खलनायक आणि चाणक्य(?)ही… 

-प्रवीण बर्दापूरकर

सक्तीने पोलिस सेवेच्या बाहेर घालवलेले आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना तब्बल तीन दशकांपूर्वीच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा होणे आणि तेलगू देसम पक्षाच्या राज्यसभेतील चार सदस्यांनी भाजपत प्रवेश करणे या घटना वाटत तेवढ्या सरळ नाहीत . नरेंद्र मोदी सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान होणे आणि त्यांच्या मंत्रीमंडळात अमित शहा केंद्रीय गृहमंत्री होण्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली की त्या दोन घटनातील सूत्र लक्षात येते . जगतप्रकाश नड्डा यांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करुन सरकार आणि पक्षावरची अनुक्रमे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीची पकड मुळीच ढिली होऊ दिली जाणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यात येऊन पंधरवडा उलटत नाहीत , तोच वर उल्लेख केलेल्या घटना घडल्या आहेत . देशाच्या राजकारणातला ‘खलनायक’ अशी ज्याची प्रतिमा विरोधी पक्षांनी गेली सुमारे एक तप रंगवली आहे त्या अमित शहा यांचा उदय आता ‘चाणक्य’ म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या बंपर यशानंतर आता झालेला आहे ; अर्थात हा चाणक्य समंजस नाही ; हा चाणक्य त्याच्या गुरुच्या सहाय्याने एकेका विरोधी पक्षाचे अस्तित्व यानंतरच्या काळात क्षीण करत जाणार आहे , कारण आता गृहमंत्री म्हणून सर्व नेत्यांच्या ‘कुंडल्या’ या चाणक्याच्या हाती आहेत .

अमित शहा म्हणजे नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक एव्हढी ओळख पुरेशी नाही . हा माणूस सध्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात मोदी यांचे डोळे आणि कान इतका महत्वाचा झालेला आहे . अमित शहा यांचा जन्म १९६४ सालचा . त्यांचे वडील अनिलचंद्र हे गुजराथेतील अहमदाबादचे एक बडे व्यावसायिक . शहा कुटुंबिय बडे म्हणजे धनाढय म्हणता येईल असे बडे प्रस्थ . अमित शहा यांचे शिक्षण अहमदाबादलाच झाले . घरच्या प्रथा-परंपरेप्रमाणे ते लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले . शालेय शिक्षण संपल्यावर अमित शहा यांनी बायो-केमिस्ट्री या विषयात पदवी संपादन केली . महाविद्यालयात असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते होते . विद्यार्थी परिषदेचे काम करतानाच त्यांच्याकडे नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले गेले . पदवी घेतल्यावर अगदी अल्प काळ का होईना अमित शहा यांनी शेअर्स ब्रोकर म्हणून काम करत असतानाच मोदी यांनी भारतीय युवा मोर्चाची जबाबदारी सोपवत त्यांना राजकारणात आणले . याच काळात लालकृष्ण अडवाणी यांच्या संपर्कात अमित शहा आले आणि त्यांचेही उजवे हात बनले . तीन लोकसभा निवडणुकात अमित शहा हे अडवाणी यांचे निवडणूक ‘व्यवस्थापक’ होते . अडवाणी आणि तोपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून स्थिरावलेल्या मोदी यांचा वरदहस्त असल्यावर अमित शहा यांचा वारु गुजरातच्या राजकारणात चौफेर उधळला . नंतर गुजरात आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद अमित शहा यांच्याकडे मोदी यांनी सोपविले . इतक्या महत्वाच्या महामंडळावर जेमतेम मिसरूड फुटलेल्या अमित शहा नावाच्या तरुणाची नियुक्ती केल्याबद्दल मोदी यांच्याकडे भाजपच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली , पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या . अडवाणी यांच्या रथाचे सारथ्य केलेल्या आणि गुजरातचे सर्वेसर्वा झालेल्या नरेंद्र मोदी यांनी त्या तक्रारींकडे अर्थातच साफ दुर्लक्ष केले आणि श्रेष्ठींनाही करायला लावले . हे कमी की काय म्हणून २००३ मध्ये विधानसभेवर निवडून आणून अमित शहा यांचा मंत्रिमंडळात गृह खात्याचे राज्यमंत्रीपद देऊन समावेश केला . तेव्हा गुजराथ राज्याच्या मंत्रीमंडळातील अमित मोदी हे सर्वात तरुण सदस्य होते . अमित शहा यांना विरोध न करण्याचा संदेश आणि इशाराही कोणताही आडपडदा न ठेवता मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी पक्षांतर्गत दिला . तेव्हापासूनच गुजरात राज्यात अमित शहा यांचा शब्द म्हणजे ‘मोदी यांचा आलेला आदेश’ , हे समीकरण रूढ झाले .

