एका छोट्या गैरसमजामुळे…..

-डॉ साधना पवार,पलूस

लग्नानंतरची पहिलीच पाळी चुकली तर, काही कुटुंबांमध्ये त्या नवविवाहित मुलीवर लग्नाअगोदर तिचे काही शारीरिक संबंध असतील, असा आरोप लावला जातो.

ती आधीच दुसरीकडून कुठूनतरी गरोदर असताना आमच्याशी लग्न लावून दिले आणि आमची फसवणूक केली गेली,हे मूल माझे नव्हेच,असा पवित्रा घेतला जातो.

या परिस्थितीमुळे घटस्फोट, प्रसंगी मारामारी किंवा जीवे मारण्याचे प्रयत्न इथपर्यंत प्रकरण पोचू शकते.

अशी कित्येक प्रकरणे ऐकलीत,म्हणून हा लेख…

लग्नानंतर पंधरा दिवसातच पाळीची पुढची तारीख असेल, ती चुकली आणि लघवीच्या तपासणीत टेस्ट पॉझिटिव्ह आली तर बरेच लोक ही शंका उपस्थित करतात.त्यात हा संशयकल्लोळ वाढविण्यासाठी कधी कधी आम्ही डॉक्टर मंडळी अनवधानाने कारणीभूत ठरतो.

हे कसे काय? तर आम्ही डॉक्टर मंडळी गर्भाची जी सोनोग्राफी करतो त्यात गर्भाचे आठवड्यात वय हे पाळीच्या तारखेपासून मोजलेले असते. म्हणजे लग्नाला दीडच महिना झाला असेल,त्याअगोदर शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नसले आणि खरा गर्भ सहाच आठवड्याचा म्हणजे दीडच महिन्याचा असेल तरीही सोनोग्राफीत गर्भाला दोन महिने(आठ आठवडे) झालेले आहेत असा आमचा रिपोर्ट असू शकतो. बऱ्याचदा तपासणीनंतर डॉक्टरही वेळेअभावी किंवा अनावधानाने सर्व ठीक आहे,दोन महिन्याचा गर्भ आहे असे सांगतात व औषधे लिहून देतात, पण समोर बसलेल्या नवऱ्याच्या मनात आमच्या लग्नाला दीडच महिना झाला आणि पोटातले बाळ दोन महिन्याचे कसे?हा प्रश्न घोळत असतो, हे त्यांच्या गावीही नसतं.

प्रत्येकवेळी ही शंका तिथे डॉक्टरांसमोर विचारलीच जाते, असे नाही, डॉक्टरांनाही बऱ्याचदा हे व्यवस्थित समजावून सांगितले नाही तर केवढा मोठा गदारोळ उडू शकतो, हे लक्षातही येत नाही. इकडे मात्र घरी नवविवाहितेवर संशय घेतला जातो. मारझोड केली जाते. संशयकल्लोळामुळे प्रकरण कधी कधी घटस्फोटापर्यंतही पोचतं.

या प्रकरणांमध्ये बऱ्याचदा त्या मुलीचा काही एक दोष नसतो पण विनाकारण साध्या गैरसमजामुळे तिचा अक्षरशः बळी जातो.तिच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते. पोटातला गर्भ गर्भपात करून संपविणे किंवा त्याला जन्म देऊनही घटस्फोट झालेला असल्याने योग्य ते पालनपोषण करू न शकणे,असे प्रकार तिच्या वाट्याला येतात .मुलीचे दुसरे लग्न हा प्रकार अजूनही समाजात अवघड असल्याने आयुष्यभर लैंगिक कुचंबना स्वीकारून जगणे असे अनेक सामाजिक प्रश्न केवळ एका छोट्या गैरसमजामुळे उद्भवतात.

अलीकडे DNA टेस्ट आल्या आहेत पितृत्व सिद्ध करणाऱ्या ,पण प्रकरण तिथंपर्यंत पोचतंच नाही बऱ्याचदा. हा असा गैरसमजाचा प्रकार आपल्या कोणाच्या बाबतीत,किंवा आपल्या नातेवाईकांबाबतीत ,मित्रमैत्रिणींबाबतीत घडू नये म्हणून यामागचे शरीरक्रियाशास्त्र समजून घेणे गरजेचे आहे.

हे जरा विस्ताराने समजून घेऊया …

स्त्री च्या शरीरात दर महिन्याला एक बीज तयार होतं आणि पाळी नियमित असणाऱ्या स्त्रियांमध्ये साधारण पाळीच्या १४ व्या किंवा १५ व्या दिवशी ते बीज फुटून एक बीजपेशी बाहेर पडते.ती साधारण २४ तास फलनशील असते . जर पाळी अनियमित असेल तर हे बीज फुटून बीजपेशी बाहेर पडण्याची क्रिया पाळीच्या कोणत्याही दिवशी होऊ शकते. या दिवसात समागम होऊन पुरुषाच्या वीर्यातून आलेल्या शुक्राणू पेशीचे या बीजपेशीबरोबर फलन झाले तर पुढील १४ दिवसांनी पाळी चुकते, आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते.

