फिनलंड- जगातील सर्वाधिक आनंदी देशाची कहाणी

शिरीन कुलकर्णी (फिनलंड)

१५ – १६ वर्षांपूर्वी कुणाला फारसा माहीत नसलेला फिनलंड नावाचा एक उत्तर युरोपातील देश सध्या फारच प्रसिद्ध झाला आहे. फिनलंड म्हणजे कुठंतरी इंग्लडच्या जवळ आहे का? असं विचारणारे लोक आता आम्ही पण Northen lights बघायला येणार आहोत असं म्हणतात, तेव्हा मला आश्चर्य वाटतं आणि आनंद सुद्धा होतो. आता तर जगातला सगळ्यात आनंदी देश म्हणून फिनलंड सलग सहाव्यांदा जागतिक आनंद निर्देशांकाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. फिनलंड हा खरं पाहता कष्टाळू आणि शांत लोकांचा देश आहे. प्रामाणिकपणे कष्ट करणे, हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. मी या देशाचं देणं लागतो, ही इथल्या प्रत्येक नागरिकाची भावना आहे. इथली सामाजिक शिस्त खरोखर अनुकरणीय आहे.

जागतिक आनंद निर्देशांक, अर्थात World Happiness Index म्हणजे काय आहे? कोण तो मोजतो? त्याचे काय निकष आहेत, हे समजून घेऊ या. त्याबरोबर फिनलंड या सगळ्या निकषांवर कसा खरा उतरतो, तेही बघू या.

द वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट हे शाश्वत विकास सोल्यूशन्स नेटवर्कचे प्रकाशन आहे, जे गॅलप वर्ल्ड पोल डेटाद्वारे समर्थित आहे. ‘जागतिक आनंद अहवाल’ सरकारी धोरणाचे निकष म्हणून आनंद आणि कल्याणाकडे अधिक लक्ष देण्याची जगभरातील मागणी प्रतिबिंबित करतो. हे आजच्या जगातील आनंदाच्या स्थितीचे पुनरावलोकन करते आणि आनंदाचे विज्ञान आनंदात वैयक्तिक आणि राष्ट्रीय फरक कसे स्पष्ट करते हे दर्शविते.

गॅलप वर्ल्ड पोलमधील जीवन मूल्यमापन वार्षिक आनंदाच्या क्रमवारीसाठी आधार प्रदान करतात. ते मुख्य जीवन मूल्यमापन प्रश्नाच्या उत्तरांवर आधारित आहेत. Cantril ladder प्रतिसादकर्त्यांना १  ते १०  च्या scale वर विचार करण्यास सांगते, त्यांच्यासाठी सर्वोत्तम संभाव्य जीवन १० आहे आणि सर्वात वाईट संभाव्य जीवन 0 आहे. त्यानंतर त्यांना 0 ते १०  scale वर त्यांचे स्वतःचे वर्तमान जीवन रेट करण्यास सांगितले जाते. तीन वर्षांतील राष्ट्रीय स्तरावरील प्रातिनिधिक नमुन्यांवरून क्रमवारी लावली जाते.

यासाठी सहा व्हेरिएबल्सवरील निरीक्षण डेटा वापरला जातो आणि त्यांच्या जीवन मूल्यमापनाशी संबंधित असलेल्या अंदाजांचा देशांमधील फरक स्पष्ट करण्यासाठी उपयोग केला जातो. त्यामध्ये दरडोई जीडीपी, सामाजिक समर्थन, निरोगी आयुर्मान, स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचार यांचा समावेश होतो. आनंदाची क्रमवारी या सहा घटकांच्या कोणत्याही निर्देशांकावर आधारित नाही – स्कोअर त्याऐवजी व्यक्तींच्या त्यांच्या आयुष्याच्या स्वतःच्या मूल्यांकनांवर आधारित आहेत. विशेषतः, एकल-आयटम कॅन्ट्रील शिडीच्या जीवन-मूल्यांकन प्रश्नावर त्यांची उत्तरे, महामारीशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार धूम्रपान, व्यायाम आणि आहार यासारख्या घटकांमुळे आयुर्मानावर किती प्रमाणात परिणाम होतो, हे तपासले जाते. जागतिक आनंद अहवाल आणि आनंदात वाढणारी आंतरराष्ट्रीय रुची भूतानमुळेच अस्तित्वात आहे. त्यांनी ठराव ६५ /३०९  प्रायोजित केला, आनंद: विकासाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाकडे, १९  जुलै २०११  रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने स्वीकारला, राष्ट्रीय सरकारांना आनंद आणि कल्याण कसे करायचे, हे ठरवण्यासाठी अधिक महत्त्व देण्यास आमंत्रित आले.

