जावेद….साहिर आणि दोनशे रुपयांच्या गोष्टीचा गुंता!

-विजय चोरमारे

जावेद अख्तर यांच्यासाठी तो खडतर काळ होता. त्या परिस्थितीत त्यांनी साहिर लुधियानवी यांच्याकडून मदत घ्यायचं ठरवलं. फोन केला आणि वेळ घेऊन भेटीसाठी गेले.
त्यादिवशी साहिर यांनी जावेद यांच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहिलं आणि विचारलं, ‘तरुण मित्रा, निराश का आहेस ?’ जावेद म्हणाले, ‘अडचणीत आहे. जवळचे पैसे संपत आलेत. मला काही काम दिलंत तर उपकार होतील.’
जावेद अख्तर सांगतात की, साहिर यांची एक खास सवय होती. ते जेव्हा बेचैन असत, तेव्हा पँटच्या मागच्या खिशातून कंगवा काढून केस विंचरायला लागत. त्यावेळीही त्यांनी तसेच केले. थोडा वेळ विचार केला आणि आपल्या खास शैलीत म्हणाले, ‘नक्कीच. फकिराकडं काय आहे आणि काय करू शकतो ते बघतो आधी.’

आणि जवळच्या टेबलाकडं निर्देश करुन म्हणाले, ‘मीही वाईट दिवस बघितलेत मित्रा, तूर्तास हे राहूदे. बघूया काय करता येईल’ जावेद अख्तर यांनी बघितलं तर टेबलावर दोनशे रुपये ठेवले होते. ते पैसे जावेद यांच्या हातातही देऊ शकले असते, परंतु ती त्या माणसाची संवेदनशीलता होती, की समोरच्याला पैसे घेताना वाईट वाटू नये. पैसे देतानाही साहिर यांनी जावेद यांच्या डोळ्यात पाहणं टाळलं होतं.

साहिर यांच्यासोबत जावेद यांचे उठणेबसणे वाढले. त्रिशूल, दीवार, काला पत्थर यासारख्या चित्रपटांची कथा सलीम-जावेद यांची होती, तर गाणी साहिर यांची. त्यामुळं भेटणं, चर्चा नित्याच्या होत्या. यादरम्यान गंमतीनं जावेद अधुनमधून म्हणायचे, ‘साहिरसाब, तुमचे दोनशे रुपये माझ्याकडं आहेत. देऊ शकतो, पण देणार नाही.’ साहिर हसायचे. बैठकीतली मंडळी विचारायची की, ‘कसले दोनशे रुपये?‘, तेव्हा साहिर म्हणायचे, ‘ते यांनाच विचारा’ हे असं अनेक वर्षं चालत राहिलं.

२५ ऑक्टोबर १९८०ला रात्री साहिर लुधियानवी यांचं हृदयविकारानं निधन झालं.

जावेद यांना बातमी ऐकून धक्का बसला. तातडीनं ते अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले.
रात्रभर मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. जुहू दफनभूमीत दफनविधीची तयारी करण्यात आली. भल्या सकाळी मुस्लिम रीतिरिवाजानुसार त्यांचा दफनविधी झाला. सोबत आलेले लोक थोड्या वेळानं निघून गेले. परंतु जावेद अख्तर खूप वेळ तिथं बसून राहिले. बऱ्याच वेळानं ते उठले आणि डबडबल्या डोळ्यांनी तिथून निघाले.

जुहू कब्रस्तानातून बाहेर पडून समोर उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये बसत असतानाच त्यांना कुणीतरी हाक मारली. जावेद यांनी वळून पाहिलं तर साहिर यांचे एक जिवलग मित्र अशफाकसाहेब होते.

अशफाक गडबडीनं येत होते. त्यांनी नाइट सूट परिधान केला होता. त्यांना सकाळीसकाळी बातमी कळली होती आणि तसेच ते घरातून निघाले होते. आल्याआल्या ते जावेद यांना म्हणाले, ‘तुमच्याकडं थोडे पैसे आहेत का ? त्या कबर बनवणाऱ्याला द्यायचे आहेत, मी गडबडीनं पैसे न घेताच आलो.’

जावेद यांनी खिशातून पाकिट काढलं आणि विचारलं, ‘किती रुपये द्यायचे आहेत?’

