गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे

 

-श्रीकांत तिडके

१९२६ ते १९५६ असा तीस वर्षांचा निरक्षर गाडगेबाबांचा पत्रप्रपंच, सार्वजनिक त्यागाची गीता आहे असेच म्‍हणावे लागेल. बाबांच्या पत्रातून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. त्या मनोहारी पत्रांचा हा वेध

……………………………………………………………………………………………………………….

(एक)

गाडगेबाबांचे निधन झाले त्यावेळी मी वर्षाचा असेन. पण, त्यांचं अस्तित्व आमच्या जगण्याचा भाग होते. त्याला भूतकाली आणि वर्तमानाचे संदर्भ होते. कारण, गाडगेबाबा आणि तिडके सावकार यांच्यातील संघर्ष बाबांच्या जीवन चरित्रातील महत्त्वाचे वळण होते. पूर्णा-पेढी, उमा नदीच्या खोऱ्यातील हजारो एकराची मालकी तिडक्‍यांनी सावकारीतून मिळवली होती. मामाची कष्टाने फुललेली शेती सावकार गिळंकृत करतोय, हे पाहून तरुण डेबुजीने हाती काठी घेऊन प्रतिकार केला. सावकार लवाजम्‍यासह, भाडोत्री गुंडांसह पळून जाताना पंचक्रोशीने पाहिले. सावकारशाहीला सुरुंग लागला. गहाणखते मागण्याची हिंमत बाबांच्या अभयामुळे शोषितांमध्ये निर्माण झाली. पुढे बनाजी, प्रीतमजी तिडके सावकारांनी गाडगेबाबांच्या सामाजिक उपक्रमाला आर्थिक मदत दिली. घट, पाणपोया, सदावर्त स्थापण्याची त्यांना उपरती झाली. याच कुटुंबातील माझे वडील भगवंतराव हिस्लॉपमधून पदवीधर होऊन, वकिली करण्याचा बेत करून आपल्‍या गावी परतले.

भगवंतराव यांनी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग दिलाच, पण त्याचवेळी स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत शिक्षित तरुणीशी घरच्याच्या विरोधात जाऊन आर्यसमाज मंदिरात लग्न केले. १९५०-५२ च्या दरम्‍यान ग्रामीण मुलामुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढण्याचे त्यांनी ठरवले. गाडगेबाबांची भ्रमंती महाराष्ट्रात, देशात चालू असायची. पण, त्यांची पत्नी, मुलगा गोरक्षणाच्या परिसरातील खोपटात, मूर्तिजापूरला राहायचे. त्यामुळे बाबा अधुनमधून यायचे. भगवंतरावाचे शाळा काढण्याचे प्रयत्न त्यांच्या कानावर गेलेत. त्यांना ‘तुम्‍ही येता की, मी येऊ भेटीले?’ असा निरोप बाबांनी धाडला. दीर्घ चर्चा झाली. शाळा काढण्याचे ठरले. शाळेला माझे नाव देऊ नका, असे बाबांनी निक्षून सांगितले. अच्युतराव देशमुख (बाबा ज्‍यांना दादा म्‍हणायचे) व भगवंतराव तिडके (नानासाहेब) यांनी तुमच्या नावामुळे शाळेला वर्गणी मिळेल, असे परोपरीने समजावून सांगितले. बाबा तयार झालेत. बाबा हाती कंदील घेऊन घरापर्यंत सोडायला आलेत. १९५० ते १९५६ म्‍हणजे, गाडगेबाबांच्या निधनापर्यंत सहा वर्षे ते शाळा स्थापण्याच्या व बाबांच्या विधायक कामाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर होते.

