तुमच्या या सुंदर बिनडोकपणाचं रहस्य काय?

साभार: दैनिक दिव्य मराठी

संजय आवटे

पंधरा वर्षं तरी झाली असतीलच.
‘देवाला रिटायर करा’ अशी लख्ख भूमिका घेऊन डॉ. श्रीराम लागू ठामपणे उभे होते. तर, सर्वसामान्यांच्या सामूहिक धारणांना असे ठोकरण्याची आवश्यकता नाही, असा समंजस सूर डॉ. नरेंद्र दाभोलकर आळवत होते. दोघांचा प्रकट संवाद चर्चेचा ठरत असताना, या संवादाचे सूत्रसंचालन मी करावे, असा प्रस्ताव डॉ. दाभोलकरांनी ठेवला. कार्यक्रमापूर्वी तयारी म्हणून लागूंना भेटलो तर, ते म्हणाले, ‘त्यात तयारी कसली? तुम्हाला हवे ते तुम्ही विचाराल आणि मला हवे ते मी बोलेन’. आणि, तसेच घडलेही. (‘अक्षय’ मुलाखतींच्या आजच्या जमान्यात ही उत्स्फूर्त मुलाखत आठवली तरी आश्चर्यकारक वाटू लागते! असो.)

एखादा माणूस आपले अवघे आयुष्य एवढ्या विवेकी पद्धतीने, सुस्पष्ट बुद्धिप्रामाण्यवादाने आणि तरीही तेवढ्याच रसरशीतपणे जगू कसा शकतो, याचे मला कमालीचे कौतुक वाटत असे. लागूंचे बोलणे तर लख्ख होतेच. उच्चार स्वच्छ होते. पण, खरे म्हणजे त्यांचे विचार त्याहून अधिक स्पष्ट होते. लोकानुनयाच्या फंदात ते कधी पडले नाहीत आणि कोणत्याही कारणाने त्यांनी आपली भूमिका लपवली नाही. हे असे करणे हा वेडेपणा होता. याला ‘पोलिटिकल करेक्टनेस’ नाहीत म्हणत. अभिनेता म्हणून मराठी आणि हिंदीत शब्दशः राज्य करणा-या अशा नटसम्राटाला हा वेडेपणा परवडण्यासारखा नव्हता. लोक एकीकडे आणि याच्या विचारांची दिशा भलतीच. पण, तरीही हा लमाण त्याच्या तंद्रीत वाट तुडवत राहिला. स्वतःशी इमान ठेवत जगत राहिला. आणि, व्यवस्थेला न आवडणारे प्रश्न विचारत, जाब मागत राहिला. मुळात डॉक्टर. नंतर अभिनेता म्हणून मिळवलेले उदंड यश. कशाला बाकी उठाठेव हवी! पण, प्रत्येक सामाजिक मुद्द्यांवर हा नायक व्यक्त होत राहिला. दांभिकतेला नख लावत नैतिकतेची व्याख्या तपासत राहिला. शक्य तिथे आपला खारीचा वाटा खरेपणाने उचलत राहिला. काम करत राहिला.

मी डॉक्टरांच्या संपर्कात पुन्हा आलो, ते ‘कलात्म’च्या निमित्ताने.
कलेच्या सामाजिक आकलनाचा प्रयत्न करणारा एक प्रकल्प आम्ही मित्र-मैत्रिणी करत होतो. २०१० ची ही गोष्ट. महाराष्ट्र आपला सुवर्णमहोत्सव तेव्हा साजरा करत होता. लागू या अंकाचे अतिथी संपादक होते. त्या निमित्ताने त्यांच्याशी विस्ताराने बोलता आले. ‘ज्याला कला खुणावत नाही, तो विचारवंत असू शकत नाही आणि विचार असल्याशिवाय कलावंत म्हणून कोणी घडू शकत नाही’, हे तेव्हाचं त्यांचं विधान मला कमालीचं महत्त्वाचं वाटतं. ‘कलात्म’चे अतिथी संपादक म्हणून त्यांनी केलेली मांडणी आजही तेवढीच लागू आहे! या प्रकल्पाचा मी संपादक होतो. आणि, त्यांच्या त्या मांडणीनं कमालीचा प्रभावित झालो होतो.

‘तुम्ही आधी नागरिक असता. ज्याला नागरिक म्हणून संवेदना नाहीत. जो ‘माणूस’ म्हणून सजग नाही, तो कलावंत म्हणून सजग असूच कसा शकतो?’, हा त्यांचा प्रश्न होता. कलेला आपण फार उथळ पातळीवर नेऊन ठेवलं आहे. कला वैश्विक भान देते. कला तुम्हाला ‘माणूस’ करते. कला हा समतेचा, शांततेचा, व्यापकतेचा ‘विचार’ आहे. हा विचार न करता जे चाळे कलेच्या नावाखाली होत असतात, त्याला कला नसतात म्हणत, असे तर त्यांनी मांडलेच. पण, त्याचवेळी कला हा सामाजिक- राजकीय मुद्दा आहे, हेही मांडले. कलावंत म्हणून माझे राजकारण आहे, माझे ‘स्टेटमेंट’ आहे, हेही आवर्जून नोंदवले.

आज का कोण जाणे, डॉक्टरांच्या जाण्याने आपण एकाकी झालो आहोत, अशी भावना मनात आहे. अविवेकी झुंडींचा नंगानाच भवताली सुरू असताना आणि ‘पोलिटिकल करेक्टनेस’च्या नावाखाली सारेच मौन बाळगत असताना, हा वेडा लमाण आठवत राहातो. आज लागू बोलते, तर ‘या टोपीखाली दडलंय काय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला असताच. त्याचवेळी, सभोवतालच्या सत्ताधीशांकडे आणि त्यांच्या भक्तांकडे बघत त्यांनी ”सामना’मधील त्यांचा तो सुप्रसिद्ध डायलॉगच कदाचित मनापासून वापरला असताः ‘तुमच्या या सुंदर बिनडोकपणाचं रहस्य काय?’ …

बिनडोकपणाच डोक्यावर राज्य करत असताना, लख्खपणे आपली भूमिका मांडणारा हा तेजस्वी नायक आठवतो. आणि, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ही आपलीच ओळख आहे, असे वाटून जाते!

(लेखक दिव्य मराठी चे राज्य संपादक आहेत)

+91 98812 56009

Previous articleवैचारिक बराकीकरण हे शिक्षण क्षेत्रासमोरील मोठं आव्हान – डॉ. प्रज्ञा दया पवार
Next articleमी गांधीवादी!- डॉ श्रीराम लागू
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here