चौकटी मोडताना…!

-डॉ. शीतल आमटे

एका स्त्रीने कसे असावे यासाठी जगाने शतकानुशतके चौकटी ठरवून दिलेल्या आहेत. World economic forum चा Gender Parity Report २०२० म्हणतो की पुढील ९९.५ वर्षांत सुद्धा स्त्री पुरुष समानता जगात येणार नाही.

मला लहानपणापासूनच वडिलांनी प्रचंड वैचारिक स्वातंत्र्य दिले. त्यामुळे मी कुठलीच चौकट स्वतःला लावून  घेतली नाही. त्यामुळे खूपदा मार्ग सुकर होत असे पण प्रश्नही उभे राहत कारण मी जेव्हा चौकट मोडीत असे, तेव्हा काय करायचे हे सांगायला कुणीच नसे. आई चौकटीत जगलेली. वडील कामात. त्यामुळे पुढे काय या प्रश्नाचे उत्तर मलाच शोधावे लागे.

तरीही या प्रवासात मी मार्ग शोधत इथवर आले. पण या मार्गात चुकाही घडत गेल्या. आज त्याबद्दल मी लिहायचे ठरविले.

लहानपणापासूनच आमट्यांचे मन हे कल्पनांची फॅक्टरी आहे. मनात सतत नवीन कल्पना येत असतात. माझ्या आजोबा आणि वडीलांचेही हेच आहे. ते नेहमी नवीन कल्पनांनी अस्वस्थ असायचे. मलाही त्यामुळे अस्वस्थता असते. सर्वच केले पाहिजे हा ध्यास असतो.

मी त्यातच perfectionist या category मध्ये होते. त्यालाच दुसरी बाजू म्हणजे मला फार anxiety होती. त्याला Precrastination पण म्हणता येईल, म्हणजे एखादी गोष्ट घडणार असेल किंवा मी ती करणार असेन तर बरेच दिवस आधीच मी अस्वस्थ असे. जसे १० तारखेला गावाला जायचे तर आठवडाभर आधी मी लिस्ट करून Perfect पॅकिंग करीत असे. जे हातात घेतले त्याचे उत्तम नियोजन करून ते पूर्णत्वाला नेलेच पाहिजे हा ध्यास अंगी होता. त्याच्यासोबत नैसर्गिक anxiety येत असे. काही अंशी आमट्यांचे रक्त याला कारणीभूत आहे पण स्वभावातील झालेच पाहिजे मधला ‘च’ एक सतत टोचणारा कंगोरा होता. त्यामुळे ‘काम करना है तो Perfect , नहीं तो हाथ ही नहीं लगाना’ वाला attitude बनत गेला. Precrastinator वरून Procrastinator ( आळशी) बनत गेले. त्यात ‘च’ आड आल्याने अधिक अडचण होत होती.

त्यातून अभ्यासात सर्वत्र मेरिट, मग कलेतही प्राविण्य हे प्रकार होत होते. पण त्यात असंख्य गोष्टी मी सोडूनही देत होते. खेळ खेळले नाही त्यामुळे प्रकृती ठीक राहिली नाही, असे बरेच झाले. त्यामुळे जीवनात एक पोकळी होती.

बाबा विकास आमटेसोबत लहानगी शीतल

त्यातच माझा technically विचित्र शैक्षणिक प्रवास हा आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल याची मीही कधी कल्पना केली नव्हती. बारावीला सायन्स आणि गणितात  ९८ टक्के मार्क्स पडले होते. त्यात आम्ही खेड्यात राहात असल्याने आणि पगार कमी असल्याने आईवडिलांना फार बाहेर पाठवणे परवडणारेही नव्हते. शेवटी मी MBBS ला ऍडमिशन घ्यावी ही बाबांनी (आमटे) शेवटची इच्छा व्यक्त केली आणि डॉ. राणी बंग वगैरे बऱ्याच जवळच्या लोकांनी समजाविल्याने मी शासकीय महाविद्यालय, नागपुरात MBBS ला admission घेतली. खरे पाहता मला आर्टिस्ट व्हायचे होते. पण डॉक्टर बनून आर्टिस्ट बनता येते, आर्टिस्ट बनून डॉक्टर बनता येत नाही हे एकाने सांगितले. ते पटले. Perfectionist attitude असल्याने मेडिकल धमाकेदार पद्धतीने पूर्ण केले. तिथे सर्जरीत सुवर्णपदक होते, कॉलेजमध्ये दुसरी होते. मुळात अभ्यास प्रिय असल्याने एखादी गोष्ट हातात घेतली की ती perfect हवी आणि ती पूर्णत्वाला न्यायची हा एक नेहमीच ध्यास होता.

