गोष्ट महेश्वरची, तेथील नर्मदेची!

– शुभांगी चेतन

काही गावं, शहरे प्रथमदर्शनीच आपल्याला प्रेमात पाडतात. नंतर एका अनामिक ओढीने आपण त्यांच्याकडे वारंवार खेचले जातो. मध्यप्रदेशातील माळव्यात नर्मदा किनाऱ्यावरील महेश्वर हे त्यापैकी एक. लोकमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर होळकर घराण्याची गादी इंदूरहून महेश्वर येथे आणली होती. नर्मदेच्या विशाल पात्राला अगदी खेटून अहिल्याबाईंनी नदीकिनारी जवळपास एक किलोमीटर लांबीचा अतिशय देखणा व मजबूत घाट उभारला आहे. हा अहिल्या घाट हेच महेश्वरचे विशेष वैशिट्य आहे. अलीकडच्या काही वर्षात ‘पॅडमन’, ‘दबंग ३’, ‘अशोका’ अशा अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण या घाटावर झाले असल्याने हा घाट, घाटावरील मंदिरं आणि राजवाड्याचे बांधकाम, स्थापत्यशास्त्र पाहायला देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोक गर्दी करायला लागले आहेत. महेश्वरवासीयांचे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंतचे या घाटावरील लोकजीवन पाहणे, अनुभवणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. अगदी पहाटे, सायंकाळी वा रात्री अगदी निवांतपणे घाटावर भटकंती करत तो अनुभव घ्यायलाच हवा.

आपला देश, येथील माणसं आणि त्यांचं जगणं… याचे अनेक थर आहेत. ते सारे एकमेकांत मिसळून, एकरूप होऊन ‘भारत’ नावाचा देश आकारास आला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात फिरताना त्या-त्या प्रदेशातील माणसांचे पेहराव, रंग, बोली, सण-उत्सव, लोककथा, संगीत, खाद्यसंस्कृती हे सारं मिळून त्या परिसराची, तेथील समाजमनाची जडणघडण झाली आहे, हे अनुभवायला मिळतं. प्रवासामुळे आपल्या देशाचे अद्भुत सौंदर्य आणि विविधता अनुभवता आली. प्रवासामुळे कुठल्या कुठल्या राज्यांचे तुकडे आठवणी होऊन सोबत आले. तिथला निसर्ग, माती, रंग माणसं चित्रांच्या माध्यमातून कागदावर उतरली आणि रोजच्या जगण्यातला भाग झाली. अशाच एका प्रवासादरम्यान एका निसर्गरम्य राज्यातल्या एका लहानशा शहरवजा गावाची ही शब्द आणि चित्रातून विणलेली गोष्ट. एक प्रवास गोष्ट…

भारताच्या नकाशात मध्यवर्ती असलेला ‘मध्यप्रदेश’ पर्यटकांसाठी अनेक महत्त्वाचे आकर्षण असलेला हा प्रदेश. माझी या प्रदेशासोबतची पहिली ओळख आर्ट स्कूलला असताना झाली. तेव्हा खजुराहो आणि कंदारीय महादेव मंदिर म्हणजेच मध्यप्रदेश, एवढ्यापुरतीच ती ओळख मर्यादित होती. मात्र, पुढे पुढे पर्यटक न होता प्रवासी व्हावं, हा विचार करून प्रवास सुरू झाला आणि समज बदलत गेली. मध्यप्रदेशाच्या प्रवासातलं एक अतिशय सुंदर, शांत, सौंदर्य लाभलेलं आणि दिवसाच्या प्रत्येक प्रहरागणिक ही शांतता आणखी गहिरं करणारं एक ठिकाण- ‘महेश्वर’. त्या दिशेने हा प्रवास सुरू झाला. हे लेखन म्हणजे एक गोष्ट आहे. ‘प्रवासाची गोष्ट’. महेश्वरच्या माणसांची, रंगांची, दिवस-रात्रीची, सूर्योदय- सूर्यास्ताची, तिथल्या वाहत्या संथ नर्मदेची.

