जगातले सर्वात मोठे विमान- An – 225 Mriya

-अमित जोशी

An -225 Mriya मध्ये Mriya चा अर्थ आहे स्वप्न – Dream

अबब, अजस्त्र….सध्याच्या भाषेत आरारारारारा खतरनाक असे शब्द कमी पडतील एवढं हे मोठं विमान आहे. १९८० च्या दशकातील सोव्हिएत तंत्रज्ञानाची ही कमाल आहे. तेव्हाच्या अंटोंनोव्ह कंपनीने हे विमान बनवले. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सध्या ही कंपनी युक्रेनमध्ये आहे. सोव्हिएत रशियाचे शक्तिशाली रॉकेट Energia चे बुस्टर्स पोटातून तर स्पेस शटल ( Buran) हे डोक्यावर घेऊन नेता यावे यासाठी हे विमान बनवलं होतं. सोव्हिएत महासत्ता कोसळल्यानंतर रशियाने रॉकेट Energia आणि स्पेस शटल कार्यक्रम खर्च परवडत नसल्याने बंद केला. तसंच एवढे विमान आणखी बनवणे हे सुद्धा आवाक्याबाहेरचे ठरले होते. तेव्हा An-225 हे एकच विमान बनवले गेले तर दुसऱ्याची फक्त बॉडी तयार केली आणि काम थांबण्यात आले.

हे विमान किती मोठं आहे ?

सुमारे ८४ मीटर लांब, ८८ मीटर पंखाचा पसारा आणि १८ मीटर उंच एवढे हे विमान मोठं आहे. एवढ्या अवाढव्य आकारामुळे आतमध्ये सुमारे ४३ मीटर लांब, ६.४ मीटर रुंद आणि ४. ४ मीटर उंच एवढ्या मोठ्या आकारामध्ये विविध सामान /वस्तू / Payload ठेवता येतात. २५० टन एवढे वजन वाहून नेण्याची या विमानाची आश्चर्यकारक अशी क्षमता आहे.

आता आकडेवारीवरुन विमानाच्या आकारमानाचा कदाचित अंदाज येणार नाही. म्हणून काही उदाहरणे देतो.

1..रस्त्यावर धावणार एखादा मोठा ट्रेलर हा १० एक गाड्या ( LMV ) वाहून नेऊ शकतो. तर An – 225 विमान हे अशा ५० ( LMV ) गाड्या सहज घेऊन शकते.

2..जून २०१० मध्ये ४२ मीटर लांबीची पवनचक्कीची दोन पाती या विमानातून चीनहून डेन्मार्कला नेण्यात आली होती.

3..ऑगस्ट २००९ ला वीज निर्मितीचा तब्बल १८९ टन वजनाचा जनरेटर या विमानाने नेण्यात आला.

4.. सप्टेंबर २००१ मध्ये ४ रणगाडे घेऊन या An -225 ने आकाशात झेप घेतली होती. यांचे एकूण वजन होते तब्बल २५३.८२ टन. एखाद्या विमानाने सर्वाधिक वजन वाहून नेण्याचा हा आत्तापर्यंतचा जागतिक रेकॉर्ड आहे.

तर एवढं मोठं विमान कशासाठी ? अर्थात सामरिक वापराकरता – संरक्षण बाबींसाठी या अजस्त्र विमानाची निर्मिती करण्यात आली. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर याची उपयुक्तताच संपली. त्यापेक्षा युक्रेनसारख्या देशात अंटोनोव्ह कंपनीला हे विमान सांभाळणे आर्थिकदृष्ट्या जिकरीचे झाले होते. त्यामुळे काही काळ हे विमान पार्किंगमध्ये धूळ खात पडण्याच्या मार्गावर होते. आता या विमानाचा पूर्णपणे व्यावसायिक वापर सुरु करण्यात आला आहे. जगात कोणताही देश आकाराने अजस्त्र असं सामान वाहून नेण्यासाठी या विमानाची सेवा घेऊ शकते. अर्थात हे विमान अवाढव्य असल्याने तीन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या मोठ्या धावपट्टीवरच उतरु शकते. विमान आवाढव्य असल्याने याच्या लँडिंग गियरला तब्बल ३२ चाके आहेत. पुढे चार तर मागे ७ चाकांच्या ४ जोड्या. सर्वसाधारण विमानाला दोन जेट इंजिन असतात. बोईंग 747 किंवा एयरबस – 380 ला सुद्धा चार जेट इंजिन आहेत. तर या An -225 ला तब्बल ६ शक्तीशाली जेट इंजिन आहेत.

सध्या हे विमान जगभरात भ्रमंती करत असून विविध प्रकारचे Payload – सामान वाहून नेण्याचा एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड या विमानाने कायम ठेवला आहे.

अधिक काही लिहिण्यापेक्षा पुढील व्हिडियो लिंक बघा,  नुसते फोटो बघितले तरी या An -225 Mriya विमानाची अवाढव्यता लक्षात येईल.

https://www.youtube.com/watch?v=KhyzSSAwBos

(लेखक ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281

Previous articleशेतीचा शोध: एक ऐतिहासिक फसवणूक?
Next articleन जाने क्यूँ…अधूरी ही मुझे तस्वीर जचती है!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.