कालबाह्य व्हायचे नसेल, तर विचारधारांना बदलावे लागेल

 

  • दत्तप्रसाद दाभोळकर

विचारधारांना बदलले पाहिजे. मुलभूत विचारांशी फारकत न घेता हे करता येईल किंवा हा हलवून खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न असेल. हे लक्षात न आल्याने विचारधारा कालबाह्य होताहेत, का याचा विचार व्हावयास हवा. बदलायला हवे, पुन:पुन्हा तपासणी करावयास हवी. कारण भोवतालचे सारे संदर्भ बदलले आहेत. झपाट्याने दरक्षणी बदलत आहेत.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

 

 

मला माझी एक जुनी कविता आठवते

                    होकायंत्र आपली दिशा बदलते           

तो कळवळता क्षण

तू टिपलास

आपल्या अपाप डोळ्यांनी

आणि वळणावर दूर

दृष्टिआड होताना

                                  तू फक्त एवढेच म्हणालास

काळाच्या प्रवाहात ,फक्त दिशाच बदलतात

         ही माझी जुनी कविता आठवण्याचे कारण माझ्यासमोर संपादकांचे पत्र आहे. ते पत्र असे आहे

‘एक काळ असा होता, बहुतांश माणसे कुठल्या ना कुठल्या विचारधारेशी जोडलेली असायची. वैयक्तिक जीवनात वाटेल ते कष्ट सोसावे लागले, तरी ते आपल्या विचारधारेशी निष्ठावान रहायचे. कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, संघवादी… सारेच कमालीचा आग्रह आणि पोटतिडिकेने विचारधारेशी प्रामाणिक राहायचे. अलीकडच्या काही वर्षांत मात्र विचारांवरची निष्ठा हा प्रकारच बाद होताना दिसतोय. उपयुक्ततावाद आणि चंगळवाद हे दोनच वाद आता सर्वांना महत्त्वाचे वाटायला लागलेत. का झाला हा बदल? माणसांच्या जगण्याचा संघर्ष तीव्र झालाय, की जगण्याच्या प्रोसेसमध्ये विचारधारा काहीही कामात येत नाहीत, या निष्कर्षावर माणसे आलीत? हळूहळू विचारधारा कालबाह्य का होत आहेत?’

विषय महत्त्वाचा आहे. पत्रही महत्त्वाचे आहे. मात्र, पत्रातील दोन मुद्द्यांबाबत असहमती आहे. शेवटचे वाक्य ‘विचारधारा कालबाह्य का होत आहेत?’ असे आहे. माझ्या मनातले हे वाक्य ‘विचारधारा कालबाह्य होत आहेत का?’ असे आहे. पत्रातील पहिले वाक्य ‘एक काळ असा होता, की बहुतांश माणसे कुठल्या ना कुठल्या विचारधारेशी जोडलेली असायची. वैयक्तिक जीवनात वाटेल ते कष्ट सोसावे लागले, तरी ते आपल्या विचारधारेशी निष्ठावान राहावयाचे,’ असे आहे. मला हे पटत नाही. एकतर बहुतांश माणसे खेड्यात राहायची. त्या पैकी बहुतांश माणसे विचारधारांपासून खूप दूर होती. शहरात, प्रामुख्याने महानगरात खूप माणसे विचारधारेशी जोडलेली आहेत, असा आभास व्हावयाचा. त्या लोकांना विचारधारा नको होत्या. चांगले आयुष्यमान हवे होते, ही विचारधारा ते देते म्हणून तेवढ्यापुरती मानायला ती विचारधारा ठीक होती. माझ्याच आयुष्यातील एक उदाहरण देतो. मी एका मोठ्या कंपनीत नोकरीला होतो. कम्युनिस्टांची एक ताकदीची युनियन होती. कामगारांचे पगार व नोकरीतील नियम फार सुखकर होते. मात्र, कंपनीतील कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टवर दिलेले होते. तेथील कामगारांचे पगार फार कमी होत. त्यांना वागणूकपण फार वाईट मिळायची. आणि तशी वागणूक देणारेही कंपनीतील कामगारच होते. कॅन्टीनला कंपनीत सामावून घ्यावे. तेथील कामगारांचे जीवनमान सुधारावे, अशी सूचना मालकांनी केली. कामगारांनी याला विरोध केला. ही अशी परिस्थिती मुंबईतील अनेक कारखान्यात होती. कामगारांच्यादृष्टीने समाजवाद महत्त्वाचा नव्हता. त्यांची जीवनशैली महत्त्वाची होती. कॅन्टीनमधील कामगारांच्यावर अरेरावी करण्याचा त्यांचा हक्क जाणार होता.- अगदी मनापासून समाजवादी असलेली मंडळीसुद्धा घरकामाला येणाऱ्या बाईला रविवारची सुटी, एक महिना पगारी रजा, असले काही करत नाहीत.