या सहा वर्षातील बरीच पत्रे आहेत. निरक्षर गाडगेबाबा पाच-सहा अनुयायांना एकाचवेळी वेगवेगळा मजकूर सांगून विविध संस्थाचालकांशी संवाद साधायचे. एका निरक्षर फकिराने अशी शेकडो पत्रे लिहवून घेतली. त्यातली काही माझ्या संग्रही आहेत. शिवाजींच्या आज्ञापत्रातून त्यांच्या प्रशासकीय कौशल्‍याचे जसे दर्शन घडते, तसे गाडगेबाबा त्यांच्या करुणा, तळमळ व वैराग्‍याच्या विविध रंगानी पत्रातून आपल्‍याला भेटतात. गो. नी. दांडेकर, डॉ. द.ता. भोसले यांनी या पत्रांचे वेगळेपण बाबांच्या चरित्रात अधोरेखित केले आहे. डॉ. उषा वेरुळकर यांनी गाडगेबाबांच्या व्यक्तित्वावर केलेल्‍या पी.एचडी. संशोधनात या पत्रांचे विषयनिहाय वर्गीकरण केले आहे. प्रस्तुत लेखात गाडगेबाबांनी भगवंतराव यांना लिहिलेल्‍या पत्राचा परामर्श घेतोय. पत्रे आणि त्यातील आठवणीचे संदर्भ मी बालवयापासून ऐकत होतो, सहानुभवत होतो.

भगवंतराव नानासाहेब जनपदसभेचे अध्यक्ष होते. राजकारण, सार्वजनिक जीवनात ते अग्रेसर होते. पण, शाळा आणि बाबांच्या प्रबोधनकामात ओढल्‍या गेल्‍यानंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली पूर्णतः! बाबा म्‍हणाले, राजकारण सोडा. बाबांनी पत्रातही लिहिले. राजकारणाकडे त्यांनी कायमची पाठ फिरवली. बाबांच्या पहिल्‍या आग्रहाला त्यांनी मान दिला. अच्युतराव देशमुख यांची कहाणी वेगळीच. त्यांच्या आईने बाबांना माधुकरी देताना विचारले होते, ‘बाबा काय देऊ आणखी?’ बाबा म्‍हणाले, ‘हा पोरगा दे मले!’ आणि उमलत्या वयातले अच्युतराव दादा बाबांजवळ गेले. गृहस्थजीवन आणि बाबांचे काम त्यांनी हयातभर निष्ठेनं केले. नानासाहेबांनी बाबांचा पहिला शब्‍द पाळला. पण दुसरा? गाडगेबाबा म्‍हणाले, ‘तुम्‍ही संसार सोडा. तुमच्या शिक्षणाचा, राजस रूपाचा समाजाला लाभ मिळू द्या सावकारबुवा! मी वठ्ठी मानूस कपडे धुनारा, साधू झालो, नवल काय? तुमी जमीनदार, सावकार, तुमी साधू झाले, तर राजपटाचा त्याग करणाऱ्या बुद्धासारखी कीर्ती होईन तुमची! घर-दार, पोर काई सांगू नका! कावळा-चिमण्या पिलं उडायला लागली की, बाजूला होतात. तुमची बायको हुशार आहे, ते सांभाळीन लेकरायले. तुमच्या समाजाच्या संसारासाठी साधू झाले तर!’ त्यांची वाक्‍ये अशी, ‘जमीनदार, सावकार घरात जन्मूनही तुमाले गरीबाची कीव येते. भांगेतही तुळस उगवते कधी-कधी!’ असं भावरम्‍य नातं होतं बाबांशी त्यांचं.

मी गाडगेबाबा बालमंदिरात शिकत होतो. ते माझी आई चालवायची. भावंडं मोठी होती. ती गाडगेबाबा विद्यालयात शिकायची. गोरक्षणमधील कडब्‍याच्या खोल्‍या जवळील टिनाच्या शेडमध्ये शाळा भरायची. परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर हे बाबांच्या शाळेच्या मॅट्रिकच्या बॅचचे (पहिल्‍या) विद्यार्थी. एका वेगळ्या भावविश्वात आमचे शिक्षण झाले. ज्‍यात गाडगेबाबा सतत दृश्यादृश्य रूपात भेटायचे. गाडगेबाबांच्या व्यक्तित्वाची ही पहिली प्रिंट माझ्या मनोभूमीत पारंब्‍यांसारखी रुतली आहे.

