भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे !

(साभार: साप्ताहिक चित्रलेखा)

■ ज्ञानेश महाराव
———————————————–

‘जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म सुरू होते; म्हणून ते सुपर सायन्स आहे,’* या थोतांडाची लोकमानसात प्रतिष्ठापना करण्यासाठी, अक्कल पाजळण्याचा खोटेपणा देशात गेली काही वर्षं राजरोस सुरू आहे. तो धर्मवादाला उधाण आणून राजकीय सत्तास्वार्थ साधणाऱ्यांसाठी होता आणि आहे. या थोतांडाच्या प्रचारार्थ, स्वतःला उच्च- अतिउच्च शिक्षित म्हणून मिरवून घेणारे, ‘विज्ञान आणि अध्यात्म यात किती सूक्ष्म फरक आहे,’ ते सांगण्यासाठी आपल्या बुद्धीला ब्रह्मगाठ मारून जातीनिशी लिहीत-बोलत होते. त्यात ‘परम कॉम्प्युटर’च्या कथित संशोधनाने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार पटकावलेले ‘विज्ञानाचार्य’ डॉ. विजय भटकर हे म्हणजे पुण्यातल्या ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’च्या गणपतीच्या तुलनेत ;  सदाशिव पेठेत अंगभूत मुकुट असलेला तीन फुटी ‘चिमण्या गणपती’च म्हणा ना ! या सार्‍या ‘सुपर सायन्स’वाल्या अध्यात्म प्रचारकांचे थोबाड ‘कोरोना’ने फोडलेय.

गेले ५ महिने अवघं जग ‘कोरोना’च्या जीवघेण्या दहशतीने हवालदिल झालंय. महासत्तांचा माज उतरलाय. व्यापार-व्यवहार थांबलाय. अर्थ व्यवस्थेची घडी पार विस्कटलीय. विदेश भ्रमंतीची चैन करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही तोंडाला फडकं बांधून देशात फिरावं लागतंय. ही वेळ का आली? तर वैज्ञानिक विचारशक्तीचा अभाव! या विचारशक्तीचा अंगीकार करीत भारतानंतर स्वतंत्र झालेले छोटे छोटे देशही भारताच्या कित्येक पटीने प्रगत झाले. पण आपण कुठे आहोत? अलीकडेच फ्रान्सकडून खरेदी केलेली ‘राफेल’ ही ५ लष्करी विमानं भारतात आली. ही विमानं आधुनिक तंत्रज्ञानयुक्‍त आहेत. त्यांचे पूजापाठाने स्वागत झाले. हा आपला आध्यात्मिक बाणा! प्रत्येकी १,७०० कोटी रुपयांच्या या विमानांना पाकी-चिनी-अफगाणी-नेपाळी ‘नजर’ लागू नये, म्हणून विमानाच्या पुढच्या चाकांना लिंबू-मिरच्या-कोळशाच्या तुकड्याचा ‘तोडगा’ बांधला असेल, तर ती आपली श्रद्धा ! विमानाच्या आधुनिकतेला फासली जाणारी ही ‘काळोखी’ खुल्या डोळ्यांनी पाहायची, ही तर आपली भक्ती ! पण यात बुद्धी- विचारांची शक्ती किती आणि ती तपासायची कशी ?

       आपल्या देशाचं एकूण क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार ५९० चौरस किलोमीटर आहे. यातील पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ १५ हजार ६४२ चौरस किलोमीटर आहे. इराणचे आखात आणि सौदी अरेबिया यांच्या बेचकीत ‘कतार’ हा छोटासा देश आहे. तिथे पारंपरिक राजेशाही आहे. ‘इस्लाम’ हा ‘कतार’चा राजधर्म आहे. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीला कतार ब्रिटिशांचे मांडलिक संस्थान झाले. १९७१ मध्ये ‘कतार’ला स्वातंत्र्य मिळाले. या ‘कतार’चं  एकूण क्षेत्रफळ ११ हजार ५७१ चौरस किलोमीटर आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यापेक्षा ३० टक्के कमीच !  ‘कतार’कडे आज २४ ‘राफेल’ विमानं आहेत आणि त्यात १२ची भर पडणार आहे. भारताच्या लष्करी ताफ्यात आता कुठे ५ ‘राफेल’ विमानं दाखल झालीत. लवकरच ऑर्डरीनुसार, ३६ राफेल विमानं दाखल झाली तरी, या वाढत्या बळाची ताकद पुणे जिल्ह्यापेक्षा लहान असलेल्या ‘कतार’ एवढीच असणार, हे अध्यात्मयोगात गटांगळ्या खाणाऱ्या भक्तांना कसे आणि कधी कळणार ?

