जीवनशैली

गांधी-150

गांधी कथा

प्यारेलाल नैय्यर शिक्षण सोडून आश्रमात दाखल झाले. गांधींनी त्यांना सांगितले ” तुम्ही मला दोन निबंध लिहून द्या. एका इंग्रजीत ‘ असहयोग ‘ आंदोलनावर आणि दुसऱ्या निबंधाचा विषय तुम्ही निवडा. जसं की ‘ मी गांधींकडे का आलो?’ तो हिंदुस्तानी भाषेत लिहून द्या. दुपारी तीनपर्यंत लिहून द्या.”

प्यारेलालनी निबंध पूर्ण करून दिले. दुसऱ्या दिवशी गांधीजी दौऱ्यावर गेले. प्यारेलाल आश्रमाच्या कामात रमले. एक दिवस पत्र आले. निबंध वाचले. पसंत आहेत. मी तुझ्या लेखनशक्तीचा उपयोग करू इच्छितो. दोन दिवसांनी प्यारेलालना तार आली. ‘ डॉ अन्सारींच्या घरी दरियागंज नं.१ ला तातडीने मला येउन भेट.’

प्यारेलाल दोन दिवसांनी गांधीजींच्या समोर हजर झाले. गांधीजी ‘ यंग इंडियात’ निबंध प्रकाशित करणार होते. दुसऱ्या दिवशी गांधीजी रोहतकला गेले. प्यारेलाल तिथंच राहिले. संध्याकाळी परत आल्यावर गांधीजीनी विचारल्यावर प्यारेलाल म्हणाले ” मला कोणीच सोबत यायला सांगितले नाही.”

गांधीजी म्हणाले ” कोणाच्यातरी अनावधानाने हे झालं. मात्र आपल्या जागरूकतेने तू त्याला त्याच्या या चुकीपासून वाचवणं तुझं कर्तव्य बनतं. जर संकोच आणि नम्रता हे कर्तव्याच्या आड येत असतील तर त्याला वृथा अहंकार मानून त्यावर विजय मिळवायला हवा.”

त्याच दिवशी संध्याकाळी महादेवभाई ‘ यंग इंडियाच्या’ कामासाठी अहमदाबादला रवाना झाले. त्यांच्या जागी प्यारेलालच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. पाण्याचा ग्लास देताना बाहेर लागलेलं पाणी पुसून द्यावं. जेवण वाढण्याच्या आधी हात धुतल्यावर त्याच हातानं दरवाजा उघडू नये. भांड्यातून दूध देण्याच्या आधे ते चमच्याने नीट ढवळून बघावे म्हणजे त्यात काही न खाण्यासारखे पदार्थ पडले असतील तर वरती येतील. अक्षर वाचनीय बनण्यासाठी त्यातील विरामचिन्हे अनुस्वार स्पष्ट लिहायला हवेत. बिछाना कसा घालावा. मलमूत्रासंबंधित भांडी कशी स्वच्छ करावीत . इत्यादी कामे त्यांना थोड्याच दिवसात शिकावी लागली. गांधीजींचे साधेपण किती कठीण आहे याचा अंदाज त्यांना सूक्ष्म अध्ययन आणि निरीक्षणानंतर आला. एकदा कुठल्यातरी निमित्ताने गांधीजी त्यांना म्हणाले ” खूप विचार करतात तसा साधेपणा हा सहज साध्य नाही.”

सौजन्य -विजय तांबे

Previous articleवेश्याव्यवसाय इतर व्यवसायांसारखाच, हे मान्य केले पाहिजे !
Next articleस्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीला महात्मा गांधींचे योगदान – रेखा ठाकूर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.