ऊर्ध्व-विश्वाच्या मुसक्या कोण आवळेल?

-सारंग दर्शने

बेकायदा किंवा समाजाला अमान्य अशा कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटित किंवा ‘लूजली फेडरेशनिस्ट’ गुन्हेगारांच्या समुदायाला अधो-विश्व असा शब्द आहे. म्हणजे, अंडरवर्ल्ड. या नावातच त्याचे छुपेपण, चोरटेपण किंवा निदान काल्पनिक तरी खुजेपण सूचित होते. याच्या उलट, ऊर्ध्व-विश्व म्हणजे ओव्हर-वर्ल्ड असा शब्द आहे. ऊर्ध्व-विश्व म्हणजे खरेतर लोकोत्तरांचे जग. किंवा आध्यात्मिक शक्ती असणाऱ्या पुण्यवंतांचे, दिग्गजांचे विश्व. भारतातील हे अधोविश्व गेली अनेक दशके टप्प्याटप्पाने ऊर्ध्वविश्व काबीज करत चालले आहे. आता तर भारतात अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्ड यांच्यातील फरक पुरता पुसून गेला आहे. भारताच्या आधुनिक इतिहासाकडे पाहिले जाईल, तेव्हा ‘सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरण’ हे या दोन विश्वांच्या अभूतपूर्व ऐक्यातील मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल. या हत्येचा तपास झाला आणि तो केंद्रीय अन्वेषण यंत्रणांना पुढे नेला, म्हणजे या दोन्ही विश्वांच्या ऐक्याला धक्का लागेल, असे जर कुणी समजत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात राहात आहेत, असे म्हणावे लागेल. या खटल्याचा जो राजकीय लाभ घ्यायचा असेल तो घेतला जाईलच. ज्यांची कोंडी करून नाक घासत आणायचे असेल त्यांना तसे शरण आणले जाईल. ‘शिर सलामत तो पगडी पचास.’ आणि ही राजकीय मोहीम फत्ते झाली की, हे सारे मग संपून जाईल.

असे व्हायचे नसेल आणि अधो-ऊर्ध्वविश्वाची निष्ठुरपणे पण अत्यंत आवश्यक अशी कत्तल करावयाची असेल तर त्याला असामान्य राजकीय इच्छाशक्ती तर लागेलच, पण मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याचीही तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी ठेवणे सोपे नाही. लोकशाहीचे प्रतिनिधिगृहे, न्यायपालिका, मीडिया, प्रशासन हे चार स्तंभ आहेत. यात स्वयंसेवी संघटना व चळवळी हा पाचवा स्तंभ मानला जातो. हे योग्य आहे. भारतीय लोकशाहीला क्रिकेट आणि मनोरंजन विश्व म्हणजे प्रामुख्याने बॉलिवूड असे आणखी दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. पण हे जे एकूण सात स्तंभ आहेत, यातील किमान सहा किंवा काहीवेळा सातही स्तंभ एकाचवेळी अधोविश्वातही वावरतात आणि ऊर्ध्वविश्वातही वावरत असतात. आणि हे मिश्रण एकसंध आहे. महाभारतात जरासंधाला उभा फाडून दोन दिशांना फेकला तरी तो जसा पुन्हा चिकटून, सजीव होत असे, तसे या सहा-सात स्तंभामधील दिग्गजांपासून भुरट्यांपर्यंत सगळे एकसंध, एकजीव आहेत आणि असणार आहेत. ते वेगळे होऊ शकत नाहीत. जरासंधाचे धड पुन्हा चिकटू नये, यासाठी श्रीकृष्णाने त्याचा डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे टाकण्यास सांगितले होते. आज असे उलटेसुलटे करून साऱ्या व्यवस्थेला शिस्त लावण्याची किंवा ती आमूलाग्र साफ करण्याची कुणाच्यात हिंमत तरी आहे का? सगळ्यांना दोन्ही विश्वातील फायदे हवे आहेत. त्यातून सत्ता राखायची आहे.

