…तर काही महिन्यात पृथ्वी मानवरहित होईल!

– आशुतोष शेवाळकर

करोना नावाच्या मायक्रोस्कोप मधेही न दिसू शकणाऱ्या एका छोट्या जीवाने संपूर्ण जगाच्या गालावर एक करारी थप्पड मारली आहे. या अनुभवामुळे आता आपल्याला निसर्गातून यापुढे येणारा विषाणू यापेक्षा जीवघेणा आणि अधिक जलद प्रसारक निघाला तर काय, याही गोष्टीचा विचार करणं भाग आहे. तसं उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे या जंतूचं या पुढचं ‘म्युटेशन’ यापेक्षा वरचढ येणे हेच अपेक्षित आहे. करोनाचा संपर्काशिवाय प्रसार होऊ शकत नाही. पण हवेतून ज्याचा संसर्ग होऊ शकतो असा पुढचा ‘व्हायरस’ निसर्गात तयार झाला तर मग संपर्क टाळून सुद्धा त्याचा संसर्ग टाळणं शक्य होणार नाही. असा पसरणारा व यापेक्षा अधिक जीवघेणा असा काही जिवाणू सृष्टीत निपजला तर मानवजातीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो.

कोरोनाच्या या जागतिक अनुभवामुळे सगळ्यात जास्त प्रेरित कुणी झालं असेल त्या जगातील दहशतवादी संघटना. ही या करोना अनुभवामधली सगळ्यात जास्त धोकादायक बाब आहे. शक्तिशाली बॉम्बने पण होऊ शकत नाही एवढी मानव हत्या, एका जिवाणूमुळे संपूर्ण जगाला वेठीस धरता येणे, स्वत:ची फारशी काहीच जीवहानी न होता विरोधी राष्ट्राला नोमोहरम करता येणे , असे या अनुभवाचे सगळेच पैलू दहशतवादी संघटनांना आकर्षित करणारे आहेत.

‘सॅडीसीझम’ (Sadism) च्या घटना आपल्याकडे फारशा  होत नाहीत, पण पाश्चात्य देशात वर्षातून एखाद दुसरी तरी अशी घटना होतच असते. मशीनगनने किंवा रिव्हाल्वरने  काही जणांना मारून मग स्वत:ला मारून घेणे अशा ‘सॅडीस्ट’ माथेफिरुंच्या घटना पाश्चात्य देशांना नवीन नाही. अशा माथेफिरुंना पण हे ‘बायोवेपन’ आता जास्त आकर्षक वाटेल.

म्हणजे येत्या काळात जगाच्या ‘सायबर इंटेलीजेन्स’ पेक्षा  ‘बायो-इंटेलीजेन्स’ ची जबाबदारी जास्त वाढणार आहे. डोळ्यात तेल घालून जग नष्ट करू शकणाऱ्या या गुन्हे व गुन्हेगारीकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. ‘केमिकल’ व ‘बायोलॉजीकल’ शस्त्रांसाठी आजही या दहशतवादी संघटना प्रयत्नशील नसतील, असं नाही, पण आता त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असणाऱ्या या अनुभवाने तर त्यांचे याच बाबतीतले प्रयत्न जास्त वाढीस लागतील.

अमेरिका व चीनने आता तरी आपापल्या अहंकारांना आवर घालून मानव जातीच्या भवितव्यासाठी या बाबतीत सहकार्याचे हात मिळवले पाहिजेत. मोठ्या मनानी पुढाकार घेऊन [भलेही जाहीर न करता] आपापले ‘बायोवेपन्स’ नष्ट केले पाहिजेत.

या मोठ्या देशांच्या प्रयोगशाळेत किंवा दहशतवाद्याच्या ‘कॅम्प’मध्ये किंवा निसर्गावरच्या ‘म्युटेशन’ नी तयार होणारा एखादा सर्व संहारक जिवाणू ही कल्पनाच अंगावर शहारा आणणारी आहे.