ते म्हणाले, ‘दोनशे रुपये !’

…..

एका मित्राच्या फेसबुक वॉलवर मला ही पोस्ट हिंदीमध्ये आढळली, वाचून मी भारावून गेलो आणि त्यातील बारीक-सारीक तपशील टाळून तिचा अनुवाद केला. अवतीभवतीच्या राजकारणाच्या धबडग्यात हे काहीतरी मौलिक आहे, असं मला वाटलं म्हणून मला ती अनुवाद करून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावीशी वाटली. त्यावर खूप प्रतिक्रिया आल्या. ‘नया ज्ञानोदय’ नियतकालिकात गुलजार यांची अशीच एक गोष्ट प्रसिद्ध झाल्याचे आणि तिचा तपशील वेगळा असल्याचे कुणी निदर्शनास आणून दिले. गुलजार यांच्या ‘देवडी’ पुस्तकात ती असल्याचे कुणी नोंदवले. दोनशे नव्हे, शंभर रुपयांची ही गोष्ट आहे आणि ते शंभर रुपये कबर खोदणाराला नव्हे, तर रिक्षावाल्याला दिले आहेत, असेही कुणी सांगितले. सुजाण वाचकांनी वेगवेगळे संदर्भ आणि तपशीलातील फरक मांडला. जावेद यांच्या तोंडूनच टीव्हीवर हा किस्सा ऐकला असल्याचे एकाने नोंदवले.

जावेद यांचा किस्सा. तो दुसऱ्याच कुणीतरी फेसबुकवर टाकलेला. तो आवडला म्हणून तिसऱ्यानेच त्याचा अनुवाद केलेला. त्यात गुलजार यांच्या कथेची साक्ष काढून तपशीलातला मोठा फरक असल्याचे पुढे अनेकजणांनी निदर्शनास आणून दिलेलं. त्यामुळं आपली फसगत झाल्यासारखं वाटत होतं. सोशल मीडियावरच्या उथळ गोष्टींना आपणही बळी पडल्यासारखं वाटत होतं.

पण नेमकी घटना काय याचीही उत्कंठा होती. अर्थात जावेदजी किंवा गुलजारजी, ही दोघंही सहज उपलब्ध असणारी माणसं नसल्यामुळं जरा कठिणच वाटत होतं.

पण फार वाट पाहावी लागली नाही.

…..

महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा संवाद’ कार्यक्रमासाठी यंदा जावेद अख्तर यांना बोलावलं होतं. त्यानिमित्तानं त्यांची बऱ्यापैकी निवांत भेट झाली. गप्पाही झाल्या. थोडं इकडचं तिकडचं झाल्यावर मी थेट या किस्स्याचा विषय काढला. हे खरं आहे का विचारल्यावर म्हणाले, ‘खरं आहे.’
गुलजारजींनी लिहिलेल्या गोष्टीचा संदर्भ देऊन म्हटलं की त्यांनी वेगळा तपशील दिलाय आणि शंभर रुपयांचा उल्लेख आहे.

त्यावर मिश्किलपणे जावेदजी म्हणाले, ‘शंभर रुपयांनी काय फरक पडतो?’
मी म्हटलं, ‘अहो, शंभर की दोनशे रुपये हा प्रश्न नाही. तुम्ही ते पैसे रिक्षावाल्याला दिले, असं लिहिलंय गुलजारजींनी. आणि इथं तर कबर खोदणाऱ्याला दिल्याचा उल्लेख आहे.’

म्हणाले, ‘गुलजार आणि मी एकदा फ्रँकफुर्टमध्ये एकत्र असताना त्यांना हा किस्सा सांगितला होता. तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं, मी लिहू का हे? तर म्हटलं लिहा. त्यांनी त्यावर कशी गोष्ट लिहावी हा त्यांचा प्रश्न. त्यावेळी रिक्षा वगैरेतून कुणी येण्याचा प्रश्नही नव्हता.’

जावेदजींनी पुन्हा एकदा सांगितलं,
मी दोनशे रुपये दिले आणि कबर खोदणारासाठी दिले हेच खरं !

(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

Previous articleफेसबुकचे आभासी चलन: लिब्रा
Next articleपुरुषसूक्ताचे पठण बंद करा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here