गोष्टी सांगण्याचं कौशल्य

-प्रा. कृष्ण कुमार

मुलांना गोष्ट सांगणं हे खरोखर एक महत्वाचं कौशल्य आहे. गोष्टी सांगण्यात काय बारकावे आहेत ते जरा पाहू.

आपल्याकडच्या प्राथमिक शाळांमध्ये दररोज गोष्ट सांगायचा वेगळा तास नसतो हे खरंतर खेदजनक आहे. अशी पध्दत जर अस्तित्वात असती तर मुलांना शाळेत अडकवून ठेवायची समस्या काही प्रमाणात तरी कमी झाली असती. अनेक जणांना वाटेल, मी ही समस्या किती सखोल आहे तिकडे दुर्लक्ष करतो आहे. माझी सूचना ऐकून अनेक अधिकारी व्यक्तींच्या ओठांवर एक उपरोधिक हसू सुध्दा उमटेल अशीही खूप शक्यता आहे. त्यांचा कामाचा अफाट अनुभव आणि व्यवस्थापनाबद्दलचं ज्ञान यातून त्यांच्या मनातून ही गोष्ट निसटली असावी, जी एकेकाळी त्यांच्या मनावर उमटलेली होती, की गोष्ट सांगण्यामुळे मुलांच्या मनावर जादूसारखा अद्भुत परिणाम होतो.

हेही तितकंच खेदजनक आहे की आपल्याकडे शिक्षकांना शिकवणाऱ्या संस्थांमध्येदेखील गोष्टी सांगणं हे गंभीरपणे घेतलं जात नाही, तरी काहीजण पाठ्यक्रमात गोष्टी सांगण्याचं महत्व नमूद करतात.
मी अशा एका दिवसाची कल्पना करतो, जेव्हा लहान मुलांना शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला तीस पारंपारिक कथा मुखोद्गत असतील. त्यांच्या या कौशल्यामुळे ते मुलांना या गोष्टी सहजी आणि आत्मविश्वासानं रंगवून सांगू शकतील. हजारो गोष्टींचा खजिना असलेल्या समाजात हा काही फार करामतीचा प्रकार नव्हे. अशा तीस कथा, ज्या शिक्षक उत्तम रीतीनं सांगू शकतील, त्यातून प्राथमिक शाळेच्या पहिल्या दोन वर्षांमधलं वातावरणच बदलून जाईल. कथा सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे जाणून रोजच्या पाठ्यक्रमात त्याला आदराचं स्थान द्यायला हवं ही यामागची एकमेव अट आहे.

या गोष्टी कुठून आणायच्या?

पुढे जाण्याआधी मागच्या परिच्छेदात वापरलेल्या एका विशेषणाबद्दल मी जरा स्पष्टीकरण देतो. मी पारंपारिक गोष्टी सांगण्याबाबत अनुकूल आहे असं मी लिहिलं आहे. तरुण शिक्षकांना गोष्टी सांगण्याबद्दल शिकवत असताना माझा अनुभव असा आहे, मुलांना सांगायला गोष्टी निवडा असं सांगितलं तर ते बऱ्याचवेळा लहान मुलांच्या मासिकातल्या कथा धुंडाळतात. काही जण कॉमिक कथा शोधतात आणि इतरजण लांबलचक विनोद किंवा प्रत्यक्ष आयुष्यात घडलेले किस्से घेऊन येतात. अशा प्रकारचं साहित्य देखील कथा अशा प्रकारात बसू शकतं हे खरं आहे पण अशा प्रकारची प्रत्येक कथा सहा किंवा सात वर्षांच्या, प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांवर जादुई परिणाम घडवून आणेल अशी आशा आपण बाळगू शकत नाही.

वारसा घेऊन आलेल्या पारंपारिक गोष्टींमध्ये जी वैशिष्ट्यं असतात ती समकालीन गोष्टींमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारे माध्यमांमध्ये येणाऱ्या कथांमध्ये असतीलच असं नाही. आपण त्या वैशिष्ट्यांबद्दल लवकरच चर्चा करणार आहोत. पण आधी मला पारंपारिक गोष्टींचे काही स्त्रोत नमूद करायचे आहेत. प्रथम पंचतंत्र, जातक, महाभारत, सहस्त्र रजनी चरित्र, विक्रमादित्याच्या कथा आणि विविध प्रांतातल्या लोककथा हे साधे आणि समृध्द अशा वर्गवारीत मोडणारे स्त्रोत आहेत. यानंतर आपण कथा सरिता सागर, गुलिस्तान आणि बोस्तान आणि जगभरातल्या लोककथा यांची यात भर घालू शकतो. हे सगळे स्त्रोत एका ठिकाणी सहजी उपलब्ध नाहीत. म्हणजे जर एखाद्यानं पाठ्यक्रमात गोष्टी सांगणं अंतर्भूत करायचं ठरवलं तर या सगळ्या स्त्रोतांमधून एकत्र केलेल्या गोष्टींचा संग्रह तयार करावा लागेल.