कल्पना करून पहा… हवेतून जलद पसरणारा आणि आपल्या संसर्गानी मानवाच्या रक्तामध्ये गुठळ्या तयार करू शकणारा एक ‘व्हायरस’ सृष्टीत निर्माण झाला तर ही पृथ्वी संपूर्ण मानवरहित व्हायला काही महिन्यांपेक्षा जास्त अवधी लागणार नाही. गेल्या दहा हजार वर्षाच्या मानवाच्या कठोर मेहनतीने तयार झालेले हे सगळं विश्व केवळ दहा महिन्यातच अस्तित्वात राहणार नाही. आपण निर्माण केलेलं हे सगळं इथे असंच असेल, फक्त मानव नसेल . कल्पना करून पहा . आपलं घर, सुरू राहिलेला पंखा, एसी, बाहेरचे रस्ते, मेट्रो, पूल, ऑफिस, कम्प्युटर्स, मॉल्स, मल्टीप्लेक्स, रेस्टोरंट, हॉटेल्स… पण हे वापरणारा एकही माणूस नाही. सध्या  डॉल्फिन्स किनाऱ्यावर आले आहेत, पेंगविन्स, हरणं, मोर रस्त्यावर आले आहेत, हे आपल्याला फार मनोहर वाटत आहे. पण पृथ्वी निर्मनुष्य झाल्यावर  जे काही होईल ते मात्र निश्चित मनोहर असणार नाही. उलट ते भयंकर असेल.     कुत्रे, कोल्हे, लांडगे आत येऊन फ्रीजचे दार उघडायचा प्रयत्न करतील, कम्प्युटर्सच्या कीबोर्डवरुन साप सरपटतील, तुमच्या पलंगाच्या उशीखाली पाल पिल्लांना जन्म देईल. उद्दामपणे वाढणाऱ्या रानटी वेलींनी घरं झाकले जातील, उंच निवासी  इमारतीमध्ये वटवाघळांची ‘ओनरशिप’ असेल, मानव निर्मित वीज संपल्यावर पुन्हा काळोखाचे साम्राज्य रात्री पृथ्वीवर असेल, अमावस्या व पौर्णिमेच्या आवर्तनांनी प्राण्यांचं ‘नाइट लाईफ’ नियंत्रित होईल. पुन्हा नवीन मानव निर्माण होऊन तो ‘टारझन द एप मॅन’ कम्प्युटर हाताळून आपल्या बुद्धीनी त्यात काही शोधेपर्यंत हे सगळं असंच सुरू राहील.

  संपूर्ण मानव वंशाचा नायनाट निसर्ग इतक्या सहजतेने करू शकतो का, या भीषण शक्यतेची कल्पना डोक्यात आल्यावर मग मुळात अशा महामाऱ्या येतच का असतील? हा मूलभूत प्रश्नही मनात डोकावतो . उत्क्रांतीमध्ये असं काही होण्याची आवश्यकताच का असेल? निसर्गात कुठलीही गोष्ट ‘अॅक्सिडेंटली’ होत नाही, एक नियोजित सुसूत्रता निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे असते, असं मला वाटतं. कोट्यवधी योगायोग घडून पृथ्वीवर जीवन निर्माण झालं हे विवेचन मला पटत नाही. निसर्गाच्या कुठल्यातरी अनामिक शक्तीचा इथे जीवन निर्माण करण्यासाठीचा ‘इंटेन्स इन्टेंट’ व त्यासाठी तिचे कोट्यवधी वर्षांचे सातत्याचे प्रयत्न यातूनच शेवटी इथे जीवन निर्मिती झाली असावी. आपल्याच आकाशगंगेच्या आपल्यापेक्षा प्रचंड मोठे सूर्य असलेल्या लाखों सूर्यमालिकांमधे  पृथ्वीसारखी अनुकूल परिस्थिति असूनही त्या ग्रहांची कूस अजून वांझ आहे आणि आपली वसुंधरा मात्र जीववैविध्याने बहरलेली आहे, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. आणि म्हणून अशा वैश्विक महामाऱ्या येण्यात पण असा काही कार्यकारणभाव असू शकतो असाही विचार करून पहायला हरकत नाही.

धर्मच श्रेष्ठ किंवा विज्ञानच श्रेष्ठ असे विरोधी विचार असलेले दोन विचार प्रवाह जगात दिसून येतात. पण निसर्ग हा धर्म वा विज्ञान या दोन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे. निसर्ग हा आद्य  आहे, मूलभूत आहे. निसर्गाच्या अभ्यासातून  धर्म वा विज्ञान या दोघांचाही जन्म झालेला आहे. धर्म किंवा विज्ञानातून निसर्गाचा नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

‘जीवेत जीवनी जीवनम’ ही तशी निसर्गाची मूलभूतच  व्यवस्था  आहे. एक जिवाणू खात जगणारे दुसरे जिवाणू तयार होणे, असंच या उत्क्रांतीच्या साखळीत घडत असतं. पण माणूस हे निसर्गाचं सर्वोच्च व  सर्वात लाडकं अपत्य आहे. त्याला खाणारा कोणी जीव निसर्गाने निर्माण केलेला नाही. त्यामुळे अशा महामाऱ्या निसर्गाचा काही निरुपाय होऊनच येत असतील, असंही एक वाटतं.

विज्ञानाची इतकी प्रगती झाल्यावर आता शरीर वा शरीराच्या यंत्रात काही बिघाड झाला तरच किंवा वार्धक्याने हे यंत्र जुनं झालं तरच आपण मरू शकतो अशी आपल्याला खात्री वाटायला लागली होती. कुठल्या जंतूच्या संसर्गानी आपण मरू शकतो हे आपण जवळपास आता विसरूनच गेलो आहोत आणि अशा वेळी हे आव्हान आपल्या समोर येऊन उभं ठाकलं आहे.

