काटकसर, बचत आणि दान करणारा महाराजा

साभार: साप्ताहिक साधना

– डॉ. राजेंद्र मगर

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभार करताना अनेक गरजू व्यक्ती आणि संस्थांना इ.स. 1881 ते 1939 या काळात 89 कोटी रुपयांचे सत्पात्री दान केले. महाराजांच्या या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूवर ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’चे संशोधन सहायक डॉ. राजेंद्र मगर यांनी ‘दानशूर महाराजा सयाजीराव’ हा चारशे पृष्ठांचा अनोखा ग्रंथ सिद्ध केला आहे. येत्या काही दिवसांत ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. दि.28 डिसेंबर हा सयाजीराव महाराजांचा राज्याधिकारप्राप्तीचा दिवस आहे. या निमित्ताने महाराजांच्या प्रचंड आणि अनोख्या दातृत्वाची तोंडओळख करून देणारा  लेख प्रकाशित करत आहोत. – संपादक, साधना
………………………………………………

महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या व्यक्तिमत्त्वात विद्वत्ता, उद्योगशीलता, चतुरस्र बुद्धी, हिंमत, व्यासंग अशा अनेक गुणांचा समुच्चय होता. योगायोगाने राजगादी मिळालेल्या या राजाने आपल्या 64 वर्षांच्या कारकिर्दीत बडोदा संस्थानात केलेल्या सुधारणा नजरेत भरणाऱ्या होत्या. राजगादीवर विराजमान झाल्यावर दत्तकमाता महाराणी जमनाबाईसाहेब, दिवाण टी.माधवराव, तत्कालीन इंग्रज अधिकारी आणि शिक्षक यांनी त्यांना राज्यकारभारासाठी तयार केले. या तिघांच्या दूरदृष्टीमुळे सयाजीराव महाराजांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले. राज्यकारभार हाती येताच त्यांनी बडोदा संस्थानाची ‘हुजूर सवारी’ केली.

राज्याचे पाहणी दौरे करत असताना सयाजीराव महाराजांच्या लक्षात आले की, संस्थानातील प्रजेला सुधारणांची आवश्यकता असून लोकांना सोईसुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. प्रत्येक विभागात सुधारणा करण्यासाठी त्यांनी या समस्यांचा मुळातून अभ्यास केला. यामुळे त्यांना त्या-त्या विभागातील समस्यांची जाणीव झाली. यावर उपाययोजना करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, हेही त्यांच्या लक्षात आले. राज्याच्या तिजोरीत जर धन मुबलक असेल, तर या धनातून सुधारणा होऊ शकतात हे वास्तव त्यांनी स्वीकारले; परंतु राज्याची तिजोरी भरायची म्हणजे प्रजेवर अमानुष कर लादून भरणे योग्य नाही, याचीही त्यांना कल्पना होती. राज्याचे उत्पन्न ज्यातून येते, त्या पूर्वीच्या आणि पारंपरिक स्रोतांमध्ये असणाऱ्या त्रुटी शोधल्या. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार केले.

राज्याचे उत्पादन वाढवले –

सयाजीराव महाराजांनी राज्याचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पारंपरिक पद्धतीत सुधारणा केल्या. काही सरदार आणि देवस्थानाचे प्रमुख यांनी पिढ्यान्‌-पिढ्या संस्थानामार्फत मिळालेल्या जमिनीच्या उत्पन्नावर आपली उपजीविका चालवली होती- ज्यांनी आजपर्यंत संस्थानात कधीही कर भरला नव्हता, त्यांना महाराजांनी योजलेल्या नव्या नियमाप्रमाणे करपात्र केले. यामुळे ऐतखाऊ आणि सनातनी लोकांनी काही काळ खळखळ केली; परंतु महाराजांनी प्रत्येक गोष्ट पूर्वतयारीनिशी केल्याने आणि प्रशासनावर त्यांचा वचक असल्यामुळे या गोष्टी त्यांना साध्य करता आल्या. महाराजांनी राज्याच्या उत्पन्नाला शिस्त लावली. त्यातील एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शेतसाऱ्यात त्यांनी आणलेली नियमितता आणि पारदर्शकता.

देवस्थानासाठी देण्यात आलेल्या जमिनी, त्यांच्या पूर्वजांनी बक्षीस म्हणून दिलेल्या जमिनी आणि पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी करमाफी दिलेले बडे सरदार व मानकरी यांच्या जमिनी करपात्र केल्या. यासाठी गुरू इलियट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुखत्वाखाली ‘बारखळी खाते’ निर्माण केले. याअंतर्गत आतापर्यंत न मोजलेल्या जमिनींची मोजणी झाली. त्यावर कर बसविला. ज्या जमिनी लागवडीखाली नाहीत, त्या लागवडीखाली याव्यात म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. अशा जमिनीचा शेतसारा काही वर्षांसाठी माफ केला. दुष्काळानंतर शेतकऱ्यांना शेतीत उत्पादन घेता यावे यासाठी आगाऊ रक्कम (तगाई) देण्याची पद्धत सुरू केली. राज्यात अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान दिले. इंग्रजांना द्यावा लागणारा काही वस्तूंवरील कर मुत्सद्देगिरीने कमी करून घेतला. अशा प्रकारे पारदर्शी आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या नियोजनबद्ध धोरणामुळे राज्याचे उत्पन्न वाढले.

राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी हुकूम –

भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि करावयाच्या सुधारणांसाठी राज्यात अधिक धनराशी शिल्लक पाहिजे, यासाठी महाराजांनी राजसत्ता हाती आल्यापासूनच उपाययोजना केल्या. राज्याचे उत्पन्न आणि खर्च विचारात घेऊन बचत करावी यासाठी काढलेला हुकूम महत्त्वाचा आहे. तो पुढीलप्रमाणे- ‘राज्यकारभार चालवण्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी राज्यात उत्पन्नाच्या बाबी सुधारलेल्या देशास अनुसरून व न्याय्य अशा पायावर ठरवून उत्पन्न वसूल करण्यात येत असावे; परंतु असे ठरलेले उत्पन्न वसूल करण्यानेच केवळ आपले कर्तव्य संपले असे अंमलदारांनी न समजता, ते उत्पन्न योग्य मर्यादेत वाढविण्याचे कोणकोणते मार्ग आहेत हेही पाहिले पाहिजे आणि ज्या खात्याचा संबंध उत्पन्नाच्या बाबींशी असेल त्या सर्व खात्यांनी त्या विषयाकडे नेहमी लक्ष देत असावे. दुसऱ्या देशी राज्याचे उत्पन्न निरनिराळ्या कारणांनी वाढत असते, तसे मार्ग आपल्याकडेही सापडण्यासारखे आहेत आणि त्याशिवाय दुसरे शोधून काढण्यासारखे आहेत. उदा- 1) पडिक जमिनींत लागवड करणे, 2) वेरा, कर वगैरे यात फेरफार करणे, 3) व्यापारास उत्तेजन व सवलती देणे, 4) सेव्हिंग बँका काढून पैसे एकत्र करणे, 5) शेतीच्या पद्धतीत सुधारणा करून पीक वाढवणे, 6) शेतकरी लोकांच्या पेढ्या काढून त्यांची स्थिती सुधारणे, 7) जंगलांची स्थिती सुधारून व ती व्यवस्थित करून उत्पन्न वाढविणे, 8) तलाव, कुवे, रस्ते वगैरे नवे करणे व जुने दुरुस्त करणे, 9) सरकारांतून जथाबंद झाडे लावणे व तसे करण्यास लोकांना उत्तेजन देणे, 10) अबकारी खात्याचे उत्पन्न योग्य प्रमाणात वाढविणे, 11) जंगलातील लाख काढण्याची तजवीज चांगल्या पायावर करून ते उत्पन्न वाढविणे.’

अधिकारी आणि कर्मचारी यांनी राज्याचे ठरलेले उत्पन्न वसूल करावे, तसेच ते वाढविण्याचे मार्ग शोधावेत अशा अर्थाचा हा हुकूम महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे राज्यात राहणारी शिल्लक योग्य ठिकाणी ठेवून त्यातून जास्तीत जास्त व्याज कसे मिळेल यासाठी ते आग्रही होते. यासंबंधानेही त्यांनी हुकूम काढला होता. ही शिल्लक सुरक्षित जागी ठेवावी, याकडेही त्यांनी या हुकमात लक्ष वेधले होते.

काटकसर स्वतःपासून –

महाराजांनी राज्याचे फक्त उत्पन्नच वाढवले नाही, तर राज्यात होणाऱ्या अवास्तव खर्चावर मर्यादा आणल्या. त्यात काटकसर केली. याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. महाराजांनी राज्यकारभाराच्या प्रारंभी सुरू केलेल्या पहिल्या हुजूर स्वारीपासूनच याची सुरुवात झाली. ही संस्थानाच्या प्रमुखाची पाहणी असल्यामुळे त्यांच्याबरोबर असणाऱ्या साहित्याची आणि काम नसणाऱ्या सेवकांची जास्त गर्दी होत असे. त्यावर खूप खर्चही होत असे. हा लवाजमा महाराजांनी टप्प्याटप्प्याने कमी केला. यातील एक उदाहरण महत्त्वाचे आहे, ते महाराजांनी एका भाषणात पुढे सांगितले. ‘‘मी एकवीस वर्षांचा असताना एकदा प्रांतात दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा या मंडळींपैकी काही नोकरांनी बोभाटा होऊ नये व महाराज कोणत्या वेळी काय मागतील त्याचा नेम नाही, म्हणून माझे सोळाव्या वर्षांचे कपडे व पादत्राणंही प्रांतस्वारीत नेली होती.’’ महाराजांनी याबाबत अधिकारी आणि नोकरांना तारतम्याने वागण्याच्या सूचना दिल्या. अशा प्रकारचा अवास्तव खर्च त्यांनी राज्यकारभाराच्या प्रारंभीच कमी केला. समाजातील प्रत्येकाने व्यवहार करताना काटकसर केली पाहिजे, याबाबत महाराज नेहमीच आग्रही होते. महाराज प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासूनच करत. यामुळे इतरांना- विशेषतः राजवाड्यातील नातेवाईक आणि संस्थानातील अधिकाऱ्यांना मनात नसतानासुद्धा तिचा स्वीकार करावा लागत असे.