कोणती गोष्ट सांगण्याजोगी बहुमोल असते.

एका चांगल्या गोष्टीचं वैशिष्ट्य काय हे शोधायचा साधा मार्ग म्हणजे मुलं पिढ्यानपिढ्या ती गोष्ट किती तन्मयतेनं आणि आनंदानं ऐकत आहेत हे अभ्यासणं. सिंह आणि ससा यांची पंचतंत्रातली कथा हे असं एक उदाहरण आहे. आपण ती गोष्ट जाणतो पण त्याची मध्यवर्ती संकल्पना सहजसोपी नाही. आपण या गोष्टीतल्या खुमासदार गोष्टी आधी का जाणून घेऊ नयेत बरं?

या कथेत एक दिवस असा येतो जेव्हा लहानग्या सशाला म्हाताऱ्या सिंहासमोर उभं रहायचं असतं. ससा सिंहाच्या दारात जायला खूप उशीर करतो त्यामुळे सिंह भुकेनं खवळतो. खरं तर सिंह खूप रागात असल्यामुळे त्या अवघड क्षणांमध्ये त्याच्याबरोबर कोणतीच तडजोडीची भाषा शक्य नसते, तरीही तो ससा त्यावेळी अनपेक्षितपणे आपल्याला इतका वेळ का लागला हे सांगणं घुसडतो. वाटेत दुसरा सिंह भेटला वगैरे सगळ्या थापा असतात, पण भुकेलेल्या आणि खवळलेल्या सिंहाच्या शाही मस्तकात ते म्हणणं घुसतं. आता त्याला प्रतिस्पर्ध्याला आधी निपटायचं असतं त्यामुळे तो सशाबरोबर विहिरीकडे निघतो, जिथे दुसरा सिंह रहातो असं त्याला सांगितलेलं असतं. या नाजुक क्षणी, आपला कपटीपणा आणि सिंहाचा मूर्ख मत्सरीपणा आणि संतापीपणा, जो दुसऱ्या कोणी नसून स्वत: सशानंच निर्माण केलेला असतो, या सगळ्यावर भरवसा ठेवून ससा पुढे होतो. आपल्या विहीरीतल्या प्रतिबिंबाला दुसरा सिंह समजण्याची चूक करुन, सिंहाचा राग अनावर होतो आणि तो मृत्यूकडे झेपावतो.

या जुन्या, ओळखीच्या गोष्टीकडे आपण परत एकदा बारकाईनं पाहू. सर्वप्रथम, या कथेत कोणताही उपदेश नाही. याउलट, ही गोष्ट थेटपणे, मृत्यूचा धोका समोर दिसत असताना, सैतानी शक्ती समोर असताना स्वत:चं रक्षण कसं करायचं अशा गंभीर प्रश्नाला हात घालते. आपण मुलांशी बोलत असताना सहसा असे प्रश्न उपस्थित करत नाही, पण हे उघड आहे की मुलांना अशा प्रश्नात खूप रस असतो. या रस असण्यामागे काय कारण आहे असं तुम्ही विचारु शकता, पण हा प्रश्न मी जरा नंतर चर्चेला घेतो. या क्षणी मला दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे. ही एका चिमुकल्या प्राण्याची कथा आहे, जो एका बलाढ्य प्राण्यानं उभ्या केलेल्या समस्येशी लढतो आहे. या त्रासातून बाजेर येण्यासाठी, तो चिमुकला प्राणी एक युक्ती वापरतो, जी आपण सहसा अनैतिक मानतो.
ही युक्ती वापरुन, ससा व्यक्तिमत्वातल्या काही पैलूंची चुणूक दाखवतो. हे पैलू आहेत धैर्य, संकटसमयी दिसणारा आत्मविश्वास, एका अवघड परिस्थितीला शेवटच्या क्षणापर्यंत शांतपणे सामोरं जाणं आणि आपल्यापेक्षा वयानं आणि सामर्थ्यानं मोठ्या असणाऱ्यासमोर योग्य प्रकारे वागणं.