याचा अर्थ विचारधारेशी निष्ठावान लोक समाजात नव्हते किंवा नाहीत, असे नव्हे. पण ही मंडळी समाजात अत्यल्प असतात. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी मंडळी जरा जास्ती होती. कारण आपली विचारधारा देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल, असा विश्‍वास किंवा भ्रम त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यानंतर काही काळ आपली विचारधारा देशाला झपाट्याने पुढे नेईल या भावनेने भारावून ही मंडळी काम करत होती. पण विचारधारा म्हणजे काय? त्या विरोधी आहेत म्हणजे काय? सर्व विचारधारंचे अंतिम उद्दीष्ट एकच आहे. मानवाचे, मानवी समाजाचे भले व्हावे. समाजवादी मंडळींना समाजवाद हे करेल असे वाटते किंवा वाटत होते. भांडवलशाहीला कल्याणकारी राज्य हवे होते. म्हणजे सर्व विचारांचे अंतिम उद्दीष्ट एकच आहे म्हणजे या वर्तुळाच्या एकाच केंद्राकडे विरुद्ध दिशेनी जाणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत का?

आपण वर तीन गोष्टी पाहिल्या. बहुसंख्य लोकांचे विचारांशी, विचारधारांशी काही देणे घेणे नसते. त्यांना आपले सुरक्षित, सुखी आयुष्य हवे असते. त्यांचे वास्तव त्यांच्यापुरते मर्यादित असते. चंगळवाद किंवा मध्यपूर्वेतील भयानक अशांत परिस्थिती त्यांना अस्वस्थ करत नाही. म्हणजे बहुसंख्य लोकांना स्वत:च्या विवंचनेतून बाहेर आलो, तरी विचार नको असतो. मात्र, अत्यल्प लोकांच्याबाबत विचार हिच विवंचना असते. आपण विचार करतो आहोत, या अशा अत्यल्प लोकांबाबत. हे अत्यल्प लोक आज अस्वस्थ आहेत. कारण होकायंत्र आणि दिशा या भोवतालच्या अवकाशाशी जोडलेल्या असतात, हे त्यांनी ओळखलेले नाही. अवकाश बदलला की साऱ्या रचना नव्याने कराव्या लागतात. मात्र, यात तुमच्या मनातील मुलभूत सिद्धांताना धक्का लागत नाही किंवा खुंटा हलवून अधिक बळकट करावा, तशा त्या अधिक बळकट होतात.

आपण एक वेगळे उदाहरण घेऊ. सारे धर्म हे खरेतर विचारधाराच आहेत. ते परस्परविरोधी वाटले, तरी मानवी आयुष्य अधिक सुखी, समाधानी व्हावे, म्हणून ते धर्म मार्ग शोधताहेत किंवा सुचवताहेत. विवेकानंदांनी हे अधिक स्पष्ट शब्दात सांगताना म्हटलंय, ‘माणसाला जो माणूस बनवितो तो धर्म.’ सर्व धर्मांना एवढेच करावयाचे आहे. पण एक मुद्दा पुढे येतो. विवेकानंदांनी तो एकशेवीस वर्षांपूर्वी धर्मांच्याबाबत सांगितलाय. तो मुद्दा आपल्या आजच्या विचारधारांच्या संदर्भातही खरा असेल का? विवेकानंदांनी १२० वर्षांपूर्वी सांगितले, ‘विज्ञानाच्या अविरत माऱ्यामुळे सर्व स्वमतान्ध धर्मांचे बुरूज धडाधडा कोसळून पडत आहेत. धर्माने पृथ्वी, सूर्य, आकाश याबाबत सांगितलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे खोट्या आहेत, हे विज्ञानाने पटवून दिलंय . सर्वधर्म त्यामुळे भांबावलेत. काहीतरी स्पष्टीकरणे देताहेत. याचे कारण धर्माच्या मुलभूत सिद्धांताना विज्ञानाने अजिबात धक्का पोचवलेला नाही. तसा तो पोचवणे विज्ञानाला अजिबात शक्य नाही, खरतर धर्मातील कर्मकांडांच्यापासूनची अनेक जळमटे काढून टाकण्याची गरज विज्ञानाने लक्षात आणून दिली आहे. ही फार मोठी संधी आहे. मात्र, या संधीचा फायदा न घेता धर्म आहे तिथेच उभा राहिला, तर काहीकाळाने धर्माचे कलेवर वा सांगाडे बाकी उरतील. कर्मठ पुरोहित, पाद्री, मौलवी त्यालाच धर्म म्हणून कवटाळून बसतील. सर्वसामान्य माणसांच्यादृष्टीने मात्र खरा धर्म तेव्हा संपलेला असेल. पुढचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, ‘पुरोहीत, पाद्री, मौलवी यांनी बदलले पाहिजे आणि ते सोपे आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. ग्रंथ हे धर्माचे आधार नाहीत. तर धर्म हे ग्रंथांचे आधार आहेत. धर्मातील मुलभूत सिद्धांत काळाच्या त्यावेळच्या एका चौकटीत लोकांना समजावून देण्यासाठी ग्रंथांचा जन्म झाला. काळाची ही चौकट बदलली तर नव्या चौकटीत बसता येईल. अशा प्रकारे धर्मग्रंथांनी बदलले पाहिजे.’

