अरुणा सबानेंचे ‘ते आठ दिवस’ : ग्रामीण वास्तवाचा एक छोटा एक्सरे !

-प्रमोद मुनघाटे

अरुणा सबाने एका गावात रात्री मुक्कामी असतात. तेंव्हा घडलेला एक संवाद –

“मी माझी बॅग उचलली, आणि दाराकडे वळून पडवीच्या बाहेर पडले. तोच आतून आवाज आला.

“थांबा बाई.’’

मी वळून पाहिलं, तर तुळशीची माळ घातलेले आणि कपाळावर चंदनाचा टिळा लावलेले बाईंचे यजमान बाहेर आलेले. ते म्हणाले,

“बाई, जात विचारण्याचे एकमेव कारण मी पारायण करतो. पंढरीचा वारकरी आहो. मी घरात बसून तुकारामाची गाथा वाचून राहिलो. या सप्ताहात ती संपली पाहिजे. रात्री आमच्या घरी भजन असते. मला मास मच्छी खाणारे चालत नाही आणि नवबौद्ध ते खाल्ल्याशिवाय राहात नाही.’’

“ठीक आहे. काही हरकत नाही. मी निघते.’’

“नाही, तुम्ही राहू शकता.’’

“नाही, मला आता ते शक्यच नाही.’’

“का ? तुम्ही तर पाटील आहात न ?’’

“होय, पण मी मटण खाते.’’

“पाटील घरातल्या असून?’’

“हो, आमच्या घरात इतर कुणीच स्त्रिया खात नाहीत, पण मी खाते. म्हणूनच आता मी निघते. सॉरी, मला माफ करा. पण जाता जाता एक गोष्ट सांगतेच काका, मटणाचा आणि जातीचा काहीही संबंध नाही. मी जोशी, कुलकर्णी असते, तर तुम्ही माझी काहीच विचारपूस न करता मला थांबवून घेतलं असतं. ती बाई मटण खातच नसेल या विश्वासावर.  पण आता तेही खूप खातात. माझा मुलगा तर म्हणतो, सर्वांत जास्त मटण बी क्लास खातो. त्याचं हॉटेल आहे, म्हणून मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकते. निघते मी.’’

अरुणा सबाने यांच्या ‘ते आठ दिवस’ या नवीन पुस्तकाचे वर्णन एका वाक्यात करायचे झाल्यास मी ‘ग्रामीण जातवास्तवाची लिटमस टेस्ट’ असे करेन. तसे तर ‘जात’ ही गोष्ट आपल्या भारतीयांच्या डीएनएमध्येच वस्तीला आहे. काही गंड-अहंगंड आपल्याला जन्मापासून रेडीमेड मिळत असतात, त्यापैकी ही जातीय मानसिकता.  पण ही मानसिकता वारकरी-माळकरी यांच्यापुरतीच नाही, असा गैरसमज लवकरच या पुस्तकातील पुढच्या घटनांमधून दूर होतो. संत-महात्म्यापासून तर आपण रात्रंदिवस  ज्यांना वंदन करतो त्या  महापुरुषांनी जाती निर्मूलनासाठी किती खस्ता खाल्या असतील.  समाजाला डी-कास्ट करण्यासाठी प्रबोधनाच्या कितीतरी चळवळी आल्या आणि गेल्या. पण आपला सामाजिक व्यवहार जातकेंद्रीच राहिला,  हे कटू सत्य आहे. कारण मानसिक स्वच्छता करण्याचा साबण अजून कोणाला तयार करता आला नाही.

‘ते आठ दिवस’  अरुणा सबाने यांचे दीडशे पृष्ठांचे एक छोटे ‘स्वकथन’ आहे. ‘स्वकथन’ म्हणजे ते काल्पनिक ललितलेखन नाही किंवा वैचारिक पुस्तक सुद्धा नाही. तर लेखिकेला विदर्भ-मराठवाड्याच्या सीमारेषेवरील  लहान लहान गावात फिरताना आलेले अनुभव या पुस्तकात लिहिले आहेत.