राजवाड्यात महाराज, महाराणी आणि कुटुंबातील इतरांच्या सेवेत खूप सेवक असत. हा आकडा साधारणपणे चारशेच्या आसपास होता. त्यामुळे विशेषतः महाराजांची सोय न होता गैरसोयच अधिक होत असे. कोणावरही एका कामाची जबाबदारी नसे, त्यामुळे प्रत्येक जण काम दुसऱ्यावर ढकलून रिकामा होत असे. महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब सुटली नाही. कामाच्या आणि केवळ हुजरेगिरी करणाऱ्या सेवकांना त्यांनी दुसऱ्या खात्यात वर्ग केले किंवा कामावरून कमी केले. चारशे नोकरांचा आकडा जवळजवळ चाळीसवर आणला. त्याचप्रमाणे देशांतर्गत प्रवास करताना आणि परदेश केवळ दिखाऊपणा व डामडौलासाठी खूप मोठा लवाजमा त्यांच्या सोबत असे. ही बाब त्यांच्या लक्षात येताच हाही लवाजमा कमी केला. महाराजांनी प्रत्येक नोकराची जबाबदारी निश्चित केली. त्यामुळे अमुक एका अव्यवस्थेला कोण कारणीभूत आहे याबाबत लगेचच खुलासा होत असे. राजवाड्यातील अनेक लोकांची आणि खात्यांची चौकशी महाराज स्वतः करत किंवा इतरांकडून करून घेत. या नियोजनामुळे नोकरांत एक प्रकारची शिस्त निर्माण झाली. कमी लोक नोकरीस लागू लागले, परिणामी खर्चात बचत झाली.

रियासतकार गो.स. सरदेसाई यांनी महाराजांकडे सदतीस वर्षे वाचक म्हणून आणि इतर पदांवर नोकरी केली. त्यांनी महाराजांच्या प्रवासाच्या खर्चाबाबत आणि इतर काटकसरीबाबत अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यातील एक- ‘सन 1882 च्या हिवाळ्यात महाराजांची स्वारी प्रथम कडी प्रांतात दोन महिने फिरावयास गेली, तेव्हा स्वारीत लोकसंख्या 2367, जनावरे 910 व स्वारीचा खर्च 1,34,647 रुपये झालेला आहे. सन 1888 साली निलगिरीस स्वारी गेली. त्या वेळी स्वारीचा लवाजमा असाच अवाढव्य असून साडेतीन महिन्यांचा खर्च रु.1,66,000 झाला. हल्ली (इ.स.1925) तशाच स्वारीतील लोकांची संख्या बहुधा 100 चे वर जात नाही. मोटार झाल्यापासून जनावरे बहुतेक कमी झाली आहेत आणि तीन महिन्यांचा खर्च अलीकडच्या महागाईतसुद्धा पन्नास हजारांवर जात नाही. पहिल्या विलायतच्या स्वारीत लोकांची संख्या 50 होती, ती हल्ली सुमारे 10 असते आणि त्या वेळी दरमहा एक लाख खर्च लागला, तो हल्ली 25 हजारांचे वर जात नाही.’ पुढे-पुढे महाराज अनेक वेळा फक्त पाच-सहा सेवक घेऊन प्रवास करत. अशा प्रकारे महाराजांनी स्वतःच्या खर्चात कपात केली. यासाठीचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी स्वतःसाठीसुद्धा अनेक हुजूरहुकूम काढले. त्यानुसार प्रत्येक बाबतीत काटकसर होऊ लागली. त्यामुळे ‘यथा राजा तथा प्रजा’ या म्हणीप्रमाणे महाराजांच्या कुटुंबातील सदस्य आणि अधिकारी वर्ग यांनासुद्धा बचतीची सवय लागली.