नंतर खरे प्रश्न सुरू झाले. अभ्यासापर्यंत ठीक होते. परंतु काही महिन्याच्या मेडिकल प्रॅक्टीसमध्ये माझे मन कधीच रमले नाही. या क्षेत्रात फार शिस्तीत राहावे लागते. तसेच एका छोट्याश्या केबिनमध्ये बसून पेशंटची दुःखे ऐकून त्यांना गोळ्या देऊन परत पाठवणे आणि त्यातून पैसे कमविणे हे एकंदर माझ्या गणितात बसत नव्हते. खूप दुखण्यांवर इलाज नसतात, त्यामुळे referral केले जाते. एकूणच आनंदवनाच्या मोकळ्या वातावरणात वाढल्याने आणि वैचारिक स्वातंत्र्याची सवय असल्याने इतक्या छोट्या खोलीत तेच तेच करीत Claustrophobic आयुष्य काढणे मला दुरापास्त वाटे.

पुढे बाबा (आमटे) नर्मदाकिनाऱ्यावरून आनंदवनात परत आल्याने माझी MD ची सीट मी घेतली नाही. बाबा तेव्हा नव्वदीचे होते आणि बाबांचे आयुष्य हेच आमच्यासाठी बोनस होते, त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण पुढे ढकलून त्यांच्यासमवेत काम करणे हा निर्णय घेतला.

या कालखंडावर मी बरेच लिहिले आहे. त्यामुळे पुन्हा लिहीत नाही; पण डॉक्टरी करताना सामान्य माणसाशी कनेक्ट येत नव्हता. सामान्य माणसाला जाणून घेण्यासाठी स्वतःचा डॉक्टरी कोट उतरवून वडीलांसारखे कामगारांसोबत जमिनीवर काम करणे मी अधिक पसंत केले. माझी शकले गळून पडली आणि डॉक्टरीणबाईची आमची बाई, आमची ताई झाले. सर्वांचे आशीर्वाद मिळू लागले. पण ते डोक्यात गेले नाहीत. त्यांच्या प्रेमाचे fixed deposit मी जपून ठेवले आहे .

त्यानंतर बाबा जाईपर्यंत पाच वर्षे मी आनंदवनात विविध उद्योगांत काम केले. कामगारांसोबत भरपूर अनुभव घेतला. लोकांशी समरस होऊन त्यांच्याशी जोडून घेणे शिकले. पुढे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसोबत काम करताना माझे मेडिकलचे शिक्षण अपुरे वाटू लागले. Perfectionism मध्ये अपुरेपणा हा अंतर्भूत असतो. आपल्या जीवनाच्या सर्वच अंगांना अर्थशास्त्र, राजकारण आणि पर्यावरणीय बदल स्पर्शीत असतात, त्यामुळे ते शिकणे अनिवार्य वाटू लागले. त्यामुळे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून सामाजिक उद्यमितेची पदवी घेतली. खरे म्हणजे मी माझे स्वतःचे काहीतरी सुरू करायला हवे होते पण तरीही Perfectionism हा प्रकार साथ सोडत नव्हता, त्यामुळे हिम्मत केली नाही.