त्यानंतर गुजराथमधील दंगली आणि त्यांना मिळालेल्या नरेंद्र मोदी यांच्या धर्माधिष्ठित हिंस्र उत्तेजक समर्थनाचा काळाकुट्ट अध्याय घडला , तो जगासमोर आला . त्यात अमित शहा यांचा अर्थातच सक्रिय सहभाग होता . सोराबुद्दीन फेक एन्काऊंटरने तर सर्व बाबी लखलखितपणे समोर आल्या आणि राजकारण्यांची संवेदनशून्य , अमानवी , काळी बाजू जगासमोर आली . हे घृणित कृत्य समोर आणण्यात उमेद न हरता लढणारे कार्यकर्ते जसे हिंमतबाज आहेत तशीच आपली न्यायव्यस्था आहे. त्यामुळेच अखेर अमित शहा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला , कारागृहाची हवा चाखावी लागली ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना प्रदीर्घ काळ गुजरात राज्याच्या बाहेर उत्तर प्रदेशात वास्तव्य करावे लागलेले आहे . तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मर्जीखातर एका तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी अमित शहा यांनी पोलीस दलाचा गैरवापर केल्याची घटना २०१३/१४ मधे उघडकीस आली , गाजली आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारुढ झाल्यावर ती घटना व त्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेली समिती अंतर्धान पावली ; हा अर्थातच योगायोग नाही .

बिहार आणि उत्तर प्रदेशात फिरताना अनोळखी माणसाशी संभाषणाला सुरुवात केली की साधारणपणे ९०-९५ टक्के लोक प्रतिसाद देतात तो , ‘कौन जाती हो ?’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते…आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा बाजारात तरीही हाच प्रश्न समोरून येतो , सवय नसलेली माणसे मग गांगरून जातात . उत्तरप्रदेशीयांना मात्र त्याचे काही म्हणजे काहीच वाटत नाही ! याचे कारण उत्तर प्रदेशचे राजकारण , समाजकारण एवढेच कशाला सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे धर्माधिष्ठित तसेच जाती आधारितच आहे आणि ते लपवून ठेवावे असे कोणालाच वाटत  नाही . त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केलेला ‘सोशल इंजिनिअरिंग’चा केलेला प्रयोग धाडसी ठरला होता . हा प्रयोग होईपर्यंत सर्वच पक्षाची नाळ कोणत्या ना जाती-धर्माशी पक्के जोडली गेलेली होती म्हणून मायावती यांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाला निवडणुकीत मोठ्या बहुमताचा प्रतिसाद मिळाला होता . अशा या जाती-धर्माचे प्राबल्य असलेल्या उत्तर प्रदेशाची भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्रे ‘एन्काऊन्टर स्पेशालिस्ट’ म्हणून परिचित असणा-या अमित शहा यांच्याकडे पंतप्रधानपदी आरुढ होण्यास आतुर झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या आग्रहामुळे पक्षाने सोपविली तेव्हा राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या . अमित शहा यांचे संघटन कौशल्य असे की , याच जाती धर्माचा आधार घेत त्यांनी सलग दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकात पक्षाला उत्तरप्रदेशात लक्षणीय यश मिळवून दिले आहे . बाळासाहेब ठाकरे-प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांनी सेना-भाजपच्या सत्ताप्राप्तीसाठी मराठा लॉबीच्या विरोधात महाराष्ट्रात बहुजनांना आणि सत्तेपासून वंचित असणार्‍या छोट्या जाती-समुहाला एकत्र आणण्याचा प्रयोग केला , तोच प्रयोग उत्तर प्रदेशात करत अमित शहा यांनी हे यश संपादन केलेले आहे .

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत  भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतातील राजकारणाचा केंद्रबिंदू अमित शहा होते . राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून गेल्या सुमारे पांच वर्षात ते राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत . संघटन कला आणि राजकारणाच्या आकलनाच्या  बाबतीत अमित शहा कुशाग्र आहेत यात शंकाच नाही . या लोकसभा निवडणुकीत भाजप ८० ते १०० जागा गमावणार अशी चर्चा होती , तसा अंदाजही होताच पण , त्यावरच विरोधी पक्ष विसंबून राहिले . भाजप हाही राजकीय पक्ष आहे आणि मोदी-शहा या २४ तास केवळ राजकारणाचाचाच विचार करणार्‍या जोडगोळीशी गांठ आहे , या राजकीय समंजसपणाचा जणू अभावच विरोधी पक्षांकडे होता . संभाव्य कमी होणार्‍या जागा ही जोडगोळी कुठून आणि कशा पद्धतीने भरून काढणार आहे याचा अदमास घेण्यात काँग्रेसकट सर्वच पक्ष थिटे पडले ; खरं तर , गफिलच राहिले . संघटनात्मक बांधणी पुरेशी आधी आणि नेमकी करुन , लोकांत नाराजी असणार्‍या तब्बल ८० पेक्षा खासदारांना मोदी-शहा यांनी उमेदवारी नाकारली ; शिवाय पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतात जोरदार मोर्चे बांधणी केली . परिणामी झालेल्या मतदानपैकी तब्बल ४४.९ टक्के मते मिळवतांना स्वबळावर ३००वर जागांची मजल भाजपने मारली हे यश जितके नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचे तितकेच अमित शहा यांच्या काटेकोर संघटनात्मक  नियोजनाचे आहे , यात शंकाच नाही .

