गोष्ट ‘अज्ञानकोशाची’

-प्रमोद मुनघाटे

तुम्हाला ‘ज्ञानकोश’ माहित आहे. पण ‘अज्ञानकोश’ तुम्ही कधी पहिला आहे का? प्रथम त्यातील एक नमुना बघू: “जंगलात एका भुकेल्या कोल्ह्याला एक मेलेला हत्ती दिसला दुपारच्या रखरखत्या उन्हामुळे त्या मेलेल्या हत्तीचे तोंड वासले होते. कोल्ह्याने ते पाहिले . कोल्हा हत्तीच्या पोटात शिरला. भरपूर खाऊन थोडावेळ पडावे म्हणून तेथेच झोपी गेला. सायंकाळी त्या मेलेल्या हत्तीचे तोंड आपोआपच मिटले गेले आणि काल्हा आत अडकला. “मला वाचवा, एक लाख देतो ‘अशा त्याच्या ओराळ्यांनी दोघा पांथस्थांनी कोल्ह्याला मुक्त केले. हत्तीच्या पोटातून सुटलेला कोल्हा म्हणाला, “मी तर जंगलचा कोल्हा. मजकडे कसले असणार एक लाख. आम्ही वनवासातले आदिवासी. तरीपण माझे प्राण वाचविलेत म्हणून मी तुम्हाला लाखाची एक गोष्ट २३ सांगू शकतो. “लाख नाही तरी लाखाची गोष्ट तरी ऐकून घेऊ या  असे वाटून त्यांनी कोल्ह्याची लाख मोलाची गोष्ट ऐकली. कोल्हा म्हणाला, “तुम्ही गरीब निर्बल असाल तर कधीही मोठ्याच्या पोटात शिरू नका.”

□■

हा ‘अज्ञानकोश’ आत्माराम कनीराम राठोड यांचा. ते मागच्या पिढीतील विदर्भातील एक लेखक होते.   गुजरातमधील ‘ भाषा संशोधन प्रकाशन केंद्राने ‘ ते प्रकाशित केले आहे. आत्माराम यांनी हे पुस्तक एकदा स्वतः मला घरी आणून दिले होते. तेंव्हा मी नागपुरात महाराज बागजवळच्या पत्रकार सहनिवास मध्ये राहत होतो. तिथे गच्चीत चहा घेताना त्यांनी पुस्तक दिले होते. आमच्या खूप गप्पा झाल्या. पण त्यानंतर ते पुस्तक म्हणजे  ‘अज्ञानकोश’ माझ्याकडून कुणीतरी मारले आणि नंतर काही काळानंतर आत्मारामजी सुद्धा जग सोडून गेले.

अलीकडेच काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा बडोद्याजवळच्या तेजगढला गेलो आणि अज्ञानकोशाची प्रत दिसल्याबरोबर झडप घातली.  मोठे मस्त पुस्तक आहे हे. कधीही कोणत्याही पानावरून वाचायला सुरवात करा, आपण त्या गप्पाष्टकांमध्ये रंगून जातो.

आत्माराम कनीराम राठोड यांचे ‘तांडा’ हे आत्मचरित्र व ‘गोरबंजारा’ हे समाजशास्त्रीय पुस्तक पूर्वी गाजले होते.  विदर्भ साहित्य संघाच्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. ‘ अज्ञानकोश ‘ हे कोणतीही रूढ चौकट नसलेले ललितगद्य आहे. ‘अरेबियन नाईटस् प्रमाणे एकापाठोपाठ एक कथा सांगत जाणे, असे या पुस्तकाचे तंत्र आहे . या कथांना स्थळकाळाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत, रंजन किंवा तत्त्वबोध असाही नेमका उद्देश त्या कथनामागे नाही. पण उपरोधाचे एक विचित्र सत्र या कथांमधून जाणवत राहते. या लेखनाचे सर्व सामर्थ्य आत्माराम कनीराम राठोडच्या शैलीत आहे . ही शैली विद्याव्यासंगातून कमावलेली नाही. ती त्यांच्या वाट्याला आलेल्या भन्नाट आयुष्यातून उगवलेली आहे . साऱ्या आयुष्याची किंमत चुकवून एखादा माणूस जेव्हा मनापासून बोल लागतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दाला वजन प्राप्त होते.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतो,

“लमाणबंजारा गणाच्या न्यायपंचायतीला ‘नसाब’ म्हणतात. यात न्यायनिवाडा करताना आपल्या अशिलाच्या बाजने बिनतोड गोष्टी सांगण्याची परंपरा आहे. ती निती अजूनही अस्तित्वात असलेली आढळते.”

