जेव्हा सत्ताधारी आमदार बलात्कार करतो तेव्हा पिडीतेचे एनकाऊंटर केले जाते

प्रा.हरी नरके

उन्नाव बलात्कार प्रकरणात आरोपी उत्तरप्रदेशचा सत्ताधारी आमदार आहे. तो अपघाताद्वारे पिडीतेच्या नातेवाईकांची हत्त्या घडवतो. तिला जाळून मारतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मुख्यमंत्री फाट्यावर मारतात. पिडीतेला पुरवलेली सुरक्षा असतानाही तिला जाळून मारल जातं. योगीपुरूष मुख्यमंत्री आहेत. ते स्वपक्षाच्या आमदाराला पाठीशी घालतात.
४ जून २०१७ पासून सुरू असलेला उन्नाव पिडीतेचा संघर्ष आता मृत्यूमुळे थांबला आहे.४ जून २०१७ रोजी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या कुलदीप सेंगर या आमदाराने तिच्यावर बलात्कार केला होता.
तरिही उ.प्र. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही.
मग १७ ऑगस्ट २०१७ रोजी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर तिनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे पोलीस, मीडिया आणि कोर्टाने तिची दखल घेतली.सेनगरवर गुन्हा दाखल झाला.पुढे तिच्या विनंतीवरून सुप्रीम कोर्टाने हे खटले दिल्लीत हलवले.

एप्रिल २०१८ मध्ये स्वतः ५० इंची पंतप्रधानांनी या घटनेचा निषेध केला.पण तरिही उत्तरप्रदेश पोलीस कोणाच्या मागे राहिले? पिडीतेऎवजी आरोपीच्या मागे ते उभे राहिले.२१ नोव्हेंबर २०१८ ला पिडितेचा चुलता आणि मोठा भाऊ यांना उ.प्र.पोलिसांनी अटक केली. १८ वर्षांपूर्वी त्यांनी गोळीबार केला होता हा जावईशोध लावण्यात आला.२८ जुलै २०१९ रोजी मुलीला कोर्टात जात असताना ट्रकने उडवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस तिच्या सुरक्षेसाठी दिलेले पोलीस गायब होते.
या अपघातातून ती वाचली. परवा तिचा भरदिवसा एनकाऊंटर करण्यात आला. ५ डिसेंबर २०१९ रोजी तिच्या गावात तिला जाळण्यात आलं. तेव्हाही सुरक्षेसाठी दिलेले पोलीस गायबच होते. गावातल्या, राज्यातल्या, देशातल्या कोणा पिडीतेने यापुढे तक्रार करू नये यासाठी बसवलेली ही दहशत आहे.
निर्भया, दिशाबाबत आक्रोश करणारा ‘ढोंगी’ संप्रदाय आणि माध्यमं उन्नाव पीडितेला फक्त श्रद्धांजली वाहून मोकळे होतील.
कारण ती महिला होती. गरिब होती. मागासवर्गीय होती.
आरोपी पुरूष आहे. श्रीमंत आहे. उच्चवर्णीय आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. धर्म, जात आणि राजकीय सत्ता त्याच्यामागे आहे.यावरून घ्यायचा बोध म्हणजे संस्कारी पक्षाचे आमदार जेव्हा आरोपी असतात तेव्हा पिडीतेचाच एनकाऊंटर केला जातो.तिला जाळण्यात आल्यानंतर काही तासांनी हैदाबादमधील बलात्कार प्रकरणी आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार केले गेले.

हैदराबादच्या बलात्काराच्या आरोपींना ठार मारलं म्हणून देशभरात हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन केलं गेलं.साहजिकच उन्नावची बातमी कोपऱ्यात गेली. आरोपींना गोळ्या घालणाऱ्या पोलिसांवर फुलं उधळली गेली. ऊन्नावप्रकरणी मात्र भाजपा आमदार सेनगर आणि इतर आरोपींबाबत देशानं मौन बाळगलं. स्त्रीमुक्ती संघटना, मिडीया आणि मेनबत्तीवाले आता थोडेसे नक्राश्रू ढाळतील. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करते हे नाटक सालाबादप्रमाणे केले जाईल.मुळात तिनं त्याच्याविरूद्ध तक्रार केली हा तिचा पहिला गुन्हा. तिच्या नातेवाईकांना ठार मारण्यात आले तरीही ती लढत राहिली हा दुसरा गुन्हा.
तेव्हा मग सर्वोच्च न्यायालय तिच्यामागे असूनही तिची हत्त्या करण्यात आली.ही श्रीमंतांची, उच्चवर्णियांची, सत्ताधार्‍यांची, पुरूषसत्ताक व्यवस्था सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही. तुम्ही तिचं काय उपटणार?
थोडा तडफडाट कराल, समाजमाध्यमावर शिव्याशाप द्याल आणि मग यथावकाश थंड व्हाल.शेकडो वर्षे फक्त असेच घडत आलेय. आता तरी दुसरे काय होणारेय?
या देशात बाई म्हणून जन्माला येणं, गरीब असणं आणि मागासवर्गीय असणं म्हणजे फक्त सोसण्याचा हक्कदार असणं. बायांनो सत्ताधार्‍यांनी बलात्कार केले तर तक्रार करण्याच्या फंदात पडू नका. नाहीतर मरावं लागेल. गप्पगुमान राहा. जमला तर बलात्काराचा चक्क उत्सव करा. तरच जिवंत राहाल. अन्यथा असं मरावं लागेल.

(लेखक नामवंत अभ्यासक व विचारवंत आहेत)

Previous articleफडणवीसांचे ‘अधिक’ आणि ‘उणे’
Next articleअघटित
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.