समुद्र किनारे, डोंगर , नद्या , बॅकवॉटरने समृध्द असलेले कोल्लम

 -राकेश साळुंखे

कोलम हे नाव आपल्या सर्वांच्या कानावर बरेचदा पडते . बरोबर ! कोलम जातीचा तांदूळ खूप जणांच्या आवडीचा असतो . पूर्वी मला वाटायचं की केरळ मधील कोलम या शहराचे नाव कोलम  तांदळाच्या नावावरून पडले असावे . परंतु थोडी माहिती घेतल्यावर कळले की संस्कृत भाषेत कोल्लं म्हणजे मिरी . फार पूर्वीपासून मसाल्याच्या व्यापारासाठी हे बंदर प्रसिध्द आहे . मिरीचा व्यापार येथून होत असावा म्हणून या शहराला ‘कोल्लम’ नाव दिले असावे . या शहराची स्थापना नवव्या शतकात एका सिरीयन व्यापाऱ्याने केली . त्रिवेंद्रमपासून ६६  किमी अंतरावर असलेले कोल्लम बऱ्याच ट्रॅव्हल कंपनी किंवा पर्यटकांच्या फिरण्याच्या यादी मध्ये समाविष्ट नसते.आष्टामुडी लेकच्या काठी वसलेले हे एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. व्यावसायिकदृष्ट्याही  हे एक महत्वपूर्ण शहर आहे . केरळमधील इतर शहरांप्रमाणेच हे शहर ही मसाले व काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.  हा भाग सुंदर समुद्र किनारा , तलाव , डोंगर , नद्या , बॅकवॉटर , घनदाट जंगलाने समृद्ध आहे.

   २०११ साली मी प्रथमतः येथे गेलो होतो आणि त्यानंतर मग खूपदा येथे जाणे झाले . येथील बॅकवॉटर सहल अत्यंत स्वस्तात होऊ शकते . ज्यांना कुणाला हाऊसबोटवर खर्च करायचा नाही . पण बॅकवॉटर अनुभवायचे आहे , त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे . येथे दर दोन तासांनी फेरी बोट असते . तिनेच शेवटपर्यंत जायचे व परत यायचे . रिटर्न तिकीट फक्त २० रुपयांच्या आत.  दोन तास स्वच्छ बॅकवॉटर मध्ये फिरण्याची ही नाममात्र किंमत आहे . तुम्हाला चायनीज फिशिंग नेट ने कसे मासे पकडतात हे ही  प्रत्यक्ष पाहायला मिळते.  एकदा मात्र  या फेरीबोटीचा  जाम टरकवणारा  अनुभव आला होता.  फेरी बोट जातानाच्या शेवटच्या  थांब्याजवळ पोहचणारच होती तेवढ्यात हवामान एकाएकी खूपच बदलले .  वादळी वारे व पाऊस सुरू होण्याची लक्षणे दिसू लागली .  आणि पोहोचतो न पोहोचतो तेवढ्यात वारा पाऊस सुरू झाला आणि दाट अंधारून आले . बोटीतून सगळे स्थानिक उतरून गेले.   ड्राइवर व तिकीट कलेक्टरही  उतरून गेले होते.

तेथे मी व माझा केरळमधील एक भाचा असे दोघेच उरलो . परतीचा कोणी  प्रवासीही नव्हता .  कुठे येवून फसलो असे मला झाले .  काय करावे अशी आमची चर्चा चालली होती . खाडी जवळच असल्याने पाण्यात लाटाही मोठ्या येत होत्या  .  खाली उतरून जावे तर त्या खेड्यात काय करायचे हा प्रश्न होता .   बोट  परत जाणार की नाही, हे काही कळायला मार्ग नव्हता.  माझा  भाचा  म्हणाला, इकडे असेच हवामान अचानक बदलते. थोडयावेळाने होईल सर्व सुरळीत.  आणि झालेही तसेच .  २०-२५ मिनिटात हवामान पूर्वपदावर आले. आणि ड्रायव्हर व त्याचा सहकारी  हसत हसत  परत आले . बहुधा  वेळ मिळाल्याने त्यांनी कार्यक्रम  केला असावा. नेहमी पाच मिनिटात परत फिरणारी बोट आज अर्ध्या तासाने परत फिरली .  आम्हाला हुश्श झाले. येताना चायनीज फिशिंग नेटमध्ये मासे पकडणारे लोक खूप ठिकाणी दिसले.

कोल्लमचा समुद्रकिनारा हा महात्मा गांधी बीच म्हणूनही ओळखला जातो.  शांत, सुंदर, स्वच्छ किनाऱ्यावर सर्वदूर पसरलेली सोनेरी रंगाची वाळू पर्यटकांना त्याच्या प्रेमात पाडते.  नैसर्गिक सौदर्यामुळेच  हा किनारा वेडिंग डेस्टिनेशनसाठी लग्नाळू जोडप्यांची  पहिली पसंत ठरला आहे . आपल्याकडील वेंगुर्लेजवळील सागरेश्वर किनाऱ्यासारखाच मला वाटला. या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा बगीचा तयार केला आहे .  त्यामध्ये असलेल्या दोन भव्य शिल्पांपैकी माता शिल्प सुंदर आहे.या शहराच्या आजूबाजूला बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत . त्यापैकी जटायू पार्क किंवा रॉक हे खूपच देखणं आहे .कोल्लमपासून साधारणपणे ३८ कि मी अंतरावर विस्तीर्ण परिसरात हे सुंदर व प्रेक्षणीय स्थळ पहायला मिळते .

रामायणातील मिथक जटायू पक्षी व रावण यांच्यात सीतेच्या सुटकेसाठी युद्ध झाले. त्यात जटायू ज्या ठिकाणी धारातीर्थी पडला तेथेच त्याचे  हे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे असे म्हणतात . एका डोंगरमाथ्यावरील मोठ्या खडकावर हे शिल्प साकारण्यात आले आहे . खालून वर माथ्यावर जाण्यासाठी रोप वे ची सोय आहे . प्रवेश फी ४८० रुपये असली तरी आपले पैसे वाया गेले असे वाटत नाही . तेथील किल्ला , त्याच्या आजूबाजूचा परिसर याची देखभाल खरोखर कौतुकास्पद आहे . या सर्वाचा खर्च पर्यटकांकडून आकारलेल्या  प्रवेश फी मधूनच केला जातो. या शिल्पाच्या आत रामायणातील कथानकांची झलक दाखवणारे संग्रहालय आहे . तसेच एक इनडोअर 6 डी व एक ओपन थिएटर ही आहे . इनडोअर थिएटरमध्ये जटायू शिल्प निर्मितीवरील फिल्म दाखवली जाते . जटायू शिल्पाच्या आतून त्याच्या डोळ्यापर्यंत जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे.

केरळला सोन्याचे आकर्षण फार.  केरळमधील लहान मोठ्या प्रत्येक शहरात सोन्याच्या दुकानांच्या जाहिरातींची मोठमोठी होर्डिंग्ज पहायला मिळतात . पहिल्यांदा मला वाटले की येथे सोन्याचा दर  कमी असावा . पण चौकशीअंती कळले की, दर आपल्यासारखाच आहे .  आपल्याकडील बरेच जण येथे या व्यवसायात आहेत.  सोन्याची भव्य दुकाने  येथे आहेत. सोने खरेदीची हौस येथे भागवता येते.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Explore Kollam

Previous articleढिम्म साहित्य-संस्कृती मंडळ आणि अशोक चव्हाणांचं अगत्य !
Next articleरवीश नावाचा आतला आवाज !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.