म्हणूनच या पुस्तकाचे उपशीर्षक ‘नसाबनीती’ असे आहे. ‘अज्ञानकोशाचे’ सूत्रच जर सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की आत्माराम ‘ बायको ‘ नावाच्या व्यक्तीला ‘ अज्ञानकोश ‘ संबोधतात. एखादा माणस चालता बोलता ‘ज्ञानकोश’ असतो, असे म्हटले जाते, तसेच ‘बायको’ म्हणजे ‘अज्ञानकोश’. नवरा-बायकोच्या बौद्धिक संबंधात, विनोदी लेखकांनी बायकांच्या अगाध ज्ञानाबद्दल परंपरेने जे सूत्र जोपासले आहे, त्याचाच आधार आत्माराम कनीराम घेतात; परंतु व्यक्ती म्हणून बायकोचा अनादर हा हेतू त्यांच्या या कथासूत्रात नाही. ते केवळ निमित्त आहे.  नवराबायकोच्या संवादातून इतिहास वर्तमानातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय ढोंगीपणावर अत्यंत उपरोधिक संवादात्मक कथांचे निवेदन त्यांनी प्रवाही शैलीत केले आहे. पात्र व प्रसंगानुरूप भाषा हे त्यांच्या लेखनाचे पहिले वैशिष्ट्य आहे.  परंतु  या गोष्टीवेल्हाळ वैशिष्ट्यांमुळेच काही कथा निरुद्देश झाल्या आहे. असे अपवाद सोडले तर ‘ अज्ञानकोशातील बहुतांशी गोष्टी सांगून आत्माराम एक नवीन किस्सा सांगतात.

आचार्य अत्र्यांनी त्यांचे गुरू राम गणेश गडकऱ्यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले. ” एकदा कोल्हापूरच्या शाह महाराजांनी मोठी मेजवानी दिली. पुष्कळ सरदार मानकऱ्यांना बोलाविले. तर त्या ठिकाणी त्यांनी आपले जुने मास्तर बोलाविले. तो बिचारा मास्तर फाटके कपडे घालून कसातरी आला होता . त्याच्याकडे कोण पाहणार? बाकीचे सरदार पटके बिटके घालून बसले होते. हा बिचारा मास्तर फाटके कपडे घालून बसला होता. महाराजांनी देखील त्याच्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी जेवण झाले, तेव्हा मास्तर उठले म्हणाले, “मला दोन शब्द बोलायचेत या प्रसंगानिमित्त.”

महाराज म्हणाले, “कशाला ? काय बोलायचं?

 ” नाही.. नाही, थोडस….”

. “बरं बोला.”

“मला एवढच बोलायचं की, एवढी आपली पार्टी, मोठे-मोठे सरदार आले आहेत मी फाटके कपडे घालून आलोय इथं. याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत असेल. वाईट वाटत असेल. तेव्हा मला फाटके कपडे घालून इथं का यावं लागलं, त्याचं कारण सांगायचं.”

” अहो मास्तर नको “

 ” नाही  नाही थोडस ” .

ते म्हणाले, “असं झालं, आपलं आमंत्रण मिळालं तेव्हा शिंप्याकडे गेलो आणि सांगितलं की मला असे असे कपडे शिवायचे, शिंपी म्हणाला, “दोन दिवसात शक्य नाही. ” मग परटाकडे गेलो  तर परीट म्हणाला, माझ्याकडे असे कपडे मिळायचे नाहीत. मग भाड्याने कपडे देणाऱ्याच्या दुकानात गेलो आणि सांगितलं. ” असे असे कपडे मला पाहिजेत. शेरवानी पाहिजे, सुरवार पाहिजे.” तेव्हा दुकानदार ” सगळे कपडे सरदार लोकानी भाड्याने नेले आहेत. त्यामुळे मला आपल्याला काही देता म्हणाला येत नाही.” एवढे सांगून मी आपले आभार मानतो.”

 “एखादा मास्तरही हशार असतो बघा ! “

गोष्ट वाचून दाखवताच अज्ञानकोश म्हणाले, “चांगलीच जिरवली त्यानं तो कोण छत्रपती होता त्याची. पण आमच्या दिवानजीएवढा नाही .

“आत्ता , आमचा दिवानजी ‘ म्हणजे, अज्ञानकोशाच्या आजोळचा. हिचे आजोळ जमीनदार ; आता जमिनी गेल्यात, दिवानजीच्या गोष्टी तेवढ्या आहेत. तिने सांगितलेली ही गोष्ट . . .

एका इजारदाराकडे मुलगी पहायला जायचे होते. रावसाहेब निघाले घोडागाडीतून, सोबत ते प्रसिद्ध दिवानजी आणि काही नातलग. रावसाहेबाच्या आगमनाची वर्दी गेलेली होती. यजमान तयारीत होते. पाहुण्यांना दिवाणखान्यात बसवण्यात आले . फराळ , चहा झाला. बोलणी सुरू व्हायची तेवढ्यात यजमान इजारदार गरजले . . . .