सुशांतसिंह प्रकरण हे हिमनगाचे टोकही नाही. हिमनगाचा कण आहे. ते बाहेर येण्याची, त्याची इतकी चर्चा होण्याची कारणे सगळ्यांना माहीत आहेत. बिहार आणि महाराष्ट्राचे राजकारण उलथेपालथे करण्याची ताकद या प्रकरणात आहे. केंद्रात सध्या सत्ताधारी असणाऱ्यांना हे उमजावे, यात विशेष काही नाही. येत्या काही आठवड्यात हा फास जसजसा आवळला जाईल, तसतशी शरण येणाऱ्यांची, पाय धरणाऱ्यांची, माफी मागून अश्रू ढाळणाऱ्यांची आणि ‘वाचवा, वाचवा’ असा टाहो फोडणाऱ्यांची दिल्लीच्या दरबारात रांग लागणार आहे. सीबीआयची ‘कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम’ शक्ती सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे, ज्यांना हवे त्यांना अडकवायचे आणि ज्यांना दया दाखवायची ठरेल, त्यांना सोडवायचे, हा सीबीआयसाठी डाव्या हातचा मळ आहे. खरा प्रश्न तो नाही. क्रिकेटविश्वाचा महाभयंकर विस्तार आणि तिथले बेटिंग, बॉलिवूड आणि तिथला प्रचंड काळा पैसा, आर्थिक गैरव्यवहार, किळसवाणी व्यसने व त्यासाठीचा व्यापार, या क्षेत्रातील अनेकांच्या गलिच्छ लैगिंक आवडीनिवडी व त्या पुरवण्यासाठी होणारे गुन्हे व अत्याचार हे सगळे कोणी थांबवू शकणार आहे का? अशाच सगळ्या प्रकारांमधून सुशांतसिंहची हत्या झाली आहे. सुशांतसिंहचा खून हा रोग नाही. ते केवळ भारताच्या अधोऊर्ध्वविश्वाला जडलेल्या महारोगाचे बारीकसे लक्षण आहे. या दृश्य जखमेची मलमपट्टी करून मूळ रोगाचे निर्मूलन कसे काय होणार आहे?

वरच्या परिच्छेदात नमूद केलेल्या अभद्र युतीची उदाहरणे देत बसली तर शेकडो पाने लिहावी लागतील. पण काही प्रश्न विचारता येतील. एका महान अभिनेत्याचा भाऊ बेटिंग प्रकरणात सापडतो. मग पुढे कसे काहीच होत नाही? बेटिंगच्या रॅकेटला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवत कोण असते? सेलिब्रिटींचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या क्रिकेटपटू आणि नट्या यांची लग्ने कशी काय जुळवतात? नेते, सेलिब्रेटी, उद्योगपती यांच्या मुला-मुलींपैकी कुणाकुणाला विकृत लैंगिक सवयी आहेत आणि त्या भागवण्यासाठी कोणकोणते गुन्हे सर्रास केले जातात? मुंबईत सर्व प्रकारचे डेडली अंमली पदार्थ विपुल प्रमाणात कसे काय मिळतात आणि ते घेण्यासाठी वर उल्लेख केलेल्या पाच-सहा स्तंभांमधील ‘नामचीन’ एकत्र येऊन रात्र रात्र मौज कशी करतात? प्रसंगी दोनचार माणसे मारून टाकणे व नंतर ही सगळी प्रकरणे ‘रफादफा’ करून टाकणे, हे या सगळ्या टोळ्यांना मुळीच अवघड का बरे वाटत नसावे? बॉलीवूडसाठी यातल्या काही गोष्टी नव्या नाहीत. पण त्या एकेकाळी आडवाटेच्या गल्ल्या होत्या. आज त्यांचेच महामार्ग झाले आहेत. असे का झाले?

बॉलिवूड, क्रिकेट आणि इतर स्तंभांचे गूळपीठ आणि या सगळ्यांची ‘क्रिमिनल कमराडरी’ म्हणजे ‘गुन्हेगारी बंधुत्व’ देशातल्या उदारीकरणानंतर म्हणजे १९९१ नंतर वेगाने वाढत गेले आहे. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील सगळे आरोपी, त्यांचे साटेलोटे आणि त्यांचे मित्रवर्तुळ पाहिले तर हे ऐक्य कसे बळकट होत गेले, हे समजून येईल. या बाँबस्फोटातील सगळे धागेदोरे अगदी मुळापासून आजही पूर्णपणे उलगडले गेलेले नाहीत. मुख्य आरोपी दाऊद तर सापडलेलाच नाही. त्यानंतरही मुंबई व देश अनेकदा लक्ष्य झाला. या प्रत्येकवेळी दहशतवादी गुन्हा होण्यासाठी जमीन भुसभुशीत करण्याचे मोलाचे काम मुद्दाम असे नव्हे, पण परिणामस्वरूप म्हणून ही उजळ माथ्यांची गुन्हेगारी टोळी करत आली आहे. ‘देशद्रोह’ म्हणजे दरवेळी हातात एके-४७ घ्यावी लागत नाही. दुबईहून नियंत्रित होणाऱ्या अमली पदार्थांच्या, बॉलीवूडच्या, जमीनव्यवहारांच्या व क्रिकेटच्या अधोविश्वात सहभागी होणे, हाही देशद्रोहच आहे. आणि तो करणारे अनेक समाजाच्या गळ्यातले ताईत आहेत!