दिल्लीतील पत्रकारितेच्या दिवसात अमित शहा यांची कार्यशैली पाहता आली . ते तेव्हा पक्षाचे उत्तरप्रदेशचे प्रमुख तर नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते . त्याकाळात अमित शहा पत्रकारांना फारसे भेटत नसत आणि भेटले तरी जीभेपेक्षा कानांचाच वापर जास्त करत . या माणसाची ऐकून घेण्याची क्षमता आणि त्यासाठीचा संयम अत्यंत चिवट असल्याचं सहज लक्षात येत असे . त्यांची तेव्हाही पक्षात जरब असायची ( अजूनही आहे ! ) आणि ती त्यांच्या देहबोली तसेच चष्म्याआडच्या डोळ्यांतून जाणवायची ; अमित शहा साधारणपणे पक्षाच्या मुख्यालयात नियमित येत नसत आणि आले तर त्या परिसरात केवळ सन्नाटा पसरलेला असे . तेव्हाही मोदी यांना अनुकूल ठरेल असा , हवा तो आणि हवा तसाच राजकीय निर्णय घेऊन ते थेट मोदी यांनाच ‘रिपोर्ट’ करत . म्हणूनच तेव्हा रामविलास पासवान यांच्या पक्षाशी युती होणार असल्याची बातमी भाजपच्या अनेक नेत्यांना वृत्तपत्रातूनच कळली होती . अमित शहा यांचा आदेश , सल्ला , निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी यांचा हुकूम असे वातावरण आणि अमित शहा यांच्या कोणत्याही म्हणण्याकडे दुर्लक्ष म्हणजे म्हणजे जणू काही नरेंद्र मोदी यांचा अवमानच असा सार्वत्रिक ठाम समज भारतीय जनता पक्षात राष्ट्रीय स्तरावर जो पसरलेला आहे त्याचे कारण अमित शहा यांची ही ‘जरबयुक्त बिनबोभाट’ आणि आज्ञाधारक कार्यशैली आहे .

खलनायक ते असा चाणक्य (?) प्रवास झालेल्या अमित शहा यांच्याकडे आता देशाचे गृहखाते आहे ; ते नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातले आहेत ; केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांचे स्थान नंबर दोनचे आहे ; अमित शाह यांचा लौकिक लोकशाहीवादी वागण्याचा नाही म्हणूनच इतकी सगळी सत्ता एकाहाती केंद्रीत झाल्यावर यापुढचे त्यांचे राजकारण लोकशाहीपूरक राहण्याची शक्यता कमीच आहे आणि तेच विरोधी पक्षांसमोरचे मोठे आव्हान आहे . आता ‘कुंडल्यां’च्या आधारे राजकीय नेत्यांवरफांसे टाकणार्‍या अमित शहा यांना आवर घालण्यात यश आले नाही तर भविष्यात संसदेत विरोधी पक्षांचे अस्तित्वच उरणार नाही , हाच संकेत तेलगू देसम पक्षाच्या राज्यसभा सदस्यांच्या भाजप प्रवेशातून मिळालेला आहे .

अर्थात खलपुरुष म्हणून अमित शहा हे काही भारतीय राजकारणातील एकमेव उदाहरण नाही आणि अशा एखाद्या धोक्यांना खतपाणी घालणारा भारतीय जनता पक्ष हा काही एकमेव राजकीय पक्ष नाही . आपल्या देशातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा आधारच धर्म आणि जाती द्वेष आहे ; फरक आहे तो प्रमाणात . शिवाय सर्वच राजकीय पक्षात वेगळ्या नावाने वावरणारे कमी-अधिक उंचीचे दुसरे कोणी ‘अमित शहा’ आहेतच . भारतीय जनता पक्षाचे अमित शहा जसे देशात फोफावले तसे फोफावण्याची अन्य राजकीय पक्षातील या प्रत्येकाची मनीषा आहे आणि तो खरा धोका आपल्या सर्वधर्मसमभावाधिष्टीत संसदीय लोकशाहीसमोर आहे .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799

 

Previous articleनेहरू व सुभाष
Next articleफेसबुकचे आभासी चलन: लिब्रा
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here