खरे confusion मग सुरू झाले. २००७ ते २०१२  या काळात मधली काही वर्षे सोडली तर बऱ्याचदा टोकाचे निराशावादी विचार माझ्या मनात येत असत. माझी डिग्री MBBS ची आणि पदव्युत्तर शिक्षण सामाजिक उद्यमितेत. त्यामुळे एकतर लोकांना वाटे की ,ही ना धड डॉक्टर आहे ना धड उद्यमशील. मी माझा काही स्वतःचा वेगळा व्यवसायही त्या काळात सुरू केला नव्हता. कारण मलाही स्वतःला आयुष्यात नेमके काम ‘कुठल्या जागी’ सुरू करायचे कळत नव्हते. लग्न झालेले होते आणि नवऱ्याची नोकरी सतत फिरतीची होती. पुन्हा कामात सगळेच मुद्दे महत्त्वाचे वाटत. एखाद्या मुद्द्यावर काम करतो म्हटले तर दुसऱ्या कामावर आपण अन्याय करतो आहे, असे वाटे. त्यातच नातेवाईकांकडून मूल कधी होऊ देणार याचे भयंकर प्रेशर. टोकाचे विचार येत पण त्यात एखादा आशेचा किरण दिसेच. ते किरण मी जमा करीत गेले. खचत होती पण पुन्हा वरही येत होती .

कधी टोकाचे निराशावादी विचार येत असताना मानसिक आरोग्यतज्ज्ञ मित्रांचे सल्ले घेतले. पण चर्चेअंती परिस्थिती ही मानसिक आरोग्याशी निगडित नसून मी वेळोवेळी घेतलेल्या निरनिराळ्या शैक्षणिक मार्गांमुळे होती हे आढळून आले. त्यामुळे तेही उपयोगी पडले नाही.

२०१२ ते २०१४  मी दिव्यांग मुलांसोबत शिक्षणात काम केले. आनंदवनची मूकबधिर शाळा शून्यातून महाराष्ट्रातील नावाजलेल्या शाळांपैकी एक आम्ही बनवली. तरीही इतर सामाजिक निकडीच्या मुद्द्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आहे ही  सल मनात सतत होती. सर्व काही होते पण एकंदर perfection जमत नव्हते. त्यामुळे संपूर्ण आनंद होत नसे.

२०१४ साली गरोदर असताना मला बराच वेळ मिळायचा. तेव्हा कामही कमीच झाले. त्या काळात बरेच विचारमंथन करून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्यात एक महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे perfectionism मुळे आलेली ‘भीती’. काहीही नवे काम सुरू केले तर चांगलेच झाले पाहिजे हा एक भाव, चुकता कामा नये ही perfectionist वृत्ती आणि ते काम सतत पुढे चालू राहिले पाहिजे हा ध्यास. यातून इतकी समीकरणे बनत की मी नवी कामे हाती घ्यायलाच घाबरत असे. अनेक नवीन नवीन कामांची स्वप्ने त्या काळात बघितली पण एकही काम सुरू केले नाही. भीतीमुळे हे प्रत्यक्ष परिस्थितीचे ‘विदारकीकरण’ आपण करतो तसे काहीसे झाले होते. माझ्याकडे पद नाही, प्रोजेक्टला आवश्यक पैसे नाहीत आणि मुख्य म्हणजे काय करायचे ठरत नाही अशी बरीच excuses येत होती. त्यात बराच काळ वाया गेला. मूलही लहान होते त्यामुळे लोकांनी समजून घेतले. पण मुळात स्वस्थ बसण्याची प्रवृत्ती नसल्याने मला फारच guilt complex आला होता. मला FOMO ( fear of missing out) झाला होता.

परंतु बाळ झाल्यावर काय माहिती, माझ्यात काहीतरी फरक पडत गेला. लहान मुलांकडून एक शिकायला मिळाले की ते जे करतात ते कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता करतात. त्यांना भीती नसते आणि perfection ची ओढही नसते. ते जे करतात त्यात खरी निरपेक्ष भावना असते.ते प्रोसेसचा आनंद घेतात आणि लगेच विसरून सर्व मोडून नवा ध्यासही घेतात. भूतकाळाचे ओझे नसते आणि भविष्यकाळाची चिंता नसते. ती वर्तमानकाळात जगतात. हा साक्षात्कार झाल्यावर मी माझ्या perfectionism च्या भीतीवर विजय मिळविण्याचे ठरविले. ते कठीण होते. ह्या विचारातही बरेच आठवडे गेले.