एकशेवीस वर्षांपूर्वी विवेकानंद हे विज्ञानाच्या संदर्भात सांगताहेत. त्यावेळी तंत्रज्ञान फारच प्राथमिक अवस्थेत होते. मात्र त्याचवेळी या दार्शनिकाने आणखी एक गोष्ट लक्षात आणून दिली, ‘यंत्रयुगामुळे वस्तूंची विपुलता वाढेल. त्यामुळे चंगळवाद वाढेल. माणसांचे परस्परावलंबन कमी होईल. माणसे आत्मकेंद्री बनतील, एक नवी समाजरचना आपणासमोर असेल.’-त्या समाजरचनेला योग्य अशाप्रकारे विचारधारांना बदलावे लागेल.

धर्मांच्याबाबत आपण जे पाहिले ते विचारधारांच्याबाबतही खरे आहे का? मला तसे वाटते, खरतर धर्म या विचारधारा आहेत आणि विचारधारा हे धर्म आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात घेऊ या. ज्यावेळी प्लेगसारख्या साथी होत्या. सर्पदंशासारख्या अनेक गोष्टी होत्या, त्यावेळ आधार म्हणून बहुसंख्य माणसांना धर्म म्हणजे त्यातली कर्मकांडे मोठ्याप्रमाणात हवी होती. आज ज्यावेळी स्पर्धा तीव्र झाली आहे, ती प्रत्यक्ष कामावर नव्हे तर नशीब वगैरे सारख्या गोष्टींवर अवलंबून आहे, त्यावेळीही आधार म्हणून कर्मकांडे हवी आहेत. खूप सुखाचे आयुष्य असेल, तरी वेळ काढायला म्हणून कर्मकांडे हवी आहेत. विचारधारांच्या बाबत काय होते? स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळवणे ही सर्व माणसांच्या मनातील आस होती. आपली विचारधारा स्वातंत्र्य मिळविणार या भावनेने बहुसंख्य माणसे अगदी वरवर का असेना, पण विचारधारांशी मनातून जोडलेली होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर काही काळ हिच भावना होती. आपली विचारधारा झपाट्याने समाजाचा कायापालट करणार असे वाटत होते. असे काही नसते, असे काही होत नाही हे काही काळाने लक्षात आले. त्याचवेळी वस्तुंची विपुलता वाढली, जीवनमान सुधारले. माणसे आत्मकेंद्री बनली. विचारधारा त्यांना खोट्या वा भातुकलीतील खेळासारख्या वाटल्या. स्वातंत्र्योत्तर काळात बहुसंख्य माणसे विचारधारांशी जोडलेली राहीली नाहीत. त्यातून त्यांचे आजचे जीवनमान वाढविण्यात या कुठल्याच विचारधारेचा काही संबंध नाही, याची खात्री त्यांना पटत चालली होती.

