‘मीरा मास्टरमाईंड – टीम सुपरमाईंड’-वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणारा कथासंग्रह

-श्याम मानव

डॉ० स्वप्ना सिंधू मुरार यांच्या लेखणीतून सहज, सुलभ, ओघवत्या भाषेत स्रवलेला ‘मीरा मास्टरमाईंड – टीम सुपरमाईंड’ हा कथासंग्रह तुमच्या हातात देताना आनंद होतो आहे. साऱ्याच कथा ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर बेतल्या आहेत. वाचताना चपखलपणे ह्या कथा तार्किक बुद्धीला जागृत करत, वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवण्याचं अत्यंत मौलिक कार्य, सहजपणे करून जातात.

या कथा वाचताना, ‘माझ्या बालपणात असं काही मला का वाचायला मिळालं नाही, नव्हतं ‘ याची खंत तीव्र होत गेली. बालपणापासून मी अधाशी वाचक होतो. वर्ध्यात माझ्या घरापासून ‘गांधी ज्ञान वाचनालय’ किमान ४ किलोमीटर , तर शाळेपासून १ किलोमिटर अंतरावर होतं. एकावेळी दोनच पुस्तकं मिळत असत. पण मी आठवड्यातून किमान ५ वेळा जाऊन १० पुस्तकं तरी आणून वाचत असे. सर्वांपासून चोरून, अभ्यासाच्या पुस्तकात इतर पुस्तके घालून, वाचण्याची सवय अनेकदा मार देववून गेली. खूप खूप खूप वाचले. पण वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवू शकेल, असं काही वाचायला मिळालं नाही. किमान वयाच्या पंचेविसाव्या वर्षांपर्यंत तरी. तार्किक बुद्धीला चालना मिळेल अशा अकबर, बिरबल वा पंचतंत्रासारख्या काही तत्सम कथा मिळाल्या वाचायला. पण  त्यातून फक्त बुद्धीचातुर्याला चालना मिळाली असावी. बाकी सारं फॅन्टसीचं जगत निर्माण करणारंच साहित्य होतं. स्वप्नरंजनात गुंगवून टाकणारं साहित्य होतं. विज्ञानकथाही बऱ्याच वाचल्या. प्रामुख्याने एच. जी. वेल्स यांच्या बऱ्याच कथा-कादंबऱ्या मराठीत उपलब्ध होत्या. साऱ्या वाचून काढल्या. फॅन्टसी वर्ल्ड अधिक विस्तारलं, पण कुठेही वैज्ञानिक दृष्टिकोणाला हात घातला गेला नाही. टारझन (एडगर राइस बरोज) चे १० भाग, अरेबियन नाईट्स हे सारं कल्पनाविश्व अधिक साहसिक करणारे साहित्य, त्या काळच्या आमच्या बालविश्वाचं, अविभाज्य अंग होतं.

डॉ० स्वप्ना सिंधू मुरार

सार्‍या प्रकारच्या अंधश्रद्धा, चातुर्वर्ण्याचं ब्राह्मण श्रेष्ठत्त्व व इतरांचं शूद्रत्व या बालकथांमधून अलगद व चपखलपणे पेरलं जात होतं. मराठीच नाही तर हिंदी बालसाहित्यही त्याला अपवाद नव्हतं. ब० मो० पुरंदरेंचे शिवाजीचे १० भाग कोळून प्यालो. माझं फार आवडतं साहित्य. त्यातील अनेक रोमहर्षक प्रसंग मी इतरांना रंगवून रंगवून सांगायचो. पण आपण नकळत ‘गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी’ (जो मूळच्या कुळवाडी भूषण जनतेच्या राजाचा, राजे शिवाजी यांचा अपमान करणारी प्रतिमा) स्वीकारला आणि इतरांपर्यंत पोहचवला, हे पुढे २०-२५ वर्षांनंतर कळले. बाल साहित्यातून कसं वर्णवर्चस्व, जातकनिष्ठत्व व ब्राह्मण्य पोहचवलं जातं, त्याचा उत्कृष्ट पुरावा म्हणजे गेल्या ६०-७० वर्षांतील बालसाहित्य आहे. सोबतच साऱ्या प्रकारच्या अंधश्रद्धांची अतिशय चलाखपणे पेरणीही केली गेली आहे. तेही वेगळं सांगायला नको.

