एकाकीपणाशी मैत्र…

साभार: साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

स्वत:शी मैत्री करणे ही बाब म्हणावी तशी साधी व सहज नाही. विपश्यनेने वा प्राणायामानेही ती साधत नाही. त्यासाठी आपले मन, मेंदू, बुद्धी व असलाच तर तो आत्मा आपल्या पातळीवर आणावा लागतो. ही तपश्चर्या नाही. तो सरळ साध्या वास्तवाचा स्वीकार आहे. आपली खरी अडचण वास्तव स्वीकारता न येणे आणि स्वत:शी मैत्री करता न येणे, ही आहे. माणूस एकात्म होतो, म्हणजे काय? त्याचे मन, मेंदू व क्षमता एकत्र येणे. ते एकत्र आणता येणे अवघड असले तरी अशक्य कोटीतले नाही. मात्र त्या प्रयत्नांमागे कितीजण असतात? लोक खोट्या समाधानाच्या वा तात्पुरत्या उपायांच्याच मागे अधिक असतात. तेवढ्याने त्यांचे तात्कालिक समाधान होते. मात्र त्याचा प्रभाव कोणत्याही अंमली पदार्थाएवढाच असतो. त्यात चिरंतनत्व नसते. त्यावर उठणे आणि सातत्याच्या ऐक्याचा ध्यास धरणे, हाच मग मार्ग उरतो.
……………………………………………………….

निराशा वा डिप्रेशन हे दुसरे तिसरे काही नसून नकळत येणारे एकाकीपणच आहे. माणसे सभोवताली असतात. गर्दीचाही घोर असतो. त्यातच आपल्याजवळ असणारी आपली असणारी माणसेही खूप असतात आणि त्याही स्थितीत आपल्याला कोणी नाही, आपले मन जाणणारे कोणी नाही व प्रसंगी आपला शेवटच जणू जवळ आला आहे, ही भावना ज्यांना घेरते ती माणसे सगळी साधीच नसतात. त्यात नेते असतात, नट असतात, सेलिब्रिटीज असतात. त्यातल्या काहींची ही भावना एवढी जबर होते की अशांनी केलेल्या आत्महत्यांच्याच बातम्या येतात. मग आपण म्हणतो, ‘याला सारेच उपलब्ध होते. पैसा होता, मानमरातब होता, प्रेम करणारी माणसे (आणि स्त्रियाही) होत्या; तरी त्याला आत्महत्या करून या जगातून निघून जावेसे का वाटले असेल?’ सामान्य व साध्या माणसांच्या अशा मृत्यूची कोणी दखल घेत नाही.

पण त्यांनाही हे जगङ्‌व्याळ एकाकीपण कधीतरी भेडसावतच असते. ‘मी कोणाचा नाही अन्‌ कोणी माझे नाही’ ही मग कविता नसते. ते वास्तव असते. या वास्तवाच्या कारणांशी जाता येते. पण ही कारणे मनुष्यपरत्वे भिन्न असतात. पण कारणे वेगळी असली तरी ‘एकाकीपणाचे’ रूप सारखे आणि एकच असते. सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिला गेला. पण अँरिस्टॉटलने तो स्वत:च का पिऊन टाकला? अँनाक्झिमॅन्डर या तत्त्वज्ञाने ज्वालामुखीच्या विवरात उडी घेऊन आत्महत्या का केली? प्रत्यक्ष प्रभु रामचंद्राने शरयूत प्रवेश करून आत्मत्याग का करावा? बलरामाने त्याच्या मूळ (भुजंग) रूपात समुद्रात प्रवेश करून जीवनयात्रा का संपवावी? आणि श्रीकृष्णानेदेखील एका व्याधाने केलेल्या साध्या शिकारीच्या बाणाला बळी का पडावे? ईश्वराची अखेर म्हणून या घटनांची चिकित्सा कोणी केली नाही वा करीत नाही, पण त्यांना माणूस म्हणून समजून घ्यायचे तर हे प्रश्न आपल्यालाही पडावे की नाही? राज्य जिंकल्यानंतर आणि राज्याभिषेक झाल्यानंतर काहीच काळानंतरच पांडवांनी हिमालयाची वाट का धरली? शंकराचार्यांचा शेवट कसा झाला? ज्ञानेश्वरांदिकांनी ‘सदेह’ समाधी का घेतली आणि तुकारामही वैकुंठाला(?) कसा गेला… हे प्रश्न न संपणारे म्हणून मग आजच्या मानवी प्रश्नांकडे वळायचे. विनोबांच्या आणि सावरकरांच्या प्रायोपवेशनाचे खरे कारण तरी कोणते होते? आता सारे करून झाले आणि करण्याजोगे काही उरले नाही ही भावना? पण मग ज्यांचे सारेच करण्याजोगे राहिलेले असते आणि माणसे यशाच्या जवळ असतात, तीही या भावनेने का ग्रासली जातात?