अशा महामाऱ्या मानवाच्या इतिहासात यापूर्वीही अनेकदा येऊन गेल्या आहेत. गेल्या दोन हजार वर्षातल्या अशा महामाऱ्यांचे त्या त्या वेळेसच्या संत साहित्यात उल्लेख पण  आढळतात.

त्याआधीच्या वर्षांचा विचार करायचा म्हटलं तर डास हे गेल्या जवळपास २३०० वर्षांपासून आपले सहचर आहेत. हे  आलेत तेव्हा माणसांना मारणारे मोठे शत्रू हेच होते. जगातल्या सगळ्या राजांना युद्धात जिंकणारा अलेक्झांडर स्वतः मात्र एका क्षुल्लक डासाच्या चाव्यामुळेच मेला होता. एका जीवाणुला खाणारा  त्याच्यापेक्षा मोठा जिवाणू अशी साधारणपणे निसर्गाची ‘जीवेत जीवनी जीवनम’ ची योजना आहे, यात माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी, त्याला मारण्यासाठी शक्तीची नाही तर युक्तीची गरज आहे. म्हणून निसर्गाने आपल्याला मारायला अशा छोट्या जीवांची नियुक्ती केली असावी का? डासांच्या चाव्यांना आता आपण सरावलो आहे .शरीरात त्यांच्या ‘अँटीबॉडीज’ तयार करून आपण आता निबरट, कोडगे झालोत, त्यामुळे निसर्गाने त्याहीपेक्षा सूक्ष्म अशा व्हायरस या जंतूंचं  गेल्या ५०-६० वर्षात नियोजन केलं असेल कां?

गेल्या १०० ते १२५ वर्षाच्या महामाऱ्यांचा विचार करायचा झाला तर १८९७ च्या प्लेग नंतर १९१८ व १९५८ चे फ्लू या मोठ्या महामाऱ्या येऊन गेलेल्या दिसतात. [आताचा करोना हा त्याचाच ७ वा व लेटेस्ट वंशज.] फ्लूचाही प्रसार सार्वत्रिक होता, पण जीवहानी प्लेग इतकी नव्हती.

ज्ञात असलेल्या प्रत्येक महामाऱ्यांच्या आधीच्या थोड्या काळाचा अभ्यास करून त्या  महामारी आधी आपण निसर्गाशी काही मोठी काही छेडछाड केली होती का, असाही एक विचार करून पाहिला पाहिजे. १९१८ आणि १९५८ च्या फ्लूशी त्याआधी होऊन गेलेल्या विश्वयुद्धांचा काही संबंध असावा का?

पूर्वी धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेत येऊन गेला की कुठली तरी नवीन रोगराई येते असं म्हणायचे. धुमकेतूवरचे काही जीवजंतू पृथ्वीच्या जीवजंतूच्या सानिध्यात आल्याने हा संसर्ग होतो असा तेव्हा समज होता.

अवकाशातून परतणारी आपली अवकाशयाने, उपग्रह त्यांच्याबरोबर काही सूक्ष्म जीवजंतू आणत आहेत का व त्यांचा पृथ्वीवरच्या जंतूंशी संकर होऊन असे काही विध्वंसक जंतू निर्माण होत आहेत का?

या व अश्या महामाऱ्या आपण आपल्या काही चुकांमुळे ओढवून घेत आहोत का? पृथ्वीच्या समतोलासाठी मानवांची काही ठराविक लोकसंख्या अपेक्षित आहे व ती आपण ओलांडतो आहोत का किंवा पृथ्वीच्या वातावरणाच्या समतोलासाठी २/३ पृष्ठ भूभाग पाण्याचा असणे आवश्यक आहे. तसाच अमुक काही  टक्के भूभाग हा झाडांचा ‘ग्रीन कव्हरचा’ असणे आवश्यक आहे व नागरीकरणाच्या स्पर्धेमध्ये आपण तो ओलांडतो आहोत का?

गेल्या दशकात सातत्याने सार्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू अशा माणसाच्या जीवाला घातक असलेल्या विषाणूची एकामागोमाग निर्मिती निसर्गात होते आहे, याला आपण निव्वळ योगायोग समजायचं का?

कोंडी होत चाललेल्या, आपल्या अतिक्रमणाने घुसमटत चाललेल्या निसर्गाचे हे विषारी फुत्कार असावेत काय? मोठ्या भूकंपाआधी त्या भूभागाच्या आतून  काही विशिष्ट आवाज मधून मधून काही वर्ष ऐकू येत असतात. गेल्या दशकातला हा जंतू प्रसार हे निसर्गाचे तसे आवाज, तशीच साद आहे का?

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

9822466401

Previous articleकोरोना संकटात मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा !
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातील मास्टरपीस
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.