आपण हेही लक्षात घ्यायला हवं, कथा किती झपाट्यानं पुढे जाते. सुरुवातीला, एक विचित्र प्रथा तयार केली जाते, ज्यानुसार दररोज एक प्राणी स्वेच्छेनं वृध्द राजाचं भक्ष्य होणार असतो. लवरकच, लहानग्या सशाची पाळी येते आणि कथेची मध्यवर्ती संकल्पना उघड होते. नंतरच्या घटना वेगानं घडतात, जणु सशानं स्वत:ला वाचवायची एक भयंकर योजना आखल्यावर एक क्षणही त्याला वाया घालवायचा नसतो. ही गोष्ट ऐकणारा एका परिस्थितीतून दुसरीकडे संवादामार्फत ढकलला जातो. सशाच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पहाण्याशिवाय श्रोत्याला पर्यायच उरत नाही. हे छोटंसं विश्लेषण देखील लहान मुलांमध्ये ही गोष्ट अफाट लोकप्रिय का झाली, यामागची कारणं शोधायला पुरेसं आहे. सर्वप्रथम, ही गोष्ट मुलांना एक व्यक्तिरेखा देते, एक नायक देते, ज्याबरोबर ते स्वत:ला पूर्णपणे कल्पू शकतात. ही व्यक्तिरेखा म्हणजे ससा. या गोष्टीतली त्याची व्यक्तिरेखा ज्या संकटांना आणि त्रासांना सामोरं जाते त्यांनाच मुलं दररोजच्या आयुष्यात सामोरी जातात. तो लहानसा आणि हातात कोणतीच सत्ता नसलेला असा आहे, त्याला जे करायचं नाही तेच त्याला करावं लागतं आहे, सर्वसत्ताधारी आणि शारीरिक बळानं युक्त अशा एका प्राण्याकडून मारलं जाण्याची त्याला भीती वाटते आहे. ससा ज्या परिस्थितीत आहे तशी परिस्थिती मुलांच्या आयुष्यात रोज येत असते. आपण पालकांची आणि शिक्षकांची भूमिका बजावण्यात मग्न असल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा ते लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, लहान असताना, अचानक येणाऱ्या मृत्यूची भीती हा चिंतेचा सर्वात मोठा उगम असतो हे आपल्यापैकी खूप कमीजणांना ठाऊक आहे. एका महाकाय आणि बलवान माणसासमोर यायला घाबरणं हे तशाच प्रकारची चिंता निर्माण करतं.

ही गोष्ट सुरु झाल्याबरोब्बर मुलांचं लक्ष वेधून घेते कारण मुलं स्वत:ला त्या गोष्टीत पहायला लागतात. त्यांचं वेधून घेतलेलं लक्ष नंतरच्या घटनांमुळे तिथेच खिळून रहातं. तो लहानगा ससा एक क्लृप्ती निवडतो आणि ती यशस्वीपणे वापरुन दाखवतो. त्यात फक्त त्याला यश मिळतं इतकंच नव्हे, तर समस्या सगळ्यांसाठी कायमची सुटते. लहान मुलांना असे उपाय आवडतात. सशाची क्लृप्ती आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे मुलांमध्ये असलेलं एक निरागस सुप्त आकर्षण – सबब सांगण्याचं आकर्षण. अजून एक आकर्षण म्हणजे सशानं उशीर झाल्याबद्दल – स्वत:चं आयुष्य वाचवण्याचा हेतू, इतकंच नव्हे तर सिंहाला मारण्याचा हेतू – ही सांगितलेली सबब. खरं तर, सशाचं द्वंद्व खूप गुंतागुंतीचं आहे कारण तो अन्यायाला (सिंहाला) मारल्याशिवाय स्वत:चा जीव वाचवूच शकत नसतो. तसंच, ही गोष्ट स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी – धैर्यानं विनाश करणं – या प्रकाराचा वापर करणं आपल्यासमोर मांडते. जर त्यात काही नैतिकता असेल, तर ती “स्व”रक्षण करण्याची नैतिकता आहे. आपण ही गोष्ट तेव्हाच नीट पाहू शकतो जेव्हा आपण या कथेकडे लहान मुलाच्या दृष्टिकोनातून पाहू शकू. आपण जर ही गोष्ट मोठ्या माणसांच्या दृष्टिकोनातून पहाण्याचा अट्टाहास केला, तर आपण ही अनैतिक गोष्ट असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू – प्रत्यक्षात ते तसंच आहे.

याची काय गरज आहे?