राजवाड्यातील काटकसर –

महाराजांची राजवाड्यातील काटकसरीची काही उदाहरणे पाहिली म्हणजे महाराज राज्याच्या खर्चाबाबत किती दक्ष होते, हे समजेल. यामध्ये सर्वप्रथम त्यांनी खाजगी खर्चात कपात केली. राजवाड्यात होणारे अवास्तव खर्च कमी केले. महाराजांच्या दत्तक मातोश्री महाराणी जमनाबाई यांना विडा खाण्याची सवय होती. यासाठी राजवाड्यात दररोज दोन शेर चुना मागवण्यात येई. तसेच राजवाड्यात जेवण करणारी माणसे आठ होती; परंतु जेवणानंतर त्यांच्या मुखशुद्धीसाठी दोन डझन सफरचंदे मागवावी लागत. महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून या बाबी सुटल्या नाहीत; परंतु अशा खर्चावर ताबडतोब नियंत्रण आणणे शक्य नव्हते. अशा वेळी त्यांनी महाराणी जमनाबाई यांना समजावून सांगितले. अशा अवास्तव बाबी टप्प्याटप्प्याने कमी केल्या. अशा बाबींवर नियंत्रण आणताच राजवाड्यातील रूढी व परंपरांना चिटकून राहणाऱ्या आणि परंपरावादी विचारसरणीच्या नातेवाइकांनी तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. त्या वेळी महाराजांनी त्यांना कधी सबुरीने, तर कधी नियमाने नवे धोरण आणि योजना यांचा स्वीकार करण्यास भाग पाडले.

राजवाड्यातील नातेवाइकांनी गरजेपुरता खर्च करावा; तसेच राज्याचे उत्पन्न वाढवून प्रजेच्या सुधारणा करता याव्यात यासाठी महाराजांनी जमा-खर्च या दोन्हीवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवले होते. खानगी खात्यातील खर्च कमी व्हावा यासाठी महाराजांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. याबाबत रियासतकार सरदेसाई यांनी महत्त्वाचे उदाहरण दिले आहे. ‘सन 1905 साली श्रीमंत संपतराव यांची नेमणूक खानगी खात्याचे कारभारी म्हणून झाली. ती मध्यंतरी अनेक फेरफार होऊन सन 1913 पावेतो चालली. त्यांच्या वेळचे मुख्य काम म्हणजे रिटेंचमेंट कमिटी (काटकसर समिती) नेमण्यात येऊन सन 1906-07 सालांत तमाम खर्चाची व व्यवस्थेची नवी रचना करण्यात आली.’ खानगी खात्यात काटकसर करावी, म्हणून काटकसर समितीची स्थापना करावी हे महाराजांच्या कारभाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. राजवाड्यात डामडौलाच्या नावाखाली राजकुटुंबाचे सदस्य, नातेवाईक आणि अधिकारी वायफळ खर्च करत. याला प्रत्येक वेळी लगाम घालणे शक्य नव्हते. महाराज राजधानीच्या किंवा राज्याबाहेर असताना खर्च वाढत असे. राजवाड्यातील व्यक्ती याबाबत काळजी घेत नसत. त्यामुळे महाराजांनी आर्थिक बाबींचा जेथे-जेथे प्रश्न येत असे अशा सर्वच आस्थापनांला नियम केले. या सर्वच हुजूरहुकमांची ‘आज्ञापत्रिकेत’ प्रसिद्धी केली. (सयाजीराव महाराज गादीवर आल्यावर जे-जे नियम करत, त्या सर्वच नियमांची प्रसिद्धी या पत्रकात दर आठवड्याला केली जात असे.) त्यातील अनेक हुजूरहुकम खानगी खात्यासंबंधाने होते.

राजवाड्यातील प्रत्येक आर्थिक बाबीसंबंधी महाराजांनी काही नियम केले. नियमबाह्य खर्च करणाऱ्याला कायद्याने शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली. खर्च योग्य कारणांवर होऊ लागला. त्यामुळेही खर्चात बचत झाली. महाराजांनी खर्चात काटकसर केली; याच्या उलट राजवाड्यातूनही उत्पन्न वाढावे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यामध्ये त्यांनी योजलेला एक-एक उपाय पाहिला म्हणजे महाराज खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी किती आग्रही होते, हे लक्षात येते. जनावरांच्या पायाखालील कचरा, बागांतील गवत, फळे, फुले, भाज्या, प्रत्येक खात्यातून निरुपयोगी होणारे साहित्य अशा सर्वांचा लिलाव करून येणारी रक्कम सरकारमध्ये जमा करण्याची पद्धत सुरू केली. अशा सूक्ष्म नियोजनामुळे राजकोषात कायमच भर पडत राहिली.

महाराणींना बचतीचा सल्ला –

सयाजीराव महाराज स्वतःबरोबर कुटुंबातील इतरांनी बचत करावी यासाठी आग्रही असत. ते नेहमीच कुटुंबातील सदस्यांना बचतीबाबत मार्गदर्शन करत. महाराणी चिमणाबाई यांना एका पत्रातून बचत करण्याविषयी सांगितले. हे पत्र महाराणी चिमणाबाई यांना लिहिले नसले तरी, त्यातून त्यांनी बचत करावी याबद्दल स्पष्टपणे उल्लेख आहे. महाराज या पत्रात लिहितात, ‘महाराणींनी त्यांच्यासोबत जास्तीचा स्टाफ व इतर खास व्यक्तींना नेण्याची गरज नाही आणि त्या लोकांनी स्वत:चा खर्च स्वत: करण्याऐवजी तो राज्यावर टाकणे योग्य नाही. मग निधीची स्वतंत्र तरतूद करण्याचा उपयोग काय? महाराणींनी या बाबी स्वत: समजून घ्यायला हव्यात. त्यांना हे सांगण्याची गरज भासू नये. मी हे सांगतोय ते यामुळे नाही की, मी माझ्या कुटुंबाचा सहानुभूतीने विचार करीत नाही. कदाचित ते तसा विचार करतील; पण जोपर्यंत केलेल्या तरतुदीतच खर्च करण्याची प्रत्येकाला सवय लागणार नाही, तोपर्यंत आज्ञापालन आणि शिस्तीचीही अपेक्षा करता येणार नाही.’