त्या काळात त्या बाबतीत बरेच विचारमंथन केले. त्यातून ते लिहून काढावे असे वाटले. त्यात एकतर मनातील सर्व perfectionism ची भीती मी कागदावर लिहून काढली. ती दोन भागात विभाजली. कामाबद्दल आणि स्वतःबद्दल. त्यात साधारण २० मुद्दे होते. त्यानंतर त्याचे ‘आपल्या हातातील’ /factors within control आणि ‘आपल्या हाताबाहेरील’ / factors without control मुद्दे असे विश्लेषण केले. यातून असे लक्षात आले की हातातील मुद्दे ( fwc) हे हाताबाहेरील मुद्द्यांपेक्षा(fwoc) जास्त होते. दुसरे म्हणजे जेव्हा स्वभावातील आंतरिक आणि बाह्य मुद्द्यांचे विश्लेषण केले त्यातही आंतरिक भीतीचे मुद्दे ( internal barriers) बाह्य भीतीदायक मुद्द्यांपेक्षा ( external barriers) जास्त निघाले.

कामात असलेले हाताबाहेरील कामातील मुद्दे (fwoc) आणि स्वभावातील बाह्य मुद्दे ( external barriers) थोडे महिने बाजूला ठेवून कामाशी सुसंगत असे हातातील मुद्दे (fwc) आणि स्वभावातील आंतरिक मुद्दे( internal barriers) यावर काम करायचे ठरविले.

उदाहरणार्थ पर्यावरणात आपण काही भरघोस योगदान द्यावे अशी मनापासून तळमळ होती. त्यात स्थानिक झाडे हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण भरघोस करायचे हे perfectionst ध्येय असल्याने पराजित होऊ ही भीती निर्माण झाली आणि आयुष्यातील 33 वर्षे काहीच केले नाही.

नंतर आत्मपरीक्षण केल्यावर ठरविले की आपण या कामाची सुरुवात अगदी छोट्या कामापासून करायची आणि ते काम फुलू द्यायचे. त्यात काहीच फारशी मोठी अपेक्षा स्वतःकडून ठरवायची नाही. चुकलो तर accept करून पुढे चालायचे. हे माझ्यासाठी कठीण होते. पण मी ते ठरविले.

माझे आजोबा बाबा आमटेंच्या जन्मशताब्दी वर्षात, म्हणजे डिसेंबर २०१३ साली जन्मलेल्या माझ्या बाळाच्या हाताने मी दर महिन्याला एक वृक्ष लावायचे ठरवले. हे realistic ध्येय होते. उद्देश असा होता की तो पाच वर्षाचा होईपर्यंत आम्ही त्याच्या हस्ते साठ झाडे लावली असतील आणि जर तो पन्नास वर्षाचा होईपर्यंत हे सुरळीतपणे करू शकला तर त्याने सहाशे झाडे लावून हजारो पशुपक्ष्यांना अन्न व निवारा दिले असेल ! त्याला कार्बन neutral करणे एवढेच ध्येय होते.

दर महिन्याला एकदा झाड लावायचे कारण म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी मी समाजाचे व निसर्गाचे काही देणे लागतो हे त्याच्या स्वत:च्या मनावर लहानपणीच बिंबवणे आणि आयुष्यभर जबाबदारीने ती शपथ पूर्ण करण्याची आठवण त्याला राहणे. त्याला कदाचित ते पुढे जड जाईल असे वाटले पण माझ्या आईने मला काय शिकविले हे जेव्हा तो आठवेल तेव्हा निसर्गाला अन्न व समाजाला ऑक्सिजन या सोप्या शब्दात त्याला माझी स्मृती राहील एवढाच विचार त्यामागे ठेवला.