आत्तापर्यंत हे स्पष्ट झालं असेल, लहान मुलांसाठी चांगली गोष्ट ऐकणं याचा नैतिकता किंवा नीतीमत्तेला धरुन याच्याशी काही संबंध नसतो, निदान थेट तरी नसतो. सखोल विचार करता, ससा आणि सिंह यांच्या गोष्टीत काही तरी प्रेरणादायी आहे. धोका समोर दिसत असताना डोकं शांत ठेवण्याचे फायदे ती गोष्ट दाखवते. ती गोष्ट कल्पकता आणि सामान्य व्यवहारज्ञान वापरणं कसं महत्वाचं आहे तेही दाखवते. पण या गोष्टींना पारंपारिक पध्दतीत नैतिक शिक्षण म्हणता येणार नाही. खरं तर, पारंपारिक गोष्टी पारंपारिक पध्दतीची नीतीमत्ता क्वचितच शिकवतात. आपल्यासाठी जास्त महत्वाचं म्हणजे, मुलांमध्ये नीतीमत्तेचा विकास करणं हे गोष्ट सांगण्याचं उद्दिष्ट नाही. गोष्टी सांगण्याचे विविध फायदे आहेत, आणि ते खालीलप्रमाणे आहेत.

गोष्टी “ऐकण्याची क्षमता” योग्यपणे विकसित करतात : चांगलं ऐकणारा कोण असतो? जो शेवटपर्यंत ऐकतो. हे आपण फारशा लोकांबाबत म्हणू शकणार नाही. अगदी आौपचारिक चर्चांमध्येही लोक मध्येमध्ये अटकाव करत रहातात. यामागचं कारण म्हणजे वक्ता काय बोलणार आहे ते आपल्याला आधीच ठाऊक आहे असं गृहीत धरण्याची त्यांची सवय. दुसरं कारण म्हणजे त्यांच्याकडे ऐकून घेण्याची सबुरी नसते. हे अजिबात आश्चर्याचं नाही, की ऐकणं हे आजकाल फक्त एक कौशल्य मानलं जात नाही, तर ती वृत्ती मानली जाते, जिला व्यवस्थापनाच्या आणि मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये विकसित करायला प्रोत्साहन दिलं जातं. लहान वयात गोष्टी सांगण्यामुळे, ऐकण्याची सवय आणि वृत्ती आयुष्यभरासाठी एक चांगली सवय म्हणून जोपासली जाऊ शकते अशा आयुष्याच्या नाजुक काळात सबुरीनं ऐकण्याची क्षमता विकसित होते.

मौखिक परंपरेची दृढ संस्कृती असलेल्या आपल्या देशात चांगलं ऐकणाऱ्यांची वानवा असणं हे जरा विचित्रच आहे. माझ्या अंदाजानं ही परिस्थिती लहानपणी गोष्टी सांगणं याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उद्भवली आहे. आधुनिक भारतात मुलांना नियमितपणे गोष्टी सांगायला वेळ नाही असं दिसतं. या उणिवेचे परिणाम आता समोर उघडपणे दिसायला लागले आहेत.गोष्टी सांगण्यातून भाकित करण्याची क्षमता शिकता येते : लहान मुलांना गोष्टी परतपरत ऐकायच्या असतात. याचं कारण म्हणजे, एकदा त्यांना गोष्ट माहित झाल्यानंतर ते एकाग्रतेनं गोष्ट ऐकण्याची त्यांची क्षमता ओळखीची गोष्टच परतपरत ऐकून तपासून पहातात. हे तपासणं नेणिवेत घडणं हे नैसर्गिक आहे. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा गोष्ट ऐकताना, आता काय घडेल याचं यशस्वीपणे आपण भाकित करु शकलो याचा मुलांना आनंद होतो. भाकित बरोबर आल्याचा आनंद हे त्या मन लावून ऐकणाऱ्यासाठी एक बक्षीस असतं, आणि तो केवळ आनंद नसतो. यातून गोष्ट ऐकणाऱ्या मुलामधला आपली भाकित करण्याची क्षमता अचूक आहे याचा आत्मविश्वासही वाढीला लागतो. ही धारणा मूल सर्वार्थानं विकसित होण्यात महत्वाची भूमिका निभावते – विशेषत: वाचण्याची क्षमता विकसित होण्यासाठी याची खूप मदत होते.

