गद्दार गाडायच्याच लायकीचे!

*’शिंदे-फडणवीस सरकार’ स्थापन होऊन तीन महिने उलटले तरी शिवसेनेतील गळती अजून थांबत नाही. अशावेळी ‘बाळासाहेब ठाकरे आज असते, तर ते दसरा मेळाव्यात काय बोलले असते?’ ह्याची कल्पना करणारे, प्रत्येकाने वाचायलाच हवे असे शब्दचित्र.-

– लेखक :  ज्ञानेश महाराव

     (संपादक, साप्ताहिक चित्रलेखा)

———————————————–

स्थळ शिवतिर्थ, शिवाजी पार्क, घोषणा, टाळ्या, शिट्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिवसेना प्रमुखांचे भाषण सुरू होतं.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो!…  हो हो, तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो! (समोरच्या जमावाकडे पाहत, कमरेवर दोन्ही हात ठेवून) काय कुणाला शंका आहे की काय? (शिट्या-टाळ्यांचा कडकडाट)

     आजचा दिवस तुमच्या- माझ्यासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी महत्त्वाचा आहे. आज दसरा! तमाम हिंदूंच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक सण-उत्सव! याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला. पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरून खाली उतरवली आणि याच दिवशी ‘शिवसेने’चा पहिला दसरा मेळावा पन्नास- पंचावन्न वर्षांपूर्वी इथेच पार पडला. (तेवढ्यात दिवाकर रावते बसल्याजागी पुढे होत म्हणतात- ‘साहेब छप्पन वर्षांपूर्वी…’ ) बरं, ५६ वर्षांपूर्वी! कुणी मोजत बसायचे आकडे? तो उद्योग आमच्या मनोहरपंतांचा! (हशा) त्यांची जागा दिवाकर भरून काढतोय, इतकंच! बरं… शिवतीर्थावरचा प्रत्येक दसरा मेळावा हा ऐतिहासिक होताच. पण आजचा दसरा मेळावा विशेषातला विशेष… अगदी खासम खास असा आहे.

     पुराणात ईश्वराचे जसे अनेक अवतार असतात. एखाद्या महान वृत्तीचा पुनर्जन्म होतो. तसा आजचा दिवस ‘शिवसेने’च्या जन्माचे स्मरण करण्याचा आहेच आहे! (प्रचंड टाळ्या) त्यात सध्याची परिस्थिती पाहता, आता ‘शिवसेने’चा पुनर्जन्म होतोय म्हणून मी आज येथे पुन्हा आलोय. (बराच वेळ टाळ्या)… अहो, मी कुठे गेलोय? आणि माझी ही तमाम शिवसैनिकांची ‘शिवसेना’ ताकदीने असताना मी कुठे जाणार!  मी सदैव इथेच आहे. याच शिवतीर्थावर… इथेच विसावलो आहे!  (टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. घोषणा होतात.. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो! आव्वाज कुणाचा…. शिवसेनेचा!)

     आता बास, बास! आता मुद्याकडे येऊ. आजच्या परिस्थितीकडे येऊ. खूप काही बोलायचे आहे. गेले काही दिवस खूप काही तुम्ही पाहिले आहे. त्या सगळ्याचा समाचार घ्यायचा आहे; नव्हे, तो घ्यायलाच हवा. आज शिवतीर्थ खच्चून भरले आहेच. पण ते ‘ओव्हर फ्लो’ म्हणतात तसे माणसांनी फुलून गेले आहे. बाजूचे रस्तेही भरलेत. आजच्या आपल्या या विचारांचे सोने लुटायच्या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष आहेच आहे. पण देशाचेही लक्ष शिवतीर्थाकडे आहे. जगभरात पसरलेल्या हिंदुस्थानी लोकांचे लक्ष आहे. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमावर करोडो लोक कानात प्राण आणि डोळ्यांत ज्योत आणून हे सर्व काही पाहत आहेत; ऐकत आहेत. एवढं सगळं ‘स्पेसफुल्ल’ व्हायचं कारण जगाला माहीत आहे. (पब्लिकमधून आवाज: गद्दार.. गद्दार!….  तो थांबवत-)