सुरुवात केली, झाडे लावत गेलो. कधी २ लावली तर कधी ४ महिने लावलीच नाहीत. पण खंड पडू दिला नाही. वैयक्तिक पातळीवर सुरू ठेवले. एकदा त्याने १ वर्ष काहीच लावले नाही आणि मग एकदम ३५ झाडे लावली.

या संकल्पनेतून अतिशय प्रखर अशा  तापमानात त्याने ७२ महिन्यात आजवर ९३ झाडे लावली आणि ध्येय अधिक प्रमाणात पुढे नेले. हे सगळं आम्ही खेळीमेळीने सर्व केले. कुठलेही टेंशन नव्हते. तो मातीत खेळत होता ते त्याला पुरेसे होते.

या सगळ्यात माझ्या आयुष्यात शुभेन्दू आणि सनी ही दोघे आली. त्यांच्याशी गट्टी जमली आणि जंगले लावीत गेलो.  सांगायचा उद्देश हा की मी यावर्षी माझ्या गटासमवेत सुमारे साडेपस्तीस हजार झाडे असलेली सहा मियावाकी जंगले

केवळ २५ महिन्यात विकसित झालेले मियावाकी जंगल

आणि इतर पद्धतींची झाडे लावली आहेत. त्याबाबतीत Youtube वर Con’Serve’ with love म्हणून एक documentary केली आहे. आम्ही ८५ जातींच्या दुर्मिळ झाडांची gene bank उभी केली आहे आणि नैसर्गिक अन्नसाखळी पुन्हा restore करण्याचा प्रयत्न करतोय. या जंगलात खूप प्राणी आलेत, परवाच एक बिबट्या येऊन गेला.  म्हणजे अन्नसाखळी बनते आहे.

मुद्दा हा की यात आम्ही भान ठेवून योजना आखल्या आणि बेभान होऊन अंमलात आणल्या. खूप अडचणी आल्या. पण Perfectionism बाजूला ठेवल्याने आणि Micromanagement सोडल्याने सर्वांचा हातभार लागला आणि प्रकल्प उत्कृष्ट बनला. यात एक मोठी ग्रँट आम्ही नाकारली कारण ग्रँट म्हणजे पुन्हा Perfectionism आणि पुन्हा तोच त्रास. (हा प्रकल्प आता देशपातळीवर गेला आहे. जगभरातले हजारो लोक तो बघायला येत आहेत.)

दुसरे उदाहरण पेंटिंगचे. मी काही चित्रकला शिकलेली नाहीये पण पेंटिंग करायचेच हे ठरविले होते. मला आठवते नामवंत चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णींसोबत  मी बोलले होते की २०१४ ला  बाबांच्या जन्मशताब्दी वर्षात मला आनंदवनची १०० पेंटिंग्ज करायची आहेत. कोणत्या भरवशावर माहीत नाही. पण केले काय? माझे चित्र perfect झाले पाहिजे या भीतीपायी काहीच केले नाही.

मुलगा दीड वर्षांचा झाल्यावर कोणीतरी आम्हाला acrylic रंग दिले होते ते मी त्याला दिले आणि तो सुटलाच. अंगभर रंग लावून रंगांचा बाजार त्याने मांडला. बोटांनी सगळा कॅनव्हास रंगवला. शिकण्यासारखे असे होते की तो प्रोसेस Enjoy करत होता, त्याला ते पेंटिंग कोणाला दाखवायचेही नव्हते. चुका झाल्या तेही बघायला कोण होते? मग मीही ठरविले की आपण करायचे. त्याकाळात खूप निराशावादी विचार डोक्यात होते. कामाच्या स्वरूपाने आणि काही मोठ्या issues मुळे डोक्याला त्रास होत होता. एक दिवस मी ब्रश घेतला आणि कॅनव्हास रंगवला. काहीपण केले. काहीपण. कोणीच मला judge करणार नव्हते त्यामुळे मी मुक्त होते. मग दुसरे केले ,तिसरे केले. मग एकदा फेसबुकला टाकले. ते लोकांना आवडले.  माझ्या मैत्रिणीला ते पाठवत असे पण ती फक्त रंगांशी खेळायला सांगी. End result चा विचार करू नको, असे सतत सांगे.