शाळेच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये ही क्षमता विकसित होणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. भाकित करण्याची क्षमता याचं “साक्षरता आणि आकलन यासाठी किती महत्वाचं योगदान आहे” याचा उहापोह सविस्तरपणे मी माझ्या “द चाईल्डस लॅंग्वेज अॅंड द टीचर” या पुस्तकात केला आहे.
भाकित करण्याच्या क्षमतेचा इतर विषय शिकण्यामध्येही मोलाचा सहभाग आहे, विशेषत: गणित आणि विज्ञान हे विषय. गणिताचा अभ्यास करताना समस्या सोडवण्यासाठी नियमांचा वापर करणं याला सैध्दांतिक महत्व आहे. गोष्टींमध्येही नियम असतात. यातला फरक म्हणजे ते नियम रुपकांमध्ये असतात. उदाहरणार्थ, अनेक गोष्टीत छोटे प्राणी मोठ्या प्राण्यांवर युक्तीनं विजय मिळवतात. ससा आणि सिंह यांच्या गोष्टीतही हेच घडतं. मुलं जसजशी गोष्टी ऐकतात, तसतसे त्यातले अंतर्भूत नियम त्यांच्यात रुजतात, आणि त्यांची नियमांवरची पकड भाकित करण्याच्या क्षमतेच्या विकासादरम्यान वाढीला लागते.

गोष्टी आपलं जग विस्तारतात: आपण मेंदूत आणि मनात घेऊन चालत असतो त्या जगाबद्दल मी बोलतो आहे. जी माणसं किंवा गोष्टी आपल्याला आयुष्यात कधीच सामोऱ्या येणार नाहीत ते जग आपल्यासमोर उलगडत नेऊन गोष्टी आपलं जग विस्तारतात. प्रश्न असा आहे, अशी माणसं आणि त्यांची परिस्थिती माहिती करुन घेऊन उपयोग काय आहे? याचा फायदा म्हणजे या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहेत. त्या माणसांना किंवा परिस्थितीला आपण वैयक्तिकरीत्या ओळखत नसलो तरी मानसिक पातळीवर त्या आपल्याला अस्वस्थ करतात – विशेषत: लहानपणी ऐकल्या असतील तर साधारणपणे तो त्रास आयुष्यभर पिच्छा पुरवतो.

उदाहरणार्थ, लहान मुलांना वाईट माणसांबद्दल अस्वस्थता वाटते, जरी त्यांच्याभोवती वाईट माणसं नसली तरी. त्याचप्रमाणे, मनाच्या तळाशी कुठेतरी त्यांना आपल्याला स्मार्ट, सुंदर किंवा भलं असं कोणीतरी भेटायची संधी मिळावी अशी इच्छा असते. आदर्श व्यक्तिमत्वाची कल्पना आणि प्राणघातक संकटाची भीती या गोष्टी मुलांच्या मानसशास्त्रात गुंफून राहिलेल्या असतात.
पारंपारिक कथा ही मानसिकता मांडतात आणि त्यामुळे त्या मुलांना सहज भावतात. गोष्टी ऐकून, एखादं लहान मूल, जे अजून फार काही शिकलेलं नाही, त्याच्याभोवतालच्या प्रत्यक्ष जगापेक्षा एका भल्यामोठ्या काल्पनिक जगाचा अनुभव घेऊ शकतं.

अजून एक गोष्ट म्हणजे, गोष्टी ऐकून एखाद्याला येणारा अनुभव हा विस्कळीत नसतो. उलटपक्षी, तो अनुभव आपल्या एरवी कल्लोळ असलेल्या जगाला एका विशिष्ट नियमावलीत किंवा मांडणीत बांधायला मदत करतो. सखोलपणे पहायचं तर, ती नैतिक मांडणी असते – पण सर्वसामान्य अर्थानं मानली जाते तशी नैतिकता मला इथे अभिप्रेत नाही. दुबळे जरुर जिंकतात, पण अनेकदा चुकीचे मार्ग वापरुन. उदाहरण म्हणजे ससा भुकेल्या सिंहाशी खोटं बोलतो.

गोष्टी ऐकणं आणि वाचणं

अखेरीस, मुलाच्या भाषाकौशल्याच्या विस्तारासाठी गोष्टी सांगण्याचं महत्व आपल्याला दिसू शकेल. शब्द हे खूप व्यक्तिगत असं धन आहे. जगातल्या वस्तूंना व्यक्तिगत आवडीनुसार नाव देण्याची क्षमता आपल्याला त्यातून प्राप्त होते. दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर शब्द ही सामाजिक संपत्तीही आहे, ज्याद्वारे आपण इतरांबरोबरचे अनुभव मांडतो. हे दुहेरी वैशिष्ट्य शब्दांना अर्थ देतं. उदाहरणार्थ, लहान मुलाला स्वत:च्या अनुभवामुळे सिंहाला भूक लागल्यावर काय वाटत असेल ते माहिती असतं. ही गोष्ट मुलाला भूक या शब्दाच्या अर्थात सिंह या शब्दाचा समावेश करायला शिकवून त्या शब्दाच्या अर्थाचा विस्तार करुन दाखवते. मुलं जितक्या जास्त गोष्टी ऐकतील, तितका त्यांचा शब्दसंग्रह इतरांच्या अनुभवांना सामावून घ्यायला समर्थ होत जाईल. या दृष्टिकोनातून पाहिलं तर, लहानपणी ऐकलेल्या गोष्टी नंतरच्या काळात वाचन क्षमतेचा पाया ठरतात.