पण जीवननिष्ठा म्हणून व्रतस्थपणे विचारधारा मानणारे जे अत्यल्प लोक असतात त्यांचे काय? खरंतर ही अत्यल्प माणसे पण समाजाचा एक भाग असल्याने त्यांचाही विचारधारांच्यावरचा विश्वास थोडा कमी झाल्याची एक शक्यता आहे. पण त्याच्यापलीकडच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या विचारधारा जेव्हा प्रत्यक्षात आल्या किंवा व्यवहारात उतरल्या. त्यावेळी हे अत्यल्प लोक भांबावून गेले. रशिया कोसळला हे यातील एक प्रमुख उदाहरण. मात्र, रशिया का कोसळला याचे महत्त्वाचे कारण त्यांनी लक्षात घेतले नाही. धर्मग्रंथ म्हणजे धर्म नव्हे, तर धर्मग्रंथ धर्मावर अवलंबून आहेत. काळाच्या प्रवाहात त्यांना बदलले पाहिजे, हे रशियाने लक्षात घेतले नाही. मार्क्स बरोबर आहे. दासकॅपिटल नव्हे. रशियाकडे परिस्थितीनुरूप बदल करणारे दार्शनिक राहीले नाहीत किंवा ते तसे नव्हतेच.

विचारधारांना बदलले पाहिजे. मुलभूत विचारांशी फारकत न घेता हे करता येईल किंवा हा हलवून खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न असेल. हे लक्षात न आल्याने विचारधारा कालबाह्य होताहेत, का याचा विचार व्हावयास हवा. बदलायला हवे, पुन:पुन्हा तपासणी करावयास हवी. कारण भोवतालचे सारे संदर्भ बदलले आहेत. झपाट्याने दरक्षणी बदलत आहेत. एकवेळ समाजवाद ‘रोटी, कपडा और मकान’ ही घोषणा देत होता. आता कपडा हा शब्द कालबाह्य झालाय. कृत्रीम धागे तयार झाले नसते, तर ही घोषणा कळीची ठरली असती. वाढत्या लोकसंख्येला नुसते साधे वस्त्र पुरवायचे म्हटले असते, तरी लाखो हेक्टर जमीन कापसाच्या लागवडीखाली आणावी लागली असती. अन्नधान्याची आज नसलेली समस्या यातून तयार झाली असती. आणि तरीही पुरेसे वस्त्र मिळत नाही, म्हणून माणसे आक्रमकपणे रस्त्यावर उतरली असती.

पण हे बदल महत्त्वाचे असले तरी वरवरचे आहेत. मुळात माणूस पूर्णपणे बदलला आहे. दरक्षणी बदलतो आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान माणसात किती विलक्षण बदल झपाट्याने घडवतोय हे समजावून घ्या. या चक्राची गती भयंकर आहे, आणि ‘विश्वाचा विस्तार जेवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ हे आज पूर्णपणे खरे आहे. प्रतीक्षणी पूर्णपणे बदलणाऱ्या या माणसाला, त्याच्या प्रश्नांना समजावून घेणे, तरी विचारधारांना शक्य आहे का? याचाही विचार करावयास हवा.

काही गोष्टी लक्षात घेवूया. मी आज ८० वर्षांचा आहे. मी शाळेत होतो, तेव्हा ‘साठी बुद्धी नाठी’ किंवा हे म्हातारचळ लागावयाचे वय असे समजायचे. एखाद्याने साठी गाठली, तर धुमधडाक्यात एकसष्ठी समारंभ साजरा व्हायचा. आज साठी लोक लक्षातही घेत नाहीत. साठी गाठलेली बहुसंख्य माणसे ८०-८५ पर्यंत जगतात. ती माणसे त्यावयात शारिरीक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. या माणसांच्यात समंजसपणा किंवा निबरपणा आलेला असतो. सर्वच विचारधारांच्याकडे ही माणसे फार तटस्थपणे पाहतात. आणि हे येथेच संपत नाही, येथे सुरू होते. पुढील काही काळात स्टेमसेल किंवा बॉडी पार्ट क्लोनिंगमुळे माणसे १२५ ते १५० वर्षे सहज जगणारेत. नुसती जगणार नाहीत शारिरीक, मानसिक आणि होय लैंगिककदृष्टीनेही पूर्ण सक्षम राहणार आहेत. या बदणाऱ्या समाजरचनेत कालबाह्य व्हायचे नसेल, तर विचारधारांना बदलावे लागेल आणि फार थोड्या काळात येणारे हे बदल सर्वंकष असतील. अनेक शक्यता आहेत. एक शक्यता विचारात घेवू – समजा डोळा जेनॅटिकली मॉडिफाइड करून किंवा त्याच्यावर एखादी छोटी शस्त्रक्रिया करून त्याला रात्री दिसेल अशी सोय केली किंवा नाईट व्हिजन चष्म्यांचा दर्जा वाढवला आणि ते स्वस्तात सर्वत्र मुबलक प्रमाणात मिळू लागले तर भोवतालची सारी रचनाच बदलून जाईल.