      दारुडे एका बाटलीत टोलेजंग मशीद कसे हलवतात, ते मिर्झा गालिबने नेमक्या शब्दांत सांगितले आहे. तसाच पराक्रम भक्त मंडळींनी देशात ‘कोरोना लॉकडाऊन’ जारी असताना ५ ‘राफेल’ विमानं येताच; ५०० ‘राफेल’ आल्यासारखा धिंगाणा ‘सोशल मीडिया’वर घालून केला ! हा ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या मुंगीलाही मेरू पर्वत गिळायला लावणाऱ्या अध्यात्माचा पराक्रम आहे. तिथे ‘राफेल’सारखं आधुनिक तंत्रज्ञानाचं विमान आपण का बनवू शकलो नाही, हा प्रश्न फिजूल ठरतो. कारण तेव्हा या भक्त मंडळींना ‘आद्य विमान निर्मिती’चा ‘रामायणा’तला दाखला आठवत नाही ना! तसेच आता ‘कोरोना’ महामारीने गेले ५ महिने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले तरी; विज्ञानाला हलकं, दुय्यम ठरवण्यासाठी ‘देव- धर्म- संस्कृती- दैव- मोक्ष- पुनर्जन्म- ज्योतिष- कर्मफळ’ यांना एकत्र वाटून-घाटून पकवलेलं अध्यात्म ऊर्फ ‘सुपर सायन्स’ काय करतंय? याचा जाब विचारायचं कुणाला सुचतच नाही.

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  ‘महाभारत’ मधील १८ दिवसांच्या युद्धाचा दाखला देत, २१ दिवसांचा देशव्यापी पहिला ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. २१ दिवसांचे २१ आठवडे उलटले, तरी ‘कोरोना’ विरुद्धचे युद्ध अजून संपले नाही. म्हणजे दाखल्याप्रमाणेच ‘महाभारत’ हेदेखील  कल्पनाविलासच आहे, हे सिद्ध झाले. मग सत्य काय आहे ? वैज्ञानिक संशोधनातून निर्माण होणारी लस-व्हॅक्सिन हेच सत्य आहे!

    या लसीच्याच प्रतीक्षेत आज जगभरातील सारी मानव जात आहे. या ‘व्हॅक्सिन’च्या प्राप्तीसाठी कोणी सिद्धपुरुष हिमालयात तपस्येला बसलेला नाही. ‘सनातन’चे स्वामी जयंत आठवले यांनी आपले पंजे एकमेकांवर घासले की, त्यातून सोन्याचे कण निघतात, अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी ‘पत्रकार परिषदे’तून दिली होती. मग या ‘पपूं’ना जगाच्या कल्याणा जाऊ देत; केवळ ‘हिंदूरक्षणार्थ’ हात चोळून  ‘व्हॅक्सिन’ची धार काढायला का सुचत नाही?  विद्यमान चार शंकराचार्यांचे ‘बाप’ म्हणजे ‘स्वयंघोषित जगद्गुरू’ झालेले ‘माजी फ्रॉड ग्रामसेवक’ नरेंद्र महाराज !  ते  ५ रुपयांच्या पेनाला आपला फोटो लावून, ते ‘जगबुडी पासून वाचवणारं सुरक्षाकवच’ म्हणून ५० रुपयांना  आपल्या भक्तांना विकत. तरीही या ‘सुरक्षाकवचा’सह त्याचे शेकडो भक्त ‘कोरोनाच्या फटक्यात’ कसे गेले? ‘तुमच्यावर बलात्कार झाला, तर या बापूला हाक मारा. मी तो बलात्कार अंगावर घेईन,’ असे हौसेने सांगणाऱ्या अनिरुद्धबापूने ‘अंबज्ञ- नाथ संविद’ म्हणत एकाचे तरी ‘कोरोना’ संकट अंगावर घेतलं का ? कॅन्सर, किडनी डिसीज सारख्या आजारांचे रिपोर्ट केवळ ज्याच्या नामस्मरणाने ‘पॉझिटिव्ह’चे ‘निगेटिव्ह’ झालेत; अशी ख्याती असलेल्या अनिरुद्ध बापूचा वापर ‘ठाकरे सरकार’ने ‘कोरोना’मुक्त महाराष्ट्रासाठी करून घेतला पाहिजे होता. त्याने ‘कोविड सेंटर-हॉस्पिटल’ उभारण्यासाठी सरकारचे करोडो रुपये खर्च झाले, ते वाचले असते! पण हेही सगळे  मोदींच्या ‘महाभारता’च्या दाखल्यासारखेच खोटे निघाले.