(दोन)

बालपणी गाडगेबाबा मला त्यांच्या मुलीच्या रूपाने भेटायचे. आलोकाबाई शाळा-गोरक्षणाच्या प्रांगणातल्‍या खोलीत आपल्‍या कुटुंबासमवेत राहायच्या. बाबांची ही कन्या बहुदा दर शुक्रवारी आमच्या घरी माधुकरी मागायला यायची. परसदारी वाढलेले अन्न जवळच्या कापडावर घेऊन झाडाखाली बसून खायची. नळाचे पाणी पिऊन निघून जायची. माझ्या बालसुलभ मनाला प्रश्न पडायचा. आपण गाडगे बाबांच्या शाळेत शिकतो आणि त्यांच्या मुलीला भीक वाढतो? आई म्‍हणायची, मोठा झाला की, कळेल तुला!

बाबांनी आलोकाबाईंना पाठविलेली पत्रे वाचताना रडायला येते. फार पूर्वी ‘बाबांच्या व आलोकाबाईच्या संबंधातील ताण व्यक्त करणारा’ ‘संन्याशाचा संसार’ हा माझा लेख दहावीच्या दुय्यम मराठी अभ्यासक्रमासाठी अभ्यासमंडळाने निवडला. बाबांचे वैराग्‍य व मुलीला ‘आपला काही हक्क नाही या लोकायच्या संस्था आहेत, इथं राहू नका’ हे बाबांचे विश्वस्त अंतःकरण समजायला, ही मूल्‍ये पहिल्‍यांदा शिक्षकाला कळायला पाहिजेत ना? हा धडा कठीण आहे, असा आक्षेप येऊन दोन वर्षांनी तो वगळण्यात आला. धडा कठीण होता की त्यातला जीवनादर्श कठीण? चंगळवादी समाजाला तो समजणेच कठीण होते. हिंदी माध्यमाच्या गाडगेबाबांवरील व्यक्तिलेखात त्यांनी खूप संस्था व त्यामार्फत पैसा जमवला असे विधान करणाऱ्या पाठाबद्दल सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. गाडगेबाबांचे धगधगीत वैराग्‍य न समजणाऱ्या आपल्‍या समाजाला इतका फकिरी वृत्तीचा माणूस असू शकतो काय? असेच उद्या वाटेल.

पंडित जवाहरलाल नेहरूंचे ‘इंदिरेस पत्रे’ वाचून एका संपन्न अशा वारशाने आपण दीपून जातो. गाडगेबाबांचे आलोकाबाईला लिहिलेली पत्रे पराकोटीच्या वैराग्‍याचे प्रतिध्वनी आहेत. मूल्‍यशिक्षणासाठी यापेक्षा अधिक सुंदर वस्तुपाठ कोणता असू शकतो? बाबांची एकच मुलगी आलोका जगली. गोविंदा नावाचा मुलगा कुत्रा चावून मेला. बातमी आली तेव्‍हा बाबा कीर्तन करीत होते. ते म्‍हणाले, ‘ऐसे गेले कोट्यानुकोटी काय रडू मी एकासाठी!’ आलोकाबाई मूर्तिजापूरच्या गोरक्षणातल्‍या एका खोलीत राहायला आली. बाबांना हे कळले. मरणाच्या एक वर्ष आधी यासंदर्भात त्यांनी अच्युतराव देशमुख यांना पत्र पाठवून सार्वजनिक संस्थेच्या कारभारात माझ्या कुटुंबीयांना प्रवेश देऊ नका, असे निक्षून सांगितले व आलोकाबाईंना वारंवार पत्रे पाठवून ताकीद दिली. त्या पत्रातली काही वाक्‍ये वानगीदाखल. सौ. आलोकाबाई, श्री. गाडगेबाबांचा अनंत कोटी नमस्कार. पत्रास कारण की, गोरक्षणातून लवकर बाहेर पडाल, तर फार बरे होईल. तुला पैशाचे पक्के भूत लागले. कमी नाही. तू मेल्‍याशिवाय ते भूत निघणार नाही…. ज्‍या माणसाला पैशाचे भूत लागले, तो पोटाला कमी खात असतो. तो स्वतःही काही खात नाही, तर दुसऱ्याला काय घालणार? मी नसतो तर ट्रस्टीने तुमच्यावर खटला भरून पोलिसाच्या ताब्यात  दिले असते… बाबाची मुलगी म्‍हणून यापुढे कोणाला काही मागू नये व देणाऱ्याने देऊ नये. असा सर्व जनतेला निरोप आहे.

