‘दिठी’: तू तो माझे… मी तो तुझे…

-प्रमोद मुनघाटे

रात्री ‘दिठी’ पाहिला. पहाटेपर्यंत स्वप्नात-अर्धवट झोपेत सारखी तीच ती दृश्ये दिसत होती. दिवसरात्र निनादणारा पाऊस, रामजीदादा अशी हाक, गायीच्या वेणा, रामजीच्या नवजात नातीचे रडणे, वारीतील अभंगाचा नाद आणि रामजीचे ते शून्यात डोळे लावून बसणे. विलक्षण झपाटल्यासारखा अनुभव.

सुरवातीला कोसळणारा पाऊस पाहून मला ‘राशोमान’चीच आठवण झाली. संतू वाणी, जोशी बुवा आणि गोविंदा तिघे तसेच मुसळधार पाऊस बघत आहेत. रामजीचा तरुण मुलगा नदीतल्या भोवऱ्यात गेल्याने त्याच्या दु:खाने ते व्याकूळ झालेले आहेत.

‘दिठी’ या संपूर्ण सिनेमाला एक अनोखी ‘लय’ आहे. सतत दृश्ये एका लयीत सरकत राहतात. रात्रीचा काळोख, वाऱ्याच्या झोताने हेलकावणारा पाऊस, अंधारलेल्या गावातील नागमोडी वाटा, त्या वाटांवरून डोक्यावर पोत्याची खोळ घेऊन पोथीला निघालेली माणसे. रामजीच्या घरात हा काळोख आणि निरंतर पावसाचा एक मोठा अजगरच जणू वेटोळे घालून आहे. संपूर्ण सिनेमाभर पावसाच्या धारांचा नाद, मध्येच वारीतील अभंगांचे सूर, गायीच्या वेदनेने कासावीस झालेल्या पारूबाईचे ‘रामजी… रामजी…’ अशा हाका, रामजीच्या नातीचे किरकिरणे, माळ्यावर चाललेल्या पोथीतील अमृतानुभवाचे वाचन आणि अभंगांचे तालबद्ध सूर; अशा निसर्ग, प्राणी आणि मानवी आवाजाच्या एकमेकांत मिसळलेल्या स्वरांची आवर्तने, एका लयीत होत राहतात. हे लयबद्ध दृश्यमालिका, हीच या या सिनेमाचा विलक्षण अनुभव वैशिष्ट्य आहे. एखादी अनवट कविताच जणू दृश्यरूपाने साकार होते डोळ्यांपुढे.

फ्लॅशबॅकमध्ये मधूनच येणाऱ्या वारीच्या अनेक दृश्यातून वळणे घेत घेत येणारी सिनेमाची ही लय उत्तरार्धात ‘तू तो माझे मी तो तुझे’ या ज्ञानेश्वरांच्या अभंगातून क्लायमॅक्सला पोचते. सिनेमाच्या एकूणच अनुभवाचा कंद या अभंगातून व्यक्त होतो. दि बा मोकाशींच्या मूळ कथेतील गाव, ती माणसे, ते जन्ममृत्यूचे गूढ, हे सगळे एका विशाल अनुभूतीत विसर्जित होतात. संपूर्ण सिनेमाचा भोवरा ज्या एका केंद्राभोवती गरगरत राहतो, ते केंद्र म्हणजे हा अभंग. वारकरी संप्रदायाच्या जीवनमूल्यांचा अन्वयार्थ म्हणजे ‘तू तो माझे मी तो तुझे’ हा अभंग आहे. अद्वैतवाद.

पोथीला जाण्याआधी संतू वाणी, जोशी बुवा आणि गोविंदा तिघे हताशपणे प्रलयंकारी पावसाकडे पाहत बोलत असतात. रामजीवर कोसळलेले दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तेंव्हा गोविंदा विचारतो. “एक माणूस दुसऱ्यासाठी संपूर्णपणे दुखी नसतोच का हो?” त्यावर जोशीबुवा उत्तर देतात, “क्वचितच”.

पण अद्वैताची परीक्षा या सिनेमात आणखी पुढे आहे. एरवी इतरांना शहाणपण सांगणाऱ्या रामजीसारख्या साध्या कष्टकरी वारकऱ्याला देखील आता काही प्रश्न पडतात. “दिठी साफ असेल तर अल्याडचं पल्याडचं साफ दिसतं; नाहीतर दोन्हीकड अंधार” असे एकदा रामजी कुणाला तरी बोलला असतो पूर्वी. पण आता तरुण पोराच्या मृत्यूने त्याची दिठी अंधारून गेली आहे. म्हणून माझ्याच वाट्याला हे का आले? माझी तीस वर्षांची वारी कुठे गेली? ते पुण्य कुठं गेलं ? आत्मा खरा आणि शरीर खोटं. शरीराला काहीच अर्थ नसतो का? हे दु:ख असं एकेकट्यालाच भोगावं लागतं का? हे असले प्रश्न त्याला सतावू लागतात.