त्यातून एक कोडे आणखीही. ज्यांच्याजवळ गमावण्यासारखे काही उरले नाही त्यांची जीवनेच्छा कधी अतिशय प्रबळ दिसते तर ज्यांच्याजवळ सारे काही आहे त्यांना मात्र मृत्यू जवळ करावासा वाटतो वा आपण ‘एकटे’ आहोत हे त्यांना जाणवते? आपल्यातली वानप्रस्थाश्रमाची किंवा संन्यासाश्रमाची कारणे यात शोधता येतात काय? पण ती माणसे तर प्रत्यक्ष ‘त्या’च्या शोधात निघाल्याचे सांगत असतात. ती खरोखरीच तशी असतात आणि सोय म्हणून सांगत असतात, की तशी इतरांची समजूत घालीत असतात? तिकडे गेलेली काही माणसे नंतर परतही येतात. त्यांना पाहिले वा त्यांचा विचार केला की मग या साऱ्याचे मृगजळच जाणवू लागते की नाही? याच संदर्भात देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विचार केला पाहिजे. उपाशी आहेत म्हणून नव्हे, केवळ कर्जबाजारी आहेत म्हणून नव्हे आणि मंत्री म्हणतात तसे दारू पिऊन तर नव्हेच नव्हे, मग एवढी सारी माणसे आत्महत्येला का प्रवृत्त होतात? जीवनाला कंटाळली म्हणून, नवीन काही उरले नाही म्हणून, आहे त्यातला आनंद संपला म्हणून की यापुढे आनंदाचे काही यायचे नाही म्हणून? वैफल्याची किंमत आयुष्याचे मोल देऊन ही माणसे चुकवीत असतील काय?

कारणे खूप सांगता येतील. ती व्यक्तिपरत्वे वेगळीही असतील. पण ती सारी सयुक्तिकच असणार नाहीत. तरीही थेट प्रभू रामचंद्रापासून या वैदर्भीय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपर्यंत काहीएक सामान्य सूत्र असेल काय? हा त्याग सामान्य नाही. तो अखेरचा आणि स्वत:सकट सारे संपविणारा आहे. तरीही तो स्वीकारला जात असेल तर त्याची कारणे खूप वेगळी व खोलात जाऊनच शोधावी लागणार. देहाच्या, मनाच्या व कदाचित अस्तित्वाच्याही… प्रयोजनशून्यतेमुळे हे एकाएकीपण वा नकोसेपण येत असते काय? या प्रयोजनाचा अर्थ तरी कोणता असतो? आपल्या आयुष्याचे नेमके प्रयोजन कितीजणांना कळलेले असते? ते न कळताच माणसे जगत असतात काय? एखाद्याला विचारले तरी त्याला त्याच्या आयुष्याचे प्रयोजन सांगता येईल का? आणि ते सांगितले तरी ते त्याला खऱ्या अर्थाने समजले असेल काय? ‘यदा यदाहि धर्मस्य’ असे म्हणत तो श्रीकृष्ण खरोखरच जन्माला आला असेल, की तो श्लोक त्याच्या नावावर कोणा एका व्यासाने वा दुसऱ्या कोणी खपविला असेल? एखाद्याला ज्ञानाची तृष्णा कधी व केव्हा जाणवली आणि येशूला ‘आपण आकाशाचे पुत्र असून या जगातली पापे वाहून नेण्यासाठी त्यानेच आपली निवड केली आहे.’ हे कधी समजले असेल? पैगंबराला त्याचे पैगंबर असणे केव्हा व कोणी सांगितले वा त्याचे वास्तव्य कळले की त्याने ते स्वत:च मानून घेतले? प्रत्येकच थोरा-मोठ्याला विचारता येईल, असा हा प्रश्न आहे.

