कोई मिल गया…!

-रघुनाथ पांडे

‘त्या’  दोघांचे छायाचित्र पाहिले, आणि स्टोरी सापडली. या स्टोरीचे आयुष्य किती असेल माहीत नाही. ती तात्पुरती का असेना पण खूप आश्वस्थ करणारी. चित्रपटात नाट्य म्हणून जे घडू शकेल किंवा ओढून ताणून वाढवलेल्या मालिकांमधून कदाचित दिसू शकेल अशी ही स्टोरी. पण हे सारे कदाचित.

…………………………………

पुढ्यात दोन मुले, ती नेहमीसारखीच बोल्ड, ब्युटीफुल आणि तो..कोई मिल गयाच्या स्टाईलने. हुड घालून. त्या तिघांच्या मागे. ‘पती,पत्नी और वह’ मुळे विस्कटलेले हे संपन्न कुटुंब..तशी त्यांच्या दुनियेत अशी अनेक संपन्न घरं तुटलेली आहेत. तिथे तो शाप आहे. जाडजूड लोखंडी दरवाजा लोटून बंगल्यात हा कुटुंब कबिला शिरतो..सर्वांच्या तोंडाला मास्क आणि प्रत्येकात थोडे अंतर..नेपथ्य असेच. चित्रपटाला साजेसे.

“लॉकडाऊन : कोई मिल गया” ची ही अनटोल्ड स्टोरी. आत्ताच्या सामाजिक अंतरातून सामाजिक बदल सांगणारी. स्टोरीत गुंतागुंत आहे, नाट्य आहे, वाद आहे, तणाव आहे…ताटातूट आहे, घटस्फोटही आहे…तरीही पालकत्वाची सर्वोच्च जाणीव तीत आहे. म्हणून ती सच्ची, अबोल संसाराची व्यक्त गोष्ट.

‘त्यांचे’ अलगीकरण का झाले, त्याला जबाबदार कोण, कोणी कोणास काय म्हटले, कोणी कोणास किती रक्कम दिली, संजय खान व राकेश रोशन यांच्यात कसा बेबनाव झाला, तिचा- त्याचा नवा मित्र- मैत्रीण..वगैरे ठोकताळे देत चार वर्षांचा लग्नपूर्व दोस्ताना व चौदा वर्षांचा गुण्यागोविंदाच्या संसाराचा काडीमोड कसा झाला, हा गॉसिपवाला धंदा इथे सांगायचा नाही. 

आपला मुद्दा घटस्फोटाच्या जागतिक चिंतेचा आणि त्याचबरोबरीने अंधुक कल्पनांसह कौटुंबिक दिलासा देणाऱ्या नव्या पालवीचा आहे. ती पालवी सुझानच्या रूपाने ‘सुजाण’ दिसली. पुढे काय घडेल, माहीत नाही तरीही त्यांचे सामाजिक अंतर कौटुंबिक स्तरावर कमी होणे, हा नवा सामाजिक बदल आहे. अर्थात, असे बदल होत असतील, झालेही असतील. पण ज्या चंदेरी जगातील ही स्टोरी आहे, तिथे असे सकारात्मक घडते तेव्हा सैरभैर समाज त्यात आपले प्रतिबिंब नक्की शोधतो. अन्यथा हिप्पीवाला मिथुन, उघडाबंब सनी, लांबकल्याचा अमिताभ…घराघरात माधुरी, कैफ नाहीतर दीपिका कशा असत्या?

कोरोनाच्या दहशतीखालील अनेक देशांच्या सामाजिक स्थितीचे आकलन सुरू झाले. युवकांची मानसिक स्थिती, रोजगार, उद्योग आणि निसर्ग हा एक विषय जशी भयकथा लांबवतो, तसेच विवाहितांवर होणारे परिणाम मानसिक विश्लेषकांची मती कुंठीत करतो आहे. जीव वाचवतानाच जगभर भीती, दैना आणि त्यांचे मानसिक विश्लेषण सुरू आहे. 

या दशकाच्या आरंभी, २०११ मध्ये भारतात ४३ हजार घटस्फोट झाले. त्यापैकी ६० टक्के सहमतीने झाले. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे २० हजार घटस्फोट झाले. त्यात १५ हजार घटस्फोट मुंबई व पुण्यात झाले आहेत. पुण्यात २००५ मध्ये सहमतीने ७२९ घटस्फोट झाले. हेच प्रमाण २०१० साली ११३० एवढे झाले होते. मुंबईत लग्नानंतर एका वर्षांत घटस्फोट घेणाऱ्यात ३० टक्के लोक सामंजस्याने घटस्फोट झाले. मागील दोन वर्षांतील आकडेवारी सातपटीने वाढली. मागच्या डिसेंबरात हे प्रमाण दहामागे चार आहे. दशक समाप्त होताना ही संख्या कैकपटीने अधिक असेल.