संतू वाणी, जोशी बुवा आणि गोविंदा ही माणसं पोथीच्या निमित्ताने जणू अद्वैताच्या कल्पनेची उलटतपासणीच करीत आहेत. पण त्यांना अशा शाब्दिक-विद्वचर्चेशी काही घेणेच नसते कारण ते सगळेच कष्टकरी आहेत. रामजीवर, त्या गावावर, त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खातून त्यांच्यापुढे हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

या प्रश्नांची उत्तरे आहेत का त्या पोथीत, असाही प्रश्न सिनेमा पाहणारा प्रेक्षक स्वतःलाच विचारतो. आणि समजा या प्रश्नांची उत्तरे अद्वैतवादी तत्वज्ञान सांगणाऱ्या पोथीत बद्ध असतीलही, पण प्रत्यक्ष जीवनात या प्रश्नांची उत्तरे कशी सापडत असतील सामान्य माणसाला? आणि कोणत्या रूपात आकळत असतील ही उत्तरे? याच प्रश्नांनी भोवंडून टाकलेल्या या कथेतून दि बा मोकाशी वाचकांची सोडवणूक करू पाहतात. इथे रामजीचा अभिनय करणारे किशोर कदम आणि दिग्दर्शक सुमित्रा भावे ती सोडवणूक करू पाहतात. आणि ही सोडवणूक म्हणजे त्या दिवस भरलेल्या, असह्य प्रसूतीवेदनांनी हंबरणाऱ्या सगुणा गायीची सोडवणूक होय.

‘दिठी’मधील हा गायीच्या सोडवणूकीचा हा प्रसंग म्हणजे मराठी सिनेमात इतिहास निर्माण करणारा एक क्षण होय. पोराच्या मृत्यूने सैरभैर झालेला रामजी सगुणाच्या पोटावरून हात फिरवतो आणि तिची समजूत घालतो. तो जणू त्या क्षणी ब्रम्हान्डालाच साद घालतो आहे. जिथे सुख-दु:ख, जन्म-मरण यांचे द्वैत फिटले आहे आहे असा क्षण रामजी अनुभवत आहे, आणि प्रेक्षकही अनुभवत आहेत. “दिठी साफ असेल तर अल्याडचं पल्याडचं साफ दिसतं” हाच तो क्षण आहे.

‘दिठी’ या सिनेमाचा अनुभव असा केवळ काव्यात्म अनुभव नाही, तो तात्त्विकदेखील आहे. पण काव्य, तत्त्वज्ञान हे शब्दांविना दृश्यरूपात एकजीव होऊन आपल्या पुढे ज्या अनुभवाच्या मुशीत उभे राहते, ती रामजी आणि इतर सामन्यांच्या जीवनव्यवहाराच्या पातळीवरील आहे, ही ‘दिठी’ या सिनेमाची खरी ताकद आहे. दि बा मोकाशी यांची कथा जशी लौकिकातून अलौकिकाकडे झेप घेते, तशी किशोर कदम यांच्या रामजीच्या भूमिकेतून, त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीतील ही आजवरची मोठी झेप आहे आणि आणि सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनाची ती उंची आहे. एवढेच नव्हे तर एकूणच मराठी सिनेमाच्या उंचीचे ते दर्शन आहे. डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, अंजली पाटील, कैलाश वाघमारे आणि ओंकार गोवर्धन या प्रतिभावंत कलावंतांचा अभिनय एकाचवेळी अनुभवता येणे, हाही या निमित्ताने एक उच्चांकच आहे.

दिग्दर्शक सुमित्रा भावेंनी केलेला सिनेमाच्या दृश्यभाषेचा फार कमालीचा वापर केला आहे. कॅमेरा, संकलन आणि संपादन या काही वेगवेगळ्या गोष्टी अस्तित्वात असतील असे वाटतच नाही, इतका हा एकात्म-काव्यात्म अनुभव वाटतो. फारच कमी मराठी सिनेमात दृश्यभाषेचा असा कमाल वापर आपण पाहतो.

‘दिठी’मध्ये अतिशय मोजके संवाद आहेत. तेही काढून टाकले तर एकूण परिणामात काहीच फरक पडणार नाही, अशी एकूण या सिनेमात दृश्यभाषेचा उत्तुंग आविष्कार झाला आहे.

सलाम किशोर कदम आणि सलाम सुमित्रा भावे….तुम्ही प्रेक्षकांना सिनेमा कसा पहायचा हीच नव्हे, तर मानवी जीवनातील सुख-दु:खाकडे, जन्म-मरणाकडे कसे पहायचे ह्याची ‘दिठी’ दिली आहे.

(लेखक नामवंत समीक्षक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत)

7709012078

प्रमोद मुनघाटे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रमोद मुनघाटे – type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleवैशाखातील चंद्रकळा : यशोधरा
Next articleरणजित देशमुखांची पंच्याहत्तरी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.