“दिवानजी! “

‘ मालक ? ” दिवानजी नम्रपणे उत्तरले.

” दिसत नाही पाहणे आलेत ते ? “

” मालक ! “

‘काय मालक मालक लावून बसलात. जा दोन तांब्याच्या मोठ्या चरव्या काढा. दूध आणा. झक्कास बासुंदीचा बेत ठेवा  “

” मालक . . ” म्हणत दिवानजी मान घालत निघून गेले. रावसाहेबाचे दिवानजी . . . ते प्रसिद्ध दिवानजी हशार. ते जाऊन बसले वाड्याच्या दिडीदरवाज्यात.

इजारदाराचे दिवानजी दोन मोठ्या तांब्याच्या चरव्या घेऊन दरवाजातून बाहेर पडले. आणि खप वेळाने परतले तेव्हा, त्यांच्या हातात दुधाने भरलेली एकच चरवी होती. रावसाहेबांचे दिवानजी काय समजायचे ते समजले. आणि लगेच बाहेर पडले. या दिवानजीने गावात जुनी भांडी घेणारी दुकानं शोधली. एका दुकानात इजारदाराकडची चरवी त्याला सापडली. ती विकत घेऊन त्याने परस्पर आपल्या गावी पाठवून दिली. इजारदाराकडील पाहुणचार घेऊन रावसाहेब परतले . परतताना त्यानी इजारदाराला आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. इजारदार बिचारे मोठ्या तयारीने रावसाहेबाकडे आले. रावसाहेबानी हकूम सोडला,

 “दिवानजी चांगलं दही बोलवा. श्रीखंडाचा बेत ठेवा. “

दिवानजी पटकन म्हणाले. “मालक दही कुठल्या चरवीत आणायचं? आपल्याकडच्या की इजारदारांकडच्या? ” बिचारे इजारदार मोठे खजिल झाले. आणि सोयरीकीची बोलणी अर्धवट सोडून परतले. किती हुशार आमचे दिवानजी. कशी जिरवली इजारदाराची !”

अत्यंत उपरोधाने पारंपरिक शहाणपण सांगताना आत्माराम हे समाजातील ढोंगी प्रवृत्तीवर नेमका प्रहार करतात. त्यांच्या या प्रहारचे लक्ष्य कुणी एक व्यक्ती किंवा समूह नाही, तर प्रवृत्ती आहे. ढोंगाची त्यांना किती चीड आहे, ते एकही अवांतर विधान न करता किश्याकिश्यातून ते कशा कोपरखळ्या मारतात, ते पाहण्यासारखे आहे.

बायकोप्रमाणेच ‘बाळ्या’ हे चिरंजीवसुद्धा ‘अज्ञानकोशाचे’ एक सूत्र आहे. त्याच्या बाळलीला घेऊन सेवाग्राम बघायला जाता. ‘ अज्ञानकोश ‘ तन्मयतेने आश्रम पाहात फिरत होते. अचानक तिला काय वाटले कुणास ठावूक? तिने एक आश्रमवासी गाठला. त्याचा पेहराव तोच बिनबाह्याची बनियन आणि दादा कोंडकेसारखीअधिक चडी म्हणा किंवा पाऊण इजार म्हणा. एक विचित्र आकार. बर गृहस्थ कुठंतरी हरवल्यासारखा विचारमग्न. तिने विचारले, “अहो आजकाल नक्षलवाद. दहशतवाद फोफावतोय. मग, गांधीवाद कां बरं फोफावत नाही? “

“असं आहे. आमही आश्रमवासी शासकीय धोरण राबविणारे. शासनाने कुटुंब नियोजनाचा पुरस्कार केलाय.   आम्ही पण प्रत्येक गोष्टींचे नियोजन करून चालतो, मग सूतकताई असो की गांधीवादाचा प्रचार. “

‘सूतकताई? “बाळ्या मध्येच कोकलला, “तुम्ही पण सूतकताई करता?

“हो मी काततो राजे. तुला येतं बाळ कातता? ‘ ‘आश्रमवासीने विचारले.

“ तर ! येते मला सूतकताई ‘ , बाळ्या म्हणाला.

“छान ! ‘ ‘ आश्रमवासी आनंदाने म्हणाले, “ छान ! तू जर रोज कातत राहून महिन्याला पाठवशील , तर तुला पैसे मिळतील . तू देशाचा भावी आधारस्तंभ , तू स्वावलंबी झाला पाहिजेस . ” तो पुन्हा हरवत चालल्यासारखा बोलला.

“किती पैसे मिळतील आजोबा मला रोज कातण्याचे? ” बाळ्याने विचारले.