    हो,हो..त्यांची चिरफाड नंतर करू. गेल्या काही वर्षांत, महिन्यांत काय काय घडलं… हा सगळा कोळसा आज आपल्याला उगळायचा नाही. मात्र ज्यांनी उगळला त्यांचा समाचार नक्की घ्यायचा आहे! (घोषणा : ५० खोके.. गद्दार ओके!… हाताने घोषणा थांबवत-)  ते आहेच; पण ह्या सटरफटर गोष्टींचा उल्लेख केलाच पाहिजे, असे काही नाही. आजच्या या प्रचंड प्रचंड उपस्थितीला, माझ्या भाषणाला कारणंही तशीच आहेत. देशाच्या अवनतीला कारण बनलेली, महाराष्ट्रहिताचा गळा दाबणारी प्रवृत्ती आज मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या कंठाला नख लावत आहे. त्याचा समाचार घ्यायचा तर आजच्याशिवाय दुसरा दिवस योग्य असणार नाही! (टाळ्या… घोषणा : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो! आव्वाज कुणाचा…. शिवसेनेचा!)

     मुळापासूनच सुरुवात करतो.

हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, म्हणून आपण आपल्या संघटनेला ‘शिवसेना’ हे नाव दिले. (घोषणा : छत्रपती शिवाजी महाराज की जय!… जय भवानी- जय शिवाजी!) का करावी लागली हो ‘शिवसेने’ची स्थापना? थोडं इतिहासात जाऊ. देश स्वतंत्र झाला. भाषावार प्रांत रचना झाली. पण मुंबईसाठी मराठी-गुजराती द्विभाषिक राज्याचं झेंगट लावून दिलं. त्याच नाव मुंबई राज्य! त्याविरोधात मराठी भाषिक राज्य व्हावे म्हणून महाराष्ट्राला लढा उभारावा लागला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा! पाच वर्षे तो लढा सुरू होता. आमचे दादा-वडील, प्रबोधनकार ठाकरे ह्या लढ्यात आघाडीचे नेते होते. आमच्या दादरच्या घरात या लढ्याच्या नेत्यांच्या कित्येक बैठका झाल्या. त्यामुळे आम्हीही लढ्यात सामील झाले. मी आणि माझा भाऊ- श्रीकांतजी व्यंगचित्र काढायचो. खूप वेगळे दिवस होते ते. शेवटी १०६ हुतात्म्यांचे बलिदान दिल्यानंतर मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. मुंबई महाराष्ट्राने लढून मिळवली आहे. ती मिळवून, आपले पूर्वज नुकतेच कुठे स्वस्थ बसतायत, तोपर्यंत काही व्यापारी आणि बाजारू लोक ही मुंबई गिळायचा प्रयत्न करत होते. महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी माणसाची गळचेपी होत होती. बाहेरचे लोक मालक बनत होते. म्हणून ’मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी’ आपण सगळेजण एकत्र आलो आणि ‘शिवसेना’ निर्माण झाली! (घोषणा : आला रे आला कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…)

     हो, वाघासारखी डरकाळी फोडत माझ्या शिवसैनिकांनी मराठी माणूस सुरक्षित केलाच! (टाळ्या) पण मराठी माणसांचे भाऊबंद असणारे इतर लोकही निर्धास्त असावेत म्हणून हिंदूंचे रक्षण करण्याचाही विडा आपण उचलला! (प्रचंड टाळ्या) ऊन, वारा, पाऊस असो… धर्मांध, दहशतवादी, परकीय शक्ती असोत त्यांच्यापासून ‘शिवसेने’ने मराठी माणूस आणि महाराष्ट्रातला हिंदू वाचवला. (प्रचंड टाळ्या) या प्रवासात आपल्याबरोबर कधी ‘समाजवादी’ आले, ‘जनसंघ’ आला. ‘काँग्रेस’वालेही आले. आपण दिलेला शब्द पाळला!

(घोषणा : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा…. विजय असो!) हे याच देशातले, मातीतले पक्ष आहेत. ते आमचे शत्रू नाहीत. मतभेद असतील, पण कोणाला आम्ही कायमचा शत्रू मानले नाही. मतभेद असायचेच, पण ते मुद्याचे आणि मुद्यापुरतेच!

