देर लगी आने में तुमको…

PTI6_26_2018_000308B

-प्रवीण बर्दापूरकर

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि एक निर्विवाद लोकप्रिय नेते राज ठाकरे यांचं प्रचाराच्या  रणधुमाळीत धुमधडाक्यात आगमन झालं आहे . पहिल्याच सभेपासून राज ठाकरे नावाची मुलुखमैदानी तोफ गरजू लागली आहे . माध्यमांत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळू लागलेली आहे यात आश्चर्य ते कांहीच नाही कारण तसंही राज हे मुंबईच्या माध्यमांचे लाडके नेते आहेत . शिवाय त्यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानं तर माध्यमातल्या ज्येष्ठांचे राज हे जास्तच लाडके आहेत . त्यामुळेही माध्यमांचा झोत राज यांच्यावर जरा जास्तच असतो . मात्र प्रचाराच्या या रणधुमाळीत राज यांच्या झालेल्या या ‘एन्ट्री’चं वर्णन करण्यासाठी मला अंदलीब शहदानी यांच्या आणि जगजितसिंग यांच्या स्वरांनी अजरामर झालेल्या एका गजलच्या मुखड्याची आठवण झाली . तो मुखडा असा-

देर लगी आने में तुमको

शुकर हैं फिर भी आये हो …

 ‘सत्ताधाऱ्यांना जाब विचारु शकेल असा विरोधी पक्ष होण्याइतकं बळ मला द्या’ असं आवाहन जनतेला करुन पहिल्याच सभेत राज ठाकरे यांनी मोठा यू टर्न घेतलेला आहे . याचा अर्थ राज यांना त्यांच्या पक्षाची ताकद काय आहे याची जाणीव झालेली आहे , असाही होतो कारण याआधी ‘माझ्या हाती राज्याची सत्ता द्या , महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो’ अशी भाषा राज ठाकरे यांची होती . राज्यातल्या जनतेनी कांही राज यांच्या मनसेच्या हाती आजवर सत्ता दिलेली नाही आणि ती देण्याची यानंतरही जनतेची इच्छा नाही हे वास्तव राज ठाकरे यांनी आता मान्य केलेलं आहे , असाही त्यांच्या पहिल्या प्रचार सभेतील विधानाचा अर्थ आहे .

एक आधीच सांगून टाकतो , राज्यातले जे राजकीय नेते मला आवडतात त्यात राज ठाकरे हे आहेत . ( माझ्या ‘नोंदी डायरीनंतरच्या’ आणि ‘दिवस असे की…’ या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीचे  प्रकाशन  राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे . ) ज्यांच्याकडून आशा बाळगावी अशा नेत्यांपैकी राज ठाकरे हे एक आहेत असंही माझं मत आहे . त्यांचं घणाघाती आणि फर्ड वक्तृत्व , हजरजबाबीपणा , त्यांच्यातला चिकित्सक वाचक , त्यांचं आकलन , त्यांच्यात असणारी सांस्कृतिक आस्था , त्यांची वेध घेण्याची क्षमता आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी असणारी आस्था मला भावलेली आहे . पण…

