ग़म बढ़े आते हैं…

साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’

-वसुंधरा काशिकर

‘किया है प्यार जिसे…’ या गझलेवरचा लेख अनेकांच्या मनाला फारच भिडला. त्यामुळे पुढची गझल मैत्रीवरच घ्यावी असं वाटलं अन् ही गझल निवडली.

‘द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’ या अतिशय गाजलेल्या कादंबरीचा सुप्रसिद्ध लेखक ऑस्कर वाईल्ड याच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. दिसायला अत्यंत देखणा, इंग्रजी, फ्रेंच,जर्मन या भाषांवर प्रभुत्व असलेला, सौंदर्याचा उपासक आणि प्रचारक, प्रतिभावंत ऑस्कर वाईल्ड हा समलिंगी संबंध ठेवणारा होता. त्या काळात केवळ इंग्लंडमध्येच नाही तर संपूर्ण जगात समलिंगी संबंध ठेवणे हा महाभयंकर गुन्हा आणि पाप मानले जाई. आजही जगात समलिंगी संबंधांना समाज मान्यता नाही. त्या काळात (१८८७) तर कायदेशीर आणि समाज अशा दोन्ही मान्यता नव्हत्या. असे संबंध उघडकीस आले तर शिक्षा होती.

लेखक,पत्रकार,नाटककार म्हणून वाईल्डची ख्याती पसरली. त्याचं देखणेपण, त्याचं चमकदार संवाद कौशल्य, ड्रेसिंग सेन्स, हजरजबाबी बोलणं, बोलता बोलता सहज कोट्या करणं या सर्व गुणांमुळे तो लोकप्रिय न होता तरच नवल. स्त्रियांमध्ये तर तो फारच प्रसिद्ध होता. लंडनमधल्या उच्चभ्रू वर्तुळात तो वावरू लागला.

पण…हा पण प्रतिभावंतांच्या आयुष्यात असतोच असतो..वा येतोच येतो..वाईल्ड समलिंगी आहे हे उघडकीस आलं…त्याची सर्वत्र बदनामी झाली..पत्त्याच्या बंगल्यासारखी त्याची पत कोसळली. त्याची लंडनमध्ये धिंड काढण्यात आली. सर्व जग वाईल्डची छी-थू करत होतं. अवहेलना करत होतं. धिंड काढण्यात आली तेव्हा लोक ऑस्करला हसत होते. रस्त्याच्या शेवटी कडेला ऑस्करचा एक मित्र उभा होता. त्याने सर्व लोकांसमोर त्याच्या डोक्यावरची हॅट काढली आणि ऑस्करला कमरेत झुकून अभिवादन केलं. सर्व जग ज्याच्या विरोधात होतं त्या आपल्या मित्राच्या बाजूने उभं राहण्याची हिंमत आणि जगाचा विरोध पत्करण्याची ताकद त्या मित्राने दाखवली होती. इसके लिए बहुत कलेजा लगता है…!

ऑस्कर वाईल्ड त्यावेळी अगदी असंच म्हणाला असेल…

.ग़म बढ़े आते हैं क़ातिल की निगाहों की तरह
तुम छुपा लो मुझे ऐ दोस्त गुनाहों की तरह…

मारेकऱ्याचे डोळे जसे तो खून करण्यासाठी जवळ येत असताना त्याच्या सोबत अंगावर चालून येत असतात अगदी तसेच ही अनंत दु:ख अंगावर चालून येत आहेत…
माझ्या मित्रा…मला तू स्वत:च्या चुकांना, अपराधांना जसं माणूस जगापासून लपवून ठेवतो तसं लपवून ठेव रे…

सुदर्शन फ़ाकिर यांना या एका शेरसाठी सुद्धा साहित्य अकादमी पुरस्कार दयायला हरकत नाही. माणूस आपल्या स्वत:च्या चुका, अपराध, नेहमीच जगापासून लपवून ठेवतो. लोकांसमोर येऊ देत नाही. त्या अपराधांचा जसा स्वीकार आहे…तसा तू मला स्वीकार… तुम छुपा लो मुझे ए दोस्त गुनाहों की तरह…

मित्र उत्तम स्थितीत असेल तर मैत्री निभवण्याचं काय कौतुक? कसोटी तेव्हा आहे जेव्हा मित्रावर असलं काही संकट येतं. पुरस्कार मिळाल्यावर टाळ्या वाजवणं महत्वाचं आहे पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे मित्र कोणत्या कारणानं जेलमध्ये गेला तर जामीन घ्यायला जाणं..तिथे मैत्रीची खरी कसोटी असते.
मित्राच्या चुकांचा स्वीकार याचा अर्थ त्याच्या चुकांचं समर्थन नसतं…पण हा मित्र आहे, वाईट परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं मैत्रीचं कर्तव्य आहे, ही ती भावना.