     ३५ वर्षांपूर्वी तसं सगळं काही बरं होतं. त्याच काळात एक कमळाबाई आपल्याकडे पदर पसरत आली. (घोषणा : कमळा! कमळा! कमळा…) थांबा, नाहीतर अवदसा येईल परत! (प्रचंड हशा)… तर काय सांगत होतो… हां, कमळी आली आणि  म्हटली, ’मला आसरा द्या.’ वाटलं, बिचारी आहे; एकटी आहे; द्यावा हिला आसरा. त्यावेळी ‘शिवसेना’ही ऐन पंचविशीत होती. ह्या वयात आयती चालून आलेली संधी कोण सोडतं का?  (बराच वेळ हशा) भरपूर हसा,  पण तुमच्या मनात आहे, ते माझ्या डोक्यात नाही, हे लक्षात ठेवा! (शिट्ट्या आणि टाळ्या) त्यात त्यावेळी देशात कोणीही कमळीला दारात उभं करत नसताना, या  ‘भाजप’बरोबर पहिली राजकीय युती ‘शिवसेनेे’ने केली. तेव्हा त्यांच्याकडं माणसंपण जरा बरी होती. ती माणसं आता काळाच्या पडद्याआड गेली. कमळाबाईची नवीन लेकरं एवढी इरसाल, बडीव आणि काढीव असतील, असं तेव्हा कधी वाटलं नव्हतं हो ! (शिट्ट्या व टाळ्या). काय काय आणि कसली कसली माणसं निपजतात? आईला आई आणि बापाला बाप न म्हणणारी! भिकारचोट साले (शिट्ट्या व टाळ्यांचा कडकडाट)…. आपले तुकडे खाऊन गरगरीत झालेली कमळाबाई आणि तिची ती निवडक कार्टी….गेल्या काही दिवसांपासून आपल्यावरच डाफरत होती. लक्षात आहे ना, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २५ वर्षांची युती तोडून आपला कसा घात केला ते! म्हणून उद्धवनी २०१९ च्या निवडणूक निकालानंतर कमळाबाईच्या कनाट्यावर लाथ मारली. दिलेले शब्द मोडताय होय…  म्हणत युती तोडून कमळीला बाहेरचा रस्ता दाखवला. उद्धवनी जे केलं ते योग्यच होतं.( प्रचंड टाळ्या).

       कोण ते नागपूरचं खरबूज का टरबूज (हशा)…तीन वर्ष झाली, सारखं ‘टुरटुर’ करतंय. ‘नैसर्गिक युती! नैसर्गिक युती!… आरे चोंग्या, (हशा) तुम्ही लोक शिकवता होय आम्हाला नैसर्गिक युती! अरे मागनं आणि पुढनं एकावेळी बोलणार्‍या म्हांडुळानो, तुमच्या जिभेला काय शरम बिरम, हाडबिड आहे का नाही ?… काश्मीरमधल्या फुटीरांना पाठिंबा देणारी मेहबुबा मुफ्ती! तिच्याबरोबर सरकार केलंत ना? तेव्हा कुठं गेला होता रे तुमचा नैसर्गिक विधी का धर्म? का त्यावेळी तुमचं बूड शिवलं होतं ? निवडणूकपूर्व युती म्हणता ना? मग २०१७ मध्ये नितीशकुमार बरोबर कशाला गेला होता? झक मारून झुणका खायला का ? (हशा) आणि उद्धव दारात उभे करत नाही म्हणून त्या अजित पवार यांच्याबरोबर कशाला रे गेला होता, पहाटे शपथ घ्यायला? तेव्हा तुम्हाला काय ती नैसर्गिक लाज, अब्रू वाटली नाही ?

       २०१९ मध्ये तुम्हाला उद्धवने सत्तेतून बाजूला ठेवलं. ते तुमच्या कर्माचं, लबाडीचं…. दिलेला शब्द मोडण्याचं फळ होतं. तुमच्या पापाचं माप तुमच्या पदरात टाकलं. त्या दिवसापासून तुम्हाला चैन पडेनासं झालं होतं…. उद्धव मुख्यमंत्री झाल्याचं तुम्हाला दिवसेंदिवस असह्य होऊ लागलं. पहिल्या दिवसापासून कट- कारस्थानं सुरू केलीत! साथीला ती राजभवनावरची धोतरातली कोशिंबीर होती… (थोडासा पॉज घेत) कळलं ना कोशिंबीर कोणाला म्हणालो ते? (जमावातून ‘भाज्यपाल! भाज्यपाल!’ असा आवाज) हो हो, कोश्या कोश्या…!

