जगन्मिथ्या म्हणजे तरी काय?

साभार: साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

धर्मासारख्याच विचारसरणीही माणसांना एकारलेपण व श्रद्धांदपण आणत असतात. आपल्या श्रद्धेएवढे खरे दुसरे काही नाही. इतरांचे असणे हे निव्वळ खोटेपण, उर्मटपण व माजोरेपण. ते एकदा उतरले वा उतरविले की तेही आपल्याच सोबत येतील या व अशा श्रद्धा माणसांचे कळप बनवितात. जोवर ते कळपातले अस्तित्व मन व मेंदूचा ताबा घेते तोवर ही माणसे त्यांचा एक निर्जीव भाग बनतात. हे निर्जीवपण निकोप वा निष्पाप मात्र नसते. ते माणसांना प्रसंगी हिंस्त्र व इतरांवर आपल्या श्रद्धा आणि मते लादायला लावते. तसे करताना ते युद्धालाही प्रवृत्त होतात. माणसांच्या जातीचा इतिहास अशा युद्धांचा व त्यात पडलेल्या बळींच्या कहाण्यांचा आहे. श्रद्धा व मते यांची ही बेहोशी दीर्घकाळ व कधीकधी पिढ्यान्पिढ्या टिकते. पण तिलाही एक आयुर्मान असते आणि ती कालांतराने कमी होत संपत जाते. (कधीतरी मग तिच्या प्रतिकियाही त्याच समूहातून उठू लागतात.)

ती बेहोशी व नशा उतरली की मग त्यांना त्यांचे स्वत: असणेच निरर्थक वाटू लागते व आपण काहीच व कशाहीसाठी उरलो नाही असे नैराश्य आणत असते. राजकारणात भूमिका घेणारी, धर्मकारणातले एकांगीपण अंगिकारलेले किंवा कुठल्याशा बुवाबाबाच्या मागे लागून सेवेकरी बनलेली माणसे अशी असतात. त्यांचे तसे असणे कीव करायला लावणारे आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर आलेले निरर्थ जीणेही दयनीय असणारे. हे एकाकीपण त्यांनी ओढवून घेतलेले असते. त्याचे खोटे समर्थन करण्यातच मग त्यांची असली नसली बुद्धिमत्ता खर्ची पडत असते. आजचा काळ धर्मांचे हे एकारलेपण संपण्याचा व त्यावर विवेकाची मातब्बरी होत असल्याचा आहे. जुने आंधळेपण जाऊन त्याची जागा डोळसपणाने घेतलेली आहे. आता पोग्रोम्स संपले आहेत. शिया व सुन्नी यांच्यातील युद्धे थांबली आहेत. अस्पृश्यता व वर्णविद्वेष हे गुन्हेगारीचे विषय झाले आहेत. या बदलांमुळे ज्यांच्या अधिकारांना फटका बसला ती माणसे कधीकधी त्याच जुन्या व्यवस्थांच्या संरक्षणार्थ तटबंद्या उभारताना दिसतात. पण त्यांचे आयुष्य ओसरत असल्याचे त्यांनाही कुठेतरी जाणवतच असते.

वर्ग, समाज आणि कौटुंबिक परंपरा व्यक्तींवर – त्यांना एकाकीपण येत असते वा कधीतरी मी म्हणून जगायला तयार राहावे लागते- याची शिकवण देत नाहीत. किंबहुना व्यक्तीचे वेगळे असणे, अगदी व्यक्ती असणे हीच बाब या संस्थांना मान्य नसते. त्यांना आपले संघटन त्या वेगळेपणाहून अधिक महत्त्वाचे व मोलाचे वाटते. त्याचमुळे मी, मी म्हणूनही कोणीतरी आहे हे अनेकांच्या बहुधा लक्षातच येत नाही.

