गांधी : एक अंगुळ तरी आकळावा

  • प्रल्हाद मिस्त्री
    ———————————————

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने ‘मीडिया वॉच’ने प्रसिद्ध केलेला विशेषांक अलीकडेच वाचला. नामवंत साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे तीन लेख आहेत. गांधी राजकारणी होते, समाज सुधारक होते आणि मानवाचे अध्यात्मिक उन्नयन करणारे धार्मिक नेतेही होते. असे असूनही गांधींनी काम केलेल्या अनेक क्षेत्रात ते त्यांच्या विरोधकांसाठीच नव्हे तर अनुयायांसाठी देखील गूढच कसे राहिले आहेत हे ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी सांगितले आहे. जीवनात ज्या वाटेने चालायचे ती वाट गांधींना कशी सापडली; त्या वाटेच्या साक्षात्काराचे काही क्षण द्वादशीवार यांनी दुसऱ्या लेखात चितारले आहेत.

गांधीजी काही फर्डे वक्ते नव्हते; मात्र चांगले लेखक होते. आफ्रिकेतील पहिल्याच भेटीतील अनुभवलेला अन्याय त्यांनी भारतात आल्यावर ‘ब्ल्यू बुक’ मध्ये लिहिला. हे बुक जगभरात गेले; त्यानेच सत्याग्रहाला जन्म दिला. जनसंपर्काची आणि संप्रेषणाची त्यांची भाषा कृती हीच होती. गांधींना काँग्रेसचे नेतृत्व मिळेपर्यंत इंग्रजी हीच काँग्रेसच्या अंतर्गत व्यवहाराची, जनसंपर्काची भाषा होती. गांधींनी काँग्रेसच्या अंतर्गत व्यवहाराची भाषा म्हणून हिंदीला स्थान दिले. मात्र देशांतर्गत सर्व व्यवहारासाठी त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनेही बहुभाषिक देश म्हणून मान्यता दिली. संविधानातील भाषांच्या परिशिष्टापर्यंतचे गांधीजींचे भाषांबाबतचे योगदान स्पष्ट केले आहे गणेश देवी यांनी.

गांधींचे सर्व जीवनच एखाद्या पुस्तकासारखे कोणीही उचलावे आणि कोणतेही पान काढून वाचावे असे पारदर्शक असल्याची मांडणी जयदेव डोळे यांनी केली आहे. ज्याला या राष्ट्रपित्याचे पूर्ण नाव देखील माहित नाही (तो मोहनलाल करमचंद गांधी असे म्हणतो) अशी व्यक्ती कोणत्याही संस्थेच्या सर्वोच्चपदी असली तरी तिचा गांधींच्या संबंधात उल्लेख अप्रस्तुत वाटतो.

गांधी आणि कस्तुरबा यांचे संसारिक जीवनातील संबंध उलगडणारे दोन लेख आहेत. एक सुरेश द्वादशीवार यांचा आणि दुसरा अंबरीश मिश्र यांचा. एका सामान्य दाम्पत्याचा संसार देशाच्या संसाराशी कसा जोडला गेला ते आलेख दोन्ही लेखात आले आहेत. तरीही महात्मा गांधींच्या सहजीवनात आणि स्वातंत्र्यलढ्यातही कस्तुरबांचे एक स्वतंत्र पण दुर्लक्षित झालेले अवकाश तुषार गांधी खूप ठळक आणि सुस्पष्टपणे रेखाटतात. त्यांचा कस्तुरबांविषयीचा एखादा लेख या संग्रहात हवा होताच. माननीय तुषार गांधींची कस्तुरबांविषयीची काही व्याख्याने आहेत. त्या व्याख्यानांच्या शब्दांकनाने सुद्धा या अंकात मोठीच मोलाची भर पडली असती.

गांधींचे चातुर्वर्ण्य आणि गांधींचा राम या दोन विषयांवर श्री चंद्रकांत वानखडे यांचे दोन स्वतंत्र लेख आहेत. भारतीय समाजाची चेतना नेहमीच धार्मिक राहिली आहे. कोणतेही खास नामकरण करून उपक्रम हाती न घेता गांधीजी हीच धार्मिक चेतना विशुद्ध करून त्यांना अपेक्षित असा समाज व त्या समाजातील माणूस कसा घडवीत होते त्याचा उलगडा या लेखांमधून होतो. अर्थातच धर्माचा असा वापर करून अशा समाजातील असा माणूस घडवण्यालाच काही झुंडशाही समूहांचा विरोध होता म्हणून त्यांनीच अखेर गांधींचे शरीर संपवले.

स्वातंत्र्यपूर्व राजकारणाच्या गाडीचा टिळक – गांधी हा नेतृत्वाचा सांधा बदलताना महाराष्ट्राच्या राजकारणात जो खडखडाट झाला त्याचे पडसाद सदानंद मोरे यांच्या लेखात स्पष्टपणे व सक्षमपणे उमटले आहेत. परंतु ‘डॉक्टर आंबेडकरांनीही अस्पृश्यांच्या राजकारणाचा सवतासुभा मांडला होता’ हे त्यांच्या लेखातील वाक्य नि:पक्षपातीपणाला छेद देणारे म्हणून खटकतेच खटकते.