जर योगायोगाने लग्नाच्या पहिल्या रात्रीच किंवा पहिल्या समागमाच्या वेळी स्त्रीचं बीज बीजपेशीतून फुटून आलेलं असेल,फलनशील असेल तर तेव्हाच फलन होऊ शकतं आणि पंधरा दिवसानंतर due असलेली पाळी चुकुन टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते.

आता आम्हा डॉक्टर मंडळींच्या सोनोग्राफी मशिन्स गर्भाचे वय दोन आठवड्यानी जास्त का दाखवतात बरं?असा प्रश्न तुम्हांला पडला असेल.सोनोग्राफीत येणारं गर्भाचं वय हे खरा गर्भ तयार होतो, त्याच्या साधारण १५ दिवसांअगोदरचं (Menstrual age)दाखवलं जातं. कारण तसं Caliberation केलं तरच प्रसूतीची तारीख ठरवणं, गर्भाची वाढ व्यवस्थित होतेय का, यावर लक्ष ठेवणं शक्य होतं.

कधी कधी नवविवाहितेवर संशय व्यक्त करत एखादा नवरा म्हणतो की , आमचे बीज फुटण्याच्या काळात संबंध आलेच नव्हते ,मग ही Ppregnancy कशी?

कसंय,पुरुषाच्या लाखो शुक्राणूपैकी बहुतांश शुक्राणू समागमानंतर लगेचच मरून जात असले तरी स्त्रीच्या योनीमार्गात ,गर्भाशयात ते कधी कधी सात दिवसापर्यंतसुद्धा जिवंत आणि फलनशील राहू शकतात. त्यामुळे बीजपेशी बीज फुटून बाहेर यायच्या दिवसात जरी संबंध आलेले नसले तरीही Pregnancy संभवते.काहींची फर्टीलिटी इतकी दांडगी असते की वीर्यपात प्रत्यक्ष योनीमार्गात न होता,वीर्य योनीद्वारावर सांडले तरी गर्भधारणा संभवते.

तर मुद्दा हा आहे की आपले शरीररचना,शरीरक्रिया शास्त्र थोडे फार जाणून घेतले , स्त्री रोग तज्ञांकडून लग्नपूर्व समुपदेशन करून घेतले तर आपण छोट्या गैरसमजातून होणारे मोठे प्रकार टाळू शकतो.

नवविवाहित जोडप्यांनी(खासकरून अरेंजड मॅरेज मधील) लग्नानंतर लगेच गर्भधारणा टाळावीच असा सल्ला आम्ही देतो.कारण लग्नानंतर लगेच Unplanned गर्भधारणा झाल्यास अनेक समस्या संभवतात. स्त्रीच्या शिक्षणात खंड पडू शकतो.पतीपत्नीला त्यांचे स्वभाव एकमेकाला अनुरूप आहेत का हे ओळखण्यासाठीचा पुरेसा वेळ मिळण्याआधीच नवी जबाबदारी येऊन पडते , गर्भावस्थेत पहिल्या तीन आणि शेवटच्या तीन महिन्यात संबंध निषिद्ध असल्यामुळे सुरुवातीच्या ओढ असण्याच्या काळात कामक्रीडेच्या आनंदात बाधा येते. सासरकडच्या घरात ऍडजस्ट व्हायच्या आधीच गर्भावस्थेतील उलटी मळमळ ,झोप येणे,असे त्रास आणि होणाऱ्या नवीन खर्चामुळे खटके उडायला सुरवात होते. सासरकडचे आत्यंतिक छळ वगैरे करत असतील तरीही पोटात वाढणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेने ते सर्व सहन केले जाते.अश्या वेळेस यातून सुटका होण्याची शक्यता असूनही स्त्री नको असलेल्या विवाहबंधनात अडकते.

कंडोमचा फेल होण्याचा रेट जास्त आहे म्हणून आम्ही जास्त खात्रीचे गर्भनिरोधक म्हणून नवीन,अत्यंत सेफ असणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांविषयी जेव्हा नवपरिणीत जोडप्यांना सांगतो तेव्हा बहुतांशी जोडपी या गोळ्या घ्यायला सांशक असतात,कारण परत एक असा गैरसमज की या गोळ्या घेतल्या तर नंतर हवं असतं तेव्हा गर्भधारणा होत नाही. अर्थात या गैरसमजातही फारसे तथ्य नाही.आपल्या फॅमिली डॉक्टरशी किंवा स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञांशी याबाबतीत सविस्तर बोलायला हवं.

या लेखानंतर ,काही मुलीतरी या जीवघेण्या गैरसमजाच्या प्रकरणातून वाचतील ही आशा आहे.

(लेखिका पलूस येथील नामांकित स्त्री रोग व प्रसूती तज्ञ आहेत)

[email protected]

Previous articleमानवी जीवनाशी भयावह खेळ खेळणाऱ्या फार्मा कंपन्या
Next articleपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.