      काय काय पात्र आणलीत हो ह्यांनी! ते मध्ये एकदा पचकलं. मुंबईत पैसा आहे, तो राजस्थान आणि गुजरातचा. आता नागपुरात ‘भारत विकास परिषद’मध्ये म्हणतो, ‘मी भिकारी आहे!’… पण तू अलिशान राज भवनात राहाणारा, विमानाने फिरणारा ‘रॉयल भिकारी’ आहेस! असली ध्यानं बोडक्यावर घेऊन मिरवते ही येडी कमळी! (हशा) आता गप्प असतो तो गुलब्या. बरं, त्याचा समाचार त्यावेळी घेऊन झालाय!

    उद्धवने इथं शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दिवसापासून खरबुज्याचा आणि गुलब्याचा अपशकून! उद्धवने मुख्यमंत्री म्हणून काही करायचे ठरवले की, हे दोघे काळ्या मांजरासारखे आडवे गेलेच गेले समजा ! बरोबर राजकारणात अजून पोरसवदा असलेल्या आदित्यच्याही बदनामीचे कट- कारस्थान यांनी केले. किती नीच थराला जाल रे! (पब्लिक एकदम शांत) काहीही करून सत्ता परत मिळवयाचीच, यासाठी पराकोटीचा निर्लज्जपणा यांनी केला.

     अगोदर गोड गोड बोलून आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न झाला. पण अलीकडचा यांचा अनुभव अन्नाजी दत्तोला म्हणजे अण्णाजीपंताला लाजवेल, असा असल्याने उद्धवनी यांना काही केल्या जवळ केले नाही. मग, दुसरी तंत्रे अवलंबण्यात आली. बदनामी सुरू केली. केंद्र सरकार ताब्यात असल्याने त्यांच्या यंत्रणा बाहेर काढल्या. नोटिसा काय! जप्त्या काय! सगळे सुरू झाले. नोटिसा कुणा कुणाला आल्या होत्या हे आता दिसतच आहे. ‘आमच्या बरोबर या नायतर कमावलेलं जप्त करून घ्या! वरून तुरुंगात जा!’ असा वरवंटा फिरू लागला. नोटिसा येऊ लागल्या तसे भलेभले सरपटू लागले. उद्धवनी ज्याला कारभारी केला होता, त्या ठाण्याच्या दाढीवाल्यालाही अशीच नोटीस आली होती.

    ‘येतोस का, की आत जातोस!’ अशी ती नोटीस होती. एका नोटिशीत तो आणि त्याच्या सोबतचे काही जण गडबडले. सपाट झाले. तसेही त्यांना तिकडे जायचेच होते. माती खायचीच होती. तसे ते गेले. फुटले आणि वर टेंभा मिरवित नाक कापून भोक उरलेले सांगतात काय? आता त्या भोकाचे काय करणार! (हशा) पुन्हा ‘आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि हिंदुत्व जिवंत ठेवण्यासाठी, हा निर्णय घेतला,’ अशा बाता मारतात!… काय बोलताय रे… काय शरम बिरम आहे की नाही तुम्हाला? इथे उद्धव बसलाय. त्याच्याकडे मीच तुमच्या साक्षीने आणि संमतीने ‘शिवसेने’ची सूत्र दिली ना! आदित्यला सांभाळून घ्या, म्हणून सांगितलं ना! तेच निर्णय घेतील म्हणून सांगितलं. आणि हे भामटे म्हणताहेत, ‘आम्ही बाळासाहेब यांचे हिंदुत्व जिवंत ठेवण्यासाठी हे सगळे केले!’ साफ झूठ बोलत आहेत. एकसाथ सगळे गद्दार आहेत. ह्या जनावरांना घाण खायचीच होती. ती खाल्ली आणि म्हणतात, रंग छान आहे! खा मग भरपेट. त्याचा वासही चांगला असेल आणि चवही चांगली असेल. च्यायला, चूक माझीच आहे. कुठून कुठून आणि कसली कसली माकडं माझ्याकडे आली. (प्रचंड हशा)…. त्या माकडांची माणसं केली. माणसाचे सरदार केले. (शिट्या- टाळ्या) पण शेवटी माकडं ती माकडंच राहिली! जनावरंच ती. त्यांना  आई कोण आणि बाप कोण कसे कळणार? ‘शिवसेना’ ही त्यांची आई! त्या आईवरच हे उलटले. (घोषणा : शेम शेम… गद्दार गद्दार) काय तर म्हणे, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतो! मी हा,असाच निर्माण झालो का? मला माझ्या वडिलांनी- दादांनी प्रबोधनकार ठाकर्यांनी घडवलं. शेंडी-जानव्यात हिंदुत्व नाही, हा त्यांचा विचार! तोच उद्धवने मांडला, तर हिंदुत्वाची सुंता झाल्यासारखी छात्या काय पिटता गद्दारांनो! माझ्या हिंदुत्वाचा पाया प्रबोधनकारांचा विचार आहे आणि होता, म्हणूनच अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना भगव्याखाली एकत्र आणणारी (पब्लिककडे हात करीत) ही विराट शिवसेना मी निर्माण करू शकलो.

