न जाने क्यूँ…अधूरी ही मुझे तस्वीर जचती है!

-सानिया भालेराव

“प्रत्येक गोष्टीला शेवट हवाच का?” हा तिचा प्रश्न त्याला एकदम अनपेक्षित होता.. म्हणजे त्याने असा विचारच केला नव्हता.

तो पटकन म्हणाला “गोष्ट म्हटली की शेवट हवाच.. नाहीतर मग अर्थ काय गोष्टीला”?

“अच्छा म्हणजे शेवटामुळे गोष्ट अर्थपूर्ण होते तर”.. तिने एक मिश्किल कटाक्ष टाकला त्याच्याकडे.

तो गडबडून गेला.. लेखणी सावरत तिला म्हणाला ” हो तर.. काहीतरी पक्कं आपल्या सगळ्यांनाच हवं असतं ना.. अधांतरी, त्रोटक, अर्धवट गोष्ट कोणाला आवडेल, कोण वाचेल?”

यावर आधीच काहीसे मोठे असलेले डोळे अधिकच मोठ्ठाले करून ती म्हणाली, ” मी वाचेन अर्धवट, धूसर.. सगळं दिसायला हवं, कळायला हवं असा अट्टहास नाहीचे माझा.. मला आवडेल अशी गोष्ट वाचायला.. शेवट नसलेली गोष्ट”…

आता तो वैतागला.. तो म्हणाला ” वेडी आहेस तू.. लोक गोष्ट वाचतात कशासाठी.. त्यांना काँक्रीट असा शेवट हवा असतो.. आता हेच बघ.. मी लिहितो आहे एक लव्ह स्टोरी.. मग त्याला दोन शेवट असणार … एकतर प्रेम सफल होतं आणि ते कायमचे गुण्या गोविंदाने एकत्र राहतात नाहीतर मग प्रेम पूर्ण होत नाही आणि त्यांचे मार्ग वेगळे होतात नेहेमीसाठी .. काहीही असो.. शेवट हवाच..”

यावर ती हसते. म्हणते… “प्रेम पूर्ण असूनही अपूर्ण राहीलं तर… किंवा ते आले एकत्र पण नाही देऊ शकले साथ तर… किंवा झाले वेगळे पण राहिले एकत्र तरीही तर.. “

त्याने लिखाण थांबवलं.. त्याच्या कपाळावर आता आठ्या पडल्या होत्या.. ” असं असलं तरीही शेवट काहीतरी होणारच.. म्हणजे एकत्र राहणं किंवा न राहणं.. शेवट नसलेली कथा.. याला काहीही अर्थ नाही.. कायमचं काहीतरी हवं.. उगाच काय फॉरमॅट आहेत साहित्यात.. तुला काय कळतं गं यातलं… “

तिच्या काळ्याशार डोळ्यात टचकन पाणी आलं.. “मला नसेल कळत फॉरमॅट पण कायमचं असं काहीही नसतं.. एकत्र असणं, एकत्र नसणं.. शेवट सुद्धा कायमचा नसतो.. गोष्टीच्या पलीकडे सुद्धा एक गोष्ट असते.. ती लिहिलेली नसली तरी असते”..

आता यावर काय बोलावं त्याला कळत नाही.. ती काय म्हणते आहे ते त्याला समजत नाही आणि त्याला उमजणार नाही हे तिला माहीत असतंच..मग ती लिहायला घेते..

स्टोरी विदाऊट एंडिंग.. अपूर्ण गोष्टी..

शेवट काय झाला? गोष्टीचा, पिक्चरचा.. या शेवटात का अडकून बसलेलो असतो आपण? शेवट सापडत नाही म्हणून कित्येक गोष्टी अधुऱ्या राहतात.. त्या मग कधी ऐकवल्या जात नाहीत, पोहोचत नाहीत.. त्या तशाच पडून राहतात.. निपचित.. आणि शेवट जो आपल्याला वाटत असतो तो असतो का खरंच ? रडणाऱ्या बाळाला दोन मिनिटं बरं वाटावं म्हणून हातात खुळखुळा द्यावा तसं काहीसं आहे, हे शेवटाचा अट्टहास म्हणजे.. शेवटाच्या नादात जे अनुभवलं आहे ते डायल्युट होऊन जातं का? फक्त शेवट लक्षात राहतो का मग? बाकीची गोष्ट विरून जाते का.?पूफ्फफ्फ…

पण सोपं नाहीये हं बिना शेवटाची गोष्ट लिहिणं.. ती वाचणं सुद्धा सोपं नाहीये.. आपल्यावर किती जबरदस्त कंडीशनींग झालेलं असतं याची प्रचिती येते अशा वेळी.. कधी कधी वाटतं आपण जगत असतो ते शेवट नीट व्हावा म्हणून.. शेवटाला साथ हवी, अमुक एक हवं, ढमुक एक हवं.. मग जुंपा स्वतःला बैलासारखं.. कशा कशाच्या मागे.. आणि मग या सगळ्यात आपली गोष्ट.. सुरवात आणि शेवटामधली.. तिचं काय होतं.. ती जगतो का आपण? अनुभवतो? की होते ती सुद्धा पूफ्फफ्फ… ती ठरवते आहे आता की लिहायच्या गोष्टी आपण .. अर्धवट, शेवट नसलेल्या, अपूर्ण.. कोणी वाचो न वाचो.. अधुऱ्या गोष्टींना तसाही हव्यास नसतो.. ना पूर्णत्वाचा, ना कोणापर्यंत पोहोचण्याचा.. ती घेते लिहायला… शेवट नसलेली गोष्ट….

न जाने क्यूँ …अधूरी ही मुझे तस्वीर जचती है

मैं काग़ज़ हाथ में लेकर फ़क़त चेहरा बनाता हूँ

-अनवर जलालपुरी

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे .)

[email protected]

 

 

Previous articleजगातले सर्वात मोठे विमान- An – 225 Mriya
Next articleस्वातंत्र्याची पहाट दाखवणारं नवं ‘बायबल’ !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.