पंधरा वर्षांपूर्वी अचानक एक दिवस या लेखिकेला वाटते की आपण आता आयुष्यात बरेच स्थिरस्थावर झालो आहोत. आरामदायी जीवन जगतो आहोत. सर्वसामान्य माणसांच्या वाट्याला येणारे आयुष्य खऱ्या अर्थाने आपल्याला माहितच नाही. म्हणून लेखिका-प्रकाशिका अशी प्रतिष्ठेची झूल झुगारून आठ दिवसांची ‘एक अनप्लँड ट्रीप’ करायची ती ठरवते. मनाची पाटी कोरी ठेवून फक्त गरजेपुरते कपडे सोबत घ्यायचे, एस. टी. स्टॅण्डवर जाऊन मिळेल त्या बसमध्ये बसायचे, मध्येच एखाद्या खेड्यातच उतरायचं, तिथे जागा मिळेल त्या घरी मुक्काम करायचा, असे ठरवते. हातात कोणताही नकाशा न घेता या अशा मुलखावेगळ्या ट्रीपमध्ये पुढे आठ दिवस लेखिका महाराष्ट्रातील काही खेडी पायाखाली घालते, तेव्हा तिला ग्रामीण महाराष्ट्राच्या मानसिकतेचा एक धक्कादायक नकाशा हाती लागतो. तोच या पुस्तकात बाईंनी आपल्यापुढे पसरला आहे. या अनप्लँड ट्रीपच्या अल्बममधील काही चित्रे काहीशा अलिप्तपणे लेखिका आपल्यापुढे मांडते, तेव्हा आपल्या डोक्याला झिनझिण्या येतात.

अर्थात एकटी बाई, विनाउद्देश आणि जायचे कुठे तेही नक्की ठावूक नसलेली, अशी रात्रीबेरात्री फिरताना तिच्यावर प्रश्नांचा मारा तर होणारच. सुरवात तर कंडक्टर आणि एसटीतल्या प्रवाशांपासूनच होते. तुम्ही बाईमाणूस असून एकट्याच कशा फिरता? लग्न झालं आहे का? मग मिस्टर कुठे आहेत वगैरे.

प्रवासाच्या दुसऱ्याच दिवसाची गोष्ट. म्हणजे रात्रीच्या मुक्कामाची. लेखिका औरंगाबादजवळच्या डोरली नावाच्या गावात उतरते. योगायोगाने एक बऱ्यापैकी सधन वाडा मिळतो मुक्कामाला. दूरची ओळखही निघते. पण भारतीय परिभाषेत ‘घरंदाज’ अशा त्या घरात रात्री अचानक लेखिकेला अतिप्रसंगाला कसे सामोरे जावे लागते ते मुळातून वाचण्यासारखे आहे. अशा  अनुभवातून लेखिकेसोबतच आपल्यालाही धक्के बसत जातात.

एरवी प्रवासवर्णन म्हणजे केवळ डोंगर-दऱ्या-समुद्राचे वर्णन असते. पण या पुस्तकात तसे नाही. वरून वरून सुंदर दिसणाऱ्या रस्त्यावरून चालता चालता पायाखालच्या नालीवरच्या एखाद्या मेनहोलचे झाकण उघडून पाहावे आणि आतली  घाण दिसावी असे एकेक प्रसंग आहेत. गांधी, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रबोधनाने सामाजिक विकासाच्या कथा आपण माध्यमात वाचतो. पण प्रत्यक्षात काय आहे?  एका खेड्यातील मुक्कामात तेथील युवकांना विचारते,

“१४ एप्रिल करता की नाही ?’’

“हो, आमच्या गावातली तिकडच्या मोहल्यातली मुलं करतात. यातली तीन मुलं त्यात सहभागी होत होती आणि चार मुलं नाही. कारण गावातील राजकारण. शिवाय बाबासाहेब हा त्यांचा विषय.’’