लेखकाचा एखाद्या विषयातील व्यासंग किती विस्तृत असू शकतो याची कल्पना ‘गांधीजींना तुकोबा भेटले होते’ हा सचिन परब यांचा लेख वाचून येते. त्यासाठी हा लेख वाचलाच पाहिजे.

‘Gandhi – The Years that Changed the World 1914-1948’ या रामचंद्र गुहांच्या पुस्तकातून घेतलेल्या एका लेखात गांधी हत्येपूर्वी दिल्ली आणि नजीकच्या प्रांतात हिंदू महासभा व रा स्व संघाने हिंदुराष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष विरोधकांसाठी किती विषाक्त वातावरण तयार केले होते त्याचे चित्रण करण्यात आले आहे. त्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांचा लेख आहे. लेखाच्या शीर्षकानुसार गांधींचे तत्त्वज्ञान संघाने कसे स्वीकारले आणि स्वीकारून संघ नेमके काय करतो आहे यासाठी शब्द खर्ची करण्यापेक्षा काँग्रेसचे नेते गांधीविरोधी कसे होते आणि गांधींच्या अनुयायांनीच गांधीजींचे तत्त्वज्ञान गाडले यासाठी मोठी शब्दरचना शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. शिवाय कोणत्याही आरोपातून संघ कसा नामानिराळा आहे त्यासाठी नेहमीचे प्रयत्न केले आहेत.

गांधी-आंबेडकर संबंध नेमकेपणाने श्री. हरी नरके यांनी मोजून मापून वापरलेल्या शब्दात संदर्भांसह स्पष्ट केले आहेत. गांधीहत्या झाली त्यादिवशी बाबासाहेब वामकुक्षी घेऊन सायंकाळी सात वाजता उठले; तेव्हा त्यांना त्यांचे सचिव सोहनलाल शास्त्री यांनी गांधीहत्येची बातमी सांगितली. त्यावर बाबासाहेबांची प्रतिक्रिया सोहनलाल शास्त्रींनी लिहून ठेवली आहे ती अशी, “It’s not good to be too good – अतिचांगुलपणा सुद्धा काही बरा नसतो”. बाबासाहेबांना गांधींविषयी शेवटी काय वाटत होते ते व्यक्त करणारे हे त्यांचे बोल.

बापूंशी एका सामान्य माणसाचा सलगीचा संवाद श्री प्रदीप पाटील यांच्या लेखातून प्रत्ययाला येतो.

गांधी केवळ त्याच्या विरोधकांनाच आडवा येतो असे नाही तर सामान्य माणसालाही दररोज कसा आडवा येतो ते विख्यात पत्रकार संजय आवटे यांनी मांडले आहे. त्यात त्यांनी गांधींचे एक वाक्य उधृत केले आहे, ‘ सामान्य माणसाच्या शहाणपणावर माझा विश्वास आहे ‘. मात्र सामान्य माणसाच्या शहाणपणाचा वापर कसा करून घ्यावा याचेही शहाणपण असावे लागते; ते गांधींकडे होते आणि त्यांनी सामान्य माणसाच्या या शहाणपणाचा सुयोग्य वापर करून घेतला.

गांधी हे लॉरी कॉलीन्स आणि डॉमिनिक लॉपीए या ब्रिटिश लेखकांना वाटते तसे ब्रिटिशांनाच घातलेले एक अनाकलनीय कोडे होते असे नाही तर ते गांधींच्या अनुयायांना, समर्थकांना, विरोधकांना सुद्धा एक कोडे राहिलेले आहेत. संजय आवटे म्हणतात, गांधी जाऊन ७० वर्षे होत आली तरीही हा माणूस अजून पुरता हातात येत नाही. येईलच कसा? गांधीनी कोणतेही तत्त्वज्ञान मांडले नाही; ते तत्त्वज्ञान जगले. त्यामुळे गांधी ही एक व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व न राहता गांधी हा शब्द एक तत्त्वज्ञान झाला आहे. लाखभर ग्रंथ लिहून देखील हे गांधी ‘तत्त्व’ दशांगुळे उरणारच. तरीही ‘मीडिया वॉच’ने हे गांधी नावाचे ‘तत्त्व’ एखादे अंगुळ तरी आकळण्याचा यशस्वी प्रयत्न नक्कीच केला आहे.

गांधी एखादा अंगुळ जरी आकळला तरी खूप मोठे आहे. त्यासाठी हा अंक वाचायलाच हवा.

—————————–

‘मीडिया वॉच’ चा ‘गांधी -१५० विशेषांक
किंमत केवळ १५० रुपये .
आताच बोलवा*
संपर्क – प्रदीप पाटील* *९८६०८३१७७६/९४२१०५५२०६
Amazon.in वरही उपलब्ध

(लेखक गांधी अभ्यासक आहेत)

 

Previous articleआर्टिकल 15..जातीची झापडं चढवून जगणाऱ्यांनी जरूर बघावा असा चित्रपट
Next articleसोहाचे मनस्वी आत्मकथन – दि पेरील्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.