      ठाणे म्हणजे ‘शिवसेने’चा तोरणा! आनंद दिघे तिथले. आपले आजन्म असे मावळे. त्यांचा फोटो लावून दाढीवाल्याने दुकान सुरू केलेय. अरे, दिघे म्हणजे दिघे होते. त्यांचे नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुमची? (टाळ्या) दाढी राखली म्हणून कुणी दुसरा दिघे होतो का? दाढीच काय, अंगभर केस आहेत, म्हणून अस्वलाला कुणी सिंह म्हणेल का?(प्रचंड शिट्ट्या-टाळ्या). ह्या गद्दारांची लायकी ती किती? त्यापेक्षाही ‘शिवसेने’ने त्यांना जास्ती मोठे केले. तुम्ही शिवसैनिकांनी जीवाचे रान करून, रात्रीचा दिवस करून ह्यांना निवडून आणले. तेच तुमच्यावरच उलटले. ‘शिवसेने’वर उलटले. महाराष्ट्रावर उलटले. आता निवडणुका कधी होतील, हे माहीत नाही. पण जेव्हा केव्हा होतील, तेव्हा ह्या माकडांपैकी एकपण परत निवडून आला नाही पाहिजे! (घोषणा : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो! आव्वाज कुणाचा…. शिवसेनेचा!).. बरं.. मग माकड लाल ढुंगणाचे असो की काळ्या ढुंगणाचे! ते पाठीवर उताणे आपटलेच पाहिजे. तुम्ही आपटणार ना? ( पब्लिकमधून आवाज : पन्नास खोके, एकदम ओके)

     अरे, ते खोके देतील नाहीतर कंटेनर देतील! घेणार्‍यांना लाज नाही, त्याला तुम्ही आम्ही आता काय करणार? आता जे करायचे ते थेट निवडणुकीतच! लगेचच महापालिकेच्या निवडणुका आहेत.  मग विधानसभेचा बार उडेल. कोणत्याही परिस्थितीत ज्यांचे मुंबईवर प्रेम आहे; महाराष्ट्रावर प्रेम आहे; देशावर प्रेम आहे; त्यांनी ज्यांना हा खोक्याचा ‘लंपी रोग’ झाला, असे सगळे दोन पायाचे प्राणी मातीआड करायचे आहेत. (घोषणा : हिंदहृदयसम्राट.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा … विजय असो. ) कारण ही अवलाद गाडायच्याच लायकीची आहे.(टाळ्या)

       किती किती म्हणून पातळी सोडावी यांनी! ह्या गद्दारांनी अगोदर सत्तेवर दावा केला. मग ‘शिवसेने’वर दावा केला. धनुष्यबाणावर दावा केला. या आजच्या मेळाव्याला,  स्थानाला विघ्न यावे, म्हणून शिवतीर्थावर दावा केला. त्या अगोदर किती अपराध केले, याची तर दादच नाही. माझे विचार ‘सामना’तून तुमच्यापर्यंत ताकतीने पोहोचवणाऱ्या संजयलाही (राऊत) यांनी तुरुंगात घातला आणि ह्या गद्दारांनी ‘ओके ओके’ म्हणत आनंद व्यक्त केला.

     हे गद्दार तुमचे- जनता जनार्दनाचे, ‘शिवसेने’चे खात होते आणि काळजी कमळाबाईची करत होते. शिवसेनेत वाघासारखे राहायचे सोडून ते नोटीशींच्या भितीने कमळाबाईला, त्या टरबुज्याला फितूर झाले होते. उद्धव दवाखान्यात असताना आणि शुद्धीत नसताना त्याला मुख्यमंत्रीपदावरून काढण्याचे कारस्थान रचत होते. शेवटी त्यांनी डाव साधलाच!

