझलेनं..
त्यांची शायरी,गझल,कविता सर्व लिखाण हे अत्यंत आत्मविश्वास असलेल्या स्त्रीचं लिखाण आहे. स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रीचं लिखाण आहे. त्यांच्या या गझलेवरून त्याची प्रचिती यावी.
जिससे तुमने खुदको देखा हम वो एक नज़रिया थे
हमसे ही अब क़तरा हो तुम,हमसे ही तुम दर्या थे
मख़मल की ख़्वाईश थी तुमको, साथ भला कैसे निभता
हम तो संत कबिरा की झीनी सी चदरिया थे
मीरा सचमूच दिवानी थी, जोग लिया फिर ज़हर पीया
तुम अपनी गोपी और राधा के साँवरिया थे
अब समझे क्यूँ हर चमकिले रंग से हट जाता था
बात अस्ल में ये थी की, हम ही सिरत से केसरियाँ थे…
किंवा त्या म्हणतात..
शब्द नहीं एहसास लिखा है
जो था मेरे पास लिखा है
भला-बुरा अब दुनिया जाने
मैनें तो बिन्दास लिखा है
थोडक्यात ही बाई मानणारी पण नाही अन् जुमानणारी पण नाही. समाजाची यत्किंचितही पर्वा न करता स्वत:च्या मनाचा कौल स्वीकारत जगणारी ही स्त्री आहे.
गुलाम अली यांनी त्यांच्या गझलांवर हसरतें हा अख्खा अल्बम काढला आहे. त्यानंतर ‘हाज़िर टू’ मध्ये हरिहरन यांनी ती गझल परत गायली. त्यात तबल्यावर साथ आहे अर्थातच पंडित झाकीर हुसेन यांची.
ही गझल कोणी अधिक उत्तम गायली आहे. गुलाम अली की हरिहरन…निर्णय देता येत नाही. गुलाम अली यांनी गाताना ती फारच मुलायम गायलीय. जे गझलेतल्या अर्थाच्या विपरीत आहे पण तरीही ते ऐकताना छान वाटतं. पण हरिहरन यांनी मूळ गझलेतली बंडखोरी, masculine असा टोन गाण्यात आणलाय…म्हणजे भई है तो है…असं
हरिहरनच्या गझलेची व्हायोलीनने होणारी सुरूवात…मग थोडीशी सारंगी…झाकीर साहेबांचा तबला…परत सारंगी…ऐकाच.
नायब राजा यांचं संगीत. गुलाम अली यांनी ही गझल एकट्याने पण म्हटली आहे आणि कविता कृष्णमूर्तींसोबत पण म्हटली आहे. गुलाम अली यांची सोलो गझल ऐकायला खूपच सुंदर वाटते. पण कविता कृष्णमूर्ती यांनी गझल म्हणू नये. तो त्यांचा प्रांत नाही. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे…इतराचं मत वेगळं असू शकतं…
जाता जाता…या गझलेचा मला जाणवलेला दुसरा एक अर्थ…अनेकदा व्यवस्था तुम्हाला न्यूनगंड देत असते, कधी रुपावरून तर कधी आर्थिक स्थितीवरून, कधी भाषेवरुन तर कधी रंगावरून.. अशा अनेक प्रसंगामध्ये व्यवस्थेला उडवून लावण्यासाठी ‘है तो है’ असं टेचात म्हणता येईल…
बऱ्याचदा समाजाच्या, लोकांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेच्या नसलेल्या अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात…लौकिकार्थानं त्यातून फारसं काहीच पदरी पडणार नसतं…पण प्राप्त होणार असतो तो निखळ आनंद…निजतेमध्ये जगतानाची स्वस्थता…मग ते चित्र काढणं असेल, गाणं म्हणणं असेल, मातीकाम असेल, लिखाण असेल, अगदी स्वेटर विणणं ही असेल…ते करावं आणि करावंच…कारण
अब ज़माने की नज़र में, ये हिमाक़त (मूर्खपणा) है तो है….
वो नहीं मेरा, मगर उससे मुहब्बत है तो है
ये अगर रस्मों, रिवाज़ों से बग़ावत है तो है
सच को मैंने सच कहा, जब कह दिया तो कह दिया
अब ज़माने की नज़र में ये हिमाक़त है तो है
कब कहा मैंने कि वो मिल जाये मुझको, मैं उसे
गैर न हो जाये वो बस इतनी हसरत है तो है
जल गया परवाना गर तो, क्या ख़ता है शम्मा की
रात भर जलना-जलाना उसकी क़िस्मत है तो है
दोस्त बन कर दुश्मनों- सा वो सताता है मुझे
फिर भी उस ज़ालिम पे मरना अपनी फ़ितरत है तो है
दूर थे और दूर हैं हरदम ज़मीनों-आसमाँ
दूरियों के बाद भी दोनों में क़ुर्बत है तो है
-दीप्ति मिश्रा
(लेखिका वसुंधरा काशिकर या Transform skill enhancers private limited च्या संचालक, स्तंभलेखक, भाषाविषयक सल्लागार  व निवेदिका आहेत)
[email protected]
Previous articleहिंदुत्ववादी व पुरोगामी : एकमेकांना ‘सुधारण्याची स्पेस’ नाकारत आहेत का?
Next articleजनसंवादाचे ‘मोदी-ठाकरे’ मॉडेल !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here