२  एप्रिल २०१२ रोजी, पंतप्रधान जिग्मी वाय. थिनले आणि जेफ्री डी. सॅक्स यांच्या अध्यक्षतेखाली, ‘नवीन आर्थिक प्रतिमान परिभाषित करणे’ यासाठी आनंदाच्या उदयोन्मुख विज्ञानातील पुराव्यांचा आढावा घेण्यासाठी पहिला जागतिक आनंद अहवाल सादर करण्यात आला. कल्याण आणि आनंद या परिमाणांना महत्त्व देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरीय बैठक २८  जून २०१२ रोजी झाली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ठराव ६६  /२८१ स्वीकारला, ज्यात दरवर्षी २० मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्याची घोषणा केली. जागतिक आनंद अहवाल दरवर्षी २० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून प्रसिद्ध केला जातो.

वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०२३ २०२० ते २०२२ पर्यंतच्या Gallup वर्ल्ड पोल सर्वेक्षणातील डेटा वापरते. ते सर्वेक्षणात विचारलेल्या मुख्य जीवन मूल्यमापन प्रश्नाच्या उत्तरांवर आधारित आहेत. याला ‘कॅन्ट्रील शिडी’ असे म्हणतात: ते उत्तरदात्यांना शिडीचा विचार करण्यास सांगते, त्यांच्यासाठी सर्वोत्तम संभाव्य जीवन १०  आहे आणि सर्वात वाईट संभाव्य जीवन 0 आहे. त्यानंतर त्यांना त्यांचे स्वतःचे वर्तमान जीवन ०  ते १०  वर रेट करण्यास सांगितले जाते. स्केल हे रँकिंग २०२० -२०२२ या वर्षांसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रातिनिधिक नमुन्यांमधून आहे. सर्वेक्षण केलेल्या लोकांची आणि देशांची संख्या दरवर्षी बदलते; परंतु दरवर्षी १३०  देशांमधील १,००,०००  पेक्षा जास्त लोक गॅलप वर्ल्ड पोलमध्ये भाग घेतात. ते संपूर्णपणे सर्वेक्षण स्कोअरवर आधारित आहेत. जीडीपीचा स्तर, आयुर्मान,औदार्य, सामाजिक समर्थन, स्वातंत्र्य आणही भ्रष्टाचार हे सहा घटक आणि निकष महत्त्वपूर्ण मानले जातात.

जागतिक आनंद निर्देशांकाचे निकष आणि फिनलंडमधे ते कसे लागू होतात ते बघू या.

दरडोई जीडीपी – फिनलंडचा दर डोई GDP ५० ,५३७  US डॉलर आहे. श्रीमंत देशांच्या यादीत फिनलंड 22 व्या स्थानावर आहे. इथे महागाईचा दर मागच्या वर्षाच्या तुलनेत १ .8  टक्के घसरला आहे. फिनलंडमधले दरडोई सरासरी वार्षिक उत्पन्न ३६०० युरोच्या आसपास आहे. बेरोजगारीचे प्रमाण ७ .८  % आहे.