“अरे, बाबासाहेब हा कुणा एकाचा विषय असू शकतो काय ? ते सर्वांचेच. आपल्याला संविधान दिलं त्यांनी. जातीभेद नष्ट होण्यासाठी किती खस्ता खाल्यात त्यांनी. मी तर त्यांना माझा बाप मानते.’’

“तुम्ही पाटील असून ?’’

“पाटलाला काय शिंग असतात काय रे ?’’

“हो, आमच्याकडे ते विशेष असतात.’’

“ते जाऊ दे. पण तुम्ही सर्वांनीच बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये सहभागी व्हायला हवं.’’

“मॅडम, आम्ही गांधी जयंती करतो, शिवजयंती करतो तर त्यात तिकडले लोक सहभागी होत नाही, मग आम्ही का जायचं तिकडे ?’’

अशा प्रसंगातून लेखिकेला आणि वाचकांनाही धक्के बसू लागतात. प्रबोधनाची चळवळ गेली कुठे असे प्रश्न पडू लागतात. चौथ्या दिवशी बसमध्ये या पेक्षाही भयंकर प्रसंग ओढवतो. शाळेत जाणारी मुलं बसली असतात. एक टारगट मुलगा एक मुलीला धक्का मारतो. लेखिकेला राग येतो. गावातील प्रतिष्ठिताचा पोरगा म्हणून कंडक्टरला हात वर करतो. लेखिका त्या मुलाला मुलीची माफी मागायला सांगते तर तो मुलगा मुलीचा जातीवाचक उल्लेख करून माफी मागण्यास नकार देतो. लेखिकेचा संताप संताप होतो. पण ती त्या पोराजवळ जाऊन प्रेमाने म्हणते, “तुला मुलींना धक्के मारण्याची एवढी हौस आहे ना, तर मार मला धक्का मार.’’ सगळी बस आता उभी होते. प्रकरण पेटत जाते. एका मुलीचा झालेला अपमान ही गोष्ट स्त्री म्हणून आपल्याही आत्मसन्मानाला आव्हान आहे, या जाणिवेने लेखिकाही हट्टाला पेटते. मुलगी मागास समाजातील म्हणून जणू तिची टिंगल टवाळी करण्याचा हक्क आपल्याला परंपरेनेच दिला आहे, अशा गुर्मीत तो मुलगा. अखेर लेखिका त्या मुलाच्या कानफटात मारते. आणि एकूण प्रसंगाचा भडका होतो. तो मुलगा सभापतीला फोन लावून एका बाईने मारल्याचे सांगतो. कंडक्टरही घाबरून जातो आणि बसची ती वरात औरंगाबाद पोलीस स्टेशनला पोचते. तिथे त्या पोराचा मामा जिल्हा परिषदेचा सभापती आणि लेखिका यांच्यात बरीच वादावादी होते. एका अखेर तो पोरगा त्या मुलीची आणि सभापती लेखिकेची माफी मागते आणि एकदाची बस पुढे निघते.

ग्रामीण भागातील जात आणि स्त्रीवरील अत्याचार यातील संबंधाची कीड लहान वयातील मुलांपर्यंत कशी पसरली आहे, याचा नमुनाच लेखिकेच्या गाठीला येतो.

पाचव्या दिवशी एसटी बसमधलाच आणखी एक प्रसंग लेखिकेच्या सामाजिक जाणिवेचे डोळे उघडणारा ठरतो. बऱ्यापैकी स्वच्छ एसटीत पुस्तक वाचत प्रवास करताना लेखिकेला सिगारेटचा वास येतो. लेखिका समोरच्या तरुणाला सिगारेट न ओढण्याविषयी विनंती करते. तो संवाद मुळातच वाचण्यासारखा आहे.

“अहो, ती सिगारेट तुम्ही गाडीत नका ओढू. प्लीज विझवा ती सिगारेट.’’

“का ? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?’’

“आहे मला प्रॉब्लेम. मला आवडत नाही तो वास. मळमळतं मला.’’