महाराजांनी अशा प्रकारे महाराणी चिमणाबाई यांच्याकडूनही बचतीची अपेक्षा ठेवली होती. त्यांनी जास्तीचा आणि अनावश्यक खर्च करू नये, म्हणून स्वतंत्र निधी राखून ठेवला होता. त्यातील निधीचा वापर करावा, असे सुचवले होते. वायफळ खर्च करू नये, आणि त्याचा भार राज्याच्या तिजोरीवर टाकू नये असे स्पष्ट आदेशसुद्धा दिले होते.

राजपुत्रांना बचतीची सवय लावली –

सयाजीराव महाराजांचे सर्वच राजपुत्र परदेशात शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी आणि खर्चासाठी महाराज खानगीतून पैसे पाठवत होते. यात राजपुत्रांच्या हातून कधी-कधी जास्त पैसे खर्च होत. त्यांनी जास्त खर्च करणाऱ्या राजपुत्रांना पुढील महिन्यात पैसे कमी करून दिले. याबाबतचे एक उदाहरण महत्त्वाचे आहे. लंडन येथे शिकायला गेलेल्या राजपुत्रांना खर्चासाठी प्रतिमहिना 40 पौंड पाठवले जात; परंतु एका महिन्यात या राजपुत्राने दहा पौंड जादा खर्च केले. महाराजांनी राजपुत्राच्या गार्डियनला पत्रातून कळवले- ‘असा वाढीव खर्च मंजूर केला जाणार नाही. राजपुत्रांनी मंजूर केलेल्या रकमेतच आपला खर्च भागवावा’ अशी ताकीद दिली. राजपुत्र जयसिंगराव परदेशात शिक्षण घेत होते. त्या वेळी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातून राजपुत्रांना अगदी कमी वयापासून बचतीची कशी सवय लावली, हे स्पष्टपणे दिसते. महाराज लिहितात, ‘तुम्हाला अकरा पौंड किमतीचा फोनोग्राफ (रेकॉर्ड प्लेयर) विकत घेऊन द्यावा, असे मी इलियट यांना लिहीत आहे; कारण तुम्ही चांगली प्रगती दाखवली आहे. पुढच्या वेळी मी तुम्हाला असे महागडे खेळणे घेऊ देणार नाही. कारण तुम्ही अशा अनावश्यक व महागड्या वस्तू खरेदी करू नयेत, असे मला वाटते. तुम्ही आरामात राहावे, पण स्वतःला अशा महागड्या सवयी लावून घेऊ नयेत. सुरुवातीला जरी तुम्हाला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे कठीण वाटले तरी, तुमच्या भविष्यासाठी हे कल्याणकारी होईल.’

महाराज सर्व राजपुत्रांना अशा प्रकारे बचत करून आणि खर्च कमी करून त्यात जीवनमान सुधारावे यासाठी मार्गदर्शन करत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून संस्थानातून दिला जाणारा खर्च कमी केला पाहिजे असे त्यांना वाटत होते.

दानधर्मात कपात –

महाराज राजगादीवर येण्यापूर्वी बडोदा संस्थानात मोठ्या प्रमाणावर दानधर्म चाले. तसेच श्रावण महिन्यात देशभरातून आलेल्या सर्व ब्राह्मणांना दक्षिणा दिली जात असे. केदारेश्वर मंदिराजवळ हिंदूंना खिचडी आणि मुसलमान लोकांना ग्यारमी दररोज दिली जात असे. त्यावर सरकारी तिजोरीतून लाखो रुपये खर्च होत. नको त्या कारणांसाठी आणि गरज नसलेल्या व्यक्तींना दान दिले जात असे. त्यामुळे खऱ्या गरजवंत लोकांना या दानाचा फायदा होत नसे. परिणामस्वरूप, केलेले बहुतांशी दान वाया जात असे. अभ्यासांती ही बाब महाराजांच्या लक्षात आली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीत दानधर्माचा फोलपणा त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी यात मोठ्या प्रमाणात कपात केली. हा खर्च पाच लाखांवरून 25 हजारांपर्यंत आणला. हे करताना अपंग, गरजू आणि निराधार व्यक्तींना मात्र दानधर्म सुरू ठेवला.