सामाजिक आधार – हा देश सोशल welfare पद्धती वापरतो. इथे KELAनावाची सरकारी संस्था आहे जी वेगवेगळ्या सामाजिक योजना आखते. त्यानुसार वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील लोकांना विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो. त्यातल्या काही महत्त्वाच्या योजना पुढीलप्रमाणे –

1. Maternity leave and maternity box – फिनलंडमध्ये गरोदर बाईला एक वर्षाची बाळंतपणाची रजा मिळते. या काळात तिचा पगार KELA मार्फत होतो. त्याच बरोबर होणाऱ्या आईला दिलासा म्हणून, बाळाला पहिल्या एक वर्षात लागणाऱ्या गोष्टी घरपोच एका मोठ्या खोक्यातून पाठवल्या जातात. त्याला Kela Maternity box असं म्हणतात. हा बॉक्स फार विचार करून भरला जातो. नवजात अर्भकाची काळजी घेता यावी यासाठी त्यात विविध प्रकारचे कपडे, दुधाची बाटली, आंघोळीच्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी तापमापक, छोटी नखं काढण्याची कात्री, थंडीचे विशेष कपडे, एक – दोन छोटी खेळणी अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची एक गंमत असते, ती म्हणजे एक कापडी किंवा पुठ्ठ्याचे पुस्तक. अर्थात, ते पुस्तक आईने बाळाला वाचून दाखवावे यासाठी असते. मला हे फार आवडलं होतं. मुलांना अगदी लहानपणापासून पुस्तकाची गोडी लागावी, यासाठी समाज प्रयत्नशील आहे, ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी.

 

 

 

 

 

 

 

 

 

2. Child care leave and allowance – मूल साधारण 11 महिन्याचे झाल्यावर आई ठरवते की, तिला अजून काही काळ बाळाबरोबर घरी रहायचे आहे की कामावर जायचे आहे. आईने किंवा वडिलांनी घरी रहायचे ठरवल्यास Kela तर्फे त्यांना child care allowance मिळतो. मी स्वतः माझ्या बाळंतपणाच्या वेळी या दोन्ही सुविधा वापरल्या आहेत.

3. Unemployment benefit – तुम्ही जर पुरेसे शिकलेले आहात आणि नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहात, तर नोकरी मिळेपर्यंत सरकार तुम्हाला दरमहा एक ठरावीक रक्कम देते. ही रक्कम तुम्ही एक साधारण पद्धतीचे आयुष्य जगण्यासाठी पुरेशी असते. त्याचप्रमाणे तुम्ही नोकरी करत आहात आणि तुमची नोकरी गेली, तरीही तुम्हाला ही रक्कम मिळते. साधारणपणे एक वर्ष तुम्हाला हा लाभ मिळू शकतो.

4. .Housing allowance– तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यास, तुम्हाला सरकारतर्फे घर दिले जाते. त्यातले काही घरभाडे तुम्ही भरता आणि उरलेले घरभाडे सरकार भरते. वर सांगितलेल्या योजनांबरोबरच आणखीही काही महत्त्वाच्या योजना आहेत; जसे की, 18 वर्षाखालील मुलांसाठी विविध योजना, त्यांच्या पालकांना दिला जाणारा भत्ता आणि परदेशातून आलेल्या लोकांना मार्गदर्शन इत्यादी. या सगळ्या योजना फिनलंडच्या रहिवाशांचे जीवन सुकर करतात.

 

निरोगी आयुर्मान – फिनलंडमधील लोक सामान्यतः आरोग्यसंपन्न आणि दीर्घायुषी आहेत. युनायटेड नेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांचे सरासरी आयुर्मान हे 82.48 वर्षे इतके आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, इथली शुद्ध हवा. इथल्या हवेत ऑक्सिजन खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि कार्बन डायऑक्साईड खूप कमी. AQI अर्थात Air Quality Index या संस्थेच्या 2022 सालच्या सर्वेक्षणानुसार फिनलंड 119 व्या स्थानावर आहे म्हणजे इथला AQI हा खूप कमी (21) आहे. हवेचे प्रदूषण खूपच कमी असल्यामुळे श्वसनसंस्थेचे रोग अल्प प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे फिनलंडमध्ये ध्वनिप्रदूषण सुद्धा फार कमी प्रमाणात आढळते. इथला महत्त्वाचा नियम म्हणजे, गाड्यांचे हॉर्न न वाजवणे. त्यामुळे रस्त्यावर कितीही रहदारी असू दे, तुम्हाला कधीही गाडीचा हॉर्न वाजलेला ऐकू येणार नाही. लोक शांतपणे रहदारी सुरळीत होण्याची वाट बघतात आणि मुळात घरून वेळेच्या पुष्कळ आधी निघतात.