या संदर्भात प्रस्तुत लेखकाच्याच एका कादंबरीतला प्रसंग सांगण्याजोगा. एका क्षणी तो तिला म्हणतो, –  अगं, या प्रसिद्ध घराण्याची सून म्हणून, या उद्योगशील नवर्‍याची पत्नी म्हणून आणि तुझ्या त्या गोड मुलीची आई म्हणून जगत असतेस. तुझ्या डॉक्टरीचाही एक भार तुझ्यावर असावा. या सार्‍या तुझ्या भूमिका आहेत. त्यात तू आहेस. पण त्या म्हणजेच तू नाहीस. कधीतरी या भूमिकांतून बाहेर पड. काही क्षण, काही काळ आणि मग स्वत: होऊन जग. तू, तू हो. – त्यावर ती निराशपणे म्हणते, –  ‘मी, मी म्हणून काही आहे हे मला कधी कळलेच नाही. या भूमिकांखेरीज मी काही खरोखरीच असते काय, की माणसांनी केवळ भूमिकाच जगायच्या असतात.’ –

सारे पाहून, अनुभवून आणि जगूनही आपल्याच अभेद्य कोषात राहणे काहींना जमते. आपले – सामर्थ्य-  त्या कोषाआड राहून ते जगाला दाखवितात. मात्र प्रत्यक्षात हे कोष कमालीचे विसविशीत व कच्चेही असतात. त्यातही एक पायरी निखळली की त्याचा सारा संभार कोसळतो. ही स्थिती इतरांहून त्यांनाच अधिक अस्वस्थ व व्यथित करणारी असते. आपले झाकलेले उघडेपण मग त्यांना प्रकाशात दिसू लागते. म्हणून ही माणसे नवनवे कोश स्वीकारतात. एक कोषाभोवती दुसरा, मग तिसरा अशी त्याची तटबंदी करण्याचा प्रयत्न करतात. पण गुलालाची खूप जाड खोळ भोवती असतानाही आतली मूर्ती एकटी व एकाकीच असते. तशीच ही माणसेही एकाकी असतात. ज्यांना सांगावेसे वाटावे असे विश्वासाचे कोणी असत नाही आणि जे असतात ते आपले दुबळेपण व आपलेपण कोणत्या अर्थाने घेतील याचा त्यांनाच विश्वास वाटत नसतो. खरे तर तो त्यांना स्वत:विषयी वाटणारा अविश्वासच असतो.

राजकारणात, समाजकारणात आणि अन्य सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर अशी एकाकी माणसे सर्वत्र असतात. त्यांना छेडायचे नसते, विचारायचे नसते, कधी कधी त्यांनाच या कोषातून बाहेर यावेसे वाटले तर ते सहानुभूतीनेच नव्हे तर आपलेपणाने समजून घ्यावे लागते. ज्यांना असे खुलता येत नाही ती माणसे सारे आयुष्य त्या अदृश्य खोळीआडच काढत असतात. बहुतेक माणसे अशीच असतात की याहून वेगळी-  मोकळी किंवा हे कोषही यशस्वीपणे दडवता आलेली. त्यांची खोळ कुणीतरी काढली नाही तर ती तशीच कायम राहते. ही माणसे क्वचित कधी उलगडल्यागत होतात. पण मग तो उलगडलेला भाग झपाट्याने मिटूनही टाकतात. मग पुढचे प्रश्न वा संवादच थांबतात. सार्वजनिक जीवनात जगणार्‍यांची जर ही स्थिती तर त्यात नसलेल्या अंगणबद्धांची अवस्था कशी असेल- एका सायकॉलॉजिक कौंसेलिंग करणार्‍या महिलेने फार पूर्वी सांगितलेली ही गोष्ट आहे. तिच्याकडे येणार्‍या बहुतेक स्त्रिया दरदिवशी नवर्‍याचा मार खायच्या. त्यातल्या काही बंडखोर आणि घटस्फोटाची भाषा बोलणार्‍या तर काही हे स्त्रीचे प्राक्तन व नवर्‍याचा अधिकार म्हणून गप्प राहणार्‍या. अगदी जखमी होऊन रक्तबंबाळ होतपर्यंत मार खाणार्‍या सुशिक्षित स्त्रियांचाही यात समावेश होता. बायकोला मारहाण करण्याआधी तिला विवस्त्र करणे व ती बाहेर जाऊ शकणार नाही असा बंदोबस्त करणे हाही त्यातल्या काही दुष्टांचा व्यवहार असतो…प्रस्तुत लेखकाच्या उपरोक्त कादंबरीत आलेली स्त्री एवढ्या दुष्टाव्याचा बळी नव्हती. तरीही तिचे कोंडलेपण सातत्याने जाणवणारे होते. एकदा तो तिला म्हणाला, –  अगं, तुझ्या या घराला दारं आहेत.-  त्यावर ती म्हणाली, – दारं आहेत, पण बाहेर जायचा रस्ता नाही. –

