काय असतो स्वैराचार?

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

फेसबुक म्हणजे अशी जागा जिथे आपण आपल्याला हवं ते भासवू शकतो. कोणाच्या नजरेत स्वतःला ग्रेट भासवता येतं, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येतं, स्त्रियांच्या बाजूने बोलून फेमिनिस्ट म्हणून सिद्ध करता येतं, तर संस्कृतीचा जप करून स्वतःला संस्कृतीरक्षकही म्हणून नाव करता येतं. मुद्दा असतो ते तुम्हाला काय हवंय, काय म्हणून सिद्ध व्हायचंय. अर्थात इथे कोणालाच ‘निगेटिव्ह’ मार्किंग नकोच असतात. आपल्याला ढोंगी, घाबरट, वाईट अशा उपमा मिळू नयेत म्हणून प्रत्येकजण इथे स्वतःची इमेज जपत असतो. प्रत्यक्षात आपण कितीही चुकीचं/अनैतिक वागत असलो तरी लोकांसमोर येताना मात्र आपण गोडगोड होऊन येतो. का ? तर लोकांनी आपलयाला चांगलं म्हणावं…. लोकांनी आपल्याला वाईट म्हणू नये.

म्हणजे परत मुद्दा आला ‘लोकं’. ‘लोक काय म्हणतील’.

मुळात लोकांनी ‘वाईट’ म्हणायचंच का ? पण मग जर वाईट म्हणायचीच भीती वाटते तर मग लोकांत यायचंच नाही. नाहीतर मग तुम्ही बदला. लाखो लोकांना बदलायचं की स्वतः बदलायचं, लोकासांठी बदलायचं की स्वतःसाठी बदलायचं … हे निर्णय फार महत्वाचे असतात. ‘लोकांना किंमत देत नाही’, असं आपण लाख म्हटलं तरी असं नसतंच, आपल्याला लोकं लागताच. मग किंमत देत नाही अशी लोकं कोण ? तर जी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला जगण्या-वागण्याचे नियम टाकून देतात, ते नियम लादतात. तुम्ही काय लिहावं, तुम्ही कसं लिहावं, तुम्ही कसं बोलावं, तुम्ही कसं वागावं …. हे सगळं ते ठरवतात. त्यांच्या दृष्टीने ते नियमच योग्य असतात. आणि तूम्ही झिडकारलेच तर मग साहजिकच तुमच्यावर चिखलफेक होते. तुम्हाला हवी ती लेबलं लावली जातात.

कसली गंमत आहे, ज्यांना फेसबुकवर स्वतःचा चेहरा लावायचीही हिम्मत नाही, ती लोकं इतरांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिप्पणी करतात.

आणि जी लोकं स्वतःला फेमिनिस्ट, विद्रोही वगैरे समजून आगपाखड करतात, स्त्रियांच्या भल्यासाठी लढण्याचं नाटक करतात, ती लोकं क्षणात स्त्रियांचाच अपमान करण्यासाठी कंबर कसतात. एखादी बाई एखाद्याबरोबर इच्छेने झोपली, तर ती “आदर नसलेली बाई” ठरते. आणि ज्याच्याबरोबर झोपते तो “रेपिस्ट” ठरवला जातो. रेपिस्ट आणि आदर नसलेली बाई, ह्या नवीनच व्याख्या स्वतःला विद्रोही, फेमिनिस्ट समजणाऱ्या व्यक्तींनी कराव्यात याहून मोठा विनोद नाही. ‘फेमिनिस्ट असण्यासाठी पुरुषांवर आग ओकायालच हवी’, येवढीच त्यांची व्याख्या असते. एकीकडे आपण स्वातंत्र्याच्या भाषा करायच्या, गुलामीच्या भाषा करायच्या आणि दुसरीकडे त्याच स्वातंत्र्याला “स्वैराचार” म्हणून संबोधयाचं.

बाकी सौम्य-गोम्या येतातच वर्षानुवर्षे जोपासलेला द्वेष घेऊन. लेबलांचा बंडल हातात असतोच त्यांच्या. अगदीच काही बोलता येत नसेल तर कमीतकमी ‘विकृत’, ‘बीभत्स’ वगैरे तरी लेबल चिटकवून द्यायचीच.

काही लोकांच्या नजरेत स्वातंत्र्य म्हणजे काय, तर “मी म्हणेल तसंच वाग”. माझी जी तत्त्वं आहेत तीच तुझीही तत्त्वं असायला हवीत. कारण माझी तत्त्वं बरोबरच आहेत. पण कशाच्या जोरावर बरोबर ? अशी कुठली टेस्ट असते का ?

—————-

लोकांना तुम्हाला स्वातंत्र्य तिथपर्यंतच द्यायला आवडतं, जिथपर्यंत ते सहन करू शकतात. जिथे त्यांची सहनशक्ती संपते तिथे मग तो स्वैराचार ठरतो.