गाडगेबाबांच्या मृत्युपत्रात त्यांनी स्पष्ट म्‍हटले आहे. मी कोणाचा गुरु नाही. माझा कोणी शिष्य नाही… हा जनतेचा ट्रस्ट आहे. माझा, माझ्या कुटुंबियाच्या मालकीचा प्रश्नच नाही….. सार्वजनिक जीवनात पिढ्यान्‌पिढ्यांची सोय करणारेच सर्वत्र दिसतात. ‘ट्रस्टीशिप’चा आदर्श गाडगेबाबांनी स्वतःच्या आचरणाने निर्माण केला. आयुष्यातला शेवटचा श्वास नागरवाडीत घ्यावा, असे वाटत होते. त्यानुसार त्यांची गाडी तिकडे जाण्यासाठी निघाली. बाबा आपल्‍या पत्नी, सखुबाईला म्‍हणाले, ‘तुम्‍ही उतरा… आम्ही जिथं चाललो तिथं एकट्यालेच जा लागते…’ वैराग्‍य आणि अपरिग्रहाचं असं अनोखं रूप बाबांच्या रूपाने प्रगटले. गुरु, गुरुदक्षिणा, शिष्यसंप्रदाय याबाबत त्यांनी केवळ पत्राद्वारे, कीर्तनाद्वारेच विरोध केला असे नाही. तर, त्यांच्याबाबत स्तुती करणाऱ्या वृत्तपत्रीय मजकुरालाही त्यांनी विरोध केला. दैनिक लोकशक्तीत अनंतराव गद्रे यांनी बाबांच्या त्यागाबाबत लिहिले. त्यासंबंधी ते म्‍हणतात, आपण जेवढ्या वर्तमानपत्रात लिहिले तेवढ्याही वर्तमानपत्रात आम्‍ही दिलेला सोबतचा खुलासा प्रसिद्ध करावा. आपली महान चूक दुरुस्त करावी. ‘मला कुणी शिष्य नाही व मी कुणाचा गुरु नाही’ असे सांगत असतो. गेल्‍या  वर्षांपासून आजपर्यंत कोणाला अंगारा दिला नाही. कोणाला पाया पडू देत नाही. चुकून कोणी पाया पडले, तर माझ्या जिवाला दुःख होते…..’ या जाहीर खुलाशातून, गुरु-शिष्याचे स्तोम बाबांना पटत नव्‍हते. शिष्य करणे, त्याला आशीर्वाद देणे, हातात खराटा देणे, आपला वेगळा संप्रदाय निर्माण करणे बाबांना मान्य नव्‍हते. या खुलाशातले एक वाक्‍य खूपच मार्मिक आहे. जनतेसमोर लोभ व त्यागी लपत नाही. जाहिरातीची गरज नाही. बाबांचे कौटुंबिक जीवन त्याबाबतची निरासक्त वृत्ती यांचे दर्शन घडविणारी पत्रे आजही पुराव्यादाखल उपलब्‍ध आहेत. यासंदर्भातील त्यांची पत्रे वैराग्‍यावरील हजार पानांचा सार वस्तुनिष्ठपणे प्रतिपादित करतात, इतकी ती मनोहारी आहेत.