    जागृत देव-देवताही दगडासारखा वागल्यात. दारूच्या वा मटक्या अड्ड्यावर व्यसनीने तिरीमिरीत वेळेवर जावं ; तशी वेळ गाठण्यासाठी भाबड्या भाविकांना हातातलं काम सोडून धावायला लावणाऱ्या सत्संग- स्वाध्याय- बैठकीचा बाजार किती खोटा आहे, तेही ‘कोरोना’ने दाखवून दिलंय. याच्या साक्षीसाठी बाबा महाराज सातारकर यांची मुलगी-नातवाच्या भजन-प्रवचनाची ‘यू-ट्यूब’वरची यंदाची ‘पंढरीची वारी’ पहा.  ही मंडळी आपल्या ‘दिव्य दर्शना’च्या हव्यासासाठी नटून-थटून ‘विज्ञान- तंत्रज्ञाना’चा वापर करतात, पण बाता भाकड अध्यात्माच्या मारतात! ‘अं…हं’च्या पालुपदात आपल्या अहंकाराचे प्रदर्शन घडवतात. समोर गिऱ्हाईक नसली तरी,’आमचे दुकान जोरात आहे,’ हे दाखवण्यासाठी साधकांच्या नामस्मरणाची आकडेवारी लॉटरीच्या निकालासारखी सांगतात.

      अध्यात्म-भक्ती काही वाईट नाही. पण त्यातले साक्षात्कार, चमत्कार, अनुभूती संकटकाळात कामाला येत नसतील, तर अध्यात्म काय चाटायचंय ? पुण्य संचयाची, पापक्षालनाची, मोक्षाची लालूच दाखवून उजळणारे अध्यात्म, भक्ती, उपासना हे ‘कोरोना’सारख्या संकटकाळात खोटेच ठरणारच होते. कारण अध्यात्मामुळे फक्त मन:स्थिति बदलते; परिस्थिती बदलत नाही. परिस्थिती बदलण्याचे काम विज्ञान करते. ते विज्ञानच आज जगातल्या प्रत्येक माणसाला सांगतंय, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे !’

     हा ‘स्वामी समर्थ’ची विकाऊ बोध नाही. कारण विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि  प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला ‘कोरोना-लसी’ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक- संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. अब्जावधी रुपये या संशोधनासाठी खर्च होत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत. माणूस म्हणून एवढं समजून घेतलं तरी, त्यांना संशोधन, बुद्धी- शक्ती, श्रम सार्थकी लागल्याचं समाधान लाभेल !

……………………………………………………..

नवसाचा राजा, विज्ञानवादी झाला

    मानवजातीच्या आजवरच्या इतिहासात ‘कोरोना’चं संकट हे महाभयंकर आहे. कारण ते सार्वत्रिक आहे आणि सर्वाधिक धोक्याचं आहे. हे संकट दूर करण्याची खात्री मानवाने आपल्या बुद्धीने प्रगत केलेलं विज्ञानच देतंय. हे वर्तमान ठळकपणे दिसत असतानाही लोकांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा; वैज्ञानिकांत आणि संशोधन कार्यात वाढ व्हावी; विज्ञानविरोधी बाताड्यांचं समूळ उच्चाटन व्हावं; यासाठी कुणी आटापिटा करताना दिसत नाही. त्यापेक्षा अयोध्या ‘कोरोना’ग्रस्त झाली असताना, तिथे ‘राम जन्मभूमी मंदिर’ निर्माणाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त टळू नये, यासाठी प्रधानमंत्र्यांनी किती आटापिटा केला ! तो देशाच्या बुद्धीचा नाश करण्यासाठीच होता.