-माय फ्युडल लॉर्ड- हे  तेहमिना दुर्रानी हिचे आत्मचरित्र ज्यांनी वाचले त्यांना स्त्रीची भीषण कहाणी या ठिकाणी आठवावी. कोणतेही कारण नसताना तिचा, पश्चिम पंजाबचा (पाकिस्तान) गव्हर्नर असलेला नवरा तिला रात्री दारू पिऊन मारायचा. तोच त्याचा छंद होता. या मारहाणीला कंटाळलेल्या त्याच्या पत्नीनेच मग नाईलाजाने त्याच्याशी एक करार केला.  –  मारहाणच करायची, तर खुशाल कर. पण चेहर्‍यावर व गळ्यावरती करू नको. कारण उद्याचे त्याचे व्रण इतरांना दिसतील. – ही असहाय्यता, बेडी, तुरुंग संस्कारांचे बंधन, तिचे दुबळेपण, नात्याची प्रतिष्ठा की एकूणच सगळ्या स्त्रीजीवनाची असहाय्यता.

हा प्रकार पुरुषांच्याही वाट्याला येणारा आहे. मात्र त्याची चर्चा होत नाही आणि त्यांचे कौंसेलिंगचे वर्गही होत नाहीत. अशा वर्गात जाणे हा आपल्या कमीपणाचा भाग आहे आणि त्यातून आपले एकाकी व दुबळे असणे उघड होणारे आहे असे त्यातल्या अनेकांना वाटत असते. पूर्वीच्या गुलामांचे जगणे कसे होते, आपल्यातील गावकुसाबाहेरच्या माणसांची अवस्था कशी होती. गुलामांना आत्मा नसतो, असे अ‍ॅरिस्टॉटलही म्हणाला. त्याला त्यांचे माणूस असणे मान्य नव्हते काय- ते तसे नसेल तर १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत जगात झालेल्या सर्वच पिढ्यांना ते मान्य नव्हते असे म्हणावे लागेल. गुलामांचे बाजार केवळ आफ्रिकेत वा पाश्चात्त्य देशातच नव्हते भारतासाख्या पौर्वात्य देशातही होते. मीना बाजार हाही त्याचाच एक चेहरा होता की नाही- याही पुढे जाऊन मध्ययुगातील युद्धबंद्यांच्या कथा सांगता येतील. त्यांच्या तर लाखांनी कत्तली होत. त्यांच्या नावाने स्मृतिस्तंभ उभारणे वेगळे आणि त्यांचे त्या काळचे मन जाणून घेणे आणखी वेगळे. आपल्या संरक्षणासाठी सीमेवर लढणार्‍यांची मानसिकता तरी सामूहिक असते की एकाकी. – लेहलद्दाख भागात फिरत असताना तेथील खर्दुंगला या खिंडीपर्यंत जाता आले. तेथे भेटलेला अमरावती जिल्ह्यातला आरमळ नावाचा एक सैनिक म्हणाला, –  ‘साहेब, कसले हे आयुष्य-  प्राणवायू नाही, राहायला उबेची जागा नाही, दिवसभर उभे राहायचे आणि उत्तरेकडच्या बर्फाळ मार्गावर नुसतीच नजर लावायची. यात कुठे घर आहे आणि घरची माणसे. उभे राहणे अशक्य झाले की थंडगार तंबूत नुसतेच पडायचे आणि तुम्ही त्या विविधभारतीवर ऐकविलेली आमची स्तृतिपर गाणी ऐकायची. कशाचे जगणे, आणि या जगण्यालाच देशभक्ती म्हणायचे.’ –   त्याच्या देशभक्तीला नमन करण्याखेरीज आपण तरी काय करतो-  अशी ठिकाणे आपल्यालाही आपले निराधार व एकाकी असणेच जाणवून देतात की नाही-  तात्पर्य हिमालयावर असो वा त्याच्या तळाशी, त्या सार्‍याच जागी असे एकाकीपण पाहता येते.