राजा सहस्रार्जून आणि रावण

महिष्मती हे महेश्वरचं प्राचीन नाव. इथला राजा सहस्रार्जुन याने रावणाला पराजित केले होते. त्याची एक अत्यंत रोचक गोष्ट घाटावर असलेल्या साधूने सांगितली. राजा सहस्रार्जुनाला 500 बायका. तो त्यांना संध्याकाळी नदीवर फिरायला घेऊन येत असे. एक दिवस त्याच्या राण्यांनी तक्रार केली की, इथे आम्हाला खेळायला काहीच नाही. म्हणून मग राजाने त्याच्या सहस्रबाहूने नर्मदेचा प्रवाह अडवला आणि पात्र कोरडं झालं. राण्यांना आनंद झाला, त्या तिथे बागडू लागल्या. वरून आकाशातून रावण आपल्या पुष्पक विमानातून निघालेला. नर्मदेचं कोरडं पात्र त्याने पाहिलं आणि इथे शिवाची उपासना करण्यासाठी ही उत्तम जागा आहे, या विचाराने त्याने पुष्पक खाली उतरवलं. मातीचं शिवलिंग तयार केलं आणि उपासना करू लागला. दरम्यान, राजा सहस्रार्जुनाच्या राण्यांचं खेळून झालं होतं. त्या पात्रातून बाहेर आल्या होत्या. त्यामुळे राजाने आपल्या सहस्र भुजांनी अडवलेल्या नर्मदेच्या प्रवाहाला मोकळी वाट करून मोकळी करून दिली. या प्रवाहाने रावणाचे मातीचं शिवलिंग स्वतःसोबत वाहून नेलं, त्याच्या उपासनेतही खंड पडला. रावण रागावला. त्याने राजा सहस्रार्जुनाला लढाईसाठी आव्हान दिलं. त्या लढाईत रावण पराभूत झाला. ही गोष्ट सांगताना साधुबाबांचा चेहरा इतका उल्हासित होता की, जणू ती लढाई त्यांनी प्रत्यक्ष पाहिली असावी. त्यांना विचारलं, ‘आपका नाम क्या है बाबा?’ ते म्हणाले, ‘अब इतने वर्ष हो गये यहा आके… अब तो नाम याद भी नही. बाबाही बुला लो!’ बाबा तिथले नव्हते. कालांतराने ते तिथलेच झाले. पुढे चारपाच दिवस या घाटावर वेगवेगळी माणसं भेटत राहिली. बोलत राहिली. सोबत राहिली.

महेश्वरचा घाट

 ‘अहिल्या फोर्ट’, ‘महेश्वर किल्ला’ अशा नावांनी महेश्वर घाट ओळखला जातो. या घाटाबद्दल अनेक कथा सांगितल्या जात असल्या, तरी अहल्याबाई होळकरांचं या घाटासोबत असणारं नातं चिरकालीन आहे. राणी अहल्यादेवी हे तिथलं दैवत आहे. देव-देवतांच्या असण्या-नसण्याविषयीचे वाद त्यांना लागू होत नाहीत. 1765-1795 इतका दीर्घ काळ त्यांनी महेश्वरचे प्रशासन सांभाळले. अधिक सुरक्षित म्हणून माळवा प्रांताची राजधानी त्यांनी इंदूरवरून महेश्वरला आणली. महेश्वर घाट उभारण्यासाठी राजस्थानहून वास्तुविशारदांना त्यांनी आमंत्रण दिले. भुजदार आणि गजदार या दोघांच्या संकल्पनेतून महेश्वरचा घाट उभारण्यात आला. विठोबा छत्री आणि अहल्येश्वर मंदिर, हे घाटावरचे दोन प्रमुख भाग. मराठा आणि इस्लामिक रचना या वास्तूंमध्ये दिसते. घुमट आणि कळस यांचं समरसून उभं राहिलेलं हे रूप अतिशय मोहक आहे. राजस्थानातल्या वास्तुकलेतील छत्र्या, नक्षीदार जाळी, छज्जे इथे पाहायला मिळतात. दगडांवर कोरलेली नक्षी, उठावदार हत्ती, अतिशय नाजूक, पण दगडात कोरलेली सुबक जाळी; एकूणच या वास्तूचं सौंदर्य द्विगुणित करतात. दिवसाच्या तीनही प्रहरी महेश्वर घाटाचं सौंदर्य निराळ्या रूपात दिसतं. विठोबा छत्री आणि अहल्येश्वर मंदिर यांच्यामधून वाट नर्मदेकडे जाते. नर्मदेच्या काठावर घेऊन जाणाऱ्या पायऱ्या, या पात्रापासून किमान शंभर फूट उंच आहेत. तिथून दिसणारं नर्मदेचं सौंदर्य केवळ अप्रतिम, शब्दातीत असं.