(तीन)

वैराग्‍याचं मूर्तिमंत प्रतिक असलेल्‍या गाडगेबाबांसंबंधी शिवा इंगोले या कवीने अतिशय सुंदर कविता लिहिली आहे.

बोधाचा चिन्मय मेघ

दुरिताला उन्मय माया

चिंध्यांनी विभूषित केली

त्यागाची त्रिभुवन काया

वृत्ती, प्रवृत्ती, वैखरी, वाणी आणि लेखणीतून प्रगटलेली त्यांची निरासक्त जीवनशैली चित्रवत्‌ डोळ्यासमोर उभी राहते.

उपभोग आणि आसक्तीसंबंधी निरीच्‍छ असणारे गाडगेबाबा सार्वजनिक संस्थेचे प्रशासक म्‍हणून अतिशय दक्ष होते. यासंबंधीही त्यांची पत्रे अतिशय उद्‌बोधक आहेत. रामदासस्वामींच्या दासबोधाचे स्मरण व्‍हावे, इतकी अवधान जागृत करणारी आहेत.

संस्थेचा ट्रस्टी कसा असावा? धर्मशाळेचे बांधकाम कसे करावे? लोकांहाती ‘सार्वजनिक वास्तू’ कशी उभी करावी? विनयाने दात्यांची मने जिंकून त्यांचा पैसा गरजू माणसाकडे कसा वळवावा? असे  कितीतरी ‘प्रशासन-मंत्र’ त्यांनी सांगितले आहेत. साधारणपणे १९२६ ते १९५६ असा तीस वर्षांचा निरक्षर माणसाचा पत्रप्रपंच, ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्‍हणावे लागेल. बाबांच्या पत्रातून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कुठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्‍य त्यांच्याजवळ होते. त्यांनी जागोजागी लोकोपयोगी संस्था, घाट, धर्मशाळा ट्रस्टींच्या हवाली करूनही तेथला व्यवहार वाऱ्यावर सोडला नाही. कोणत्याही धर्मशाळेत गेल्‍यावर त्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या निधनानंतर स्थापन झालेल्‍या दादर, के.ई.एम. परिसरातील धर्मशाळेतही येतो. स्वच्‍छता, व्यवहार, कुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ त्यांच्या पत्रातून वाचकासमोर उभा होतो. महानुभाव पंथाचे चक्रधरस्वामी यांनी ‘उत्तरापंथे’ गमन केल्‍यानंतर त्यांचा शिष्यपरिवार शोकाकूळ झाला. त्यातील म्‍हाइमभटाने चक्रधरांच्या आठवणी गोळा करून लीळाचरित्र साकार केले. तसेच सामर्थ्य त्यांच्या या पत्रातून प्रकटणाऱ्या सृष्टीत आहे.

गाडगेबाबा विद्यालयासाठी भगवंतराव, नानासाहेबांनी मूर्तिजापुरातील एका जागेसाठी आग्रह धरला. ती जागा केंद्र शासनाच्या ‘मिलिटरी विभागाची’ होती. पण, बाबासाठी डॉ. पंजाबराव देशमुखांनी आपली प्रतिष्ठा पणास लावून ती जागा मिळवून दिली. यासंदर्भात पंजाबरावांनी व नंतर गाडगेबाबांनी त्यांना लिहिलेली पत्रे माझ्या संग्रही आहेत. पंजाबरावांनी जागेसंबंधीचा प्रस्ताव स्वतः गाडगेबाबांनी दिल्‍याचे लिहिले आहे. स्वतःच्या हस्तक्षरात! याच संदर्भात १.९.१९५५ च्या पत्रात गाडगेबाबा म्‍हणतात,‘आपण लिहिले की, मिलिटरी व राजकीय खात्याकडून कागद आले नाहीत. ७-८ दिवसात येतील. श्री. बियाणी अर्थमंत्री व श्री. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भेटलो. ७-८ दिवसात काम झाले नाही, तर मला पुन्हा तिकडे यावे लागेल….. आपण लिहिले ते सर्व योग्‍य आहे. मात्र, संस्थेचे आजपासून मला पत्र घालू नका. सर्व देखरेख गोरक्षण धर्मशाळा वगैरे लक्षात घ्या. पाच किंवा सातजण ट्रस्टी व्‍हा.’