गांधींजींचे सामान पहिल्या वर्गातून प्लॅटफार्मवर फेकून देणाऱ्या त्या पोर्टरने त्यांना ‘आपण स्वातंत्र्यासाठी जन्म घेतला’ या ज्ञानाची ओळख पटविली, की पुढल्या काळात ती त्यांना क्रमाक्रमाने जाणवत गेली. माणसे प्रयोजनासाठी जगतात की जे जगणे घडले तेच आपले प्रयोजन होते असे समजतात? प्राक्तनालाच प्रयोजन समजणे आणि ते गोंजारणे यातली फसवणूक वा आत्मवंचना लक्षात आल्याने माणसे एकाकी होतात काय? माणसांचे आयुष्य ठरते कसे? आणि ते ठरवितो कोण? प्रत्यक्ष ज्याचे आयुष्य तोच ठरवीत असेल, तरी तो ते आपले म्हणून निवडतो की परिस्थिती त्याला ते निवडायला भाग पाडते? आपल्याकडील स्त्रियांचे आयुष्य या अर्थाने पारदर्शी आहे. ठरवून दिलेला नवरा, निवडून दिलेला संसार, वाट्याला आलेला नवरा आणि जन्माला आली ती पोरे, त्यांच्यावर संस्कार करण्याचा अधिकार तरी तिला कुठे असतो? ते संस्कारपुरुष पुन्हा वेगळेच असतात. माणसे व्यवसाय वा नोकऱ्या करतात, मालक वा चाकर होतात. ती त्यांची स्वत:ची निवड असते काय? बापाची वारसदारी म्हणूनच बहुसंख्य माणसे आपल्या आयुष्याचे मार्ग नकळत स्वीकारत असतात की नाही? (भारतात बापाचा धर्म, जात, असलीच तर इस्टेट व राजकीय पक्षही मुकाटपणे स्वीकारण्याची व्यवस्था आहे आणि तीच व्यवस्थित आहे, असे सांगणारे धर्मसंस्कार आहेत.)

आजचे किती नोकरदार, व्यावसायिक, पुरोहित, पुजारी आणि चतुर्थश्रेणी कामगार त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन म्हणून त्यांचे काम करीत करतात? ती साऱ्यांसाठी नियती असते. ही नियती नाकारता येत नाही. आवड म्हणून स्वीकारता येत नाही. तो सगळ्या मनुष्यमात्रांचा नाईलाज असतो. अभियंत्यांना जास्तीचे वेतन मिळायचे तेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालये भरलेली दिसली. बँकाचे पगार चांगले झाले तेव्हा त्यांच्या परीक्षा देणाऱ्यांमध्ये वाढ झाली. प्राध्यापकांचे वर्गही तेव्हाच वाढले. आहे ती नियती झुगारून आपले मार्ग स्वत: तयार करणारी माणसे किती आणि त्यांचे प्रमाण केवढे? अशा लोकांचे यशापयश हेच मग समाजाच्या चर्चेचा विषय बनते. त्यातल्या यशाविषयी माणसे कमी बोलतात, प्रसंगी टीका करतात किंवा बोलणेच टाळतात. अपयशी माणसांविषयी बोलणे साऱ्यांना आवडते व ते त्याविषयी चवीने बोलतही असतात.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आपले चार पुरुषार्थ सांगितले जातात. तीच आपल्या आयुष्याची प्रयोजनेही आहेत (असे म्हटले जाते). यातला मोक्ष हा ब्रह्माएवढाच अदृश्य, अनाकलनीय आणि अज्ञात. धर्माची रूपे अनंत. त्याच्या संघटनाही जगात अनेक. (मानववंश-शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार जगातल्या धर्मांची संख्या 4200 हून अधिक आहे.) त्यांच्या व्यवस्था व आज्ञा परस्परविरोधी आणि महत्त्वाची बाब ही की, हे धर्म नीतीशी बहुदा दुरान्वयाने वा फटकून वागणारे. विषमतेला मान्यता देणारे, स्त्रियांना दुय्यम लेखणारे, गरिबांना व दलितांना तुच्छ मानणारे. अन्य धर्माच्या लोकांशी खोटा व्यवहार करण्याची, त्यांच्यावर आपला धर्म सक्तीने लादण्याची, एवढेच नव्हे तर त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करून त्यांच्या ठायी संतती उत्पन्न करण्याची परवानगी देणारे.