निरोगी आयुर्मानाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे आहे, ती म्हणजे फिनलँडची आरोग्य व्यवस्था. इथे प्रत्येक माणसाकडे एक कार्ड असतं. जे घशश्रर ही संस्था देते. त्या कार्डच्या मदतीने तुम्हाला तुमच्या भागातली आरोग्य सुविधा चटकन प्राप्त होते. इथली सरकारी आरोग्य व्यवस्था फारच चांगली आहे आणि इतर युरोपीय किंवा अमेरिकन राज्यांपेक्षा माफक दरात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही आजारी पडलात की, तुमच्यावर योग्य ते उपचार माफक दरात होतात. शिवाय, 18 वर्षाखालील मुलांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे एकटे राहणार्‍या आणि अतिशय आजारी असणार्‍या वृद्धांसाठी खास इस्पितळे आहेत. या इस्पितळांमधून इथल्या वृद्धांची चांगली काळजी घेतली जाते.

स्वातंत्र्य – फिनिश लोक स्वातंत्र्याचे भोक्ते आहेत. इथे कुणी कुणाला फार नियंत्रित करत नाही आणि कुणी एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ सुद्धा करत नाही. ‘जिओ और जीने दो’ हा इथला सोपा मंत्र आहे. त्यामुळे माणसं एकमेकांना फार judge करत नाहीत. एकमेकांच्या अनावश्यक चौकशा करत नाहीत. आपल्या भारतीय लोकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या मुलाला किती मार्क पडले, हे पालक तर एकमेकांना विचारत नाहीतच; पण मुलं सुद्धा एकमेकांना विचारत नाहीत. हे शिक्षण त्यांना शाळेतूनच दिलं जातं. अगदी पहिलीत असल्यापासूनच मुलांना सांगितलं जातं की, तुमची स्पर्धा स्वतःशी आहे. तुम्हाला स्वतःमधे बदल घडवून आणायचे आहेत. सगळ्यांना विविध प्रकारचं शिक्षण घेण्याची मुभा आहे. शिक्षण मोफत आहे आणि त्यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे इथले लोक आपल्या मनाप्रमाणे विविध प्रकारचं शिक्षण घेत राहतात. माझी इथली एक फिनिश मैत्रीण आधी एका शाळेत साहाय्यक शिक्षिका होती, आता ती Biochemical इंजिनिअर होण्यासाठी शिकते आहे. अशा अनेक गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळतात.

स्वातंत्र्याचा अर्थ कायदे न पाळणं, असा मात्र होत नाही. फिनिश लोक कायद्याचे काटेकोर पालन करतात. नियमितपणे कर भरतात. इथे गुन्हेगारीचे प्रमाण सुद्धा अत्यल्प आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास तुमच्या आर्थिक उत्पन्नाच्या प्रमाणात दंड आकारला जातो; अर्थात जितके तुमचे उत्पन्न जास्त तितका अधिक दंड भरावा लागतो.

स्वातंत्र्याच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. यामध्ये विवाह संस्थेबद्दल विचार करायला हवा. फिनलंड मध्ये सगळी लग्न ही बहुतांश प्रेमविवाह पद्धतीने होतात. शिवाय प्रत्येक वेळी स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्यासाठी लग्न करायलाच हवं, याची गरज नसते; कारण live in relationship कायद्याने मान्य केलेली आहे. इथे समलिंगी विवाहाला कायद्याने मान्यता आहे. फिनलंडमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा भरपूर आहे. त्याचे एक कारण हे आहे की, इथे घटस्फोट घेणे तुलनेने सोपे आहे. अर्थात, घटस्फोट घेणारी जोडपी काही काळाने पुन्हा एकत्र येण्याचे प्रमाण सुद्धा बरेच जास्त आहे. Remarriage इथे मोठ्या प्रमाणावर होतात. एकंदरीत स्त्री-पुरुष संबंध याबाबतीत इथे खूप मोकळेपणा आहे.

