जोकर:व्हिलनच्या चेहेऱ्यामागे दडलेल्या सामान्य माणसाची कहाणी

 -सानिया भालेराव

बॅटमॅन आणि जोकर.. गुड आणि इव्हील.. आजवर एकूणच हिरोचा उदय कसा झाला हे आपण कित्येक सुपरहिरो चित्रपटांमधून पाहत आलो आहोतच. आपल्याकडे पुराणकथांमधून, इतिहासामधून, हिस्टोरिक फिक्शनमधून जगाला तारणारा, योद्धा, देवासमान लढवय्या वगैरे वगैरे अशा हिरोइक अवतारांचा उगम या धर्तीवर कसा झाला हे सांगण्यात, दाखवण्यात आलं आहेच. पण सो कॉल्ड व्हिलन कुठून आला, त्याला नक्की व्हिलन असं आपण का म्हणतो याबाबत फारसं कधी बोलल्या जात नाही. देव नाही म्हणून दानव, हिरो नाही म्हणून व्हिलन असं सोयीस्करपणे लेबल लावून शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या मानसिकतेला कसं जपल्या जाईल,चांगलं आणि वाईट यामधल्या भेदाला चालत आलेल्या संकल्पनांनुसार कसा वाढवत नेता येईल हा समाजाचा आणि त्यानुसार त्यात वावरणाऱ्या बहुसंख्य लोकांचा प्रयत्न चालू असतोच. दिग्दर्शक टाॅड फिलिप्स ” जोकर” या चित्रपटातून एका व्हिलनच्या चेहेऱ्यामागे दडलेल्या सामान्य माणसाला दाखवू पाहत आहे. अँटीहिरो, खलनायक, वाईट्ट असे कित्येक लेबल या जोकरवर आजवर लावले गेले आहेत. बॅटमॅनच्या सुपरहिरो चित्रपटांमध्ये जोकरला अनन्य साधारण महत्व! जसं राम आणि रावण एकाच नाण्याच्या दोन बाजू. तसंच काहीसं बॅटमॅन आणि जोकरचं. सो या आधी ज्यांनी बॅटमॅनच्या मुव्हीज बघितल्या नाहीयेत त्यांना सुद्धा हा चित्रपट पाहता येऊ शकतो कारण या चित्रपटांची हिस्ट्री माहित नसली तरीही जोकर त्या सर्वांना समजू शकतो ज्यांना चांगलं आणि वाईट या पूर्वापार चालत आलेल्या वर्गीकरणापलीकडचं बघता येतं. या चित्रपटात इंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न, कोक किंवा समोसे चरत अथवा चिप्सची पाकिटं विकत घेऊन अत्यंत बोगस आवाज करून ते खाणं शक्य होणार नाहीये. आता हे असं करणारे महाभाग असतीलच पण तरीही हा चित्रपट खूप अंगावर येतो. इतका की चित्रपट भावला की पाहिल्या पाहिल्या त्यावर लिहायला मी घेते पण हा चित्रपट पाहून ते शक्य झालं नाही. संवेदशील लोकांनी अतिप्रचंड त्रास होणार असं गृहीत धरून हा चित्रपट पाहावा आणि पाहावाच आणि ही पोस्ट वाचावी कारण आपण जोकरला निदान तितकं देणं लागतोच. या लेखात स्पॉयलर्स नाहीत, मात्र या लेखाअंती एक स्पॉयलर सगळ्यांना मिळावा असं मला फार वाटतंय तो म्हणजे चांगलं आणि वाईट याला पाहण्याचा आपला दृष्टिकोनातलं सत्य!

तर जोकर ही गोष्ट आहे आर्थर फ्लेक (वाकीन फिनिक्स) या गॉथम नावाच्या शहरात जोकर म्हणून काम करणाऱ्या माणसाची. त्याचं स्वप्न आहे स्टँडअप कमेडियन बनण्याचं. त्याची आई.. पेनी फ्लेक (फ्रान्सिस कॉनरॉय) आणि तो हेच त्याचं विश्व. मेयर होऊ इच्छिणारा धनाढ्य थॉमस वेन (ब्रेट कलन) आणि फेमस टॉक शो होस्ट मरी फ्रॅन्कलिन (राॅबर्ट डि निरो) हे त्याच्या आयुष्यात येतात आणि गुंतागुंत वाढत जाते. नीट काम न मिळणं, सामाजिक – आर्थिक विषमता वाढल्यामुळे समाजात वाढत जाणारा भेदभाव या सर्व गोष्टींमुळे आर्थरचं मानसिक स्वास्थ घसरत जातं. यात मदत करणारी थेरपीस्ट सुद्धा आपलं ऐकून घेत नाही.. इतकं नैराश्य त्याला आलेलं असतं. चित्रपटातले कित्येक सीन्स अक्षरशः डोळ्यातून बदल्याभर पाणी काढायला लावणारे आहेत. यातना किती असू शकतात, एखाद्याने एकटं पडावं ते किती याची जाणीव आर्थर आपल्याला फार भयानक पद्धतीने करून देतो. आर्थरला त्याच्या मानसिक आजारामुळे नियंत्रणाबाहेर हसू येत असतं.. त्याचं ते हसणं.. त्यामागचं दुःख.. सगळं कसं काळजाचं पाणी करणारं. समाजतली अस्वस्थता अशीच वाढत जाते आणि कोइंसीडन्टली त्याला वाचा फुटते आर्थरच्या एका कृत्यामुळे. आणि मग सुरु होतो जोकरचा प्रवास.. वेड्या जगात त्याहूनही जास्त वेडं बनण्याचा..