खरं तर, वर कथा ऐकण्याबाबत नमूद केलेल्या चारही गोष्टी वाचनालाही लागू होतात. वाचनाची क्षमता मुलांना भाषेचे नियम आणि मांडणी याच्याशी ओळख करुन देते. चांगलं वाचायची क्षमता बुध्दिमान भाकितं करण्याच्या सवयीवर अवलंबून असते. भाषेचे नियम अवगत केल्यानंतर, मुलं पुढच्या विधानात किंवा वाक्यात काय असेल याची अपेक्षा करु शकतात. गोष्टी सांगणं हे या दृष्टिकोनातून मुलांना साक्षर करायला उपयोगी ठरतं.

गोष्टी सांगण्याचं कौशल्य
गोष्टी सांगण्याच्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त करायचं असेल तर त्या माणसानं स्मरणशक्तीचा गंभीरतेनं विचारात घ्यायला हवी. जर गोष्टी सांगणाऱ्या माणसाला गोष्ट नीट आठवली नाही, तर उत्कृष्ट कथा पण वाया जाऊ शकते. स्मरणशक्तीच्या सामर्थ्यामुळे गोष्टी सांगणार्‍्याचा आत्मविश्वास वाढतो आणि सहजता येते. शांतता आणि सहजता या दोन गोष्टी कथा ऐकणाऱ्याशी नातं जुळण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे, ती गोष्ट जर तपशीलवार नीट आठवत असेल तर सांगणारा ती रिकाम्या नकाशासारखी किंवा ब्लूप्रिंटसारखी वापरु शकतो.
हा मोकळा नकाशा तुमच्या सोयीनं किंवा ऐकणाऱ्याच्या मनाचा कल ओळखून भरता येतो. गोष्ट थोडक्यात सांगणं किंवा लांबवणं दोन्ही खूप महत्वाचं असतं. एखाद्या दिवशी तुम्ही ससा सिंहासमोर जाऊन उभा राहिला या मुद्द्यापर्यंत पटकन येऊ शकता. दुसऱ्या एखाद्या दिवशी तुम्हाला गोष्टीचा सुरुवातीचा भाग विस्तारानं सांगावासा वाटेल, आपल्या जेवणाची वाट पहात असताना सिंहाच्या मनात काय विचार तरळत होते त्याचं आणि तेव्हाच सिंहाच्या गुहेकडे जात असताना सशाच्या डोक्यात ज्या कल्पना आणि योजना तयार होत होत्या असं सगळं तपशीलवार मांडता येईल.

मुलांना गोष्ट कशी सांगावी यासाठीदेखील कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला वाटलं, तर दोन प्रकारचे आवाज नाट्यमयपणे काढता येतील किंवा हातांच्या हालचाली, देहबोली वापरता येईल. तुम्ही हातात कठपुतळ्या घेऊन संवाद जिवंत करु शकता. तुम्ही दोन व्यक्तिरेखांच्या भूमिका खोलीच्या एका कोपऱ्यात  आणि दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन वठवू शकाल. या सगळ्या शक्यता रंजक आहेत. एकच गोष्ट वर्षानुवर्षं किंवा एका वर्षात अनेकवेळा सांगण्याची आपली क्षमता विकसित करुन वाढवत नेणं हे एक मोठं आव्हान आहे.जर गोष्टी सांगणं त्यात सामील केलं तर शिक्षकाचं दैनंदिन आयुष्य कधीच कंटाळवाणं होणार नाही. पण गोष्ट सांगणं हा जर दैनंदिन उपक्रम करायचा असेल तर प्राथमिक शाळेचा पाठ्यक्रम याबद्दलच्या आपल्या संकल्पना मुळापासून बदलायला हव्यात.

 

कथा : सशाला बुध्दिमान हा किताब कसा प्राप्त झाला.