राहता राहिले अर्थ आणि काम. या पुरुषार्थांचा व प्रयोजनांचा संबंध माणसांशी येणारा. माणसे पैसा मिळविणार, सुखोपभोग घेणार व प्रसंगी दानधर्मासाठी त्याचा वापर करून समाजातील अभाग्यांनाही मदतीचा हात देणार. काम ही प्रवृत्ती आहे आणि ती उपजत असल्याने तिचा भोग घेणे, संतती वाढविणे व समाज अखंड राखणे हे त्यातून घडते. मात्र अर्थ व काम या वृत्तीही नेहमीच चांगल्या वापरल्या जातात असेही नाही. अर्थाच्या क्षेत्रात लुबाडणूक आहे, फसवणूक आहे, इतरांची लूट आहे. कामाच्या क्षेत्रात संयम नाही. त्यात बलात्कारापासून सर्व तऱ्हेच्या अत्याचाराचे प्रकार आहेत. धर्माने अंगिकारलेले पुरुषार्थच जर गैरमार्गाने नेता येत असतील तर माणसाला ते सदैव आनंदी कसे राखतील? त्यातून निराशा येणार, वैफल्य येणार, एकाकीपण येणार आणि जगात आपले कुणी नाही ही भावनाही येणार.

बहुतेकजण या पुरुषार्थांचे नाव ऐकूनच बिचकतात. सामान्यांना ती आपली क्षेत्रे नाहीतच, असे वाटते आणि ज्यांना ती आपली वाटतात त्यांचे स्वरूप नेहमीच आदरणीय असते, असे नाही. असे पुरुषार्थ गवसणे वा न गवसणे याचा या एकाकीपणाशी संबंध कुठे येतो? ही स्थिती एकाकीपणच स्वयंभू असल्याची वा तेच आपले खरे व अंतस्थ रूप असल्याचे सांगणारी ठरते काय? येताना एकटे, जाताना एकटे असेच हे सारे असते काय? की एकाकीपण दाखविण्याचा, इतरांत मिसळण्याचा व त्यांच्यातले एक होऊन हरविण्याचा क्षण खरा असतो? पण हे हरविणे कायमचे नसते. तो स्थायीभावही नसतो. ती माणसे गेली वा दुरावली की पुन्हा उरते ते एकाकीपणच की नाही? माणसे भक्तिरसात डुंबतात. भान हरपून बसतात. ते संत म्हणे प्रत्यक्ष परमेश्वराशी बोलायचे. पण ते डुंबणे व हरविणे किती काळाचे? आणि ते बोलणे तरी खरे की आभासच? विधवा, विधुर, परित्यक्त, कुटुंबापासून तुटलेले, बहिष्कृत, ज्यांची मुले विदेशात व नोकरीनिमित्त अन्यत्र राहतात ते एकाकीच जगतात. हे एकाकीपण ते सुखरूप करून घेतात की ते केवळ सुसह्य असल्याचे मानतात? कधीतरी कोणीतरी भेटेल, मग तेवढाच वेळ आनंदात. आवडीचे काही घडेल म्हणून त्याचीच वाट पाहण्यात, आपल्याला आपले मानणारे कुठे तरी दूर का होईना आहेत या समजात. पण हे सारे समज स्वत:ची समजूत घालणारेच असतात; असते ते सारे एकाकीपणच. समाजात, घरच्यात, साऱ्यांच्यात अगदी मित्रमैत्रिणी असतानासुद्धा! फार कशाला, अंथरुणातही ते जाणवणारे असतेच. त्यावर मात करायची की त्याच्याशीच मैत्र करायचे? ते ज्यांना करते येते ते भाग्यवान, बाकीचे नशिबाला दोष देणारे…