नर्मदा आणि घाट, म्हणजे जणू परस्परांचे सोबतीच. नर्मदेचा प्रवाह दिवसभर आपल्या लयीत वाहत असतो. काठासोबत हितगुज करत ती दिवसाचा प्रवास सुरू करते. सूर्याची सकाळची किरणं हळुवार घाटावर पसरत असतात. सुरेख नक्षीकाम असलेला तो घाट सकाळच्या प्रहरी हलकासा सोनेरी पिवळा दिसतो. प्रत्येक सकाळी नव्याने जाग आल्यासारखी त्याचं रूप असतं. आम्ही गुढीपाडव्याच्या सकाळी तिथे होतो. ती सकाळ थोडी निराळी होती. माणसांची ये-जा संथ गतीने वाढत होती. त्या साधू बाबांनी सांगितलं, ‘आज भूतडी अमावस्या हैं, सब निमाडवासी आज के ही दिन नर्मदा में स्नान के लिए आते हैं. यह श्रद्धा की बात है. इसमें यह माना जाता है कि इस नर्मदा में स्नान करनें से जो बुरी छाया रहती है, भूत-प्रेत का साया रहता है, वह मीट जाता है.’ मला फार मजा वाटली या एकूणच विचाराची. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतलं अंतर अतिशय सूक्ष्म असतं, हे पुन्हा जाणवलं. नर्मदेतील ‘डुबकी’ प्रकार पाहण्यासाठी मी दुसऱ्या दिवशी लवकर घाटावर पोहोचले. साधारण पहाटे पाचनंतर माणसांचे थवेच्या थवे नर्मदेच्या दिशेने येत होते. पिवळा, लाल, नारंगी यांच्या भडक छटा असलेल्या साड्या आणि त्यांना सोबत करणारे पुरुषांचे फेटे. सगळं काही ऊन सांडणारं. आपल्या वाटेवर उन्हाचं चांदणं शिंपत जाणारे हे उन्हाचे रंग. महेश्वरचा घाट दोन-तीन दिवस विविध रंगांनी सजला होता. रंगही हलणारे, बोलणारे, साजरे करणारे. नर्मदेत स्नान झाल्यावर तिथेच घाटावर स्त्रियांनी लोकसंगीतावर ठेका धरला. त्यांना तसं पाहिल्यावर त्या केवळ भूतडीसाठी तिथे आल्या आहेत, असे मला वाटले नाही. तो खास त्यांचा वेळ होता. त्यांचा एकमेकींसोबतचा वेळ होता.

आजूबाजूच्या परिसरामध्ये गहू कापणी झालेली होती. शेतीच्या कामांतून थोडी उसंत असण्याचा हा काळ. ही संधी साधून श्रद्धास्थानांना भेट देण्याचा कार्यक्रम ठरविला जातो. सुरुवातीला ओंकारेश्वर करून अनेकजण महेश्वरला भेट देतात आणि नंतर परतीचा प्रवास सुरू करतात. स्त्रिया आपल्या दैनंदिन दिनक्रमातून थोड्या मोकळ्या असल्याने गप्पा, गाणी आणि हलक्या ठेक्यांवर त्यांचा सहज, साधा ‘घूमर’ नाच करून त्या ताल धरतात. आपल्याला एखादा शब्द कळला तरच, नाहीतर गाण्यांचे सगळेच शब्द नवीन. सोबत एक साधी ढोलकी वाजवणारा असतो. सायंकाळ व्हायला आली असते. सभोवताली केशरी, लाल रंगाचा सडा पडल्यासारखं अतिशय मनमोहक दृश्य असतं. अस्ताला जाणाऱ्या भास्करासोबत घाट दिवसभराचा शीण परतवतो. त्याचा सोनेरी, पिवळा रंग फिकट होत जात असतो. सूर्यास्ताच्या वेळेचं हे घाटाचं सौंदर्य केवळ अद्भुत असतं. सायंकाळच्या आधीच घाट रिकामा झाला असतो. नर्मदेचा प्रवाह पूर्व-पश्चिम वाहत असतो.