    असू दे, ते दिवस तुमचे होते, भामट्यांनो! (शिट्या) आता येणारे दिवस आपले आहेत. आहेत की नाही? (‘हो हो’…. आवाज कुणाचा, शिवसेनेचा. एका मागून एक घोषणा.)

      काय काय वाट लावली साल्यांनी महाराष्ट्र आणि देशाची हो! आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने महाराष्ट्र हे राज्य सतत आणि सर्वत्र पहिल्या क्रमांकावर होतं. कुठं नेऊन ठेवलंय हो आपल्याला! मुंबईतली सरकारी ऑफिसं एकेक करीत पळवून नेत आहेत. मध्ये तो ‘फॉक्सकॉन’ का काय तो प्रोजेक्ट गुजरातला नेला. नेला कुठला, त्या दाढीवाल्याने आणि टरबुज्याने त्यांच्या घशात आयता नेऊन घातला. ती बुलेट का फटाफट ट्रेन कुणासाठी करत आहेत? आपल्यासाठी? ( गर्दीतून आवाज : ‘नाही, नाही’) आपलं सगळं पळवून नेत आहेत. जागे होणार आहात की नाही आता ? ( ‘हो, हो’- असा गर्दीतून आवाज.) नुसते जागे होऊ नका. उठा, उभे रहा. मिळेल ते हातात घ्या. दिसेल तिथे प्रतिकार करा. फक्त एवढेच नाही तर देशात आणि राज्यात जे जे म्हणून प्रश्न सामान्य माणसाला आणि गरिबाला भेडसावत आहेत, त्याबद्दल लोकांमध्ये जाऊन जागृती करा.

बघा, बाहेर महागाई किती वाढलीय!  पेट्रोल, डिझेलचे दर बघा. लोकांच्या हाताला काम आहे का, बघा. सगळीकडे अनाचार माजलाय. ‘अच्छे दिन’ देतो म्हणाले होते. कसले आलेत ‘अच्छे दिन’!  सगळीकडे लुच्चेगिरी सुरू आहे. एकच माणूस आणि त्याची काहीजणांची टोळी. एकच पक्ष आणि त्यातली पिलावळ. ही ह्यांची लोकशाही! ह्यात कसलं आलंय हिंदुत्व? या देशात बहुसंख्य हिंदूच आहेत. त्यांच्या हाता-तोंडाचा घास काढून घेता. त्यांना बेरोजगार करता. त्यांना नागवता; आणि म्हणता आमचं हिंदुत्व? तुमच्या ह्या असल्या नकली हिंदुत्वाला या देशातले निम्मे हिंदूसुद्धा मानत नाहीत हो! आम्ही तरी का मानावे? आणि हे हिंदुत्व म्हणता ना, ते काही तुमच्या एकट्याच्या बापाचं नाही. तुमच्या हिंदुत्वात आणि आमच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तुमचे हिंदुत्व द्वेष आणि भेदाभेद या पायावर उभे राहिले आहे. आमचे हिंदुत्व इथली माणसे आणि राष्ट्र प्रथम, असे आहे. आम्हाला हिंदुत्वाची पारख करून घ्यायला मशिदीत जाऊन इमाम प्रमुखाची भेट घ्यावी लागत नाही. ओवेसी सारखी ‘बी टीम’ सांभाळून मर्द असल्याचं दाखवून द्यावं लागत नाही. आणि तुमची ती शेंडी-जानवीही नाचवावी लागत नाही,  लागणारही नाही, हा आमचा ५६ वर्षांचा संकल्प आहे. तोच कायम राहाणार! (टाळ्या)

     दसऱ्याला आपट्याचं पान पुढे करायचं आणि ‘सोनं घ्या’ म्हणायचं. ‘शिवसेने’शी एकनिष्ठ असलेला हा माझा कट्टर शिवसैनिक सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे ! (प्रचंड टाळ्या) तुम्हाला काय ‘सोनं घ्या’ म्हणायचं?…म्हणून विचार देतो! तो सोन्यासारखा वाटला तर लुटा, वाटा! ‘शिवसेना’ सर्वांची आहे. ती अधिक दणकट, बळकट करा! मुंबई-ठाणे महापालिका निवडणूक निकालाच्या विजयी मेळाव्यात पुन्हा भेटू!

  जय हिंद! जय महाराष्ट्र!!

(प्रचंड टाळ्या….)

Previous articleगांधी नावाचे विलोभनीय कोडे
Next articleकेशवराव धोंडगे – ‘मन्याड’चा थकलेला वाघ !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.