कोणे एके काळी एके दिवशी, जंगलाचा राजा सिंह याला रोज अन्नाच्या शोधात भटकायचा कंटाळा आला. त्यानं विचार केला, सगळे प्राणी जर त्याला निर्विवादपणे राजा मानतात, तर भक्ष्याच्या मागे रोज पळण्यापेक्षा, तो प्राण्यांना सांगेल, रोज माझी भूक भागवायला एका प्राण्यानं माझ्याकडे यायचं.
मग त्यानं जंगलात प्राण्यांची सभा घेतली आणि म्हणाला, “माझ्या साथींनो, मला माझं अन्न मिळवायला रोज शिकार करावी लागते, त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी मला घाबरतात. रोज मी एकच प्राणी मारुन खातो, पण तुम्ही सगळे थरथर कापता. आता एक विवेकवादी व्यवस्था करु. रोज सकाळू एक प्राणी माझ्यासमोर, मला खाण्यासाठी माझ्याकडे हजर होईल. कोणत्या प्राण्याला पाठवायचं ते तुम्ही आपापसात ठरवू शकाल. यामुळे माझी शिकारीच्या कटकटीतून सुटका होईल. याचाच अर्थ म्हणजे तुम्ही जंगलात मुक्तपणे फिरु शकाल”. मग प्राण्यांनी आपापसात चर्चा केली आणि ही पध्दत सगळ्यांनाच उपकारक असल्याचं मान्य केलं. दररोज संध्याकाळी चिठ्ठ्या टाकू. ज्याचं नाव चिठ्ठीवर असेल, तो प्राणी पुढच्या दिवशी सिंहाचं अन्न असेल. ही नवीन योजना ताबतोब लागू केली गेली. दर संध्याकाळी एक चिठ्ठी निघायची आणि गरीब बिचारा एक प्राणी सिंहासमोर त्याच्या जेवणासाठी हजर व्हायचा. निवड झालेल्या प्राण्यासाठी ती नि:संशयपणे भयंकर वाईट गोष्ट असली तरी, यामुळे इतर प्राण्यांना जंगलात भटकणाऱ्या सिंहापासून अभय मिळत होतं, ते जंगलात मुक्तपणानं विहार करु शकत होते. योजना नीट चालली आहे असं वाटत होतं.
एका संध्याकाळी जेव्हा सशाचं नाव चिठ्ठीवर आलं, त्यानं सिंहाचं अन्न होण्याचा आपला बिलकुल इरादा नसल्याचं जाहीर केलं.
यावर कोल्हा म्हणाला, “सिंह त्यानं दिलेलं वचन पाळतो आहे आणि आपण आता मुक्तपणे बाहेर फिरु शकतो.”
माकड म्हणालं, “सशा, जर तू गेला नाहीस, तर आम्हा सगळ्यांना संकटात लोटशील.”
“मी या दुष्ट प्रथेचा एकदाच आणि सगळ्यांसाठी अंत करेन”, ससा आत्मविश्वासानं म्हणाला असला तरी आतून तो घाबरलेला होता. “एक दिवस तुम्ही सगळे माझे आभार मानाल.” असं तो म्हणाला.
“जर सिंहानं परत शिकार करायला सुरुवात केल्याचं कळलं तर आम्ही काही आभारबिभार मानणार नाही.” जंगली मांजर म्हणालं.
“ते सगळं माझ्यावर सोपवा” असं म्हणून ससा शांतपणे आडवा झाला. पण ससा झोपला नाही. तो कित्येक तास स्वत:चा आणि स्वत:च्या साथीदारांचा जीव वाचवता येईल आणि दुष्ट सिंहाचा नाश करता येईल यावर विचार करत होता.
सकाळी, त्याला एक युक्ती सुचली. जेव्हा त्यानं सगळ्याचा विचार केला आणि आपली योजना फत्ते होईल असं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं एक डुलकी घेतली आणि तो ताजातवाना झाला. सूर्यबिंब क्षितिजावर तळपायच्या आत तो सिंहाच्या गुहेत दाखल झाला. सिंह त्याची अधीरतेनं वाट पहात होता आणि डरकाळ्या फोडत होता. तो रागावलेला होता, एक म्हणजे, सशाला झालेला उशीर त्याचा सिंहाबद्दलचा अनादर दाखवत होता आणि दुसरं म्हणजे त्याला खूप भूक लागली होती. जसा ससा पुढे आला, तसा सिंह गरजला, “तू माझ्या नाश्त्यासाठी आला आहेस ना?”
“होय सरकार..” ससा आदरानं उत्तरला.
“मग तुला उशीर का झाला?” सिंहानं गुरकावत विचारलं. “मी सांगतो तुम्हाला सरकार”, ससा म्हणाला, “मी सकाळी इकडे लवकर यायला निघालो होतो. मला एका दुसऱ्या सिंहानं थांबवलं. तो म्हणाला, त्याच्या नाश्त्यासाठी तो मला खाणार असल्यानं मी पुढे जाऊ शकणार नाही असं तो म्हणाला. मी त्याची गयावया केली आणि थांबू शकत नसल्याचं सांगितलं, जंगलाच्या राजाच्या आज्ञेनुसार मला त्याच्याकडे पोचायला हवं असं सांगितलं. यावर तो खूप संतापला आणि तो म्हणाला, “मी या जंगलाचा राजा आहे.” मग तो गुरकावून म्हणाला, “जा आणि त्या माझ्या प्रदेशातला माझा अधिकार बळकावणाऱ्या त्या सिंहाला सांग, मी येऊन तुला मारुन टाकेन. सगळ्या प्राण्यांनाही जंगलाचा खरा राजा आला आहे आणि तो त्या नकली राजाला पळवून लावेल असं सांग.”
“यामुळे, राजेसाहेब”, ससा म्हणाला, “तुम्ही मला नाश्त्यात खाण्याआधी, मी तुम्हाला तुमचं आयुष्य धोक्यात आहे याचा इशारा देतो आहे.“