असा एखादं नातं आयुष्यात असणं ही काय श्रीमंती. असं नातं तुमच्यासाठी शॉक अँब्सॉर्बरचं काम करतं. क़तील शिफाईंच्या शब्दांत,

के संग (दगड) तुझ पे गिरे, और ज़ख़्म आयें मुझे…असं ते प्रेम असतं.

प्रतिभावंताचं सगळंच कसं विलक्षण…म्हणून फ़ाकिर पुढच्या शेरमध्ये म्हणतात, जसं एखादया शत्रूने विरोधात कारवाया कराव्यात..अगदी तसंच झालंय..माझं स्वत:चं ह्रदय आणि मनच माझं शत्रू झालंय..ते माझ्या ताब्यात नाही, ते माझ्याकडून अशी अशी कृत्य करवून घेतोय त्याने मी स्वत:च्याच नजरेत पडलोय.

कलावंत हे नेहमीच दोन एक्स्ट्रीमवर राहतात. सुप्रसिद्ध लेखक, कथाकार सॉमरसेट मॉमच्या ९० व्या वाढदिवशी त्याच्या एका चाहतीने मोठी पार्टी आयोजित केली होती. शहरातले मोठे उच्चपदस्थ लोक पार्टीला आले. भव्य आयोजन होतं. मॉम पोहोचला. काही वेळाने अचानक जिने पार्टी आयोजित केली होती त्या स्त्रीला म्हणाला, मला तुला आत्ता या क्षणी नग्न बघायचं आहे. ती स्त्री, तीचा नवरा, पार्टीतले सर्व जण अवाक् झाले. नंतर भानावर येऊन मॉम घरी गेला. आणि आपल्या ड्रायव्हरपाशी खूप रडला. रडताना सारखं तो हेच म्हणत होता की, मी असा कसा वागलो.

दिल ही दुश्मन है, मुख़ालिफ़ो के गवाहों की तरह…

शरद जोशींनी मला एकदा फार चिंतन करण्याजोगा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, १० ते ५ एखाद्या सरकारी ऑफिसात काम करणाऱ्या कारकुनाची आणि मैदानावर लढणाऱ्या सैनिकाची नैतिकता एक कशी असू शकेल? हे सत्यच आहे. पण मार्जिन ऑफ एरर लावावी लागेल की नाही? हा ही प्रश्न येतोच.
असो. पण कलांवत वेगळे असतात, त्यांच्यी निर्मितीही विलक्षण, गरजाही वेगळ्या आणि चुकाही विलक्षण…
जीवनाचा अत्यंत खडतर असा प्रवास सुरु आहे. या रणरणत्या उन्हात तुझ्या आठवणींची सावली हाच आधार आहे…बस, तेरी याद कें सायें हैं पनाहों की तरह..
आठवणी…आठवणी…आठवणी…दिलासा देणाऱ्या, कुरवाळणाऱ्या…उबदार आठवणी….

इक सफिना(होडी) है यादगार तेरी
एक समंदर है मेरी तनहाई…

किंवा

तुझे याद कर लूँ तो मिल जाती है हर दर्द से निजात(सुटका)
लोग यूँ ही हंगामा करते की, दवाईयाँ मेहंगी है…

अशा आठवणी…
किंवा कविवर्य, गझलकार सुरेश भट यांच्या शब्दात…

दु:खाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय, तरी ह्रदय मात्र थांबले,
वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली,
अन् माझी पायपीट, डोळ्यातून सांडली….

पायपीट आणि थकवा…डोळ्यातून सांडणाऱ्या आठवणी….

ज्यांच्यासाठी कधीकाळी आम्ही आमच्यावर आरोप ओढवून घेतलेत…ज्यांच्यासाठी आम्ही बदनामी स्वीकारली, इतकं ते आमचे सर्वस्व होते…आता विरोधाभास हा की, तेच आमच्यापुढे न्यायाधीशाच्या भूमिकेत उभे आहेत…
म्हणजे कसं…तर

चलते है वो भी हमसे, तेवर बदल बदलके
जिनको सिखायां हमने चलना सम्भल सम्भल के….