काय असतो स्वैराचार?
स्वैराचार आणि स्वातंत्र्य, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी linked आहेत.

आपल्या स्वातंत्र्य उपभोगण्यामुळे कोणाला त्रास होत असेल, तर तो स्वैराचार.
मग मी म्हणेन तुझं वैयक्तिक आयुष्यात असलेल्या वागण्याचा मला त्रास होतोय ते, मग तो स्वैराचार नाही का ?

पण असं असेल तर मग उद्या ही लाईन कुठपर्यंतही खेचता येते.
मी म्हणेन उद्या,
‘मला कपडे घातलेल्या लोकांचा त्रास होतो. त्यांनी नागडं राहावं. कपडे घालून मला त्रास देणं हा त्यांचा स्वैराचार आहे’.
‘कुठल्याही पुरुषाला नाही म्हणणाऱ्या बायका ह्या स्वैराचारी आहेत, काय फरक पडतो हो म्हटलं तर. नाही म्हणून पुरुषांना दुखावणं हा त्यांचा स्वैराचार आहे’
“आपले जन्मदाते आईवडील सोडून नवऱ्याच्या घरी जाऊन, त्याच्याबरोबर संसार करणाऱ्या स्त्रियांना मी वासनांध, स्वैराचारी म्हटलं तर चालेल का ?

स्वैराचाराची व्याख्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या वागण्याशी जोडता येत नाही.
फटाके फोडणं, रस्त्यांवर थुंकणं, कचरा करणं, सार्वजनिक उत्सव साजरे करणं. समुद्रात मुर्त्या बुडवून निसर्गाची वाट लावणं… हा स्वैराचार आहे.

तुमचं वैयक्तिक आयुष्य तुमच्या व्याख्येनुसार जर तुम्हाला घालवता येत नसेल तर मग कसलं बोडक्याचं आलंय स्वातंत्र्य ?
सामाजिक भान आणि वैयक्तिक आयुष्य, ह्याचा स्वातंत्र्य आणि स्वैराचाराशी संबंध जोडता येत नाही.

‘शोषण म्हणजे काय’, हेही जर एखाद्याला कळत नसेल तर त्याने किती फुकाच्या गप्पा ठोकाव्यात., काही मर्यादा …
आणि जर कोणी कबुल केलं नाहीच, की ते शोषणच आहे, तर मग तुम्ही “चिप बायका” ठरता. इथे तुमच्यातली स्वातंत्र्यवादी, स्त्रीवादी मेलेली असते.
तुम्हाला स्वातंत्र्य नाही तुमचे निर्णय घेण्याचं. का ? कारण ‘मी जग पाहिलंय’, ‘मला सगळं माहित’ … हा अहंकार.

किती सोपं असतं, कि मला हे पटत नाही म्हणणं…
पण मला पटत नाही म्हटल्यावर भागत नाही, समोरच्यालाही ते पटण्याचा अट्टाहास करावा लागतो.
आणि नाहीच पटलं तर मग चिखलफेक करण्याचा मोह आवरता येत नाही.

——————

लिस्टीतल्या लोकांना कितीही नकोशा वाटत असल्या अशा घटना, तरी वरचेवर ह्या घटना व्हायला हव्यात.
बऱ्याचवेळी अशा घटना महत्त्वाच्या ठरतात. लोकांना तुमचे आणि तुम्हाला लोकांचे खरे मुखवटे दिसतात.
म्हणजे आपला कळप कुठला, हे जाणून घेणं सोपं जातं.

फेसबुक हे आभासी जग मी मानत नाही. त्यामुळे ‘असल्या गोष्टीत वेळ घालवणं काय हशील’, असं म्हणणंही फार वैचारिक नाही. अर्थात चांगल्या गोष्टीत वेळ घालवावा हे मान्य, पण काही गोष्टी टाळूही नयेत.
मागेही असे वितंडवाद झालेत आणि पुढेही असे होत राहणार…. यातूनही बरंच शिकता येतंच…. आपलेही विचार आपल्याला पडताळून घेता येतात.

शेवटी, तेच
‘आपल्याला हवं ते निवडावं, व्यक्त व्हावं आणि बाकीचं सोडून द्यावं’.

– मंगेश सपकाळ

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात. लेखक स्वतःचा परिचय अतिशय हट्टी , अतिशय निर्बुद्ध , अतिशय अश्लील , अतिशय दुराचारी-अविचारी , अतिशय उद्धट …. वगैरे वगैरे..असा देतात   )

Previous articleऑर्जी — ग्रुप सेक्स — स्विंग्सर्स पार्टी …. सेक्स-पार्टी
Next articleतुम्ही त्यांचे अखेरचे बळी ठरू शकता!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.