मुलांच्या व्यक्तिमत्वाचा पाया पहिल्या पाच वर्षात घातला जातो. पुढच्या १० वर्षांत हा पाया अत्यंत पक्का बनतो. याच काळात मुलांची विचार करण्याची प्रक्रिया घडते. आणि म्हणूनच १२-१५ वर्षांपर्यंत मुलं काय वाचतात, ते काय पाहतात, हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. माणसाच्या मेंदूत दोन प्रकारचा विचार करण्याचं सामर्थ्य आहे. त्याच्या ब्रेनमधल्या सेरेब्रम या भागात असलेल्या लेफ्ट हेमिस्पिअर [Left Hemisphere] मध्ये तार्किक विचार करण्याचं सामर्थ्य असतं. हाच भाग गणित, विश्वेषण, चिकित्सा करणं, अन्वयार्थ काढण्याचे महत्त्वाचं कार्य करतो. यामुळेच दोन पायांच्या जनावरापासून, ‘होमो सेपिअन्स’ पासून, तर आजच्या या आधुनिक माणसापर्यंत गेल्या काही लाख वर्षांत माणसाने एवढी प्रगती केली आहे.

        राईट हेमिस्पिअर ( Right Hemisphere ) प्रामुख्यानं भावनांचं, कलांचं, कल्पना करण्याचं, फँटसी (fantacy) निर्माण करण्याचं केंद्र आहे. शिवाय सांगितलेल्या गोष्टी जशाच्या तशा स्वीकारण्याचं पण केंद्र आहे. लहानपणापासून होणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्कारांमधून आपली तर्कबुद्धी जागृत होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. तर्क करणारा, चिकित्सा करणारा, फार प्रश्न विचारणारा, शंका घेणारा माणूस चांगला नसतो. तो ‘देवाला ‘, ‘गुरुला’ प्रिय नसतो. अशा माणसाला ‘मोक्ष’ ‘स्वर्ग’ मिळत नाही, असं बिंबवून तर्कबुद्धी वापरण्यास हतोत्साहित केलं जातं. उलट  ‘आज्ञाधारकपणा ‘, ‘सांगितलं ते तसंच्या तसं (डोकं न वापरता) स्वीकारणं’ हा  ‘आदर्श’ गुण म्हणून बिंबवला जातो. आणि म्हणून आपला सुशिक्षित समाज आजही एवढा अंधश्रद्ध आहे. त्यात बालसाहित्य आजवर यथास्थिती कायम राखण्याचं काम करत आलं आहे.

                 आपण माणसाची तर्कबुद्धी जागृत करून त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवू शकतो. हाच प्रयोग गेली ४१ वर्षे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या माध्यमातून आपण सारे (अंनिसचे कार्यकर्ते) यशस्वीपणे राबवत आलो आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन करणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणं, वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणं म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणं. ज्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजतो, किमान ७० ते ८०% लोकांमध्ये निर्माण होतो, तो समाज प्रचंड प्रगती करतो, संपन्न होतो, बलाढ्य होतो. १७ व्या ते २० व्या शतकापर्यंतचा युरोपचा विकास (सोबत अमेरिका) हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

           भारतीय राज्यघटनेच्या 51A (h) या कलमात काही मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत. Scientific temper – वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणे, Spirit of Enquiry – चिकित्सक प्रवृत्ती, Reform -सुधारणा आणि Humanity – मानवता. बालसाहित्यातून वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवता आला, तर हे महान कार्य आपण मुळातून करू शकणार आहोत आणि म्हणूनच कथांच्या माध्यमातून प्रभावीपणे वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवण्याचे, खऱ्या अर्थानं राष्ट्रीय कार्य करणाऱ्या डॉ० स्वप्ना सिंधू मुरार यांच्या या कथासंग्रहाचं मनापासून स्वागत करतो आणि या उपक्रमाबद्दत त्यांचे अभिनंदनही करतो.

                डॉ. स्वप्ना सिंधू मुरार या ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी’ च्या सक्रीय, ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या साऱ्या कथा वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहेत. भाषा लहान मुलांना सहज भावेल, पचेल अशी आहे. लहान मुलांना रुचेल, जमेल अशा भाषा शैलीत लिहिणं, ती विकसित करणं सगळ्यांना शक्य नसतं. एक लेखक म्हणून त्याचं महत्त्व, मूल्य मला कळतं. म्हणूनच एक आग्रहाचे आवाहन या निमित्ताने करावंसं वाटतं. डॉ.स्वप्ना सिंधू मुरार यांनी केवळ या एक कथासंग्रहावर थांबू नये. या पुढे लहान मुलांकरता वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणारं साहित्य निर्माण करण्याकरता स्वतःला वाहून घ्यावं. कथा, कादंबऱ्या, लेख या साऱ्याच फॉर्मचा वापर करून, जमेल तेवढं बालसाहित्य निर्माण करावं. या नव्या बालसाहित्य लेखिकेचं लेखक जमातीत सहर्ष स्वागत करतो. पुढच्या वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा !

(लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) 

(‘मीरा मास्टरमाईंड – टीम सुपरमाईंड’- किंमत 150 रुपयेपुस्तकासाठी संपर्क-7507581144
www.Amazon.inhttps://amzn.to/48HnS2G
www.flipkart.com – https://bit.ly/47K6usA