रंगांचा पोत कळायला, त्यांचे वागणे कळायला मी खूप प्रयोग केले. ‘गूगल’ गुरू आणि मी असे दोनच. मांडायला फेसबुक. करत गेले तसे जमत गेले. दोन वर्षे नसती रंगांशी खेळले. आज काही पेंटिंग्ज आंतरराष्ट्रीय cultural exchange मध्ये जाणार आहेत. आज त्याचा अत्यानंदही नाही आणि दुःखही नाही. ही चित्रे माझी करताना मी किती चुकवली आणि कशी ती नीट केली हे माझ्या घरच्यांनाच माहिती आहे.

मुलाकडून यात हे शिकले की, नैसर्गिक कलाविष्कार कसा करावा. त्याला फळाची अपेक्षा नसल्याने तो काहीही काढू लागला आणि ते सुंदर होऊ लागले. माझे मात्र चुकायचेच आणि अजूनही चुकते. कारण मला अजूनही फळाची अपेक्षा न धरणे जमलेले नाही.

माझे पाहून इतर अनेकांनी पेंटिंग सुरू केले. यातून मी दिव्यांग मुलांना शिकवणे सुरू केले. नकळत एक सुंदर प्रोसेस घडत गेली. आनंदवनात नवीन Products आम्ही आणू शकलो.

या कलाविष्कारात इतका आनंद मिळतो आहे की आपण स्वतःला विसरून जायला पेंटिंग करायचे आणि विसरून जायचे हेच ध्येय ठेवले. यातून माझ्या मानसिक ताणावरही खूप फरक पडला. कोण काय म्हणेल याची चिंता सोडली.पेंटिंग करताना फक्त वर्तमानात जगायचे हे ठरविले.

असे अनेक क्षेत्रात काम करत गेले, एका आयुष्यात अनेक आयुष्य जगत गेले. खूप Credentials मिळाली पण त्यात अडकून न राहता शिकत गेले.अनेक डिग्र्या घेत गेले. तिथे किती मार्क्स मिळतील यापेक्षा प्रोसेसचा आनंद घेत गेले. मिळालेले ज्ञान वापरत गेले.

आज मी perfectionism वर पूर्ण विजय मिळवला आहे का? नाही. एकतर अपूर्णत्वाची भावना अजूनही आहे. पण त्यातूनच हे इतके मिळवता आले. पैसे हाती नाहीत, पण एक झाले…समाधान मिळू लागले. उद्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणात मागे वळून पाहताना काय दिसेल हे मला Previsualise करता येऊ लागले. त्या ध्येयावर काम करीत असताना एक आंतरिक समाधान येऊ लागले.

यश मिळाले, नाव झाले पण ते गौण आहे. त्याने खरे काय झाले? Perfection चे मानसिक ब्लॉक्स दूर झाले. स्वतःची angioplasty झाली म्हणा ना. यात खूप आजारपणं आली, मानसिक ताण आले, पण मी तो ध्येयाचा रस्ता सोडला नाही. नदीसारखी वाहात राहिले. रस्त्यात मोठे दगड आले तसे त्याला अलगद वळसा घालून पुढे गेले . पण चालत राहिले. सतत चालत राहिले. वर्तमानात जगत राहिले.

सांगायचा उद्देश हाच की Perfection चा ध्यास आणि समाज काय म्हणेल ही भीती स्त्रियांना अनेक कामापासून दूर ठेवते. जर भीतीवर नीट काम केले तर आपण आकाशही जिंकू शकतो. पण त्यातही आपणच अडचणी उभ्या करतो. पळपुटेपणा अंगिकारतो. त्या भीतीचे व्यवस्थित analysis करून त्यावर काम केले तर खूप मोठा पल्ला आपण गाठू शकतो.

