‘गड्डा हॉटेल’चे विनायकराव ७५ वर्षाचे झालेत!

      अमरावतीच्या राजकमल चौकातील ‘गड्डा हॉटेल’ इतिहासजमा होवून आता अनेक वर्षे झालीत . मात्र अजूनही या हॉटेलच्या आठवणींना  जोपासून ठेवणारे आणि त्यामुळे हळवे होणारे  हजारो अमरावतीकर राज्याच्या कानाकोपऱ्यात  आहेत. अमरावतीचे राजकारण ,  समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्रातील किमान तीन पिढ्या या हॉटेलच्या चवीवर पोसल्या गेल्या आहेत .  या हॉटेलचे मालक विनायकराव तायडे आज ७५ वर्षाचे झालेत . त्यानिमित्ताने आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता . त्या भावपूर्ण सोहळ्यात विनायकरावांना प्रदान करण्यात आलेलं हे मानपत्र   -संपादक
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..
अमरावती शहराची ओळख आहे श्री अंबाबाईचं मंदिर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, श्री शिवाजी शिक्षण संस्था, तपोवन इत्यादी इत्यादी. ह्या झाल्या अमरावतीच्या अधिकृत खूणा. पण कुठल्याही औपचारिकतेच्या पलीकडची अमरावतीची काही वैशिष्ट्ये आहेत ज्यांच्याविषयी इथल्या लोकांच्या मनात अतीव आकर्षण, कौतुक आणि हो, आदरसुध्दा आहे. एके काळी अमरावतीच्या हृदयात वसलेलं असंच एक अद्भूत नाव म्हणजे ‘गड्डा हॉटेल’. शहराच्या मधोमध राजकमल चौकात वसलेलं हे ठिकाण शहरवासीयांच्या नसानसांत भिनलं होतं. अमरावतीकरांनी ह्या हॉटेलला जीव लावला आणि ह्या हॉटेलनेही सामान्यातल्या सामान्य अमरावतीकराला आदर दिला. दारात पाय ठेवल्यासरशी या साहेब, बसा साहेब, साहेबांला पाणी दे रे, ह्या शब्दातून व्यक्त होणारं आदरातिथ्य ज्याच्या वाट्याला आलं नसेल तो करंटा !  त्याने काय गमावलं हे त्याला कधीच कळणार नाही.
        विनायकरावांच्या आवाजातलं हे सहज आवाहन आजच्या जमान्यातील कुठल्याही फाईव्ह स्टार आदरातिथ्याला  ओशाळायला लावणारं होतं. तिथे होणारं स्वागत दमदार की दही-तर्री युक्त झणझणीत आलूबोंडा दमदार हे कोडं कधी सुटलंच नाही. अर्धा प्लेट खाऊन झालेली असायची, घर्मबिंदू कपाळावर उमटू लागले असायचे, तशात विनायकरावांची स्वारी गल्ला सोडून टेबलवर यायची आणि स्वत:च्या हाताने पुन्हा तर्रीयुक्त रश्शाने प्लेट काठोकाठ भरून द्यायचे.
पहिल्यांदाच आलेलं गिर्‍हाईक असलं तरी विनायकरावांच्या अस्सल आपुलकीने आपण इथली फार जुनी माणसं आहोत, अशी भावना त्या आगंतुकाच्या मनात निर्माण होत असे. आलूबोंड्याच्या तर्रीने झोंबणारं तोंड सुस्तावण्यापूर्वीच विनायकराव जलेबीचा आग्रह करायचे. चविला म्हणून फुकट सँपल मिळायचं. जास्तीचं दही, जास्तीचा रस्सा अमरावतीच्या अस्सल वर्‍हाडी दिलेरीची ओळख पटवून देत असे. पायर्‍या उतरून तळघरात असलेल्या ह्या हॉटेलचं बारसं अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने इथल्या सोप्या भाषेत ‘गड्डा हॉटेल’ केलं. नवीन माणूस ह्या हॉटेलची किर्ती ऐकून राजकमल चौकात शोधायला बसला की त्याला हे हॉटेल नाव सापडेना. कारण, हॉटेलला अख्ख्या जन्मात नावाचा बोर्ड कधी लागलाच नाही.
        सुरेश भटांना ज्या आलूबोंड्याच्या तर्रीने दर्जेदार गजला स्फुरल्या, ज्या झणझणीत रश्शाने अमरावतीचे राजकारण ढवळून काढले, ज्या आदरातिथ्याची तोड अमरावतीच्या माणसांना जगात सापडली नाही, त्या ‘गड्डा हॉटेल’चे संचालक  विनायकराव तायडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा अमरावतीच्या अलिखित इतिहासात  अजरामर होणार आहे. अमरावतीकरांना जगण्याचा विश्वास देणारा हा उपक्रम बंद पडला त्यावेळी तर्रीचे खास दर्दी हळहळले. विनायकरावांवर वार्धक्यामुळे शारीरिक बंधने आली असतील, पण आदरातिथ्याची उर्मी तीच आहे. बडनेर्‍याच्या पुढे ‘आतिथ्य’ हॉटेलच्या माध्यमातून विनायकराव जोमाने तरूणांना लाजवेल अशी सेवा अमरावतीकरांना देत आहेत. विनायकरावांना दीर्घायुरोग्य चिंतण्याची संधी मिळाल्याबद्दल गड्ड्यानुभवाने श्रीमंत झालेले अमरावतीकर नेहमीच ऋणात राहतील
विनायकरावांचा नंबर -9881532984
.-शब्दांकन -जी .बी . देशमुख
Previous articleतू, ती आणि दोघांच्या सिंगलता
Next articleव्यक्तिनिष्ठ राजकारणाची शोकांतिका!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.