गर्दिश में हूं आसमान का तारा हूं, आवारा हूं!

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

*****

काळजीपूर्वक विस्कटून ठेवलेले, बेतरतीब भुरभुरणारे केस, त्यामुळे अधिक दिलक़श झालेलं मुळातलं देखणं रुप, त्यात गुलाबी-गोरा रंग आणि निळे डोळे…! मासूम मुद्रेवर पंचविशीतली ताज़गी, सौम्य-सडसडीत शरीरयष्टी आणि विद्ध करणारी नजर…! ‘आवारा’मधल्या राज काळजीपूर्वक विस्कटून ठेवलेले, बेतरतीब भुरभुरणारे केस, त्यामुळे अधिक दिलक़श झालेलं मुळातलं देखणं रुप, त्यात गुलाबी-गोरा रंग आणि निळे डोळे…! मासूम मुद्रेवर पंचविशीतली ताज़गी, सौम्य-सडसडीत शरीरयष्टी आणि विद्ध करणारी नजर…ची तारीफ़ करताना काय-काय आठवते म्हणून सांगू! पूर्वी कधीकाळी त्याच्या डाव्या गालावर आलेल्या, आणि जन्मभराची खूण मागे सोडून गेलेल्या मुरमाच्या इवल्याशा खड्ड्यावर हळूच बोट फिरवावेसे वाटतं, असं जरी कुणी म्हंटलं ना तरी वावगं वाटत नाही, उलट म्हणणाऱ्याच्या रसिकतेला दादच द्यावीशी वाटते. इतका देखणा आणि ‘केअरफुली केअरलेस’ दिसणारा नट हिंदी सिनेमात अन्य कुणीही झाला नाही, असं आजही काहीजण मानतात.

1951मध्ये जेव्हा ‘आवारा’ आला तेव्हा राज सत्तावीस वर्षांचा होता. चोविसाव्या वर्षीच तो निर्माता-दिग्दर्शक बनला होता. ‘आवारा’ हा त्याच्या बॅनरचा तिसरा सिनेमा. ख़्वाजा अहमद अब्बास आपली ही कथा घेऊन खरं तर मेहबूब खानकडे गेले होते. जज रघुनाथच्या भूमिकेत अशोक कुमार आणि नायकाच्या भूमिकेत दिलीप कुमार अशी पात्रयोजनाही झाली होती. पण कुठे तरी माशी शिंकली आणि केए अब्बास यांनी आपलं चोपडं तिथून उचललं आणि आरके स्टुडियोचा रस्ता धरला. मग राज-रीता ही रोमँटिक जोडी अर्थातच राज-नर्गिसच्या वाट्याला आली. जज रघुनाथ ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पापा पृथ्वीराजना मिळाली आणि राजचे बालपण साकारले गोबऱ्या, गुंदुश्श शशी कपूरने. अशा रीतीने घरातल्या घरात भूमिकांची वाटणी झाली. इतर कलाकारात रडकी लीला चिटणीस आणि कुर्रेबाज केएन सिंग महत्त्वाचे.

माणसाला रक्तातून मिळणारे गुण घडवतात की पालन-पोषणाच्या वेळी मिळणारे गुण घडवतात? Nature? की Nurture? या अत्यंत नाजूक आणि त्या काळात खूप पुढचा विचार असलेल्या सूत्राभोवती ‘आवारा’ची कथा गुंफली गेली होती. जज रघुनाथने दिलेल्या एका निकालामुळे जग्गा नावाचा भुरटा चोर नामचीन गुन्हेगार होतो. तो जजला धडा शिकवण्यासाठी त्याच्या गर्भवती बायकोला पळवतो. ती प्रेग्नंट आहे हे कळल्यावर चार दिवस सन्मानाने स्वतःकडे ठेवतो. आणि परत पोचवून देतो. त्याच्या अंदाजाप्रमाणे, कुटुंबाच्या दबावाखाली येऊन जज रघुनाथ तिला घरातून हाकलून देतो आणि मग जग्गाच तिला आधार देऊन तिच्या मुलाला ‘आवारा’ बनवतो. श्रीमंताघरची मुलगी रीता आईवडिलांच्या अपघातानंतर जज रघुनाथच्या घरात राहात असते. ती राजची बालपणची मैत्रीण आणि तारुण्यातली प्रेमिका. एका रुक्ष आणि तात्विक चर्चेचा विचार हाताळण्यासाठी गुंफलेली ही दिलचस्प आणि मनभावन प्रेमकहाणी! राज-नर्गिसच्या केमिस्ट्रीमुळे ती अधिक बहारदार – अधिक रम्य झाली आहे!