राजा सहस्रार्जुन, रावण, मल्हारराव होळकर, अहल्याबाई होळकर यांच्या काळात होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक घडामोडी, राजकीय डावपेच, कौटुंबीक कलह… तेव्हाच्या महेश्वरच्या नागरिकांनी काय-काय पाहिलं असेल? या घाटाने, नर्मदेच्या प्रवाहाने. इतिहास स्वतःत पचविल्यामुळे येथील रंग गडद, गहिरे झाले असतील का? म्हणूनच गहिरी शांतता असते का या परिसरात? मन इतिहासात डोकावून येतं. 18 व्या शतकात साकारलेल्या या घाटाने गेल्या 300 वर्षांत किती वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या असतील? असे अनेक विचार मनात येत राहतात. नर्मदा मात्र सहज शांत वाहत असते. ही तेव्हाही तशीच असेल का? निसर्ग, वास्तू तशाच राहतात. बदलत राहतात माणसं. ती मर्त्य आहेत, जन्म-मृत्यूच्या चक्रात त्यांचा प्रवास सुरू असतो. आज इथे मी आहे, काल कुणीतरी दुसरंच होतं, उद्या आणखी दुसरं कुणीतरी येणार. नर्मदा मात्र तिथेच वर्षानुवर्ष. नदीला आपण केवळ नदी म्हणून पाहत नाही. तिला स्त्रीरूप देतो अनेकदा. तसे, नदही आहेतच. पण ‘आई’ म्हणून हाक दिली की, नदीचं नदीपण हरवत जातं. तिच्यावर धरणं बांधून आपण तिचं ‘नदी’ असणंही हिरावून घेतो.

महेश्वरच्या घाटावर नर्मदा आणि घाट दोन्ही स्वच्छ दिसलेत. रात्री आठ वाजता नर्मदेची आरती होते. आरती झाली की, घाटावर असलेली फुले, फुलांचे हार, द्रोण, पणत्या सगळं उचललं जातं. सकाळी सहाच्या सुमारास पुन्हा एकदा साफसफाई होते. घाट स्वच्छ, न्हाऊ-माखू घातल्यासारखा देखणा दिसतो. घाटाच्या काठावर भेटणारी नर्मदा शांत असते. समजुतदार, अनुभवी स्त्रीसारखी. तिचं ते रूप लाघवी असतं. आम्हाला आता तिचं वेगळं रूप पाहायचं होतं. म्हणून मग दुसऱ्या दिवशी ऊन कमी झाल्यावर, नावेने आम्ही सहस्रधारेच्या नर्मदेला भेटायला गेलो. दगडांच्या खोल, उभट, पसरट उंचवट्यांमधून वाहणारी. अवखळ, अल्लड कुमारवयीन मुलीसारखी. घोंगावता आवाज करणारी, समुद्राला भेटायला जाणारी, अखंड वाहणारी नर्मदा. शतकानुशतके प्रवाहासोबत पुराणकथा, लोककथा सोबत घेऊन वाहणारी नर्मदा. इथला माणूस म्हणतो, ‘शिवाच्या घामातून एक थेंब पडला आणि नर्मदा जन्माला आली.’ नर-मादा यांचा मिलाप म्हणून ‘नर्मदा’. काठावरची नर्मदा आणि ही नर्मदा यांच्यात काहीच साम्य नव्हतं. ती शांत, सहज; तर ही बेधुंद, मुक्त. कशातच न बांधता येणारी, न सामावणारी. ती एकाच रेषेत वाहणारी, तर ही विविध पांढरा, निळसर हिरवा, करड्या रंगाच्या छटा घेऊन वेगात कोसळणारी. एकच प्रवाह, पण रूपं निराळी. जणू येथे येताना पहिलं रूप स्वतःच स्वतःतून वेगळं केल्यासारखं.