या ‘पण’नीच राज ठाकरे यांचा घात केलेला आहे . कांही भ्रमातून ते अजूनही बाहेर आलेले नाहीत . मार्च २००६ नंतरचे ‘ते’ दिवस आठवा जरा- शिवसेनेतून फुटल्यावर राज यांची राजकारणातली एन्ट्री फारच आशादायक झोकात झाली . याबाबतीत त्यांनी शरद पवार यांनाही मागे टाकलेलं होतं . माध्यमांनी तर राज यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेत्यांपेक्षा जास्त प्रसिद्धी दिली . एव्हाना उद्धव ठाकरे यांच्या मवाळ राजकारणाचा शिवेसेनेत उदय झालेला होता आणि लोकांना बाळासाहेब ठाकरे यांची आक्रमकता हवी होती . राज यांच्या रुपात बाळासाहेब ठाकरे यांची ती आक्रमकता , सेनेची ‘खळss खट्याक’ची शैली लोकांना राज यांच्यात दिसली , आवडली आणि भावलीही . त्यातच महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ देण्याची भाषा राज यांनी केली . अशी हमी देणारे राज ठाकरे हे पहिलेच नेते होते त्यामुळे तर लोकांनी तर राज यांना प्रचंड प्रतिसाद दिला . राज्याच्या विविध भागात त्यांच्या होणाऱ्या सभांना लाखांत गर्दी उसळत असे . ही गर्दी भाड्याने आणलेली नाही  , अशी खात्री तेव्हा पोलीस आणि गुप्तचर खात्यातील अनेक अधिकाऱ्यांनी तेव्हा खाजगीत बोलतांना दिलेली होती . स्थापन झाल्यावर लढवलेल्या पहिल्या विधानसभा  निवडणुकीत ( २००९ ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दुहेरी आंकडा पार करत आला ; या पक्षाचे चक्क १३ उमेदवार विधानसभेवर विजयी झाले तर २४ जागांवर मनसेचे उमेदवार दुसऱ्या जागी होते . मग महापालिका निवडणुकातलं यश , नासिक महापालिकेत तर चक्क सत्ता…त्यानंतर तर हा पक्ष तसंच राज यांची तर क्रेझच राज्यभर निर्माण झाली . राज ठाकरे लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल क्रमांकावर पोहोचल्यासारखी आणि नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत येणार असल्यासारखी ती अवस्था होती हे राज्यभर फिरतांना अनुभवणाऱ्या पत्रकारांपैकी मीही एक आहे .

राज ठाकरे स्पष्ट बोलतात पण इतरांनी स्पष्ट बोलेलेलं त्यानं आवडत नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तर ते मुळीच रुचत नाही ; कार्यकर्ते लग्गेच ‘खळss खट्याक’ प्रयोग करतात . तरी , स्पष्टच सांगतो , हळूहळू राज ठाकरे यांची क्रेझ वगळता राज यांच्यातला राजकारणी आणि राजकीय पक्ष म्हणून मनसेचा प्रभाव हळूहळू ओसरत गेला . मिळालेला अफाट प्रतिसाद पाठिंब्यात बदलण्यात राज ठाकरे यांना यश आलं नाही कारण त्यांच्या नावाचा जो कांही करिष्मा निर्माण झाला , जी कांही प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यातून जे ‘स्टार’पण आलं त्यात राज ठाकरे अडकले . अगदी स्पष्ट सांगायचं तर ते स्वप्रतीमेच्या प्रेमात ( narcissism ) पडले असावेत असं दिसू लागला . राजकारण पूर्णवेळाचं काम आहे आणि राजकारण करतांना त्यात गांभीर्य हवं हे विसरले  . त्याच्यातला नेता सरंजामदार वाटू लागला . अडचणीत आणणाऱ्या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना जरबेच्या आवाजात ते दाबू लागले .

मनसे राजकीय पक्ष म्हणून तसाही एकखांबी तंबू होता . राज यांच्यात झालेल्या या बदलामुळे पक्षाला कार्यक्रम मिळणं बंद झालं . जो पक्ष कार्यक्रम देत नाही त्या पक्षाचे कार्यकर्ते निष्क्रिय होत जातात . मनसेत तेच घडलं . जे कांही पक्ष संघटन बांधलं गेलेलं होतं ते , मुंबईत नाही तरी , राज्याच्या अन्य भागात विसविशीत होत गेलं . या सर्वाचा एकत्रित परिणाम २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जोरदार बसला ; नंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात त्याचीच पुनरावृत्ती झाली .  भाजप आणि सेना राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला निष्प्रभ करत असतांना मनसेला तिसरा भक्कम पर्याय म्हणून उभं  करण्याऐवजी शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या यांच्या वळचणीला राज ठाकरे गेले . सेना आणि भाजपला पर्याय ठरु पाहणारं त्यांचं हिंदुत्व , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला असणारा विरोध , आक्रमकता , लोकांना विश्वासात न घेता ‘सॉफ्ट’ झालं . त्याने अचानक सेनेसोब्तच भाजप आणि मोदी यांच्याशी पंगा घेणं मनसेच्या सैनिकांना बुचकाळ्यात टाकणारं ठरलं . लोकसभा निवडणुकीत  तर पक्षाचे उमेदवार न लढवता भाजप-सेनेला विरोध आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा असा अनाकलनीय राजकीय आत्मघात राज यांनी केला . कार्यकर्ते सैरभैर झाले . मात्र असं असलं तरी , राज ठाकरे यांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही हे ‘सूर्य प्रकाश देतो’सारखं वास्तव आहे !