महाराजांचे दानधर्मविषयक विचार –

सयाजीराव महाराज कृतिवीर असल्याने ‘बोले तैसा चाले…’ या उक्तीप्रमाणे वागत. प्रज्ञावंत असल्याने कोणत्याही विषयातील सर्वंकष विचार करण्याची त्यांची पद्धत होती. बडोद्यातील ‘पिलाजीराव अनाथाश्रम’ उद्‌घाटन कार्यक्रमात केलेल्या भाषणांत विविध धर्मग्रंथांत दानधर्माचा असलेला अर्थ त्यांनी सांगितला. या भाषणाच्या सुरुवातीलाच दान कोणी घ्यावे किंवा दानधर्मासाठी कोण पात्र ठरतो, यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार मांडले. ‘समाज हा त्रिविध आहे. त्यात तीन प्रकारचे लोक ठळकपणे दिसतात. एक- सर्व समाजाचे नशीब ज्यांच्या मुठीत आहे असे धुरीण व प्रसिद्ध लोक. दुसरे- बहुसंख्य, पण सामान्य असे स्वावलंबी लोक. आणि तिसरे- स्वतःच्या पोटापाण्यासाठी दुसऱ्याच्या दानधर्मावर अवलंबून असलेले कंगाल लोक. यापैकी तिसऱ्या प्रकारच्या लोकांचा विचार आज प्रस्तुत आहे. जे लोक नेहमीच आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेऊन कायमचे कंगाल बनत नसतात, अशा सर्व लोकांना दानधर्माची आवश्यकता असते’ असे महाराजांचे स्पष्ट मत होते.

पूर्वी म्हटल्याप्रमाणे जे लोक धडधाकट व कोणत्याही प्रकारचे शारीरिक आणि मानसिक पंगुत्व नसलेले असतात, अशांना या दानधर्मातून वगळले पाहिजे, हा नियम महाराजांनी सुरुवातीपासूनच अवलंबिला. सयाजीराव महाराजांनी कोणतेही दान देतेवेळी त्याची उपयोगिता तपासून पाहिली. त्याचा उपयोग अनाथ, गरीब आणि अस्पृश्य लोकांसाठी झाला पाहिजे, असे त्यांना नेहमी वाटत होते. ‘राजसेवकांची कर्तव्ये’ या विषयावर महाराजांनी 23 फेब्रुवारी 1938 रोजी केलेल्या भाषणात दानधर्माविषयी स्पष्टपणे सांगितले.

‘‘पूर्वी दानधर्म व देवस्थाने याकडे वाजवीपेक्षा फाजील खर्च होत असे. आपल्याकडील समजुतीप्रमाणे दानधर्म हे राजाचे व राज्याचेही भूषण होय. त्यामुळे राजाच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांची साक्ष सहज पटते. तथापि, अशा धर्मादाय संस्था, त्यांच्या संस्थापकांचा हेतू, त्यांची कालमानानुसार असणारी आवश्यकता व त्यांचा होत असलेला प्रत्यक्ष उपयोग यांचा विवेकबुद्धीने विचार करावयास पाहिजे. तसे न करता केवळ लौकिक लालसेने किंवा अंधश्रद्धेने अशा धर्मादाय संस्था चालू ठेवणे किंवा त्यात इष्ट असेही फेरफार न करणे, हे समंजसपणाचे नाही. दानधर्म हा ‘देशे काले च पात्रे च’ या तीन गोष्टी लक्षात घेऊन करावयास पाहिजे. ज्या दानधर्मापासून चिरकालीन फलप्राप्ती होते आणि दारिद्य्र, आळस इत्यादी हानिकारक गुणांची वाढ न होता त्यांचे निरसन होण्यास जो कारणीभूत होतो, तोच योग्य दानधर्म होय. मोठमोठे जलाशय बांधणे, औषधालये स्थापणे अथवा ज्ञानार्जनाच्या कामी मदत करणे अशा बाबींसाठी होणारा दानधर्म उच्च होय. याच धोरणाने देवघरात अंधश्रद्धा व वेडगळ समजुती यांच्या आधारावर होत असलेले विधी व आचार काही अंशी बंद केले असून फक्त लौकिक व व्यावहारिक दृष्ट्या योग्य असे आचार व विधी चालू ठेवले आहेत. यातदेखील अद्याप सुधारणा करण्यास बरीच जागा आहे. सर्वांस धर्म पाहिजे आहे, मात्र तो नैतिक असून ऐदीपणास उत्तेजन देणारा नसला पाहिजे.’’

सयाजीराव महाराज बुद्धिवंत असल्यामुळे प्रचलित सर्व धर्मांतील दानाविषयी असणाऱ्या संकल्पना त्यांनी समजावून घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत्या. धर्माचा धाक दाखवून आणि शापाच्या भीतीने जबरीने दान वसूल करणाऱ्या लोकांपासून महाराज नेहमीच सावध राहिले. शास्त्रीय आधारावर आणि जे फक्त गरजवंत आहेत त्यांनाच दान दिले. थोडक्यात, प्रत्येक दान हे सत्पात्री झाले पाहिजे, असे मत महाराज मत मांडत; त्याचप्रमाणे दान देणारांनीसुद्धा यातून ‘आपण खूप मोठे काम करून मोक्षप्राप्ती करून घेतो आहोत, हा अहंकार बाळगणे योग्य नाही’ हे स्पष्टपणे सांगितले.