या दोघांचे प्रेम आदम आणि इव्हच्या प्रेमाइतकं नव्हाळनाजूक दिसतं… ताजं…टवटवीत…! खरं तर दोघांनी उण्यापुऱ्या सोळा सिनेमात फक्त एकत्र काम केलं. त्यातूनही ‘जागते रहो’ वगळायलाच लागेल. पण तरी सिनेमाव्यतिरिक्तही राज नर्गिस जेव्हा-जेव्हा समोरासमोर आले तेव्हा-तेव्हा त्यांच्यातल्या गाढ प्रेमाच्या इंद्रधनुषी रंगाने अवकाश भरुन गेलंय! (याहून जास्त माहीत असलं तरी बोलू नये! कारण दोघंही आता हयात नाहीतच, शिवाय सुनील दत्त नावाच्या भल्या आणि प्रेमळ माणसाला मरणोपरांत यातना देण्याचा आपल्याला काय अधिकार?) अशीच अफलातून केमिस्ट्री आपण ‘सिलसिला’तही पाहिली आहेच! या ‘सिलसिल्या’नेही आपल्यातल्या काहींना विकल केलेच आहे!!

 ‘दम भर जो उधर मुँह फेरे’ हे ‘आवारा’मधलं एकच गाणं आपण नीट पाहिलं तरी या गोष्टीची प्रचिती यावी. हे गाणं ‘फक्त गाणं’ म्हणून आठवतच नाही. गाण्याच्या आधीचं बेबंद आणि उन्मुक्त प्रेम ते गाण्याच्या शेवटी महसूस होणारा तृप्तीचा बेहोष शहारा, असा तो पूर्ण प्रवास आहे! दर्दी रसिकाला गुदगुल्या करणारा आणि पापभीरु प्रेक्षकाच्या तोंडाला फेस आणणारा..!! पोहोण्याच्या वेषातली नर्गिस, तिने त्याच्या अंगावर पाणी उडवून त्याला उकसवणे, त्या तशा वेषात त्याने तिला वाळूतून फरफटत नेणे, त्यानंतर एका पडद्याआड तिचे कपडे बदलणे, स्वतःच्या हसीन, चम्पई, उघड्या खांद्यावरुन मागे पाहात धुंद नजरेचे मदनबाण त्याच्यावर सोडणे आणि त्यानंतरचे ते होडीतले गाणे – ‘दम भर जो उधर मुँह फेरे!’ आजच्या सिनेमांच्या तुलनेत हे दृश्य म्हणजे काहीच नाही. पण.. राज कपूरने या दृश्यात आणि नंतर येणाऱ्या त्या गाण्यात तारुण्यसुलभ इश्क़बाजीचे जे टप्पे दाखवलेत, त्याला खरंच तोड नाही.

एखाद्या जिमनास्टच्या चपळतेनं आणि सालसा नर्तकाच्या डौलाने होणाऱ्या नर्गिसच्या हालचाली, तिच्या नजरेतून स्पष्ट कळणाऱ्या नखरा, लाज आणि समर्पण या भावना आणि त्याच्या नजरेतली आदिम लालसा..! हे सारे केवळ ‘आफ़रीन’ म्हणावं असं आहे! ‘हे असेच होते’ किंवा ‘असेच व्हावेसे वाटते’ हे मान्य करण्याचं धाडस मात्र हवं राव! 1951 मध्ये काही लोकांना ते पाहून ‘अबब…’ वाटलं, पण राज कपूर मात्र तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला. गाण्याच्या शेवटी ती धावत होडीच्या एका टोकाला पोचते, तो तिच्या मागे… ती निकराने सांगते, ‘यहां मत आओ, क़श्ती डूब जायेगी…,’ तो मिश्किलपणे विचारतो, ‘तो फिर?’ दोन क्षण जातात.. ती लाजून नजर वळवते आणि म्हणते, ‘क़श्ती को डूब जाने दो!’ बुडून जाऊ दे ही नौका… तू ये!… मर्हबा!! प्रत्येक सिनेमात काही ‘मॅजिक मोमेन्ट्स’ असतात… त्या येतात आणि हुरहूर लावून जातात. पण ‘आवारा’मधली ‘दम भर जो उधर मुँह फेरे’ची पूर्ण सिच्युएशन हीच एक ‘मॅजिक मोमेन्ट’ आहे आणि ती अजूनही अनेकांच्या मनात रेंगाळते आहे.