सुदर्शन फ़ाकिर यांची ही गझल. आपल्या ‘द अनफॉरगेटेबल्स’ या अल्बममध्ये जगजीत सिंग यांनी गायलीय. गझलेच्या आशया प्रमाणेच गंभीर आणि काहीसं दु:खी संगीत व चाल जगजीत यांनी दिलीय. एखादया एकटया, विकल, उदास, हताश माणसाची मनस्थिती जशी असेल तसेच भाव जगजीत यांनी गाताना आणलेय..गझल ही शब्दप्रधान गायकी आहे याचं जगजीत यांना चांगलंच भान होतं…

सुदर्शन फ़ाकिर यांच्या शब्दात सांगितल्याप्रमाणे, “तुम छुपा लों मुझे ऐ दोस्त गुनाहों की तरह’’, असं ज्याला म्हणता येईल अशी एखादी व्यक्ती वा मित्र असणं हे भाग्याचंच…पण तो तसा नसेल तर आपण असे कुणासाठी आहोत का हे एकदा विचारून बघावं..ही ही श्रीमंती न्यारी..

फक्त एवढंच होऊ नये, की आपण एखादयावर बेहिशेबी प्रेम करावं, त्याचे सर्व गुन्हे स्वीकारावेत, माफ करावेत, सांत्वना व्हावं…आयुष्याचा आशीर्वाद व्हावं…अन् त्याने आपल्या शुभेच्छांच्या ताकदीचा वापर करुन घ्यावा…त्यांच्यासाठी आपण सदैव उपलब्ध असावं अन् ते आपल्यासाठी त्यांच्या सोयीनुसार, चैनीनुसार उपलब्ध असावेत…त्यांच्यासाठी आपण सर्व व्यवहार पूर्ण करुन झाल्यावर विसाव्याचं, श्रम परिहाराचं आणि उर्जा प्राप्तीचं ठिकाणं असावं…अन् अन् आपल्या नितांत गरजेच्या वेळी त्यांच्या व्यवहारासाठी ते अनुपस्थित असावे…ते आपल्यासाठी एकमेव असावेत आणि आपण त्यांच्यासाठी अनेकातील एक…अशा ऊर्जा शोषक(energy absorber) नात्यांपासून निदान कळल्यानंतर तरी दूर राहा…कारण प्रेम करणाऱ्या माणसाच्या शुभेच्छा आत्यंतिक मौलिक असतात…त्या करंटयांवर उधळू नयेत…

तुम्हाला आयुष्यात असा एक तरी ‘कल्याण’ मित्र मिळावा या शुभेच्छांसह…

ग़म बढ़े आते हैं क़ातिल की निगाहों की तरह
तुम छुपा लो मुझे, ऐ दोस्त, गुनाहों की तरह

अपनी नज़रों में गुनहगार न होते, क्यूँकर
दिल ही दुश्मन हैं मुख़ालिफ़ के गवाहों की तरह

(मुख़ालिफ़ = विरोधी)

हर तरफ़ ज़ीस्त की राहों में कड़ी धूप है दोस्त
बस तेरी याद के साये हैं पनाहों की तरह

[(ज़ीस्त = जीवन), (पनाह = शरण)]

जिनकी ख़ातिर कभी इल्ज़ाम उठाए, ‘फ़ाकिर’
वो भी पेश आए हैं इन्साफ़ के शाहों की तरह

-सुदर्शन फ़ाकिर

(लेखिका वसुंधरा काशिकर या Transform skill enhancers private limited च्या संचालक, स्तंभलेखक, भाषाविषयक सल्लागार  व निवेदिका आहेत)

[email protected]

Previous articleपत्रकाराचीही , चूक ती चूकच !  
Next articleकाळीज पिळवटून टाकणाऱ्या ‘लॉकडाऊन कथा’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. खूप छान गजल…अगदी दिल के पास असलेली. जगजीत सिंग ह्यांची निवड लाजवाब. आयुष्य काय आहे , जीवन म्हणजे काय हे जगजीतसिंग ह्यांनी गायलेल्या गजलेतून कळत जातं.
    गम बढे आते है…..विविध संदर्भ देऊन तुम्ही छान उकल केलीत.
    पुढच्या गजलेच्या प्रतिक्षेत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here