कर्मवीर भाऊ पाटील, पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज , गाडगेबाबा परस्परांच्या कामाना मदत करून प्रबोधनाचे काम पुढे नेत होते, याचे पुरावे मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शृंखलेची सशक्त कडी होते. हे पत्रातून व बाबांच्या कीर्तनातून लक्षात येते. महाराष्ट्र निर्मितीमागील हा ‘प्रबोधन काळ’ सुवर्णदशक होते, हे इतिहास वाचण्यातून जाणवते.

धनिकांच्या धनाचा ओघ त्यांनी गरीब व कष्टकरी समाजाच्या उत्थानासाठी कौशल्‍यपूर्वक वापरला. २.१२.१९३५ च्या पत्रात गाडगेबाबा अच्युतराव देशमुख यांना लिहितात, ‘घाटात ज्‍याचे त्याचे संगमरवरी दगड लावा. ज्‍यांनी जमीन दिली त्याला ट्रस्टमध्ये घ्या.’ करुणा आणि दातृत्वाला भावनिक आवाहन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते. ते त्यांनी लिहून घेतलेल्‍या पत्रातून प्रगटते, हे विशेष. तहानलेल्‍याला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी ग्रीष्म ऋतूत ‘पाणेरी’ काढण्यावर त्यांचा भर असे. पत्रात ते म्‍हणतात, ‘ पाणेरीला सावलीची अडचण असेल तर चार-दोन तट्टे टाकून वाढवा. स्वच्‍छ एवढी ठेवा की, एकही खडा न सापडला पाहिजे. खेड्या भागात खाली जागेवर चौरस्त्यावर सडा टाकीत असावे, चौरस तुकडा त्याला सारवून घेत असावे. बंगलोरी कौलाच्या फुटक्‍या तुकड्यांच्या लाईन मारा. दर शुक्रवारी आंब्‍याच्या डाखळ्या लावा. चार-दोन पताका लावा. वर्गणी सुरू ठेवा.’ बाबा स्वच्‍छतेचे फार भोक्ते होते. वेळोवेळी आपल्‍या सहकाऱ्यांना ते स्वच्‍छतेचे मार्गदर्शन करीत.

निसर्ग हाच माणसाचा गुरु आहे. पंचमहाभूतांच्या सान्निध्यात वाईट विचारांचे विरेचन होते, या जाणिवेतून मूर्तिपूजेला विरोध करणाऱ्या गाडगेबाबांनी धर्मशाळेत व आपल्‍या सर्व संस्थांमध्ये वृक्षारोपण व जतनावर भर दिलेला दिसतो. एका पत्रात ते लिहितात, ‘वड, पिंपळ, चिंच, निंब अशा सुंदर कलमा जगविण्यास सांगा. सहा किंवा आठ फूट लांब व पाच ते सहा इंच जाड अशा फांद्या पैदा करून लावा. झाडांची चांगली सेवा केली, तर तिसरे वर्षी सुंदर झाड तयार होते… वडाच्या डांगा सहा फूट वेगळ्या, तर सात फूट वेगळ्या, अशा वेगवेगळ्या लावा. काही पिंपळाची, तर काही लिंबाची झाडे लावा…’, हे बाबांचे वृक्षज्ञान शासकीय नर्सरीवाल्‍यांना सांगण्याची गरज आहे.