    माणूस हा जसा बुद्धिशील आहे, तसाच भावनाशीलही आहे. ही जोड असल्यामुळेच हे जग कसे निर्माण झाले? देव आहे का? जन्म ही काय जादू आहे ? मृत्यूनंतरचे गूढ काय आहे ? आत्मा व त्याचे अमरत्व, ही काय भानगड आहे ? आपल्या जगण्याच्या धडपडीला काही अर्थ आहे का ? की साराच अनर्थ आहे ? असे भावनेला अस्वस्थ करणारे नाना प्रश्न माणसाच्या बुद्धीला पडतात. या प्रश्नांतलं रहस्य जाणून घेण्याची जिज्ञासा मानवाला टोचत असते. ही रहस्यं विज्ञान- संशोधन एकेक करीत उलगडत आहे. त्या बळावरच मानव ५० वर्षांपूर्वी चंद्रावर पोहोचला. आपलेही यानही आता मंगळावर संशोधनाचे कार्य करते आहे. पण जोवर विज्ञानाने आकार घेतला नव्हता, तोवर ही रहस्यं उलगडण्याचा उद्योग देव, दैव, आत्मा, परमात्मा, परलोक आदींच्या माध्यमातून झाला. ती त्या काळाची ज्ञानाची भूक भागवणारी गरज होती. परंतु, विज्ञानाच्या वाढत्या पसाऱ्यात हे जुनाट-शिळे आध्यात्मिक अन्न मानवाच्या प्रगतीस घातक असल्याचं सिद्ध झालं. तरीही सर्वच धर्मातले, आध्यात्मिक भूक भागवणारे ‘बल्लवाचार्य’ आपल्या पाकनैपुण्याची जाहिरात करीत, घातक अन्न आपल्या भक्तांना चारून त्यांची मनं विषारी करतात.

    ‘कोरोना हटाव’साठी थाळ्या-टाळ्या वाजवणे, दिवे लावण्याचा कार्यक्रम होणे; किंवा रामदेव बाबाने ‘कोरोना’ वरच्या जालीम औषधाची बोंब ठोकत स्वतःची जाहिरात करून घेणे, यावरून अध्यात्माची घातक भूक भागवणाऱ्यांना आपल्या देशात किती मोकळे रान आणि मान आहे, याचा अंदाज यावा. अशांच्या नादाला लागून देव- धर्म,यात्रा- जत्रा, बुवा- बापू , सत्संग-बैठका आणि श्रीयंत्र- कुबेर यंत्र यात आपल्या आयुष्याचा किती वेळ, पैसा आणि अक्कल खर्च झाली, याचा विचार ‘कोरोना’च्या कचाट्यातून निसटलेल्या धर्मनिष्ठ भाविकांनी जरूर करावा.

    ‘कोरोना’ने तुमचा जीव गेला नसेल; पण ‘कोरोना-लॉकडाऊन’मध्ये तुमच्यासारख्या करोडो लोकांच्या नोकर्‍या गेल्यात ! शिक्षण घेऊन नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडणाऱ्या तरुणांपुढे अंधार आहे. यातून बाहेर पडण्याचा उपाय कुणाच्या भजन-पूजनाने वा नामस्मरणाने सापडणार नाही. अनेकांनी विज्ञान-तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आर्थिक कमाईच्या नव्या वाटा शोधल्यात. आपल्यात कोणता हुन्नर आहे, याचं आत्मज्ञान त्यांना अध्यात्माने दिलं नव्हतं, ते ‘कोरोना-लॉकडाऊन’ने दिलंय. ‘त्याचं अनुकरण करा!’ हे ओरडून सांगायची गरज असताना; काही मंडळींनी सरकारने ‘लॉकडाऊन’मध्ये दारू विक्री खुली केल्याचा दाखला देत, ‘प्रार्थनालये सुरू करावीत,’ यासाठी ‘मुंबई उच्च न्यायालया’त याचिका केली. कशासाठी ?