भुकेनं आणि अनादरानं संतापलेला सिंहानं गर्जना केली, “तो नकली.. तो नकली आहे. मला आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे घेऊन चल. जंगलाचा खरा राजा कोण आहे हे मी त्याला दाखवतो.”
ससा चालायला लागला आणि सिंह त्याच्यामागे जायला लागला. “आता जरा काळजीपूर्वक चाला महाराज, आपण त्या चोराच्या गुहेत पोचतो आहोत..” ससा कुजबुजला.
प्रत्यक्षात, ससा त्या सिंहाला एका खोल विहीरीकडे नेत होता. जेव्हा तो तिथे पोचला, तेव्हा त्यानं सिंहाला क्षणभर थांबायला सांगून स्वत: विहिरीपाशी सावकाशपणे गेला. मग त्यानं विहिरीच्या कठड्यावरुन खालच्या पाण्याकडे पहायला सुरुवात केली. त्याला आपल्या चिमुकल्या चेहऱ्याचं स्पष्ट प्रतिबिंब दिसलं. मग त्यानं सिंहाला बोलावलं आणि म्हणाला, “खाली पहा, हा तुमचं साम्राज्य हिसकावून घ्यायला पहातो आहे.”

सिंह विहिरीच्या कठड्यापाशी गेला, रागानं गुरगुरत एक डरकाळी फोडली. त्यानं जेव्हा खाली पाहिलं तेव्हा त्याला एक अक्राळविक्राळपणे गर्जणारा एक सिंह त्याच्याकडेच पहाताना दिसला. त्यानं त्या शत्रूवर उडी घेतली, काही काळ हातपाय झाडले आणि मग बुडून मरण पावला.
ससा पटकन इतर प्राण्यांकडे गेला आणि आपण सिंहाला मारुन टाकल्यामुळे भीतीचा काळ संपल्याचं जाहीर केलं. मग त्यानं इतरांना आपण कसं क्लृप्तीनं सिंहाला मारलं त्याची कथा सगळ्यांना सांगितली. सगळ्या प्राण्यांनी सशाच्या बुध्दिमत्तेची प्रशंसा केली.
त्या दिवसानंतर सगळे प्राणी आपल्या समस्या आणि कलह सोपवायला सशाचा सल्ला मागायला त्याच्याकडे जायचे. यामुळे तो शहाणा ससा या नावानं ओळखला जायला लागला.
*******
(प्राध्यापक कृष्ण कुमार हे ख्यातनाम शिक्षणतज्ञ आणि लेखक आहेत. त्यांनी आपले विचार आणि लेखन शिक्षणक्षेत्रातल्या प्रश्नांना वाहिलेलं आहे. “राज समाज आौर शिक्षा” आणि “बच्चे की भाषा आौर अध्यापक” ही त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत.)

(अनुवाद -नीलांबरी जोशी )

इबुकसाठी आभार : डॉ डी डी पंत मेमोरियल चिल्ड्रेन्स सायन्स रिसर्च सेंटर, बेरीनाग रोड, टीच अॅंड प्रमोट द कल्चर आॉफ रीडिंग अॅंड रायटिंग.

Previous articleकदम कदम बढाये जा…
Next articleशिवरायांचा पराक्रम! माफीवीरांची फलटण…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.