औदार्य – जागतिक आनंद अहवालाच्या या निर्देशांकावर फिनलंड अगदी पहिल्या क्रमांकावर नाही. कारण इथे तसं कुणी कुणाला फार दान करण्याची गरज भासत नाही. आधी सांगितल्या प्रमाणे घएङअ ही संस्था सगळ्यांना मदत करण्याचं, सामाजिक मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचं काम चांगल्या प्रकारे करते.

भ्रष्टाचार – फिनलंडमध्ये भ्रष्टाचार अत्यल्प प्रमाणात आहे. इथल्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा वाखाणण्यासारखा आहे. हा प्रामाणिकपणा आर्थिकदृष्ट्या तर आहेच, पण इतरही सगळ्या ठिकाणी तो दिसतो. ज्या माणसाला जे काम दिलं आहे, तो माणूस ते काम प्रमाणिकपणे पार पाडतो. सामान्यपणे माणसं कामचुकारपणा करत नाहीत. कधीतरी सरकारमध्ये उच्च स्तरावर भ्रष्टाचार आढळून येतो, पण त्यासाठी जबर शिक्षा ठोठावली जाते. आता काही असे निकष बघू या की, जे जागतिक आनंद अहवालात गृहीत धरलेले नाहीत, पण फिनलंडमधल्या जीवन पद्धतीनुसार आवश्यक आहेत.

Work – life balance – इथली ऑफिसेस सकाळी 8 वाजताच सुरू होतात. लोक साधारण 7. 30 वाजता कामाच्या ठिकाणी पोचतात आणि साडे तीन /चारच्या सुमारास काम संपवून बाहेर पडतात. इथली डे केअर सेंटर पण त्या पद्धतीने चालतात. त्यामुळे नोकरी करणाऱ्या किंवा बिझनेस करणाऱ्या आईला खूप सोयीचं होतं. शिवाय, सकाळी लवकर काम सुरू केल्यामुळे उत्साहात काम लवकर पूर्ण होतं. शिवाय, घरी आल्यावर पुष्कळ वेळ मिळतो. त्यामुळे इथे अनेक लोक वेगवेगळ्या कला किंवा खेळ शिकतात. वेगवेगळ्या भाषा शिकायला सुद्धा इथल्या लोकांना खूप आवडतं. अनेक लोक योगासनं शिकतात किंवा संध्याकाळी नियमित फिरायला जातात. इथल्या अतिथंड वातावरणाचा विचार करता रोज फिरायला जाणं, ही कठीण गोष्ट आहे, पण लोक ते करतात.

शिक्षण व्यवस्था – इथल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल हल्ली जगभरात कुतूहल आहे. इथे मुलांना सर्व शिक्षण मोफत दिले जाते. शिक्षण मुख्यतः फिनिश भाषेतून दिलं जातं. एकूण 98% शाळा सरकारी आहेत. अतिशय चांगल्या दर्जाच्या शाळा, असा त्यांचा जगात नावलौकिक आहे. प्रत्येक शाळेतले शिक्षक उच्च शिक्षित (मास्टर्स इन एज्युकेशन) आहेत. इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण सगळ्यांना मोफत आणि सक्तीचे आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी विद्यापीठात जातात. ते सुद्धा फिनिश नागरिकांसाठी मोफत आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांचं प्रमाण भरपूर आहे. त्यानंतर 94% लोकांना निश्चित नोकरी मिळते. बेरोजगारीचा दर सध्या 6% आहे. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर वेगवेगळ्या विषयांचे आणि व्यवसायांचे शिक्षण दिले जाते. म्हणजे, एका विषयांत भारंभार तज्ज्ञ, तर दुसऱ्या विषयात काम करणारे मोजकेच लोक, असं असंतुलन इथे दिसत नाही. मुख्य म्हणजे, सरकार कुठल्याही पक्षाचं आलं, तरी शिक्षण व्यवस्थेत फारशी ढवळाढवळ कुणी करत नाही. सगळ्या क्षेत्रांमध्ये राजकारण आणलं जात नाही.