भाजप , सेना , कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी विधानसभेच्या तयारीत लोकसभा निवडणुका संपताच गुंग झाल्या . महाजनादेश , आशीर्वाद  , संघर्ष अशा अनेक  यात्रांनी राज्याचं वातावरण ढवळून निघालं . सर्वच पक्षांचे नेते रस्त्यावर उतरुन जनतेत मिसळतांना दिसू लागले पण , मनसेच्या आघाडीवर शांतताच होती . निवडणूक लढवण्याचा निर्णय ‘साहेब’ घेतात का नाही या उत्सुकतेच्या सावलीत मनसे नेते आणि कार्यकर्ते विसावलेले होते . म्हणूनच म्हटले , निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतांना राज ठाकरे यांनी उशीर केलेला आहे .

भाजप-सेनेच्या विरोधात शरद पवार यांनी वयाच्या ७९व्या वर्षी कंबर कसलेली आहे . अनके नेते पक्ष सोडून भाजप आणि सेनेच्या आश्रयाला गेलेले आणि अजूनही जात  असतांना शरद पवार मात्र वयाला न शोभेशी अविश्वसनीय व अतुलनीय तडफ दाखवत आहेत ; त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे . ‘अभी तो मैं जवान हुं’ म्हणत शरद पवार दररोज सहा-सांत सभा घेत फिरत आहेत . देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरु केलाय . हे दोघ मिळून दिवसभरात बारा-पंधरा सभा घेत आहेत आणि इकडे प्रचार बंद होण्याला जेमतेम दहा दिवस उरलेले असतांना राज यांची पहिली सभा झालेली आहे !

मनसेचे केवळ १०४ उमेदवार रिंगणात आहेत . दररोज ३/४ प्रचार  सभा या गतीने राज ठाकरे फार फार तर ३०/४० उमेदवारांचा थेट प्रचार करु शकतील तरी त्यांना विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष व्हायचं आहे . विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठी मनसेचे  किमान २९ उमेदवार निवडून यावे लागतील ; जे की सध्याच्या स्थितीत अशक्य आहे हे राज ठाकरे यांना समजलेलं नसेल असं म्हणणं आत्मवंचना ठरेल .  हे सगळं तीन चार महिने आधी झालेलं असतं , राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र किमान एकदा ढवळून काढला असता तर शक्य झालं असतं , यात शंकाच नाही . म्हणूनच म्हटलं , देर लगी आने में तुमको…

लोकप्रियता , भविष्याचा वेध घेण्याची क्षमता , आकलन आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी आत्यंतिक तळमळ असणारा राज ठाकरे यांच्या वयोगटातला दुसरा  नेता आज तरी राज्यात दुसरा कुणी नाही . म्हणूनच ‘देर आये दुरुस्त आये…’ या शब्दात राज ठाकरे  याचं निवडणुकीच्या रिंगणात स्वागत आहे . 

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleआत्महत्या केलेल्या आईच्या शोधात…
Next articleजोकर:व्हिलनच्या चेहेऱ्यामागे दडलेल्या सामान्य माणसाची कहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.