नेत्यांची मुले ही एकेकाळी खूप शिस्तीत वागत. ती घराण्याची शिस्त असेल किंवा उद्याच्या करिअरची काळजीही असू शकेल. पण एखाद्या केंद्रीय नेत्याच्या मुलाला पदवीदानात रफू केलेला वडिलांचा कोट घालायला लागणे, हे काही अप्रूप किंवा अतर्क्य नव्हते. आज नेत्यांचीच नव्हे तर किरकोळ नगरसेवकांची मुलेबाळे कोट्यवधी रुपयांमध्ये लोळत आहेत. एकेका रात्रीत लक्षावधी रुपये ‘सर्व प्रकारच्या’ व्यसनांवर उधळत आहेत. काही नोकरशहांची, काही उद्योजकांची, काही बड्या व्यापाऱ्यांची आणि अनेक नटनट्यांची मुले अशीच आहेत. या साऱ्यांचे मिळून एक भयंकर सत्तांध कॉकटेल बनले आहे. हे कॉकटेल वाटेत, मौजेआड येणाऱ्यांना बिनधास्त कापून काढू शकते. इतकेच नाही तर असे गुन्हे बेलाशक दाबून टाकू शकते. अधोविश्व आणि ऊर्ध्वविश्व अशा दोन्ही विश्वांमधून माशासारखे सहज पोहत उजळ मिरवण्याचे त्यांचे हे लळित आईबापांना कौतुकाचे वाटते!

या साऱ्यांना दोष देऊन समाजाला नामानिराळे होता येणार नाही. क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे जे अपार आणि असह्य स्तोम आपण माजवून ठेवले आहे, त्याची ही फळे आहेत. ज्यांनी आयुष्यात कधी बॅट धरली नसेल ते गेल्या तीस वर्षांत क्रिकेट व्यवस्थापनात का शिरले? ते आज का गप्प आहेत? सुशांतसिंहच्या हत्येच्या आधी ज्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला, ती कोणत्या ‘टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी’त कामाला होती? ही कंपनी काय काम करते? तिचे बॉलिवूड व क्रिकेट अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये इतके जवळचे संबंध कसे काय? अशा असंख्य कंपन्यांचे आज पेव फुटले आहे. त्यांच्या संचालकपदी मोठमोठी नावे दिसतील. त्यांचे अधिकारी देशोदेशी शिकून आलेले असतील. पण त्यांचे खरे रूप, खरे काम आणि खरे लक्ष्य त्यांच्या वेबसाईटवर कधी उमटणार नाही. केंद्र सरकार या निमित्ताने हे सारे खाणकाम करायला तयार आहे का?

सध्याच्या पंतप्रधानांना ‘ल्यूटन्स दिल्ली’ मुळीच आवडत नाही. सगळ्या रॅकेटिअर्सचे ते माहेरघर आहे. काही दिवंगत मंत्री व नेते या ल्यूटन्स दिल्लीतील रत्ने होती. सुशांतसिंह प्रकरण धसास लावणारे काही पत्रकारही ल्यूटन्स दिल्लीवर कडाडून टीका करीत असतात. ती योग्यच आहे. मात्र, कालपरवा ल्यूटन्स दिल्लीत जाऊन बसलेल्या आणि आज महासत्ताधीश झालेल्यांच्या घरात क्रिकेटचे प्रेम उमलते आहे. क्रिकेटचे व्यवस्थापन ताब्यात येणे म्हणजे अब्जावधी रुपयांचा खेळ हे खरे व मोहक असले तरी त्या पाण्यात राहून व्यवस्थेला गिळून टाकणाऱ्या शार्क माशांशी वैर घेण्याची हिंमत मग उरेल का? सगळे शहाजादे आपापल्या बापांना एका क्षणी ब्लॅकमेल करू लागतात. तशी पुढची शक्यताच आज निपटून टाकण्याची ज्यांच्यात हिंमत असेल तेच सुशांतसिंह प्रकरणाच्या तळाशी खोल डुबी देऊ शकतील. या ड्रेनेजमध्ये भरलेली घाण आणि सडलेले सांगाडे बाहेर काढण्याची हिंमत कुणाच्यात आहे की नाही, ते मग कळेल. नाहीतर, एकदा राजकीय लक्ष्यभेद झाला की, दुर्दैवी सुशांतचे प्रकरण संपून जाईल. पुढचा असा योगायोग कधीतरी येईपर्यंत!

(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

9821504025

Previous articleभिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे !
Next articleलोकशाहीच्या संरक्षणासाठी काय करायला हवे?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.