डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातील मास्टरपीस

– प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञाननिर्मिती, समता, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यव्यवस्था यांचे प्रतिक होत. या राष्ट्रपुरूषाने अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात शेपाचशे लोकांनाही जमणार नाही असे पर्वताएव्हढे काम त्यांनी उभे केले. त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे महाराष्ट्र शासनाने आजवर २२ खंड प्रकाशित केलेत. या पुस्तकांचे संपादन करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. स्मृतीशेष वसंत मून यांच्या निधनानंतर २००१ ते २००६ पर्यंत समितीचा संपादक व सदस्य सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर महाराष्ट्र शासनाने सोपवली होती. त्याकाळात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणांचे अनेक खंड प्रसिद्ध केले. आधीचे जे मिळत नव्हते त्यांच्या सुधारित आवृत्त्या काढल्या. अनेक नव्या प्रकल्पांना गती दिली. गेली १४ वर्षे मी त्या समितीवर नाहीये तरिही सामान्य जनता आणि चळवळीतले कार्यकर्ते आजही मलाच त्या पुस्तकांबाबत विचारणा करतात, इतके या कामाशी माझे नाते जडलेले आहे.

डॉ. बाबासाहेबांचे मास्टरपीस

डॉ. बाबासाहेबांचे आम्ही काय वाचावे असा प्रश्न मला खूपदा विचारला जातो. त्यावर माझे उत्तर असते सर्वच्या सर्व २२ खंड वाचा. मग लोक म्हणतात, आमच्याकडे तेव्हढा वेळ नाही. निवडक पुस्तके सांगा. हा शॉर्टकट झाला. पण हरकत नाही. तुम्ही किमान दीड ते दोन तास बाजूला काढू शकता? वाचनाला देऊ शकता? तेव्हढ्या वेळात वाचायची डॉ. बाबासाहेबांची २ सर्वश्रेष्ठ पुस्तके मी तुम्हाला सांगतो. माझ्या मते हे डॉ. बाबासाहेबांचे मास्टरपीस आहेत. किमान हे तरी वाचाच वाचा. जे एव्हढेही वाचणार नाही त्यांनी बाबासाहेबांचे नावच न घेतलेले बरे!

१९३५ साली लिहिलेली ही २ पुस्तकं आहेत. ती आज मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. इंटरनेटवरही ती उपलब्ध आहेत. { लिंक्स खाली दिलेल्या आहेत. त्या न वाचताच, न पाहताच ” लिंक्स द्या, ही पुस्तकं कुठं मिळतील?” असल्या विचारणा घाईघाईत करू नका} ही आणि बाबासाहेबांची इतर सगळी पुस्तकं मिळण्याची ठिकाणे म्हणजे- मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या ५ शहरांमधील राज्य सरकारची पुस्तक दुकानं. ही पुस्तकं व्हीपीने पाठवली जात नाहीत. ती ऑनलाईन खरेदी करता येत नाहीत. ती पोस्टाने किंवा कुरियरनेही पाठवली जात नाहीत. काही खाजगी विक्रेते आणि काही खाजगी दुकानदार ही पुस्तके ठेवतात, त्यांच्याकडून ती तुम्हाला मिळू शकतील.

१. ” अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट,” हे लिहिलेले, प्रकाशित केलेले पण न झालेले भाषण आहे. पृष्ठसंख्या सुमारे ५०, शासकीय पुस्तकाची किंमत, रू. १५/- याचा समावेश शासनाच्या लेखन आणि भाषणांच्या पहिल्या खंडात केलेला आहे. याची मराठी भाषांतरे स्वतंत्रपणे प्रकाश सिरसट, वसंत मून आणि गौतम शिंदे यांनी केलेली आहेत. ही सगळी पुस्तके बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत.

२. ” वेटींग फार ए व्हीजा,” हे डॉ. बाबासाहेबांचे आत्मच्ररित्र आहे. ते हस्तलिखित स्वरूपात होते. ते १९९० साली प्रथम प्रकाशित झाले. त्याचा समावेश शासनाच्या लेखन आणि भाषणांच्या १२ व्या खंडात केलेला आहे. पृष्ठसंख्या सुमारे ३०, शासकीय पुस्तकाची {संपुर्ण खंडाची} किंमत, रू. ९५/- याची मराठी भाषांतरे भा.ल.भोळे, { डॉ. बाबासाहेब आंबेडकर- अनुभव आणि आठवणी, ले.सं. नानकचंद रत्तू, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९८, पृ.३१ ते ५१} आणि शंकरराव खरात, { डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा, इंद्रायणी साहित्य, पुणे, २०१८, } यांनी स्वतंत्रपणे केलेली आहेत. साकेत व इंद्रायणी प्रकाशनाची ही पुस्तके सगळीकडे मिळतात.

पहिले पुस्तक वैचारिक, समाजशास्त्रीय दस्तावेज असे आहे. जातीपातींवर लिहिल्या गेलेल्या हजारो पुस्तकांमधले आऊटस्टॅंडींग म्हणता येईल असे हे सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे.

दुसरे आत्मचरित्रपर आहे. पहिल्याच्या वाचनाने भारतीय समाजाचे आपले आकलन लख्ख होते, डोळे खाडकन उघडतात तर दुसर्‍याच्या वाचनाने बाबासाहेबांविषयी, त्यांच्या आयुष्यातील संघर्षाविषयी जाणून डोळ्यात आसवं येतात. ह्या महामानवाची ही संघर्षगाथा परिवर्तनाची आस जागवते. लढण्यासाठी बळ देते.

(लेखक नामवंत अभ्यासक व विचारवंत आहेत)

[email protected]

वाचनासाठी लिंक्स:-
http://www.columbia.edu/…/00ambed…/txt_ambedkar_waiting.html
http://drambedkar.co.in/…/books/cat…/6waiting-for-a-visa.pdf
http://ccnmtl.columbia.edu/…/web/readings/aoc_print_2004.pdf
https://books.google.co.in/books…

पुस्तके मिळण्याची ठिकाणे-
शासकीय ग्रंथ भांडार –

१. शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथ भांडार, जिल्हाधिकारी कार्यालय व जनरल पोस्ट ऑफिस यांच्या शेजारी,
पुणे स्टेशन, पुणे ४११००१
२. मध्यवर्ती शासकीय ग्रंथ भांडार, चर्नी रोड रेल्वे स्टेशन लगत, मुंबई, ४०० ००४
३. शासकीय ग्रंथ भांडार, तारा राणी पार्क, कोल्हापूर,
४. शासकीय ग्रंथ भांडार,सिव्हील लाईन्स, नागपूर,
५. शासकीय ग्रंथ भांडार, रेल्वे स्टेशन पुलालगत, औरंगाबाद

पुस्तक पेठ, लक्ष्मीछाया इमारत, आयडीयल कॉलनी ग्राऊंडजवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८ येथे मराठी, इंग्रजी, हिन्दीतील सर्व पुस्तके मिळतात.

Previous article…तर काही महिन्यात पृथ्वी मानवरहित होईल!
Next article‘वर्क फ्रॉम होम’ नव्हे, ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.