डिजिटल साहित्य व पत्रकारिता: मराठी साहित्य संमेलनातील नवा प्रयोग

– निखिल परोपटे
      साहित्य संमेलन…. साहित्याचा मेळा…. मराठी साहित्यातील नवे प्रवाह, नवसृजनाला सामाईक सूत्रात बांधणारा सोहळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन… यावेळीसंमेलनात यावेळी अनेक नवे प्रयोग करण्यात आलेत. यापैकी एक वेगळा अन अनोखा प्रयोग होता कार्यशाळेचा. आजवर अनेक साहित्य संमेलनात विविध विषय-आशयांवर चर्चा झाली. अनेक भूमिका मांडल्या गेल्यात. अनेक प्रश्नांना, विषयांना वाचा फोडली गेली. पण बहुतांश  संमेलन हे शब्दकेंद्रीच राहिलेले दिसतात. व्यक्त होण्याचा विविध तथा नवनव्या माध्यमातील प्रयोगांवर मात्र फार चर्चा संमेलनात झालेली दिसत नाही. आताही तशी तयारी दिसत नाही. साहित्य क्षेत्रातल्या विविध अंगावर जोरदार चर्चा होते. पण, साहित्य ज्या वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होते त्याबाबत मात्र उदासीनता आहे. छापील पुस्तक किंवा शब्द हेच शाश्वत साहित्य अशी साहित्य क्षेत्रातील बहुतांश मंडळीची समजूत आहे .
आज डिजिटल माध्यमामार्फत मोठ्या प्रमाणात सकस साहित्य वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर वाचायला मिळते . एका क्षणात ते जगभर पोहचत असल्याने त्याला प्रतिसादही भन्नाट मिळतो .जलद संवाद, सोपा मार्ग, व कमी खर्चिक असे हे माध्यम काळाची गरज झाले आहे. या नव माध्यमावर देखील चर्चा व्हावी. त्या नव्या माध्यमाची ओळख व्हावी यासाठी आयोजक संस्थेनं या वेळी डिजिटल साहित्य , डिजिटल पत्रकारिता या विषयांवर कार्यशाळांचे आयोजन केले होते . हा संपूर्णत: नवा प्रयोग होता.
नवीनतेचा ध्यास घेत साहित्य संमेलन हे फक्त जेष्ठांचा सोहळा न राहता त्यात तरुणांचा सहभाग वाढावा,  नव्या पिढीच्या विचारांचाही त्यात जागर व्हावा म्हणून आजच्या पिढीचे विषय साहित्य संमेलनात घेतले जायला हवे या दृष्टीने  कार्यशाळाच्या आयोजन करण्यात आले .‘मराठी साहित्य, अधिकाऱ्यांची चरित्रे व स्पर्धा परीक्षा’ या विषयावर पहिली कार्यशाळा ११ जानेवारी २०१९ रोजी दीपस्तंभ फौंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. साहित्य हा स्पर्धा परीक्षांचे अविभाज्य अंग. त्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला मोठी गर्दी केली होती.
‘आजचे नवं माध्यम : डिजिटल साहित्य : संधी व आव्हाने’ या विषयावर सध्या लंडन येथे स्थायिक झालेले मात्र मूळ पुणेकर असणारे जेष्ठ ब्लाँगर प्रसाद शिरगावकर यांनी मार्गदर्शन केले.  आज नवीन तंत्रज्ञानानं सर्वच क्षेत्रात व्यापक बदल झाले आहेत. साहित्य क्षेत्रही त्यापासून वेगळं राहू शकत नाही. आज नवतंत्रज्ञानाच्या माध्यमाने साहित्याची क्षितिजं फार विस्तारली आहेत. आज कमी पैशांत आपली लेखन कृती आपण कमी वेळेत जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात पाठवू शकतो. आदी विषय प्रसाद शिरगावकर यांनी अतिशय उत्कृष्ट पध्दतीने विषद केले.
‘डिजिटल पत्रकारिता : नवं माध्यम’ या विषयावर मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक अविनाश दुधे व साप्ताहिक चित्रलेखाचे विदर्भ ब्युरो चीफ अतुल विडूळकर यांनी मार्गदर्शन केले.  डिजिटल पत्रकारितेमुळे माध्यमातील एकाधिकारशाही मोडित निघाली आहे , माध्यमांचे अधिक लोकशाहीकरण झाले आहे , असे प्रतिपादन अविनाश दुधे यांनी यावेळी केले . त्यांनी यावेळी अनेक उदाहरणं देत प्रभावी डिजिटल पत्रकारिता करण्यासाठी काय करायला हवं , हे सांगितले . या कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकार व विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय होती.