पेंटिंगने मला खूप आनंद दिला

दुसरे म्हणजे खूप कल्पना मनात असल्या तरी ते चांगलेच असते. त्यातून काही कल्पना नक्कीच उत्तम असतात. त्यातली एकच सर्वोत्तम निवडून करायची… म्हणजे पुन्हा त्रास आणि anxiety. त्यापेक्षा बऱ्याच घेऊन काम करायचे. Fail झालो तरी शिकायचे पण करत राहायचे. एकावेळी अनेकांवर काम करता येते. ८ तास आपण काम करतो, ८ तास झोपतो, उरलेल्या ८ तासांत आपण काय करतो त्यातूनच आपले आयुष्य घडते.

आळस ही मानवी प्रवृत्ती आहे. पण एक अभ्यास असे म्हणतो की बॉर्डरवर असलेले आळशी लोक जास्त निर्मितीक्षम असतात. खूपदा  काय होते की आपण उगाच आळस करतो. अगदी डेडलाईन समोर उभी असते. टास्क ऍक्टिव्ह असते. काही दिवस असतात आणि आपण काम केलेले नसते. अश्यावेळी अचानक आपल्याला नवीन कल्पना सुचतात आणि त्यामुळे आपले क्षितिज विस्तारते. जसे परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत अभ्यास उत्तम होतो. कारण या दिवसांत आपण नवीन कल्पना स्वीकारायला मोकळे असतो.

खूप क्षमता असलेल्या लोकांना क्षमतेला न्याय देता येईल असे काम समोर दिसत नाही म्हणून त्यांना काही करावेसे वाटत नाही त्याला आपण आळस म्हणतो का हाही एक प्रश्न आहेच.

कधीकधी मुद्दाम एखादी गोष्ट पुढे ढकलल्यानेही नवीन कल्पना सुचतात. कालसुसंगत अशा त्या कल्पना असतात. आळस कधीकधी आपल्याला Nonlinear fashion मध्ये एकदमच नवीन कल्पना सुचवितो. वेगळ्याच कल्पना असतात त्या.

शेवटी म्हणतात ना,’ We suffer more often in imagination than reality’. ‘करके देखो’ असे गांधीजींनी लिहिले आहे. काय हरकत आहे करायला? फसलो तर कोण बोलेल? जास्तीत जास्त नातेवाईक आणि समाज. पण त्यामुळे काहीच करायचे नाही, असे नाही.  आपल्याकडे कोणी लक्ष देत नाहीये, त्यामुळे मस्त आयुष्य जगायचे आणि वर्तमानात राहून Process enjoy करायची हेच मी तरी ठरविले आहे.

आज मी खूप खूश आहे. माझ्या Perfectionism वर मी काही अंशी विजय मिळवला आहे. प्रचंड वार होत आहेत पण तरी वर्तमानकाळात जगत असल्याने मजेत जगते आहे. मला माहिती आहे माझा रस्ता योग्य आहे. तेवढे पुरेसे आहे. प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ जेन गुडाल म्हणते:

Lasting change is a series of compromises. And compromise is all right, as long your values don’t change.

यातूनच मी चालते आहे. नदीसारखी… सर्वांना सामावून घेत. हेच माझ्या चौकटी मोडून जगण्याचे रहस्य आहे.

‘आनंदवन’ मध्ये विकसित केलेल्या मियावाकी जंगलावरील ही documentary पाहायला विसरू नका- https://www.youtube.com/watch?v=voElm6KRXZo&t=17s

डॉ. शीतल आमटे यांचा ‘विक्रमी’ लेख नक्की वाचा- शर्विलचे स्क्रीन ऍडिक्शन तोडताना…- http://bit.ly/2YN2CFo

(लेखिका आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

[email protected]

 

Previous articleगाडगेबाबा मी आणि सोशल मीडिया
Next articleउनसे मोहब्बत कमाल की होती है.. जिनका मिलना मुकद्दर मैं नहीं होता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

 1. शीतल, *चौकटी मोडताना* हा लेख खूप छान लिहिला आहे.