“पंधरा पैसे रोज तरी पडतील तुला” ते म्हणाले.

“म्हणजे महिन्याला साडेचार रुपये, अहो आजोबा यात येवढे पेळूही येणार नाहीत. मग कसलं आलं स्वावलंबन? “बाळ्या पुढे म्हणाला, “असं आहे आजोबा, आम्ही मुलं म्हणजे देशाचे भावी आधारस्तंभच, “तो म्हणाला, “मग आम्हाला तुम्ही सूत कातण्याचे साडेचार रुपये देणार? आणि साठ वर्षावरील म्हाताऱ्यांना महिना साठ रुपये निराधार अनुदान. छे ! छे ! आजोबा हा कसला समाजवाद आणि आम्ही कसले देशाचे उद्याचे आधारस्तंभ!”

हा बाळ्या एक दिवस लेखकाला प्रश्न विचारतो, “पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोण हरला ? “

” गाढवा, नुसत्या नको त्या गोष्टीत हुशारी दाखवत हिंडतोस अन् या प्रश्नाचं जगप्रसिद्ध साधं उत्तर तुली माहिती नाही ? “

तुम्हाला माहीत आहे बापूश्री या प्रश्नाचं खरं उत्तर माहीत असेल तर सांगा ! ” बाळ्या .

” गाढवा , पानिपतच्या युद्धात मराठे हरले’ ‘मी.

 ” ते तर मला पण माहीत आहे बापूश्री , पण ते चूक नाही?’ ‘

” ते कसे ? ‘ ‘ मी चक्रावलो.

” असं आहे बापूश्री ! जेव्हा अटकेपार झेंडे गेले तेव्हा ते पेशव्यांनी नेले! अन् पानिपतात हरले तेव्हा मराठे हरले! म्हणजे जिंकले तर पेशवे ? आणि हरले तर मराठे. हो ना?

” अशा अनेक भेदक किश्श्यांनी ‘अज्ञानकोश’ खचाखच भरले आहे. त्यातील उपरोध लक्षात आल्यावर या पुस्तकाला ‘अज्ञानको ‘ हे नाव कां दिले आहे, ते पटते. जे खोटे आहे, ते खोटे न मानण्यावर पारंपरिक श्रद्धा ठेवन ‘राष्ट्रीय प्रवाहात’ सामील होण्याची प्रवत्ती म्हणजेच ‘अज्ञानकोशा’ चा प्रत्यय होय.

एकदा आत्माराम कनीरामला एक स्वप्न पडते. स्वप्नात एक कावळा पक्ष्यांचे संमेलन भरवतो. निवडणुका होतात. कावळेतर पक्षाचा नेता गरूड असतो. त्याचा प्रवक्ता पोपट. तो म्हणतो, “ विरोधी कावळे पक्षाचे सत्तेचाळीसच निवडून आलेले आहेत. तेव्हां निर्विवाद बहुमत आपलेच सिद्ध होईल. “

” कसे होईल? ‘ गरूड चिंतित स्वरात पुटपुटला, “एकोणपन्नास व सत्तेचाळीस म्हणजेच एकूण शहाण्णवच. उरलेले चार कोण? “

” उरलेले चार गिधाडे आहेत. ‘ ‘पोपट म्हणाला, ” ते अपक्ष म्हणून निवडून आलेत. त्यांची काय गणती? ‘

दोन्ही गटांनी रात्रभर खलबतं केली. सकाळी बातमी छापून आली. ‘आम्हाला पंतप्रधान करा ! ‘ गिधाडांची मागणी.

गिधाड्यांचा युक्तिवाद असा की, “ आम्ही अपक्ष असलो म्हणून काय झालं? आमच्याशिवाय कोणाचेच बहुमत होऊ शकत नाही. दोन मोठे पक्ष एकत्र येण्याचा संभव नाही . तेव्हां ज्यांना राज्य करायचे असेल , त्यांनी आम्हाला नेता मानावे . . “

थोडक्यात ‘अज्ञानकोश’ या पुस्तकात वाचकांना गाफील ठेवून भारतीय मनोवृत्तीचे यथेच्छ वस्त्रहरण केले आहे , ते मुळातून वाचावे असेच आहे .

□■

-(लेखक नामवंत समीक्षक आहेत)

7709012078

अज्ञानकोश
आत्माराम कनीराम राठोड
भाषा पब्लिकेशन्स, भाषा संशोधन प्रकाशन केंद्र, ६, युनाईटेड अव्हेन्यू, दिनेश मिलजवळ, बडोदा, ३९०००७, फोन -०२६५-३३११३०, मूल्य ५०/-

Previous articleइतिहास सत्ताधिशांच्या बाजूने असणारांचा असतो की विवेकाच्या?
Next articleफिलॉसॉफी इन अ‍ॅक्शन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.