 पण ‘आवारा’ म्हणजे फक्त प्रणय नाही. ‘आवारा’ म्हणजे राज आणि पृथ्वीराजच्या अभिनयाची जुगलबंदी आहे. दरारा वाटावा असे पृथ्वीराजजींचे व्यक्तिमत्व आणि आवाज. पण राजही अभिनयाची समज आणि लोभस व्यक्तिमत्वासह त्यांच्या तोडीस तोड ठरला. नर्गिस म्हणजे आर.के.ला पडलेलं एक ‘राज’वर्खी स्वप्न होतं! ती काही तिच्या इतर समकालीनांएवढी देखणी नव्हती. पण तिच्यात काहीतरी असं होतं जे बघणाऱ्याला बांधून ठेवायला पुरेसं होतं. तिच्या चेहऱ्यात ‘नमक’ होतं! (लावण्यातही ‘नमक’… ‘लवण’ असतेच ना?) तिच्या आवाजात चाशनी होती! ती लाडात आली की चाशनी टपकणाऱ्या जिलबीसारखं गोल-गोल बोलते.. तिला ‘आवारा’त दिलेल्या पाश्चिमात्य लुकमध्येही ती सहज वावरली. कम्फर्टेबल दिसली. राज कपूर पापाजींना ‘पुरला’… नर्गिस मात्र ‘पुरुन उरली!’ ‘आवारा’ म्हणजे शंकर-जयकिशनची अप्रतिम गाणी…!! उल्लेख केलेल्या दोन गाण्यांव्यतिरिक्त लताने गायलेले ‘आ जाओ तडपते हैं अरमान,’ आणि मुकेशच्या आवाजातलं ‘हम तुमसे मोहब्बत करके सनम’ अप्रतिम! मादाम सिमकी नावाच्या फिरंग बाईंनी डिझाईन केलेलं ‘तेरे बिना आग ये चांदनी’ हे धुक्यातलं गाणं! नवीन प्रयोग होता तो..! त्या काळात हा ‘ड्रीम सिक्वेन्स’ गजबचा गाजला होता. ‘आवारा’ म्हणजे गोड, गोबऱ्या, देखण्या, छोट्या शशीची निर्व्याज आणि सहज आत्मविश्वासाने भरलेली अदाकारीही आहे…! दिग्गजांसमोर पाय रोवून उभं राहायला तो ‘आवारा’तच शिकला असावा!

राज कपूरने ‘आवारा’पासूनच वेगळे आणि संवेदनशील विषय हाताळायला सुरुवात केली. हा पायंडा त्याने त्याच्या ‘हिना’ या शेवटच्या सिनेमापर्यंत पाळला. ‘आवारा’मध्येही त्याने दुर्दैवाने सडकेवर वाढलेल्या, चोरी-लबाडी करणाऱ्या आणि प्रेमात पडल्यावर आपल्या प्रेमिकेसाठी वाईट धंद्यातून बाहेर पडण्यासाठी तडफडणाऱ्या, पण पुन्हा-पुन्हा त्याच चिखलात ढकलल्या जाणाऱ्या तरुणाची व्यथा नेटकेपणाने मांडली. ‘आवारा’ म्हंटल्यावर पटकन आठवते ती ‘आवारा हूँ…’ ही लाईन. पण या सिनेमाची ‘कॅच लाईन’ खरं तर याच गाण्यात पुढे आहे. ‘गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ..आवारा हूँ!’ अगे दुनिये, मी गर्दिशमधे आहे, संकटात आहे, पण आसमानचा तारा आहे!

भरकटलेल्या अवस्थेतही स्वत:च्या ‘असण्या’बद्दलचा दुर्दम्य आत्मविश्वास त्याला प्रेमाने दिलाय! राजूचं ‘गर्दिशमधे असणं’ आणि तरी ‘आसमानचा तारा असणं’ या दोन परस्परविरोधी गोष्टी सिनेमाभर आपल्या मनात थरथरत राहतात! हे लादलेलं भुरटेपण राजने अत्यंत सहजतेनं दाखवलं आहे. शेवटी तो दोन वर्षांसाठी तुरुंगात जातो, त्याची वकील प्रेमिकाही त्याला वाचवू शकत नाही आणि ‘आवारा हूँ’च्या शेवटच्या दोन ओळी विलापिकेसारख्या व्याकूळ वाजतात तेव्हा आपल्या डोक्यातून सगळा प्रणय निघून गेलेला असतो आणि राशिद खानची ‘चारुकेशी’तली ‘पलक न लागी’ ऐकतांना मनाची होणारी तगमग आठवत राहते…! काल पुन्हा एकदा ‘आवारा’ पाहिला तेव्हा अशीच अवस्था झाली…! पलक न लागी…!! डोळ्याला डोळा नाही लागला…! ओठावर हसू खेळवत, विद्ध नजरेनं ‘गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ..आवारा हूँ!’ गाणारा राजू नजरेसमोरुन हलत नव्हता…!!

*******

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

Previous articleचार्वाकांची विचारधारा
Next articleसुखप्राप्तीचा विचार आणि चार्वाक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.