हे एकाकीपण वा दुर्लक्षित असल्याचे जाणवणे फक्त व्यक्तींच्याच वाट्याला येते असे नाही ते संस्था-संघटनांच्याही प्राक्तनात असते. जरा डोळसपणे समाजाकडे पाहिले की या संस्था-संघटनांचे व त्यातील व्यक्तींचे असे एकटेपण स्पष्ट दिसू लागते. राजकीय कार्याचे वा समाजसेवेचे कंकण बांधून असलेल्या संस्था-संघटनांनाही समाजातील बदल व त्याची बदलणारी मानसिकता लक्षात घेता आली नाही की त्यांचेही असे होते. आजच्या सर्वोदयाची व गांधीवादी संघटनांची स्थिती अशी आहे. एकेकाळी अतिशय शक्तिशाली असलेल्या शेतकरी संघटनेचे अस्तित्वही आता शोधावे लागते. राज्या-राज्यात अशा संपलेल्या वा संपत असलेल्या संघटनांची नावे येथे सांगता येतील. हेच प्राक्तन येत्या काही काळात संघावरही येण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. सगळ्या विचारसरणी आणि तत्त्वज्ञानाचा शेवट होत असल्याचा हा काळ आहे असे म्हटले जाते. कारण या सगळ्या गोष्टी समूहांच्या मानसिकतेवर म्हणजे श्रद्धेवर उभ्या आहेत. आताच्या जगाची वाटचाल व्यक्तिस्वातंत्र्याच्या व व्यक्तीच्या स्वयंभू होण्याच्या दिशेने सुरू आहे. या काळात अशा संघटना व त्यांचे नेते कालबाह्यच होतील.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  व लोकनेते यशवंतराव चव्हाण पुढे देशाचे संरक्षणमंत्री झाले. गृहमंत्री, अर्थमंत्री यासारखी मोठी पदेही त्यांनी भूषविली. पण १९६९ मध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या दुभंगात त्यांनी केलेली गटाची निवड (त्यांना नैतिक वाटत असली तरी) राजकीयदृष्ट्या चुकीची ठरली. ते संघटन कॉंग्रेसच्या बाजूने गेले आणि इंदिरा गांधींचा विजयी होणारा पक्ष त्यांना दूरसा झाला. पुढे इंदिरा गांधींनीच त्यांना दूर सारले. केंद्रीय मंत्र्याचे पद भूषविणार्‍या त्या लोकनेत्याला त्यांनी सरकारी नोकरांचे पगार ठरविणार्‍या कुठलाशा फुटकळ आयोगाचे अध्यक्षपद दिले. त्यांचे अनुयायीही मग त्यांच्यापासून दूर झाले. एवढे की दिल्लीत राहता येत नाही आणि महाराष्ट्रात येता येत नाही अशी दारुण अवस्था त्यांच्या वाट्याला आली. त्या काळात वेणुताईंना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात –   ‘सारा दिवस रिकामा असतो. कधीतरी बाईसाहेबांचे बोलावणे येते तेव्हा जातो. त्यांना हवा तो सल्ला देतो आणि परत येतो. मग पुन्हा नव्या बोलावण्याची वाट पाहतो. – .. त्यांचा शेवटही एकाकी झाला. महाराष्ट्राचा कोणताही पुढारी त्यांच्या जवळ नव्हता. त्यांचे शिष्योत्तमही तिकडे फिरकले नाही. हीच एकाकी स्थिती इतरही अनेक नेत्यांवर त्यांच्या पडत्या काळात आली. जॉर्ज फर्नांडिस त्यातलेच आणि आता असून नसलेले लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशीही त्यातलेच. ते प्रकाश करात कुठे आहेत-  वसंतराव नाईकांचे काय झाले – महाराष्ट्राच्या कित्येक मुख्यमंत्र्यांची नावे तरी कितीजणांच्या स्मरणात आहेत-  या माणसांचे एकाकीपण केवढे जीवघेणे असेल याची आता फक्त कल्पनाच करता येते. ज्यांनी सारे आयुष्य लोकात राहून लोकांसाठी काढले त्यांच्या वाट्याला हे एकाकीपण का यावे- त्यांचे लोकनेतृत्व मग खरे मानायचे की अखेरच्या काळचे त्यांचे एकाकीपण-  की जीवनातले हे चढउतार आपणच प्राक्तनाचे भाग मानायचे?