देवाच्या नावाने पशुमात्राची होणारी हिंसा रोखण्यासाठी गाडगेाबबांनी प्रखर विरोध केला. कीर्तने केली. माढाळ (सातारा) इथे तर बळीच्या वेदीवर गाडगेबाबा स्वतः गेले. हिंसा करणारे विचलित झालेत, पण हत्या थांबली नाही. गाडगेबाबांनी अशा प्रथांना त्याकाळी सतत विरोध केला. ‘समाजमन’ बदलले पाहिजे म्‍हणून सतत अशा ठिकाणी बारीक लक्ष ठेवले. ८.४.१९५३  ला उपराईच्या श्री. कुर्मी यांना लिहिलेल्‍या पत्रात गाडगेबाबा म्‍हणतात, ‘उप्राईला पूर्वी यात्रेला भर होता तेव्‍हा किती हिंसा होत होती व ती हिंसा कधी बंद झाली? आता कमीत कमी किती हिंसा होते, ही माहिती सविस्तर खालील पत्त्यावर कळविणे.’ कुप्रथेला केवळ विरोध नाही, तर समूळ नष्ट करण्यासाठी सजग नागरिकांनी सतत लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी ‘समाजहितैषी दबावगट’ असाचा असा त्यांच्या दृष्टिकोन पत्रातून स्पष्ट होतो.

(चार)

निरक्षर गाडगेबाबांनी शिक्षण प्रसाराचे, प्रबोधनाचे रान आपल्‍या कीर्तनातून पेटवले. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘कार्यचित्र’ ते आपल्‍या रांगड्या वैखरीने उभे करायचे. आपल्‍या चिंध्याच्या पोषाखाबरोबर असलेली झोळी पुढे करून त्यांनी गरजू माणसासाठी समाजाच्या दातृत्वाला वारंवार आवाहन केले. समाजाच्या दानातून विधायक संस्था निर्मिती केली.

अन्खापर झोळी मधले

वाटले दान अविनाशी

कारुण समर्पित् केले

पुण्याच्या पडल्‍या राशी….

माझे वडील गाडगेबाबांबरोबर बराच काळ कार्यरत होते. वयाच्या ९२ व्या वर्षी ते निधन पावलेत. बाबांच्या निधनानंतर बाबांना दिलेला शब्‍द त्यांनी पाळला. त्यांच्या संस्था सांभाळल्‍यात, वेळोवेळी आर्थिक साह्य केले. सर्व अनुकूलता असूनही त्यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले. आई राजकारणात होती. आमदार झाली, राजकीय पदे तिला मिळाली. पण, बाबांना दिलेल्‍या वचनामुळे भगवंतराव कधी राजकारणात शिरले नाहीत. कोणत्या व्यासपीठावर अधिकारी म्‍हणून विराजमान झाले नाहीत. आईच्या निधनानंतर जवळपास 35 वर्षे त्यांनी बाबांच्या संस्था सांभाळण्याशिवाय काही केले नाही. शेवटल्‍या काही वर्षांत त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता. त्यात ते म्‍हणायचे, ‘मी साधू झालो नाही….. बाबा तुमचे नाही ऐकले!’ सावकार, जमीनदार घरात जन्मलेल्‍या भगवंतरावांनी निधनापूर्वी आग्रहाने नागरवाडीला मुक्काम केला. ते म्‍हणायचे, ‘गाडगेबाबा इथेच विश्रांती घेत आहेत.’ तिडक्‍यांना काठीने बदडून काढणाऱ्या गाडगेबाबांच्या व्यक्तित्वाच्या संमोहनातून ते कधी बाहेरच आले नाहीत….. ‘मंत्रावेगळे’ झाले नाहीत. कारण बाबांचा सहवास, आठवणी, पत्रे त्यांच्या बिछान्याजवळच्या आलमारीत होती…. तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांची ती ‘पत्रपोथी’ वाचताना माझे डोळे आजही पाणवतात.

(लेखक नामवंत समीक्षक व वक्ते आहेत)

८४२१४१९९८०

Previous articleहलत्या चित्रांचा ग्लोकल मीडिया
Next articleकालबाह्य व्हायचे नसेल, तर विचारधारांना बदलावे लागेल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.