अगणित शक्यता आहेत. १ जानेवारी २००० मध्ये एका शास्त्रज्ञाने सांगितले होते,‘आपण १ जानेवारी १९०० रोजी जगातील प्रमुख शास्त्रज्ञांना, विचारवंतांना, संपादकांना पुढील १०० वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञान काय देऊ शकेल, असे विचारले असते, तर १९९९ साली सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या ८० टक्के गोष्टी त्यांच्या कल्पनेतही नसत्या. अणूची रचना दूर होती. अणूबॉम्ब त्यामुळे कल्पनेतही नव्हता. चंद्रप्रवास परिकथा होती. संगणक राहू देत साधे ॲन्टीबायोटिक्स त्यांच्या कल्पनेत नव्हते. आणि १९०० साली व त्यानंतर अनेक दशके विज्ञान आणि तंत्रज्ञान धिम्यागतीने प्रगती करताना असे झाले. आज विज्ञानाची व तंत्रज्ञानाची जी गती आहे त्यात दर दहावर्षांनी असेच कल्पनेत न बसणारे बदल होणारेत. ते धक्के मानवी समाज बदलणारे असतील. व्यक्ती बदलेल आणि समाजही बदलेल.

आपण ‘रोटी कपडा और मकान’ यातील कपड्याचा प्रश्न पाहिला, विज्ञानाने निकालात काढलेला. तसेच उर्जा आणि पर्यावरण यांचा प्रश्न निकालात निघेल. सूर्याची शक्ती, सूर्याची उर्जा अतिशय स्वस्त दरात छोट्या छोट्या सेल्समध्ये साठवता आली, तर तुमच्या घरातील दिवे आणि तुमची वाहने या सेल्सवर चालतील. खूप स्वस्तात, पर्यावरण दुषित न करता, हे घडेल. हेच सेल्स वापरून समुद्राच्या पाण्याचे उर्ध्वपतन करून आपण गोडे पाणी मिळवू. या सेल्सवर चालणारी उपकरणे वापरून आपण कालवे खणू आणि हे पाणी हवे तेथे, हवे तेव्हा, हवे तेवढे पुरवू शकू. उर्जा पाणी, पर्यावरण सारे प्रश्न सुटलेले असतील. माणसांकडे स्वच्छ हवा, मुबलक पाणी, भरपूर वेळ आणि भरपूर पैसा असेल. या माणसांना विचारधारा हव्या असतील का? किंवा या माणसांच्यापर्यंत पोचायला विचारधारांना काय करावे लागेल?

आपण वर फक्त एक उदाहरण घेतले. तंत्रज्ञानाजवळ या सारख्या आज आपल्या कल्पनेतही न बसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. विज्ञान पुढे आले त्यावेळी विवेकानंद म्हणाले होते, ‘सर्वधर्मातील मुलभूत तत्त्व एकच आहे. धर्मांना एकत्र यावे लागेल. उद्याचा धर्म सर्वधर्मांवर आधारित असेल आणि तो विज्ञानावर आधारलेला असल्याने तो स्थितीशील नसेल, तर गतीशील असेल.’ विचारधारांच्याबद्दल असेच आहे का? आपापल्या मर्यादा त्यांना समजताहेत. सत्तर वर्षांनंतर रशिया कोसळला आणि त्याच्याजागी ‘खाऊजा’ म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिककरण पुढे आले. आणि केवळ तीस वर्षात ‘खाउजा’ चुकीचे  आहे, असे सांगत ट्रंप पुढे आले! आज तंत्रज्ञानाने विचारधारांच्यामधील सीमारेशा धुसर केल्यात. त्यांना समन्वय नाही तरी सहकार्य करावे लागेल. आज विचारधारांना वेगळी करणारी फक्त एक रेषा आहे. एक विचार सर्वधर्म सद्‌भाव मानतो. दुसरा विचार कडवा धर्मद्वेष, वर्णद्वेष मानतो. मात्र ही रेषा म्हणजे लक्ष्मणरेषा नव्हे तर धुसर करून पुसून टाकता येईल, अशी रेषा आहे. हे  समजून विचारधारांनी काम केले, तर त्या कालबाह्य होणार नाहीत.

(लेखक हे ज्येष्ठ विचारवंत व  संशोधक आहेत )

९८२२५०३६५६

Previous articleगाडगेबाबांची मंतरलेली पत्रे
Next articleइंटेलेक्च्युअल प्रॉस्टिट्यूट्स
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here