१३ जानेवारी २०१९ रोजी ‘मराठी गझल लेखन : तंत्र व मंत्र’ या विषयावर जेष्ठ गझलकार शिवाजी जवरे यांनी मार्गदर्शन केले. गझल लेखनाचे तंत्र व मंत्र या कार्यशाळेत त्यांनी विषद केले. गझल लेखनात गझल लेखकांना येणाऱ्या अडचणी त्यांनी दूर केल्या.
महामंडळाची दळभद्री भूमिका
या कार्यशाळा आयोजित करताना मराठी  साहित्य महामंडळाची भूमिका अतिशय अडवणुकीची होती. साहित्याशी आजच्या तरूण पिढीला जोडणारे विषय कार्यशाळेत होते. मात्र, साहित्य हा विषय केवळ मुठभरांची मिरासदारी असावी, असे   महामंडळाला पदाधिकाऱ्यांना वाटतं , असे त्यांचे हेकेखोर वागणे होते आयोजक संस्थेसोबतच आप आपसातही ई-मेलने संपर्कात राहणारे महामंडळ मात्र साहित्य हे डिजिटल स्वरुपात स्वीकारायला तयार नव्हते. छापील पुस्तक हेच शाश्वत साहित्य असा त्यांचा हेकेखोरपणा संतापजनक  होता. आजच्या संवाद प्रक्रियेत जलद मार्गाचा वापर महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष फार खुबीने करत होते. मात्र, याच विषयावर संमेलनात प्रयोगात्मक कार्यशाळा घेण्यात खोडा घालण्यामागची भूमिका त्यांची आकलनापलीकडली होती.
   आम्ही सांगतो त्याच लोकांना कार्यशाळेत वक्ता म्हणून आमंत्रित करा ,   अन्यथा कार्यशाळा  साहित्य संमेलनाचा भाग नसतील अशी अतर्क्य भूमिका साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षांनी घेतली. अतिशय स्रूजनशील मुद्द्यावर महामंडळाने अडवणुकीची भूमिका घेतल्याने आयोजक संस्था वि.भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालयाने स्वतःच्या ताकतीवर या सर्व कार्यशाळा यशस्वीपणे  आयोजित केल्या. साहित्यप्रेमी तरूणाईनं याला गर्दी करीत त्याला प्रचंड प्रतिसादही दिला. या संपूर्ण  प्रक्रियेत खोडा घालू पाहणाऱ्या प्रवृत्तींना  साहित्यप्रेमींनी दिलेलं हे खणखणीत उत्तर होतं.
 फेसबुक, वाट्स-अप, ट्वीटर, ब्लाँग, वेब पोर्टल हे या पिढीच्या लेखनाचे नवी माध्यमं आहेत. या माध्यमांनी तरूणाईला लिहितं केलं आहे.  या माध्यमाचा वापर करत आजची पिढी दर्जेदार आणि सकस लिखाण करते आहे. त्यामुळे या क्रांतीकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर तो आपला करंटेपणा ठरेल. साहित्यक्षेत्रानं या बदलांची, या माध्यमांची दखल घेतली नाही तर साहित्यातील दरी वाढेल. त्यात जुने-नवे असे गट पडतील. त्यामूळे साहित्याताला समृद्ध करणाऱ्या  या नवमाध्यमाची दखल घेणं अतिशय आवश्यक आहे.
 या प्रयोगाच्या यशस्वीतेमुळे  एका नव्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे . नव्या पिढीच्या व्यक्त होण्याचे माध्यम त्यांच्या भाषेत सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न पुढील साहित्य संमेलनात अधिक व्यापक रूप धारण करेल, ही आशा आहे .  कधीतरी साहित्य संमेलन हे तरुणाईच्या या नव माध्यमांचं असेल अशी आशा निर्माण झाली आहे. जग बदलतंय, मग साहित्य क्षेत्रानंही कात का टाकू नये… साहित्यातील सध्याची काही जळमटं दूरकेल्याशिवाय या क्षेत्रात क्रांती होऊ शकणार नाही. त्या वाटेनं जाण्यासाठीच  विविध विषयांवर घेतलेल्या कार्यशाळा नक्कीच दीपस्तंभ ठरतील .हे सारं करतांना झालेला त्रास विसरून संमेलनाला एका वेगळ्या प्रवाहाची ओळख करून दिली, याचं समाधान शब्दांच्या पलिकडचं आहे. कविवर्य सुरेश भटांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास…
जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला 
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो….’
(लेखक ९२ व्या मराठी साहित्य संमेलनात डिजिटल साहित्य,  पत्रकारिता, स्पर्धा परीक्षा , गजल लेखन आदी विषयांवर आयोजित केलेल्या कार्यशाळेचे संयोजक होते)
9730019933
Previous articleअसंवेदनशील कोण? डॉक्टर की सरकार ?
Next articleआनंदभवन ते हॅरो, केंब्रिज
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here