कुटुंब व्यवस्था – मुलांना पुरेसा वेळ देणे, ही गोष्ट सुद्धा इथे प्रामुख्याने केली जाते. मुलांना बरोबर घेऊन ग्रंथालयात जाणे, त्यांच्याबरोबर एकत्र खेळणे, त्यांना नवीन गोष्टी शिकवणे हे सगळं इथले पालक उत्साहाने करतात. त्यासाठी वेळ काढतात. साधारणपणे वयाच्या 19 व्या वर्षी मुलं स्वतंत्रपणे राहायला लागतात. स्वत:ची जबाबदारी स्वतः घेतात. अर्थातच, लग्न झाल्यावर ते स्वतंत्रच राहतात. इथे जरी पालक आणि मुलं सातत्याने एकत्र राहत नसली, तरीही म्हातारपणी मुलं आईवडिलांची काळजी घेतात. वेळोवेळी आई-वडिलांना भेटायला जातात. अगदी वृद्ध किंवा आजारी लोकांची काळजी इथल्या सरकारतर्फे घेतली जाते. त्यासाठी खास इस्पितळे आहेत.

सोयी सुविधा – इथलं वातावरण जरी थंड असलं आणि इथे वर्षातून साधारणपणे 6 महिने बर्फवृष्टी होत असली, तरीही इथले व्यवहार कधी थांबत नाहीत. याचं कारण म्हणजे इथली उत्तम शासनव्यवस्था. इथले रस्ते चांगले बांधले जातात आणि सातत्याने त्याची डागडुजी केली जाते. बर्फ पडण्याच्या काळात सातत्याने रस्ते स्वच्छ ठेवले जातात. फुटपाथवरून माणसांना चालता यावं, यासाठी वेळोवेळी बर्फ हटवून त्यावर खडेमीठ आणि बारीक खडी टाकली जाते. यामुळे बर्फावरून चालताना सुद्धा पाय घसरत नाही.

धर्म – फिनलंडमध्ये प्रामुख्याने लुथेरन चर्चचे अनुयायी आहेत. अर्थातच, हे ख्रिश्चन राष्ट्र आहे. पण, इथे अनेक धर्मांचे जसे की, हिंदू, मुस्लिम, कॅथॉलिक असे लोक गुण्यागोविंदाने राहतात. इथे फारशा धार्मिक दंगली किंवा धर्मावरून समाजात तेढ असे प्रकार बघायला मिळत नाहीत. पण, याचा अर्थ इथे सगळं आलबेल आहे, असं मात्र नाही. इथे काही प्रमाणात वंशवाद आढळून येतो.

फिनलंड हा खरं पाहता कष्टाळू आणि शांत लोकांचा देश आहे. प्रामाणिकपणे कष्ट करणे, हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. मी या देशाचं देणं लागतो, ही इथल्या प्रत्येक नागरिकाची भावना आहे. इथली सामाजिक शिस्त खरोखर अनुकरणीय आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, या लोकांच्या मनात असलेली सिसू वृत्ती. सिसू म्हणजे एखादी चांगली गोष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी नेटाने प्रयत्न करणे आणि त्यात यश प्राप्त करणे. इथल्या मानवी वस्तीसाठी प्रतिकूल असणार्‍या वातावरणात तग धरण्यासाठी आणि इतका विकसित देश निर्माण करण्यासाठी याच वृत्तीने या लोकांना मदत केली आहे. मला वाटतं, दिवसभर कष्ट करून, संध्याकाळचा वेळ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी देऊन माणसं इथं सुखाने झोपतात आणि म्हणून हा देश आनंदी आहे.

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३

(लेखिका फिनलंडमधे स्थायिक असून फिनिश शिक्षण व्यवस्थेच्या अभ्यासक आहेत.)

[email protected]