‘वाॅक द लाईन’ मध्ये वाकीन फिनिक्स खूप आवडून गेला होता पण जोकरमधली भूमिका तो जगला आहे. देहबोली जबरदस्त आणि त्याचं हसणं.. जो चित्रपटाचा हायलाईट आहे.. ते कित्येक काळ लक्षात राहून अस्वथ करत राहिल असं.. केवळ कमाल. जोकर कित्येक लेव्हल्सवर आपल्याला जागं करतो. सॅनिटी आणि इनसॅनिटी यातली रेषा तशीही फार पुसट असते आणि जोकर आपल्याला याची जाणीव करून देतो. मला वाटतं जो काळ या चित्रपटात दाखवला आहे तो अगदी आजही आपल्या आजूबाजूला आहेच. मानसिक आजार अगदी आपल्यातल्या कित्येकांना असतात. नैराश्य हा त्यातलाच भाग. आपल्या नोंदवहीत एके ठिकाणी आर्थर असं लिहून ठेवतो की “The worst part of having a mental illness is people expect you to behave as if you don’t.” आपल्याला जे होतं आहे ते मान्य करून आपल्याशी सहकार्याने वागणारे लोक किती असतात? सतत दुर्लक्षित राहणं.. मनातलं बोलता न येणं, उराशी बाळगलेली स्वप्न पूर्ण न होणं, वरकरणी सुंदर दिसणाऱ्या समाजाचा बीभत्स चेहेरा बघायला मिळणं, असहाय वाटणं, मन नावाची गोष्ट जिवंत असणं.. या सारख्या गोष्टींमुळे जर आर्थरचा जोकर होणार असेल.. तर व्हिलन नक्की कोण आहे? परिस्थितीला बळी पडणारा सर्व सामान्य माणूस की ही अशी परिस्थिती निर्माण करणारा समाज आणि लोक?

आपण या जगात आहोत याची दखल घेतली जाणं.. फक्त आहोत या गोष्टीची.. असं वाटणं हे किती केविलवाणं असू शकतो आणि थोड्या फार फरकाने आपल्या सगळ्यांनाच आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर हे वाटतंच.. ‘पण मग काय आमचा लगेच जोकर नाही होत’ किंवा ‘असं चित्रपटात वाईटाचं ग्लोरोफिकेशन करायचं म्हणजे किती अयोग्य’ असं वाटणारे आणि म्हणणारे लोक असतील, असणार.. एका सो कॉल्ड अँटी हिरोवर चित्रपट निघतो, तो लोकांना आवडतो, मनं या निमित्ताने जागी होतात, आणि सगळे नाही पण लाखात एक व्यक्ती …जर एखादा माणूस असं वागत असेल तर का वागत असावा.. असा जरी विचार करणार असली ना .. तरी मिळवलं.. हा चित्रपट पाहिला नाही तर खूप काही मिस कराल हे नक्की. “जोकर, बाबा रे.. आता तुला पाहून आल्यावर हा जो काही त्रास होतो आहे तो कसा थांबणार माहित नाहीये. तू पटलास,आवडलास. चक्क बॅटमॅनचा राग यायला लागला आहे मला तर.. सो तू जे लिहिलं होतंस ना.. त्या वहीत.. की “I HOPE MY DEATH MAKES MORE CENTS THAN MY LIFE.”.. त्यावर किती जण हसले ते माहित नाही पण माझ्यासारख्या वेड्या लोकांनी डोळ्याच्या कडा पुसल्या हे मात्र नक्की..”

मनातली दुःख दाबून वरकरणी हसणाऱ्या, आपल्या जिवलगांच्या आनंदासाठी मन मारून जगणाऱ्या, महिन्याच्या शेवटी उरलेल्या पैशांचे आकडे मोजणाऱ्या, महिनाभर जीवाचं रान करून पगार झाल्यावर पोरांसाठी लगेच काहीतरी घेणाऱ्या आणि त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून सगळा थकवा विसरून जाणाऱ्या, मणा- मणाचं ओझं मनावर घेऊन ते चेहेऱ्यावर न दाखवणाऱ्या, आजूबाजूची सामाजिक- आर्थिक- भावनिक विषमता वाढताना बघून फक्त असहायपणे बघत राहणाऱ्या, घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असे पाय खेचत चालणाऱ्या.. आणि अशा शेकडो गोष्टी.. ज्या आपल्याला सामान्य वर्गातला सामान्य माणूस बनवतात.. आणि कदाचित आपल्या आत लपलेल्या ‘जोकर’ला उचकवतात सुद्धा.. पण शहाणपणाचं आणि सो कॉल्ड चांगुलपणाचं सोंग जास्त वरचढ ठरत हसणार .. आणि मग “Put On a Happy Face” म्हणत आपण असणार.. शक्य झालं तर बघाच असं हसताना स्वतःला आरशात.. आणि त्यात क्षणभर का होईना पण जोकर दिसतोय का ते बघाच..

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे )

[email protected]

Previous articleदेर लगी आने में तुमको…
Next articleनिवडणूक आणि तंत्रज्ञान !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.