या साऱ्यातून शिल्लक राहणारा प्रश्न पुन्हा तोच. एकाकीपण हाच आपला स्थायिभाव आहे काय आणि तो नाकारतो म्हटले तरी नाकारता येत नाही काय? एक संबंधित प्रश्न आणखीही. हे एकाकीपण शारीरिक दुबळेपणाने, दुराव्याने वा कोणाशी संबंध नसल्याने येते, मानसिक दुराव्याने येते की आपण बहिष्कृत म्हणून एकटे असण्याच्या जाणिवेतून येते? वैधव्य वा विधुरपण आलेली माणसे असतात. त्यातली काही समाधानी तर काही कमालीची बेचैन दिसतात. याच्या अगदी उलट अवस्थाही पाहता येते. विवाहित व समाधानी दिसणाऱ्या स्त्री-पुरुषांचे मानसिक एकाकीपणही पाहता येते. त्यांची बेचैनी उघड दिसणारीही असते. सारे एकाकीपण, तो फ्रॉईड म्हणाला तसे लैंगिक असमाधानातून येत असते काय? जोवर तो अनुभव आहे, तोवर जीवन आपले आहे आणि तो अनुभव संपला की जीवन दुरावले आहे आणि एकाकीपण मनाचे व देहाचेही- एकाचवेळी वाट्याला आले आहे, असे जाणवत असावे काय?

मागील लेखांकात एका पंतप्रधानाच्या एकाकी अनुभूतीचा उल्लेख केला होता. त्यांच्यासारखाच अनुभव इतर लोकांच्या वाट्यालाही येत असावा. सॉक्रेटिसला शिष्य होते, पण मित्र होते काय? त्याची पत्नी झान्टिपी भांडखोर म्हणून ओळखली जाते, पण त्यांच्या वयातील चाळीस वर्षांचे अंतर लक्षात घेतले तर ते स्वाभाविकच नव्हते काय? तो माणसे जमवायचा, ती वादविवादासाठी आणि सत्याच्या शोधासाठी. त्यात त्याच्यावर व विशेषतः त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रेम करणारी माणसे होती. पण ती त्याची मित्र नव्हती. प्लेटोची मोठाली अभ्यासमंडळे होती. त्यात विद्यार्थी होते. पण त्याचे मित्र म्हणून कोणी ओळखले गेले नाही. अँरिस्टॉटलला शिष्य होते, गुरू होते. त्याच्याजवळ विद्यार्जनाच्या आशेने येणारे लोक होते. पण मित्र? त्याला विष घेऊन आत्महत्या का करावीशी वाटली असावी? आपल्याकडचे ऋषीमुनीही फारसे स्नेहसंबंधातले दिसत नाहीत. त्यांना बुद्धासारखेच अनुयायी होते. पण त्यांचे एकाकीपण समजून त्यात सहभागी होणारे किती होते? कृष्णाला अनेक स्त्रिया होत्या. पण त्याचे खरे मन त्यातल्या कुणावर जडले होते? त्याच्या एवढ्या मोठ्या मित्र-मैत्रिणींच्या परिवाराने त्याचे एकाकीपण खरेच घालविले असेल काय? व ते किती काळासाठी? शिष्यांना व अनुयायांना मित्र बनविता आले तरी त्यांच्यातले अंतर कायमच राहते. त्यात सहभागाहून चर्चेचा वाटा मोठा असतो. पण ते काहीअंशी समाधान निश्चितच देत असते. विसाव्या शतकातील देशातल्या व जगभरातील अनेक नेत्यांची नावे अशी सांगता येतील. त्यांच्यात मैत्र होते. मात्र त्या मैत्रीत पुरेसे अंतरही होतेच. अनेकांबाबत लिहिले गेले की ते बाप-लेक चांगले मित्र होते. पण त्या सांगण्यात खरेपणाहून कौतुकाचाच भाग अधिक होता. एखाद्या पित्याने आपल्या तरुण मुलाला आपल्यासोबत एखादे ड्रिंक दिले की, त्याची कहाणी होते. एरव्हीच्या त्यांच्या संबंधांबाबत फारसे कधी लिहिले जात नाही.