मला नदी बघायला खूप आवडते. कुठेही प्रवासाला गेलो की; आणि तिथे नदी असली की, अनेक लोककथा समोर यायला लागतात. नर्मदेबद्दल तर अशा विविध कथा आहेत. या प्रत्येक कथेवर, मिथकावर स्थानिक माणसांची श्रद्धा आहे, विश्वास आहे. लोककथा या अधिक मानवी जाणवतात मला. त्यातून उभी राहणारी ऐतिहासिक, पौराणिक पात्रं आपल्यातलीच वाटतात. ती अवतीभवतीच्या माणसांच्या जगण्यातूनच उभी राहतात, म्हणूनही असेल कदाचित. राजेश केवट म्हणून एक गृहस्थ आम्हाला नर्मदा पाहायला घेऊन गेले. त्यांनी शंकर आणि नर्मदेच्या जन्माची कथा सांगितली. होळकरांच्या पॅलेसमध्ये ते सिक्युरिटीत काम करतात. रात्रीच्या कामाची शिफ्ट असेल, तर दिवसा ‘गाईड’ म्हणून काम करतात. त्यांनी ‘केवट’ समाजाबद्दल एक गोष्ट सांगितली. केवट म्हणजे मासेमारी करणारा, नावाडी म्हणून काम करणारा समाज. राजेशने सांगितलं, ‘नर्मदा के उसपार हम सब केवटही है. जो इस किनारे काम के लिए आते है. ज्यादा तर लोग गाईड या फिर पॅलेसमें काम करते हैं. मुझ जैसे कई दोनो काम करनेवाले भी है. हमारे समाज के आदमी ने भगवान राम को गंगा पार करवाई थी. वो वनवास में रहे भी थे एक केवट के घर. ऐसे माना जाता है की, केवट पूर्वजन्म में कछुआ थे. हमारी माँ भी हमें यही कहानी सुनाती थी जब हम छोटे थे. अब यही हम आप जैसों को सुनाते है.’ नंतर म्हणाले, ‘अब हम है, तब तक करेंगे ये काम. बेटा तो इंदौर में पढ़ता है. वह वही रहेगा.’ आणि मग आवाज जड झाला त्यांचा. माणसं खूप आपली होऊन जातात अनेकदा, कोणतंही नातं नसताना. भेटणारही नसतो आपण पुन्हा. पण, त्या क्षणापुरतं ते नातं आपलं असतं. अशी बरीच माणसं भेटली तिथे.

महेश्वरला आम्ही ‘लब्बूस कॅफे’ मधे राहिलेलो. शत्रूवर नजर ठेवता यावी, म्हणून अहल्याबाईंच्या घराआधी, सुरुवातीला प्रवेशद्वाराजवळ बांधलेला हा Watch Tower. किल्ल्याच्या तटबंदीचाच भाग असलेला. तिथेच आता त्यांनी हा कॅफे सुरू केला आहे. राहण्या, खाण्याची उत्तम सोय असलेला. सध्याचे राजा रिचर्ड होळकर यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी, कुठेही ये-जा करण्यासाठी असलेल्या वाहनाचे चालक होते लक्ष्मण. उंच होते ते. सगळे त्यांना ‘लंबू’ म्हणायचे. त्यांचा विशेष स्नेह होता या मुलांसोबत. मुलांना लहान असताना ‘लंबू’ म्हणता येत नसे. ती त्यांना ‘लब्बू’ बोलवायची. ते गेल्यानंतर, लब्बूच्या स्मरणार्थ म्हणून या कॅफेचं नाव ‘लब्बूस कॅफे’. ते MAT गाडी चालवायचे. त्यांची गाडीपण त्या कॅफेमधे लावली आहे. Heritage वास्तू आहे. त्यामुळे त्याचं ते ऐतिहासिकपण सांभाळूनच येथील रूम्स डिझाईन केलेल्या आहेत. त्या काळात राहिल्याचा सुंदर अनुभव इथे राहून मिळतो.