महाराजांचे प्रचंड दातृत्व –

सयाजीराव महाराजांनी राज्याचे उत्पन्न वाढवले. प्रत्येक खात्यात व स्वतः बचत केली. यामुळे राज्याची तिजोरी भरू लागली. या वाढलेल्या धनाचा उपयोग त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी करण्याचे ठरवले. शिक्षणामुळे व्यक्तीची -समाजाचीप्रगती होऊ शकते, हे महाराजांनी स्वतःच्या शिक्षणकाळात जाणले होते. प्रजेची प्रगती करायची असेल तर तिला शिक्षण देणे महत्त्वाचे आहे, हे ओळखून सरकारी खर्चाने शिक्षण सुरू करणारे सयाजीराव महाराज हे पहिले आहेत. त्यांनी संस्थानात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण सुरू केले. शेतीच्या शिक्षणाबरोबर तंत्रशिक्षणही सुरू केले. एवढेच नव्हे तर शिष्यवृत्ती देऊन अनेकांना परदेशात पाठवले. देशातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत लाखो रुपयांची देणगी दिली. महाराजांच्या दातृत्वामुळे शिक्षण घेतलेली एक नवी पिढी देशभरात तयार झाली. हे सर्व त्यांच्या दातृत्वामुळे घडले.

शिक्षणासाठी आणि मानवाच्या उत्कर्षासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे साहित्य होय. महाराजांनी जगभरातील साहित्याचा अभ्यास केला होता. त्यांनी युरोपातील समृद्ध साहित्य वाचले होते. तसे साहित्य देशी भाषेत निर्माण होण्यासाठी महाराजांनी संस्थानात भाषांतर शाखा काढली. त्यांच्या कार्यकाळात बडोद्यात मराठी भाषेची संमेलने तीन वेळा आयोजित केली गेली. इतरही देशी भाषांची संमेलने वारंवार आयोजित केली जात असत. महाराजांना दातृत्वामुळे अनेक साहित्यिकांना पाठबळ मिळाले. आर्थिक स्थैर्य लाभले. त्यामुळे देशी साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांतांत साहित्य निर्माण झाले. थोडक्यात, महाराजांच्या काळात साहित्यिकांना दिलेल्या राजाश्रयामुळे आणि दातृत्वामुळे बडोदानगरी साहित्यनगरी झाली होती.

राज्यकारभाराच्या प्रारंभीच शेती हा राज्याच्या उत्पादनाचा मुख्य भाग आहे, हे महाराजांच्या लक्षात आले. शेती ही मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्यामधील उत्पादनात अनियमितता असते, हेही त्यांनी जाणले. पूर्वी शेतसारा ठरविण्याच्या पद्धतीत आणि वसुलीत ठरावीक असे पारदर्शी धोरण नव्हते. त्यात आमूलाग्र बदल केला. शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणाऱ्या शेतसाऱ्यात पूर्ण राज्यभर एकसूत्रीपणा आणला. शेतकऱ्यांनी सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी अनेक वेळा शेतसारा माफ केला. शेतीत सुधारणांसाठी, आधुनिक पद्धतीने शेती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन पुढारलेल्या देशात शिक्षणासाठी पाठवले. दुष्काळात आणि इतर नैसर्गिक आपत्तीत मदत केली. शेतीबाबत महाराजांनी दाखवलेल्या दातृत्वामुळे बडोदा राज्यातील शेतकरी भाग्यवान ठरला. महाराजांनी शेतकऱ्यांना मदत करताना तो परावलंबी होण्यापेक्षा स्वावलंबी कसा होईल याकडे अधिक लक्ष दिले.

लोककल्याणार्थ कार्य करणाऱ्या अनेक पिढ्या घडण्याचे कार्य नामांकित संस्थांतून घडते, हे त्यांनी ओळखले होते. म्हणून महाराजांनी अशा संस्थांना मदत केली. यामध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन- पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय- पुणे, शिवाजी शिक्षण संस्था पुणे अशा शैक्षणिक, सामाजिक आणि इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक संस्थांचा समावेश होता. महाराजांनी ज्या संस्थांना मदत केली, त्या संस्थांमधून लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. या संस्थांच्या माध्यमातून अनेकांना मदत झाली. या केलेल्या मदतीमुळे सयाजीराव महाराज हे आधुनिक भारताचे शिल्पकार ठरतात. समाजसेवेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना महाराजांनी सर्व प्रकारची मदत केली. ही मदत अनेक वेळा व्यक्तिगत पातळीवरील असली तरी मदत घेणारी व्यक्ती समाजासाठी कार्य करत असल्याने ती मदत महाराजांनी मुक्तहस्ते केली. यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, पंडित मदनमोहन मालवीय, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर वि.रा. शिंदे, धोंडो केशव कर्वे या आणि त्या काळातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व इतर क्षेत्रांतील लोकांचा समावेश होता. अशा समाजधुरीणांना मदत केल्यामुळे त्या व्यक्तींनी सुधारणांचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