     प्रार्थनालये- देवालये बंद आहेत, कुणाचं काय अडलंय? या संकटातून देव-गॉड- अल्ला आपल्याला बाहेर काढणार नाही, याची लोकांना खात्री पटलीय. प्रार्थनालयातल्या देवाला काय, आपल्या मूर्तिवरची धूळ झटकण्या इतकीही बुद्धी-शक्ती नाही. तरीही त्याला पोटासाठी धंद्याला लावणार्या *कुणा भट- ब्राह्मणाने ‘कोरोना- लॉकडाउन’मुळे होत असलेल्या नुकसानीने जगणं असह्य झालं, म्हणून जीभ हासडून देवळाच्या  दारात प्राण सोडलाय का? कुणा मुल्लाला फुकटची ‘बांग’ ठोकावी लागतेय, म्हणून तो ‘भंडारा’ वा  शिखांचा ‘लंगर’ कुठे सुरू आहे, ते शोधत वणवण भटकतोय का? बौद्ध भन्ते जैनांच्या ‘देरासर’मध्ये काही काम मिळण्यासाठी नंगा मुनी बनून घुसू पाहातोय का? प्रभू येशूची लेकरं बरेच दिवस दिसली नाहीत, म्हणून चर्चच्या एकांताला कंटाळलेला फादर वा ब्रदर क्रूसला लटकू पाहातोय  का?* असे काहीही घडलेले नाही. सगळे आपल्या जागी सुखात आहे. म्हणून अलीकडेच नांदेडमध्ये एका मठावर पडलेल्या दरोड्यात शिवलिंगाचार्याचा पैशासाठी खून झाला. या खुनी दरोडेखोराने बहुदा ‘प्रबोधन’कार ठाकरे यांची ‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ ही पुस्तिका वाचली असावी. दगडाचे देव आणि त्या थोतांडाला जातिनिशी धंद्याला लावणारे भूदेव उर्फ भट- ब्राह्मण यांचा कठोर शब्दात समाचार घेतल्यावर प्रबोधनकार अखेरीस लिहितात, “हिंदुस्थानातील तरुण स्वयं प्रज्ञेने (म्हणजे स्वत:च्या अकलेने) उभा राहील, तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावर आणि देवावर पडेल!” हा विचार कृतीत आणण्याच्या तयारीसाठी ‘त्या’ दरोडेखोराने मठाधिपतीची निवड केली, असे का नाही म्हणायचे?

    असो. अशी प्रार्थनालये सुरू करण्यासाठी कोर्टात जाणारे लोक कुठल्या धर्माचे – पंथाचे – संप्रदायाचे आहेत, ते महत्त्वाचे नाही. सगळ्याच धर्म-पंथांचे ठेकेदार हे एकाच माळेचे मणी आहेत. महत्त्वाचे आहे, ते देवळाचे दरवाजे उघडण्यासाठी दारू दुकानाचा दाखला देणे ! हा दाखला योग्यच आहे. कारण ‘देव- दुवा आणि दारू’ हे सारखंच काम करतात.  वास्तव विसरायला लावणारी नशा देतात आणि तुमची नालायकी जगजाहीर करतात. हेच काम अध्यात्म करते! ते तुमची मन:स्थिती बदलवते; पण परिस्थिती बदलवत नाही. या बदलासाठी पोथी-पुराण, कुराण-बायबल आदी धर्मग्रंथांप्रमाणेच संतांचेही दाखले निकामी ठरतात.  कारण ‘संत आणि सायन्स’ याचा काहीही संबंध नाही. हे लक्षात घेऊन ‘नवसाला पावण्यासाठी फेमस’ असलेल्या ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव यंदा रद्द करून तिथल्या गणेशसेवकांनी ‘कोरोना’मुक्तीसाठी ‘प्लाज्मा दान मोहीम’ सुरू केली असावी. श्रद्धा- भक्तीपेक्षा ‘विज्ञान’ मोठे आहे, हे त्यांनी कृती- कार्यातून दाखवून दिलंय.

    विज्ञानाच्या संगतीचा झालाच तर फायदाच होतो, तोटा निश्चित होत नाही. विज्ञान हे सर्वांसाठी सारखेच असते ! म्हणूनच अथक संशोधनातून निर्माण होणारी ‘कोरोना’ लस करोडो लोकांना दिली जाईल. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना; किंवा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना सारखीच लस टोचली जाईल. विज्ञानाकडे सत्य-असत्य तपासून पाहण्याची निर्भय दृष्टी आहे. ती खंबीर आहे ; तरी ती अध्यात्मासारखी ‘अंतिम सत्य’ आपल्यालाच गवसलेय, अशी बढाई मारत नाही. कुठल्याही बड्या नावापुढे वा शक्तीपुढे विज्ञान झुकत नाही. विज्ञान हे कधीच निराशेची भाषा बोलत नाही. ते स्वभावतः आशावादी आहे. म्हणूनच ते ‘कोरोना’त्रस्त जगाला सांगते, ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे ना ! व्हॅक्सिन घेऊन येतोय ना!’