कोरोनाच्या विस्कोटानंतर चिन्यांचे घटस्फोटाचे अगदीच ताजे प्रमाण तपासले तर, दिवसाला एक आठशे आहे. दक्षिण- पूर्व चीनमध्ये घटस्फोट थांबविता येणार नाहीत, इतकी आणीबाणी निर्माण झाली. शेवटी, उपाय म्हणून दररोज दहा अर्ज निकाली काढण्याचे ठरले. चिन्यांत लग्नसंस्था नावाचा प्रकार आहे, पण तिचे आयुष्य दोन तास ते 98 वर्षे इतके आहे. कोरोनाच्या विळख्याने चिन्यांमध्ये हे प्रमाण आणखी खाली उतरले. घरात खूप दिवस सोबत राहिल्याने आता आमचे अधिक पटूच शकत नाही, त्यामुळे ‘अलगीकरणाचे’ हजारो अर्ज लग्न नोंदणी निबंधकाकडे आले आहेत. येणाऱ्या अर्जात हे एकच कारण आहे. आणि, हे कारण नसेल तर दुसरे कारण देवाच्या दयेने वाचलो, आता ‘या’ व्यक्तीच्या दयेवर जगायचे नाही, असे म्हटले आहे. जोडप्यांच्या समुपदेशनातून टोकाचा द्वेश, संताप, अपमान व सुडाची भावनाच परस्परांबद्दल उफाळून आली.

दूरदेशीचा हा वारा सूं ss सूं ss आपल्या देशात येईल म्हणतो. दाराला सद्या कडीकुलूपे आहेत. एकदा ती ते उघडली, किलकिली झाली की, या नव्या विलगीकरणाची दस्तक देईल. विलक्षण मंदी, गेलेले रोजगार आणि संपलेली मिळकत या बाधित लक्षणानंतर कौटुंबिक घडी उध्दवस्त होऊ शकेल, असे अंदाज आहेत. ती होऊ नये म्हणून, ही स्टोरी मला अधिक भावली. ती तात्पुरती का असेना आशा सांगते… मुलांच्या भावनेची फिकीर न करता मुलांना कस्टडी देणाऱ्यांच्या मनात ही स्टोरी समंजस पालकत्वाची जाण निर्माण करते. 

२१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा झाली. सुझानने थेट ह्रतिकला संपर्क केला. संपर्क केला असला तरी, घटस्फोटाची  एव्हाना सहा वर्षे झालेली आहेत. हा फरक दुर्लक्षित करण्याजोगा नाही. बरं, या सहा वर्षांत दोघांबद्दलही महाप्रचंड गॉसिप झाले. तरीही त्या दोघांमधील संवाद कायम आहे. रेहान आणि रिधान ही दहा-बारा वर्षांची लहान छोकऱ्यांची मनाची घालमेल आहेच. साधन संपत्ती अमाप असली तरी, आयुष्याचे मोल त्याच्या कैकपट आहे. सहानुभूती मिळेलही पण आपली माणसे कुठे मिळतील? घटस्फोटाचा प्रत्येकच निर्णय काही आनंदी नसतो. या दोघांमध्ये जे पूर्वी झाले असेल ते क्षणभर दूर ठेऊ, पण आत्ताची सुझान अधिक ‘सुजाण’ दिसली. 

आठवडा होईल, ते चौघे एकत्र आहेत. भयाण मुंबईला उद्देशून हृतिक म्हणतो, ”आम्ही उत्तम पालक आहोत, हे मुलांना कळावे. इतके त्या फुलांना उमगले तरी जिंदगी जिंकली..”

वातावरण आणखी आणखी अंधारलेले होत आहे. बाहेर निरव शांतता असली तरी, आत परतीचा दंश होतोच. तसेच सद्या या दोघांचे सुरू आहे. समाजमाध्यमातील त्यांचे व्यक्त होणे आईबाप म्हणून कोणालाही शिकवणारे आहे. 

निळ्याभोर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच्या जुहूच्या बंगल्यातील देखण्या आलिशान हॉलमधील नक्षीदार टेबलासमोरच्या खुर्चीत सुझान बसली आहे. नव्या युगाचा संगणक तिथे नाही. भावना व्यक्त करायला ते पुरेसे नाही. खरड्यावर कागदे खोचून, हाताला पेन लावत सुझान पत्र लिहीत आहे..वाक्य आहे – ” ग्लोरियस अरेबियन सी अँड आईसोलेटेड जुहू बीच..’ पेशाने इंटेरिअर असलेली ती, वाक्यांनाही नेटकेपणाने  सजवते. तिचे समारोपाचे वाक्य आहे, ” स्टे होम, स्टे सेफ…अँड डिझाइन युवर थॉट्स..”

(लेखक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत)

+91 98182 13515

Previous articleदलित-बहुजनांनी आपल्या विचारविश्वातून ‘ब्राह्मण’ हा शब्द वगळायला हवा!
Next articleसुखदुःखांची ‘बॅलेन्स शीट’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.