  संस्थेचं एवढं मोठं काम करत असताना काम सुरू करण्याआधीची मनाची द्विधा मनस्थिती खूप प्रकर्षानी जाणवते. सतत ध्यासापोटी काम करणाऱ्या माणसांमध्ये कितीही काम केलं , ते छान असेल का किंवा ह्या पेक्ष्या जास्त छान होऊ शकलं असतं का? ही एक भावना असते, थोडीशी परिपक्व पण अपूर्ण कडे झुकणारी ती भावना असते. अशी भावना आसक्त लोकांमध्ये स्वतः ला नवीन उंचीकडे देखील नेते. कदाचित ह्या भावनेतून नवीन नवीन कलाकृती (कामातल्या आणि कलेमधल्या) जन्माला येत असतात.

  लेखामध्ये अभ्यासात हुशार असल्यामुळे व्यवसायात येऊ शकणारी गती मात्र त्याच्या पुढे असणारी आणि न पटणारी करिअर ची दिशा खूप व्यवस्थित समजते. आमटे कुटुंबियांची एक वेगळं काही काम करण्याची आसक्ती आणि त्यातून डॉक्टरकी मध्ये न रमता एका नवीन विश्वात पाउल टाकण्याची धडपड, त्यात पाऊल टाकलं तर यशस्वी किंवा स्वतः ला committ केलेल्या perfection प्रमाणे काम करता येईल किंवा नाही ह्याची तगमग समोर येते.

  माणूस जेव्हा खूप अस्वस्थ असतो तेव्हा बरेच वेळेला आजू बाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. (मूल झाल्यावर निरपेक्ष पणे केलेली कामे स्वतःला फार आनंद देऊन जातात). आणि अश्या पद्धतीनी काम केलं तर आयुष्यात सगळ्याच गोष्टीचा आनंद घेता येतो आणि त्या शिकवणी मधून कसे बदल (painting, चित्रकला) घडत गेले हा प्रवास देखील प्रामुख्याने समोर येतो.

  आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी मध्ये आपण काही गोष्टी स्वतः करता analyse केल्या तर बरेच problems हे आपल्या आवाक्यातले असतात आणि त्यावर मात केली तर लक्षणीय प्रगती करता येते हे देखील समजून येतं.

  एकदा ध्येयाकडे वाटचाल सुरू केली आणि छोट्या अवधी कडे लक्ष न देता जर मोठ्या अवधी मध्ये काय गोष्टी सफल होत आहेत ह्या वर लक्ष ठेवून काम केलं तर आपल्या अंतर्गत गोष्टींवर (precastination / anxiety) कसा ताबा मिळवता येतो हे ह्या लेखामधून वाचकांच्या समोर येतं.

  कला माणसाला खूप काही शिकवून जाते. कला कधी स्वतः करता कधी समोरच्या करता असते. मात्र ती जेव्हा स्वतः करता असते तेव्हा त्या कामात समाधान मिळणे त्यातून नवीन प्रेरणा मिळणे आणि त्या उर्जेतून करत असलेल्या दुसऱ्या कामात देखील काही नवीन संकल्पना सुचणे हा न लिहिलेला भाग देखील समोर येतो.

  कल्पतरू वृक्षासारखं मन विशाल करून देत राहिलं की बऱ्याच गोष्टी साध्य होतात आंतरिक मानसिक आणि सामाजिक देखील, हे हा लेख वाचकांना सूचित करतो.

  आनंदवन कुटुंबाला परत एकदा माझ्या कडून अभिवादन!!!

 2. “चौकटी मोडताना”… समर्पक शीर्षक… प्रेरणादायी लेख…

  प्रत्येक मुलगी, स्त्री तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वळणावरील स्वतःच्या अनुभवांची सांगड कुठे ना कुठे लेखातील डॉ शीतल आमटे यांच्या प्रवासाशी घालू शकेल असा लेख.

  आयुष्य जगताना अनेक छोट्या मोठ्या अडथळ्यांना पार करत प्रत्येक स्त्री ला स्वतः च्या आयुष्याला (परिपूर्ण नसला तरी) मुक्त आकार द्यायला हा लेख खूप काही शिकवतो. स्वतःची ओळख आणि आनंद शोधताना काही चौकटी मध्ये येणारच, त्या मोडताना मिळणारे मनोबल म्हणजे हा लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here