    अशा संकटीरक्षी विज्ञानाला शरण जाण्याची नाही ; तर विज्ञानवादी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘लस टोचा आणि  खोट्या भक्तिभावाचा धिंगाणा घाला,’ ही आध्यात्मिक हरामखोरी यंदाच्या गणपतीबरोबरच विसर्जित झाली पाहिजे. दगडाचे पूजन-भजन करुन मेंदूचा दगड झाला नाही, हेही दाखवून द्यावे लागेल. अन्यथा, ‘कोरोना’ ची पुढची आवृत्ती ही अधिक महाभयंकर असेल !

………………………………………………………..

 चित्रलेखा : वर्ष ३२; अंक : १

    या अंकाबरोबरच ‘साप्ताहिक चित्रलेखा’ स्थापनेचे ३२ वे वर्ष सुरू होत आहे. गेल्या ३१ वर्षांत ‘चित्रलेखा’ नियमितपणे दर सप्ताहाला प्रकाशित होतोय. गेले चार महिने ‘चित्रलेखा’ डिजिटल स्वरूपात प्रकाशित होतोय. या वाचकांची संख्या ‘छापील-चित्रलेखा’ वाचकांपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.  ‘चित्रलेखा’ची निर्मिती ही खर्चिक आहे. तथापि,’चित्रलेखा’ व्यवस्थापनाला अनेक ‘चित्रलेखा’प्रेमींनी  आस्थेने अर्थसहाय्य केल्याने ‘डिजिटल -चित्रलेखा’ लाखो वाचकांपर्यंत ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ‘विनामूल्य’ पोहोचवू शकलो.

     महाराष्ट्राच्या अनेक भागांत  ‘लॉकडाऊन’ असल्याने आणि रेल्वे व रस्ते वाहतूक सेवा पूर्ववत झाली नसल्याने, ‘चित्रलेखा’ची छपाई झाली तरी वितरण नीटपणे होऊ शकत नाही. तरीही अंदाज घेण्यासाठी हा ‘छापील-चित्रलेखा’ प्रकाशित करीत आहोत. ‘छापील चित्रलेखा’साठी बृहन्महाराष्ट्रातून  विचारणा होत आहे. पण त्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. तथापि, ‘डिजिटल चित्रलेखा’ नियमित मिळण्यासाठी  वार्षिक वर्गणी भरणे, हाच उत्तम पर्याय आहे. त्यासाठी ‘चित्रलेखा’ वितरण व्यवस्थेशी संपर्क ( *प्रकाश बरगे :* 9769623461, 9326311972 आणि *विजय पांडे :*  9819895800, 7977965392) साधावा, ही विनंती. गेल्या चार महिन्यांतील ‘डिजिटल- चित्रलेखा’साठी माझे *Dnyanesh Maharao* हे ‘फेसबुक’ अकाउंट सर्च करा. तिथे अंकांच्या ‘लिंक’ आहेत. सोबत ‘टेक्स्ट’मध्ये ‘आजकाल’ही आहे, त्याच्या वाचनाचा आनंद घ्या.

     ‘चित्रलेखा’च्या पहिल्या अंकापासून; म्हणजे गेली ३१ वर्षे मी संपादनाची जबाबदारी सांभाळतोय. अनेक चढ-उतार पाहिलेत. तरीही इतकी वर्षं टिकून उरलोय. ११ जूनला वयाची ६० वर्षं पूर्ण झाली. नियमानुसार सेवाकाल संपलाय. तथापि, मोठ्या पल्ल्याची शर्यत धावणाऱ्याला थांबण्यासाठी शर्यत संपली, तरी मैदानाला एखाद-दुसरी फेरी मारावी लागते. विषय कार्यक्षमतेचा असला, तरी कधीतरी थांबावंच लागतं. योग्य वेळी थांबेनच ! ‘चित्रलेखा’ची वाचक-सेवा मात्र निरंतर वाढत राहील ! नित्यनूतन राहील !  ‘कोरोना’चे संकट संपेपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. संचारबंदी कडक पाळा. पण विचारांचे स्वातंत्र्य मुक्त ठेवा ! व्यक्त व्हा !

■ (लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे संपादक आहेत)

9322222145

Previous articleविज्ञान आणि धर्म यांचा समन्वय आवश्यक आहे!
Next articleऊर्ध्व-विश्वाच्या मुसक्या कोण आवळेल?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.