सयाजीराव महाराज हे जगप्रवासी होते. त्यांनी जगातील अनेक देशांचा प्रवास केला होता. या प्रवासात अनेक गरजवंत लोक महाराजांना भेटत असत. त्यांची निकड पाहून महाराज त्यांना मदत करत. प्रवासात महाराजांनी केलेली मदत ही देशातील लोकांना होतीच, त्याचबरोबर परदेशातील लोकांनाही केली होती. विद्वान, प्रतिभावान आणि प्रज्ञावंत राजा म्हणून सयाजीराव महाराजांकडे पाहिले जात असे. त्यांचा वाचन व्यासंग, ज्ञानोपासना यामुळे अनेक वेळा त्यांच्याकडे जगभरातून मार्गदर्शनपर मदत मागितली जात असे. महाराजांचा अनुभव आणि प्रवास यांमुळे ते सर्वांना मार्गदर्शन करत. यामध्ये नातेवाईक, अधिकारी, संस्थानचे प्रमुख, इंग्रज अधिकारी आणि सामान्य लोक यांचा समावेश होता. महाराज भाषण करताना प्रजेला सुधारणा करण्यासाठीसुद्धा मार्गदर्शन करत. योग्य मार्गदर्शन करणे हेही एक प्रकारचे दातृत्वच आहे. सयाजीराव महाराजांनी स्वतःपासून ते राज्याच्या प्रशासनात खूप काटकसर केली. राज्याचे उत्पन्न वाढावे, राज्याचा तिजोरीतील धनाचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यांनी काळजी घेतली. अनावश्यक खर्चाला आळा घातला. या सर्वांचा परिणाम म्हणून बडोदा राज्य जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य बनले. वाढलेल्या आणि बचत झालेल्या धनाचा वापर लोककल्याणासाठी करण्याचे त्यांनी ठरवले. राज्याचे वाढलेले उत्पन्न प्रजेच्या सुधारणा करण्यासाठी वापरले. त्यामधून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, शेती, कारखाने, छोटे-मोठे उद्योग यांचा विकास केला. प्रजेच्या जीवनात सर्वांगीण बदल घडावा यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. एवढे करत असताना त्यांनी सुधारणांचा विचार फक्त संस्थानापुरता मर्यादित न ठेवता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबई पासून कलकत्त्यापर्यंत हिंदुस्थानातील लोकांच्या कल्याणासाठी व सुधारणांसाठी वेळोवेळी दान केले. महाराजांचे हे दान देशांच्या सीमा ओलांडून अगदी सातासमुद्रापार गेले.

गरजवंतांना मदत करताना त्यांच्या मनात कधीही जात, धर्म, वंश आणि देश अशा प्रकारचे क्षुल्लक भेद आले नाहीत. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी राज्याच्या तिजोरीचा वापर त्यांनी केला. ज्या काळात इतर संस्थानिक स्वतःच्या खुशालीत आणि मौजमस्तीत दंग होते, त्या वेळी महाराजांनी स्वतःच्या खानगीतून लक्षावधी रकमा दान दिल्या. सर्वकालीन राजांमध्ये महाराजांनी सर्वांत जास्त दान केल्याचे दिसते. त्यांच्या दानामुळे महाराजा सयाजीराव गायकवाड ‘आधुनिक काळातील कर्ण’च ठरतात. सयाजीराव महाराजांनी काटकसर करून साहित्य, ग्रंथालय आणि प्राच्यविद्या, शेती आणि शेतकरी, नानाविध संस्था, ललित कला, गरजू व्यक्ती, समाजधुरीण अशा अनेकांना इ.स. 1875 ते 1938 या काळात 89 कोटींची मदत केली. हे दान अनेक प्रसंगी आणि विविध माध्यमांतून केल्यामुळे दातृत्वाच्या नोंदी एका ठिकाणी सापडणे कठीण होते. त्या नोंदी विषयावर करून त्यामुळे तत्कालीन समाजातील कोणकोणत्या घटकांचा देशउभारणीत काय फायदा झाला, हे ‘दानशूर महाराजा सयाजीराव’ या ग्रंथात नोंदवले आहे.

(लेखक ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’चे संशोधन सहायक आहेत)

Previous articleजगन्मिथ्या म्हणजे तरी काय?
Next articleअजित पवार यांना मोठी परंतु अखेरची संधी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. I liked the article upon Maharaj Sayajirao Gaikwad Baroda Empire very much .I came to know maby more historic things about Maharaj Sayajirao Gaikwaad thtough ur Article. I appreciate ur article and ur writing very much.From Adv. Sudhir H. Tayade B.Sc.LL.B.Founder President Blue Tiger Force Maharadhtra. Chief Editor Blue Tiger RNI MAH/MAR/15664/2005.Founder president ngo Blue Tiger Social Foundation Amravati Reg.No.MAH/1340/13/Amravati Director and Chief Editor U tube News Channel Blue Tiger News Channel 09372125797

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here