कोरोना उपचारासाठी नवीन औषध: 2-Deoxy-D-Glucose

-सानिया भालेराव

दोन दिवसांपूर्वी DCGI कडून (ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया) २- डीऑक्सी डी ग्लुकोज (२-डीजी) या औषधाला कोविड १९ च्या उपचारामध्ये ‘इमर्जन्सी यूज मेडिसिन’ म्हणजेच आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. ( हे औषध नवीन नाहीये. याआधी हे औषध कॅन्सर ट्रिटमेंटसाठी एक कँडीडेट म्हणून क्लिनिकल ट्रायल्ससाठी अभ्यासलं गेलं आहे). हे औषध , हैद्राबादमधील डॉ. रेड्डीज लेबॉरेटरीज आणि डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या INMAS ( इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस) यांनी डेव्हलप केलं आहे. २-डीजी हे पिटुकलं औषध कोरोनाच्या विरुद्ध कसं काम करतं, हे कोणत्या रुग्णांना देता येऊ शकतं, याची परिणामकारकता किती असू शकते आणि या औषधामुळे कोरोना ट्रीटमेंटमध्ये आणि त्यानुसार कोरोना बाधित रुग्णांना किती फायदा होऊ शकतो आणि याचे काही दुष्परिणाम असू शकतात का अशा काही प्रश्नांची उत्तर आपण वैज्ञानिक दृष्टीकोनातून शोधण्याचा प्रयत्न करूया.

तर सगळ्यात आधी २-डीजी म्हणजे २- डीऑक्सी डी ग्लुकोज हे नाव वाचल्यावर काय बरं वाटलं? समजा डी ग्लुकोज असं एका माणसाचं नाव आहे आणि दुसऱ्याचं आहे २- डीऑक्सी डी ग्लुकोज. तर आपल्याला या दोन नावांवरून समजू शकतं की या दोघांमध्ये फरक आहे तो २ डीऑक्सीचा. तर केमिकल स्ट्रक्चर मधला फरक अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास डी ग्लुकोज मधल्या “OH” ( हायड्रॉक्सी) ग्रुपमधून जर एक ऑक्सिजन ऍटम काढून टाकला तर त्याला म्हणतात डीऑक्सी… सो, डी ग्लुकोज नाव असणाऱ्या माणसाने त्याच्या नावातून ( स्ट्रक्चरनुसार दोन नंबरच्या जागेवरून) एक ऑक्सिजनचा रेणू काढून टाकला .. तर आपण त्याला म्हणणार “२- डीऑक्सी” डी ग्लुकोज.. आता तुम्ही म्हणाल हे इतकं कशाला जाणून घ्यायचं डिटेलमध्ये.. तर हे औषध कसं काम करतं याचं गुपित त्याच्या नावातच दडलं आहे म्हणून.. हा जो आडनाव बदललेला पोरगा आहे नं ‘२- डीऑक्सी डी ग्लुकोज’ नावाचा.. हा पठ्ठ्या कोरोना बाधित सेल्समध्ये डी ग्लुकोजच्या जागी स्वतः जातो आणि अशा काही उचापत्या करतो की कोरोना बाधित सेल्स संपुष्ठात येतात. ( अशा औषधांना अँटी मेटॅबोलाईट असं म्हणतात) शाहरुख खानचा एक पिक्चर होता बघा. डुप्लिकेट नावाचा.. त्यात डबल रोल असतो त्याचा.. सरतेशेवटी चांगला शाहरुख वाईट शाहरुखच रूप घेतो, त्याच्या अड्डयात जातो आणि हिरोईनला वाचवतो.. इथे पण असंच काहीसं होतं.. यात हिरोईन म्हणजे आपलं शरीर, वाईट व्हिलन आहे कोरोना विषाणू आणि चांगला शाहरुख म्हणजे आपला २ डीजी.. हे कसं होतं ते आपण आता थोडक्यात बघूया.

सगळ्यात आधी तर डी ग्लुकोज आपल्या शरीराला कशा करता लागतं? तर ग्लायकॉलिसिस नावाची एक प्रोसेस आपल्या शरीरात होत असते जिच्यामुळे शरीरातील पेशींना एटीपीरुपी एनर्जी मिळते जगण्यासाठी. शरीरीरातील पेशी डी ग्लुकोजचा अपटेक करतात आणि एनर्जी मिळवतात. आता होतं काय की जेव्हा कोरोना विषाणू आपल्या शरीरात शिरतो तेव्हा त्याला लवकरात लवकर मल्टिप्लाय व्हायचं असतं कारण तरच त्याचा टिकाव लागणार असतो. म्हणून तो पटापटा हे डी ग्लुकोज मॉलिक्यूल घ्यायला सुरवात करतो. मग जेव्हा आपल्या २ डीजी ची एंट्री होते, तेव्हा तो दिसत असतो अगदी डी ग्लुकोजसारखा.. त्यामुळे कोरोना बाधित पेशींना हा फरक लक्षात येत नाही आणि डी ग्लुकोज ऐवजी २- डीऑक्सी डी ग्लुकोज या पेशींमध्ये जातं.आता आपल्याला माहिती आहे की यामध्ये २ नंबरला एक ऑक्सिजन ऍटम नाहीये त्यामुळे पुढली एनर्जी क्रिएशनची प्रोसेस होत नाही आणि विषाणू बाधित पेशींचा मल्टिप्लिकेशनचा वेग मंदावत जातो आणि मग त्या नष्ट होत जातात आणि कोरोना इन्फेक्शन आटोक्यात येतं.