“तुम्हाला सिगारेटचा वास आवडत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मला काय सांगता.’’

“मला सहन होत नाही तो वास.’’

“मग मी काय करू त्याला ? तुम्हाला सहन होत नाही तर उतरा तुम्ही खाली.’’

लेखिका त्या उर्मट उत्तराने न चिडता त्याला ‘बाळा’ माझ्या मुलासारखा तू आहेस वगैरे शब्दात समजविण्याचा प्रयत्न करते पण त्यावर तो आणखीच चिडतो. अखेर ती कंडक्टरला ‘धुम्रपान करण्यास मनाई’ असा बोर्ड दाखवून गुन्हा नोंदविण्याची विनंती करते. एवढंच नव्हे तर बसमध्ये सर्वात शेवटच्या सीटवर बसलेल्या म्हाताऱ्या उडत असताना, ‘महिलांसाठी राखीव असलेल्या’ सीटवर तो सिगारेटवाला मुलगा बसला असल्याचे दाखवून कंडक्टरला देते. पण परिणाम उलटाच होतो. तो मुलगा म्हणतो,

“आपल्याला कोण ऊठवायला येतं पहातोच मी. अपनी भी रिझर्व्ह सिट है ये. बाबासाब झिंदाबाद. कौन उठाता बे अपने को.’’

“ए शहाण्या, तू काय एस. टी. महामंडळाचा जावई आहेस काय? म्हणे रिझर्व्ह सिट. रिझर्व्हेशन आहे का तुझ्याजवळ ?’’

“परमनंट रिझर्व्हेशन आहे आमच्याजवळ. कुठेही, केव्हाही. काय म्हणणं आहे तुमचं ? जा एवढा त्रास होतो आहे ना तुम्हाला, जा तुम्ही खाली उतरा आन दुसर्‍या प्रायव्हेट गाडीनं जा, कुठे मसनात जायचं ते.’’

वादावादी वाढत जाते आणि तो मुलगा म्हणतो  “अभी आपको मै अॅट्रॉसिटीमेच डालता…” पण इतर प्रवाशांशी होणाऱ्या संवादातून पुढच्याच क्षणाला लेखिका आंबेडकराईट असल्याचे समजताच तो नरमतो आणि “तुम्ही आंबेडकरी आहात ते आधीच सांगायचं. आपल्याच आहात तुम्ही. कशाला मी तुमच्यासोबत वाद घातला असता.’’ असे म्हणतो.

अखेर सायंकाळच्या सव्वा सहा वाजता एका थांब्यावर लेखिका उतरते. अनोळखी गावात निवारा शोधता शोधता बराच उशीर होतो. अखेर गावाबाहेरच्या देशपांडे यांच्या वाड्याचे दार ती वाजवते. त्या रात्री लेखिकेला आलेला भयाण आणि गूढ अनुभव पुस्ताकातून मुळातच वाचण्यासारखा आहे. नकार देत देत अखेर नवरा-बायको असे दोघेच असलेल्या देशपांडे कुटुंबात लेखिकेला रात्रीचा आसरा मिळतो. मध्यरात्री लेखिकेला अचानक वाड्याच्या एका कोपऱ्यात बांधलेल्या खोलीत रडण्याचा-मुसमुसण्याचा आवाज येतो. खोलीला बाहेरून कुलूप लावलेले. अस्वस्थ झालेल्या लेखिकेला अत्यंत अवघडल्या स्थितीत सकाळी कळते की ती मुलगी देशपांडे यांचीच असते. मेंटली रिटार्डेट असलेल्या मुलीला त्यांनी जगापासून लपवून ठेवले असते. मुलगा अमेरिकेत आणि एक मुलगी पुण्याला असल्याने आणि देशपांडे यांचे व्याही खूप श्रीमंत-मोठ्या पदावर वगैरे. त्यामुळे ही मुलगी जगापासून लपवून बंदिस्त एकांतात ठेवलेलं एक गुपित असते.

