फेसबुकचे आभासी चलन: लिब्रा

-शेखर पाटील

एसएमएस पाठविणे अथवा सोशल मीडियात एखादी पोस्ट वा फोटो शेअर करणे फारसे कठीण नसते. आपण सर्व जण ते सहजपणे करू शकतो. याच सुलभ पध्दतीत डिजीटल माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण वा कोणत्याही बाबीची खरेदी-विक्री झाली तर…? आपल्याला आज स्वप्नवत वाटणारा हा प्रकार लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच फेसबुकने आपले डिजीटल चलन आणि याच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक असणारी प्रणाली सादर केली असून ती वापरण्यासाठी अतिशय सोपी असणार आहे. याबाबतचा हा सविस्तर उहापोह.

व्यापक प्रणालीची उभारणी

गेल्या काही वर्षांपासून आपल्या कानावर सातत्याने क्रिप्टोकरन्सी, बीटकॉईन्स आदी शब्द पडत असतील. याबाबत मी आधीच लिखाण केले असून आपण याला टेकवार्ता या माझ्या पोर्टलवर सर्च करून वाचू शकतात. अर्थात, सोप्या भाषेत सांगावयाचे तर क्रिप्टोकरन्सी हे स्वतंत्र डिजीटल अर्थात आभासी चलन असून याचे व्यवहार हे (अभेद्य सुरक्षा कवचयुक्त तंत्रज्ञानामुळे ) अतिशय सुरक्षितपणे होत असतात. या पार्श्‍वभूमिवर, आता फेसबुकने लिब्रा या नावाने आपली स्वत:ची क्रिप्टो करन्सी लाँच करण्याची घोषणा केली आहे. याचे अतिशय व्यापक परिणाम होणार असल्याची बाब स्पष्ट आहे. फेसबुकने फक्त करन्सीच नव्हे तर याच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा (इको सिस्टीम) उभारण्याची घोषणा केली आहे. यात लिब्रा या डिजीटल चलनाच्या संग्रह व विनीयोगासाठी कॅलीब्रा हे डिजीटल वॅलेटदेखील तयार केले आहे. तर ही संपूर्ण प्रणाली लिब्रा असोसिएशनच्या माध्यमातून कार्यान्वित केली जाणार आहे. ही नॉन-प्रॉफीट संस्था फेसबुकसह जगभरातील आघाडीच्या कंपन्यांनी एकत्र येऊन तयार केली असून ती लिब्राच्या व्यवहारांसाठी मध्यवर्ती संस्थेचे काम करणार आहे.

ब्लॉकचेनचे अभेद्य कवच

सध्या आपण नेटबँकींग व विविध प्रकारच्या क्रेडीट वा डेबीट कार्डपासून ते विविध डिजीटल पेमेंट सिस्टीम्सच्या माध्यमातून डिजीटल पध्दतीत पैशांची देवाण-घेवाण आणि विविध वस्तूंची खरेदी करू शकतो. फेसबुक याच प्रक्रियेस नवीन आयाम देणार आहे. सर्वात प्रथम आणि महत्वाची बाब म्हणजे लिब्रा हे फेसबुकचे चलन ब्लॉकचेन या अभेद्य सुरक्षा कवच प्रदान करणार्‍या तंत्रज्ञानाने युक्त असणार आहे. अर्थात यावरून करण्यात आलेले सर्व व्यवहार हे गुप्त राहतील. सुरक्षा यंत्रणांनी मागणी केल्याशिवाय कोणत्याही डिजीटल व्यवहाराचा तपशील त्रयस्थ व्यक्ती वा संस्था पाहू शकणार नसल्याचे फेसबुकने नमूद केले आहे. अर्थात, सुरक्षा आणि गोपनीयता हा या चलनाचा सर्वात महत्वाचा भाग असणार आहे.

सहज उपलब्धता

यातील दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे चलन आपण मोबाईल रिचार्जप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारात खरेदी करू शकणार आहोत. म्हणजे मला १०० लिब्रा खरेदी करायच्या असल्यास मला त्या रिचार्जप्रमाणे स्टोअरमधून मिळतील. अथवा मी याला ऑनलाईन रिचार्जच्या माध्यमातून मिळवू शकतो. अर्थात या चलनाची सुलभ उपलब्धता ही याची खासियत असणार आहे.

डॉक्युमेंटची कटकट नाही

तिसरा मुद्दा हा याच्या सुलभ वापराचा आहे. वर नमूद केल्यानुसार अगदी एसएमएसप्रमाणे यातून पैशांचे व्यवहार होतील. बहुतांश डिजीटल पेमेंटची प्रक्रिया ही अनेक युजर्सला किचकट वाटते. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुकने याचे सुलभीकरण केल्याचे दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात हे चलन फेसबुक मॅसेंजर आणि व्हाटसअ‍ॅपवरून वापरता येणार असून लिब्रासाठी स्वतंत्र अ‍ॅपदेखील येणार आहे. यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही याचा वापर होईल ही बाब उघड आहेच. याचे खाते उघडण्यासाठी कोणत्याही देशातील सरकारचे अधिकृत ओळखपत्र (भारताचा विचार केला असता आधार कार्ड !) वगळता यासाठी कोणतेही डॉक्युमेंट लागणार नाही. यामुळे अगदी बँक खाते नसणारा व्यक्तीदेखील डिजीटल व्यवहार करू शकेल.