आपल्या सामाजिक  कृतज्ञतेचे अशावेळी काय होते –  ती खरोखरी असते की नसतेच-  आणि असली तरी ती त्या एकाकी व्यक्तींच्या मनाचे एकटेपण कुठे घालविते-  खोटी आश्वासने, तात्पुरता सहवास किंवा येणारी गोड पत्रे यांनी काहीकाळ हे एकाकीपण बाजूला जात असेल पण तेवढा काळ संपला की ते पुन्हा घेरून येतेच. बरेचदा अशा भेटी व पत्रेही व्यक्तीचे एकाकीपण तिला जास्तीचे जाणवूनही देत असतात. मग यातले खरे काय आणि कायमचे काय-  एकाकीपण की सामाजिकता-  माणूस हा सामाजिक प्राणी आहे असे अ‍ॅरिस्टॉटल म्हणाला. ते माणसाच्या समाजातील वावराबाबतचे व त्याच्या असलेल्या वा मानलेल्या मैत्रीच्या संबंधात खरे. पण या अ‍ॅरिस्टॉटललाही एकाकीपण अनुभवावे लागले. अगदी अलेक्झांडर हा त्याचा विद्यार्थी असतानाही त्याला विष पिऊन आत्महत्या करावीशी वाटली. सावरकरांना भक्त होते. विनोबांना अनुयायी होते. मग त्यांचे प्रायोपवेशन कशासाठी होते-  ही माणसे मोठी म्हणून त्यांची नावे घ्यायची. खरे तर हा अनुभव घेणारी व घेत असलेली माणसे घरोघरी दिसतात. इतरांच्या लेखी त्यांची दखलही नसते. असलीही तरी ती केवळ दयाभावाची वा उबगपणा स्पष्ट करणारी. ज्यांचे आजार वा व्यथा संपणारे नसतात, ज्यांचा तुरुंगवास मृत्यूपर्यंत चालणारा असतो आणि ज्यांचे जीवनमरणाचे सारे मार्ग कुंठित झाले असतात त्यांचे जगणे कसे असते-  केवळ मृत्यू येत नाही म्हणूनच ही माणसे जगत असतात की नाही-  अनेकांना हे लिहिणेही दुष्टाव्याचे वाटेल. पण जीवन-मरणाच्या खर्‍या प्रश्नांची चर्चा आपण कधी करायची की नाही-  की त्याकडे कानाडोळा करीत उगीच राजकारणाच्या वा आपल्याशी जराही संबंध नसणार्‍या गोष्टींवरच निरर्थक बोलत राहायचे असते-

तो सिसेरो तत्त्वज्ञानाला –  बकवास व तोंडची वाफ दवडणारे शास्त्र-  असे म्हणाला. त्यातून काही साध्य होत नाही. तरीही स्वत:ला बुद्धिमान म्हणवणारी माणसे त्यात आपली अक्कल व शक्ती खर्ची घालत असतात असे त्याचे म्हणणे होते. जागतिक कीर्तीच्या  त्या वक्त्याचे हे विधान ग्रीक तत्त्वज्ञांनी मनावर घेतले नाही पण त्याचे सारेच बोलणे निरर्थक कसे म्हणता येईल. वास्तव आणि वाफ यात काही वेगळेपण आहे की नाही-  की शंकराचार्य जगाला मिथ्या म्हणतात तेच खरे मानायचे असते- दुर्दैव याचे की ते खरे मानले नाही तर मग हाताशी काही उतरही नाही. असे ते आपले एकाकी असणेच… जग मिथ्या नाही पण ज्याच्या वाट्याला एकाकीपण येते त्याच्या लेखी ते मिथ्याच असते की नाही?

(लेखक नामवंत विचारवंत आहेत)

9822471646

हे सुद्धा नक्की वाचा-

एकाकीपणाचे पिशाच!- http://bit.ly/2OPFa7a

एकाकीपणाशी मैत्र… http://bit.ly/2EI5eLE

Previous articleके संग तुझ पे गिरे..और ज़ख्म आयें मुझे…
Next articleकाटकसर, बचत आणि दान करणारा महाराजा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.