या प्रदेशाला ‘निमाड’ असं एक मधुर नाव आहे. निम के आड निमाड – या संपूर्ण भागात प्रचंड विस्तार असलेला निंब पाहायला मिळतो. त्याच्या बहराचा तो काळ. गोड वासाची, पांढरी, हलकी पिवळी झाक असलेली चांदण्यांसारखी फुलं येतात त्याला. आम्ही ज्या रूममध्ये राहिलेलो, त्याला पुढे-मागे दोन्ही बाजूला गच्ची होती. दोन्हीकडे निंब पसरलेला. त्याला खेटूनच वाढलेली -मधुमालती. सकाळच्या त्या शांततेत मधुमालतीचा हलका गंध पसरलेला असायचा. बुलबुलांची एक जोडी नियमित येत होती. समोरच्या भिंतीवर मुंगूसही दर्शन देऊन गेला. या निंबाच्या सावलीतच अक्षयचा चहाचा ठेला होता. पहाटे साडेपाचला पहिला चहा तो आणून द्यायचा. कॅफेचं किचन 7 वाजता उघडायचं. तोवर दुसरा चहाही अक्षय घेऊन यायचा. मग, इथे घाटावर कसं सिनेमांचं शूटिंग होतं आणि कलाकार इथे येऊन मी केलेला चहा पितात, या गोष्टी रंगत जायच्या. दुपारच्या जेवणाचा डबा आम्ही अक्षयच्या आईलाच सांगितला होता. छान गरमागरम फुलके, कधी घरी खाल्ली नसती इतकी चविष्ट दुधीभोपळ्याची भाजी, वरण-भात असं घरचं जेवण एक वेळ असायचं. अतिशय साध्या भाज्या, पण कम्माल चव असायची. निघण्याच्या दिवशी त्यांना भेटायला गेलो, तर साडीसारखाच चेहेराही लाल झालेला त्यांचा.

पाच दिवस एका कुटुंबातच राहिल्यासारखे सरून गेले. कॅफेत काम करणारे विनय, संदीप, दिग्विजय छान मित्र झाले. साडेचार वर्षाच्या मीरसोबत क्रिकेट, गोट्या खेळणं, हा त्यांच्या दिनक्रमातला बदललेला, पण पाच दिवसांसाठी नित्याचा भाग झाला होता. साधुबाबा भेटत राहिले. अक्षयचे मित्र येतजात हात करू लागले. रात्रीच्या सिक्युरिटी काकांसोबत मीरची हिंदीची शिकवणी सुरू होती. घाटासोबत ओळख घट्ट होत होती. दिवसाचे अधिक तास आम्ही तिथेच राहत होतो. त्या दगडाची बदललेली रूपं, मी शब्दात आणि चित्रात रंगवण्याचा प्रयत्न करत होते. संध्याकाळी आणि रात्री दहानंतर घाटाचं रूप गहिरं, शांत होत जातं. नर्मदाही संथावते. घाटावर असणाऱ्या खांबांची नक्षी, महेश्वरमध्ये विणल्या जाणाऱ्या हातमागाच्या साडीच्या किनारींवर दिसते. साडेचार हजार विणकरांची कुटुंब आजही महेश्वरी साडी विणतात. त्या साडीच्या ताण्याबाण्यासारखंच तिथलं लोकजीवन सहज आणि शांत आहे. शहर छोटं आहे, मात्र आता आता रूप पालटतंय. एका बाजूला ऐतिहासिक वारसा घेऊन उभा असलेला महेश्वरचा घाट आणि दुसरीकडे जुनी कात टाकणारी घरं. अनेक प्रश्न सुरू होतात मनात, पण कधी कधी त्यांची उत्तरं न देणंच शहाणपणाचं असतं.

 

महेश्वरचे दिवस. तिथली सकाळ- संध्याकाळ, नर्मदा, ती माणसं, निंबाची झाडे, अहल्याबाईंचा इतिहास – आम्हीही त्या जगण्याचा भाग झालो काही काळासाठी. नर्मदेच्या काठावर बसून तासन्तास तिला वाहताना पाहिलं. ‘नर मादा’ म्हणून नर्मदा,’ आठवत राहिलं. तिच्या त्या प्रवाहासोबत माझ्यातलंही काहीतरी सोबत जातंय. कुठेतरी, कुणालातरी भेटण्यासाठी. मी थेंबभर तिलाही घेऊन आले सोबत. माझ्यातला ओलावा कायम राखण्यासाठी. इथे येताना कोरी असणारी माझी शब्द-चित्रांची वही, परतताना मात्र इथल्या आठवणींनी बहरून गेली. तिला बंद करताना मन जडावले. पुन्हा येईनच, असं मनातल्या मनातच ठरवून आम्ही मांडूच्या वाटेवर निघालो.

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३

लेखातील प्रकाशचित्रे – वैभव दलाल (९८२३०१८७६८)
रेखाटने – शुभांगी चेतन

(लेखिका मुलांच्या पुस्तकांसाठी लेखन करतात. चित्रे काढतात. Free Expressions of Art व Art Consultant म्हणून त्या अनेक शाळा – महाविद्यालयांसाठी कार्यशाळा घेतात.)

9769371823

[email protected]