या एकाकीपणावर मात करता येते काय? त्याचा जाच सहन करता येतो काय? किंवा तो असह्य झाला तर काय करायचे असते? मानसोपचारतज्ज्ञ आणि त्यांचे उपचार येथे पुरेसे नाहीत. झोपेच्या गोळ्या घेणेही इष्ट नाही. समाजात व इतरांत मिसळणे आणि इतरांचे आपलेपण तात्पुरते अनुभवणे हा तात्कालिक पण अल्पकालीन उपाय आहे. हे एकाकीपणच आपले मानणे व तेच आपले खरे रूप आहे, तेच वास्तव, तेच प्राक्तन आणि तेच आयुष्य आहे, हे समजून त्याच्याशीच मैत्री करणे जमणारे आहे काय? ते जमले तर त्यावर काही प्रमाणात विजय मिळविता येतो. स्वत:शी मैत्री करणे ही बाब म्हणावी तशी साधी व सहज नाही. विपश्यनेने वा प्राणायामानेही ती साधत नाही. त्यासाठी आपले मन, मेंदू, बुद्धी व असलाच तर तो आत्मा आपल्या पातळीवर आणावा लागतो. ही तपश्चर्या नाही. तो सरळ साध्या वास्तवाचा स्वीकार आहे. आपली खरी अडचण वास्तव स्वीकारता न येणे आणि स्वत:शी मैत्री करता न येणे, ही आहे.

माणूस एकात्म होतो, म्हणजे काय? त्याचे मन, मेंदू व क्षमता एकत्र येणे. ते एकत्र आणता येणे अवघड असले तरी अशक्य कोटीतले नाही. मात्र त्या प्रयत्नांमागे कितीजण असतात? लोक खोट्या समाधानाच्या वा तात्पुरत्या उपायांच्याच मागे अधिक असतात. तेवढ्याने त्यांचे तात्कालिक समाधान होते. मात्र त्याचा प्रभाव कोणत्याही अंमली पदार्थाएवढाच असतो. त्यात चिरंतनत्व नसते. त्यावर उठणे आणि सातत्याच्या ऐक्याचा ध्यास धरणे, हाच मग मार्ग उरतो. पण त्यासाठी प्रयत्नांची गरज असते. ते प्रयत्न किती जणांना जमतात? अखेर स्वत:शी मैत्री करणे हीदेखील एक साधनाच आहे आणि तिची फलश्रुतीही चांगलीच असण्याची शक्यता आहे.

(लेखक नामवंत विचारवंत व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

हे सुद्धा नक्की वाचा-एकाकीपणाचे पिशाच!- http://bit.ly/2OPFa7a

Previous articleउनसे मोहब्बत कमाल की होती है.. जिनका मिलना मुकद्दर मैं नहीं होता
Next articleकेशवराव पोतदार – असेही पत्रकार होते !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here