जगभरात एकच चलन

चौथा मुद्दा म्हणजे लिब्रा ही करन्सी अन्य चलनांप्रमाणे (उदा. डॉलर, युरो आदी) स्थिर असेल. बीटकॉईन्ससारख्या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य हे सातत्याने वरखाली होत असते. तथापि, लिब्रामध्ये परिवर्तनीयता असली तरी ती फार कमी प्रमाणात असेल. तसेच लिब्रा हे चलन जगभरात चालणारे असल्यामुळे परकीय चलन विनिमयासाठी लागणारा भुर्दंड वाचणार आहे. म्हणजे आपल्याला रूपयातून डॉलर वा डॉलरमधून युरो असा कोणताही प्रकार करावा लागणार नाही. यासाठी आपल्याला पैसेदेखील मोजावे लागणार नाहीत. यामुळे फेसबुक जगभरात एकच चलन प्रचलीत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.

अल्प आकारणी

पाचवा मुद्दा म्हणजे लिब्रा या चलनाच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या सर्व व्यवहारांसाठी लिब्रा असोसिएशन ही संस्था संरक्षक म्हणून काम करेल. जसे रिझर्व्ह बँक ही रूपयांमधून होणार्‍या व्यवहारांसाठी मध्यवर्ती संस्था आहे, अगदी त्याच प्रकारे लिब्रा असोसिएशन हे उत्तरदायीत्व निभावण्याचे काम करेल. आणि वर नमूद केल्यानुसार याला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अभेद्य सुरक्षा कवच असेल. याशिवाय, सर्वात लक्षणीय बाब म्हणजे लिब्रा या चलनाच्या व्यवहारासाठी अतिशय अल्प आकारणी करण्यात येणार आहे. यातून होणारे व्यवहार हे जवळपास विना आकारणीचेच असतील असे फेसबुकने जाहीर केले आहे. यामुळे डिजीटल व्यवहारांसाठी लागणार्‍या अतिरिक्त आकारणीतून युजर्सची मुक्तता होणार आहे.

वर्षभरात प्रचलीत होण्याची शक्यता

आता उरतो सर्वात महत्वाचा प्रश्‍न – फेसबुकचे लिब्रा हे चलन नेमके केव्हा उपलब्ध होणार ? तर खुद्द फेसबुकने आपल्या अधिकृत घोषणेत २०२०च्या मध्यावर लिब्रा वापरता येईल असे जाहीर केले आहे. याची दखल अमेरिकेन सिनेटने घेतली असून जुलै महिन्याच्या प्रारंभी याबाबत चर्चा होणार आहे. यात सर्व आयाम तपासण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे भारताचे क्रिप्टोकरन्सीबाबतचे धोरण सध्या अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यात डिजीटल चलनावर पूर्णपणे बंदी लादण्याचे सुचविण्यात आलेले आहे. तर फेसबुकने अद्यापही या संदर्भात रिझर्व्ह बँकेसोबत बोलणी सुरू केलेली नाही. यामुळे फेसबुकचे चलन भारतात नेमके केव्हा येणार याबाबत संभ्रम आहे. तथापि, फेसबुकने प्रोजेक्ट लिब्रामध्ये अन्य कंपन्यांना समाविष्ट केले असून यात उबर, पेपाल, व्हिसा, मास्टरकार्ड आदींचा समावेश आहे. यामुळे या त्रयस्थ सेवांच्या माध्यमातून फेसबुकचे लिब्रा भारतीय युजर्सला वापरता येईल अशी शक्यता आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे फेसबुकला भारतासारख्या अजस्त्र बाजारपेठेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. यामुळे भारतीय नियमांच्या चौकटीत बसवून लिब्रा हे चलन आपल्याला सादर करण्यात येईल असे सध्या तरी वाटत आहे.

( हा विषय अथांग आहे. यातील विविध पैलूंबाबत मी लवकरच सविस्तर लिहतो. विशेष करून फेसबुकचे लिब्रा हे चलन बीटकॉईन्ससारख्या अन्य क्रिप्टोकरन्सीजपेक्षा वेगळे कसे ? यातून फेसबुक नेमके पैसे कसे कमावणार ? फेसबुकच्या ग्लोबल डॉमिनन्सला वेगळा आयाम कसा मिळणार ? ब्लॉकचेन म्हणजे काय ? याबाबत सवडीने व्यक्त होतो. )

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

9226217770

https://shekharpatil.com

Previous articleखलनायक आणि चाणक्य(?)ही… 
Next articleजावेद….साहिर आणि दोनशे रुपयांच्या गोष्टीचा गुंता!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.