आता आपण या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सबद्दल बघूया. PIB वरील प्रेस रिलीजनुसार साधारण एप्रिल २०२० मध्ये NMAS-DRDO आणि CCMB ( सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी) हैद्राबाद यांनी संयुक्तिकरित्या काम करून लॅब टेस्ट करून वरून कन्फर्म केलं की २ डीजी सार्स कोव्ही २ विरुद्ध काम करतो आणि मग फेज २ ट्रायल्ससाठी परवानगी त्यांना पुढच्या महिनात मिळाली. मे ते ऑक्टोबर २०२० मध्ये डॉक्टर रेड्डीज लॅबॉरेटरीसोबत फेज २ ट्रायल्स सुरु राहिल्या. फेज २- a, ६ हॉस्पिटल्समध्ये आणि २- b, ११ हॉस्पिटल्समध्ये एकूण ११० पेशंट्सवर केल्या गेल्या. रुग्णांच्या रिकव्हरी रेटमध्ये त्यांना बऱ्यापैकी फरक दिसून आला. स्टॅण्डर्ड ऑफ केअर ( Soc) इंडपॉइंट्सवर चांगले बदल त्यांना दिसून आले. मग नोव्हेंबर २०२० मध्ये फेज ३ ट्रायल्स सुरु झाल्या आणि मार्च २०२१ पर्यंत त्या चालू राहिल्या. देशभरातील २७ हॉपिटल्समध्ये या ट्रायल्स साधारण २२० पेशंट्सवर या ट्रायल्स घेतल्या गेल्या. या ट्रायल्सध्ये दिसून आलेली गोष्ट ही की जवळपास ४२ टक्के पेशंटची सप्लिमेंटेड ऑक्सिजन वर असलेली डिपेंड्सनी ४२ टक्क्यांनी या औषधामुळे कमी झाली. त्यामुळे सध्या हे औषध हॉस्पटिलमध्ये ऍडमीड झालेल्या आणि मध्यम ते गंभीर स्वरूपाचा कोरोना संसर्ग असल्यास वापरण्यास परवानगी दिली आहे.

पावडर स्वरूपात हे औषध असल्याने ते घेणं, प्रोड्युस करणं तसं सोपं आहे. शरीरातील साखरेचं प्रमाण वाढणं, हृदयासंबंधातील काही त्रास असे या औषधाचे साईड इफेक्टस असल्याने केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध घ्यावयाचे आहे आणि इस्पितळात भरती झालेल्या पेशंटलाच ते मिळणार आहे. त्याशिवाय सध्या कोरोना ट्रीटमेंटमध्ये सहायक औषध अशी या औषधाची भूमिका असणार आहे. आता हे असं जरी असलं तरीही क्लिनिकल ट्रायल्समधले पॅरॅमिटर्स पाहता खरं तर अजून एक्सटेंसिव्हली चाचण्या व्हायला हव्यात पण सध्या परिस्थिती फार क्रिटिकल असल्याने डेटा कमी जरी असला तरीही हे औषध अप्रूव्ह केलं गेलं आहे. त्याचा होणारा फायदा आता येणारा काळच सांगेल. हे औषध योग्य पद्धतीने काम करेल, क्रिटिकल अवस्थेत असणाऱ्या पेशन्टला त्याचा फायदा होईल, ऑक्सिजन सिलेंडरवर असणारी डिपेन्डसी कमी होईल ( जे आजच्या घडीला सगळ्यात जास्तं महत्वाचं आहे) आणि जरा मोकळा श्वास घेता येईल अशी आशा आहे.

(लेखिका संशोधिका असून त्यांची ‘इकोसोल’ नावाची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी कंपनी आहे.)

८४०८८८६१२६

व्यंगचित्र – गजानन घोंगडे (९८२३०८७६५०)

……………………

२ डीजी च्या मोड ऑफ ऍक्शनला अजून एक दोन अँगल आहेत ते डिटेलमध्ये वाचायचे असतील, तसेच हे औषध याआधी कॅन्सर ट्रीटमेंटच्या क्लिनिकल ट्रायलसाठी वापरल्या गेलं आहे त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर या लेखाच्या शेवटी लिंक्स देते आहे त्या आवर्जून वाचा.हाय ग्लायकॉलिसिस रेट, हाय ऑक्सिजन डिमांड, हाय ग्लुकोज डिमांड यामुळे नॉर्मल पशींपेक्षा कोरोना बाधित पेशी या मॉलिक्यूलचा अपटेक अधिक वेगाने करतात असं रिसर्चमध्ये दिसून आलं आहे. त्यासंबधीच्या लिंक्स सुद्धा देते आहे. याशिवाय ट्रायल्सबद्दल अजून जाणून घ्यायचं असल्यास CTRI, CDSCO च्या वेबसाईट वर डिटेल रिपोर्ट उपलब्ध आहेत.

माहिती पटल्यावर आणि स्वतः पडताळून पाहिल्यावर आर्टिकल शेअर करू शकता. वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. रेफरन्ससाठीच्या लिंक्स खाली देते आहे.

1. https://www.indiatoday.in/…/drdo-2dg-corona-drug…

2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6982256/

3. https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1717007

4. https://www.news18.com/…/how-new-drdo-drug-2-dg-works…

5. http://ctri.nic.in/Clinicaltrials/login.php

6. https://cdsco.gov.in/opencms/opencms/en/Home/

Previous articleस्वप्न-वास्तवाच्या सीमेवर तरंगणारा ‘रजनीगंधा’
Next articleप्रिय भाजप सदस्यहो,
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here