अस्वस्थ झालेली लेखिका देशपांडेना ते कसे चुकीचे वागताहेत, मानवाधिकाराचे ते उल्लंघन करीत आहेत ते सांगते. ते सांगताना लेखिकेलाच रडू कोसळते आणि ती तिथून बाहेर येते. आणखी एक वेगळा अनुभव गाठीला आला असतो.

अनप्लँड ट्रीप’च्या सहाव्या दिवशी लेखिका सोलापूर- सातारा बसमध्ये बसते. शेजारच्या प्रवाशाकडून निमगाव हे बारामतीजवळच्या गावाचे नाव ऐकून तिथले तिकीट काढते. तो सहप्रवासी शिक्षक असतो. मुळचा नाशिकजवळचा असतो. जातीवरून गावकरी कसे हिणवतात ते सांगतो. साधी मोटरसायकल चालवली तरी लोक कसे संतापतात ते सांगतो. जातीय मानसिकतेचे हे नेहमीचे उदाहरण. क्षूद्र जाती सुद्धा आपल्या पेक्षा कनिष्ठ जातीतील लोकांचा कसा दु:स्वास करतात याचा अनुभव लेखिकेला येतो. लेखिकेला तो बाबासाहेबांचे संस्कार असलेला तरुण शिक्षक विश्वासू वाटतो. त्याच्याच मदतीने रात्री त्या गावात लेखिका सरपंचबाईना बोलावून सभा घेते. गावातील अनेक समस्या कळतात, तसे काही चांगले उपक्रमही कौतुकास्पद वाटतात. चर्चेतूनच लेखिका मग एक प्रश्न विचारते, गावातील किती मुलींनी प्रेमविवाह केला आहे. यावर सन्नाटा पसरतो. गावातील नथूदादाची मुलगी  एका मुसलमान मुलाच्या प्रेमात होती. पण नथूदादाचा प्रचंड विरोध. त्याने मुलीला अनेकदा मारलं. पण ती बधली नाही. आणि त्या मुलानंही गावाला धमकी दिलेली की अन्य कुणासोबत तिचं लग्न लावलं तर बघा, तिच्या लग्नात येऊन आत्महत्या करेन वगैरे… ऐकून लेखिका दुसऱ्या दिवशी त्या मुलीला रेखाला भेटायचे ठरवते.

प्रवासातील सातव्या दिवशी लेखिका रेखाच्या कुटुंबाला भेटते. रेखा आपला निर्धार सांगते. मग लेखिका तिच्या वडलांना विचारते,

“तुमचा नेमका विरोध कशासाठी आहे ? तो मुलगा मुसलमान आहे म्हणून, गरीब आहे म्हणून की आणखी काही ? दिसायला चांगला नाही, व्यसनी आहे, नेमका विरोध कशासाठी ?’’

“नाही, व्यसनी तर नाही तो. कधी पान खातानाही नाही दिसला. दिसायला तर देखणाच आहे. राज बब्बर सारखा; पण मुसड्ड्यासोबत आमची मुलगी लग्न नाही करू शकत.’’

“का ?’’

“अजी तो मुसलमान आहे.’’

“तुम्ही पण दलित आहात न ?’’

“म्हणून काय झालं ? त्यांच्यापेक्षा आम्ही उच्च आहोत.’’

“असं तुम्हाला वाटतं. हिंदुधर्मात तुम्हाला काय किंमत आहे ? ’’

“वा ! अशी कशी नाही. आम्ही इज्जतदार आहोत. त्या बांड्यांना कोण विचारतं ?’’

“अहो, हे तुम्हाला स्वत:ला वाटतं. समजा तुमची मुलगी ब्राह्मण, कुणबी, मराठा मुलाच्या प्रेमात पडली असती, तर तुमचा त्या  लग्नाला विरोध राहिला असता काय ?’’

“नाही. चांगल्या घरात गेली असती नं. आमच्यापेक्षा वरच्या घराण्यात जाईल तर मी कशाला विरोध करेन ?’’

“पण त्यांचा राहिला असता नं. ब्राह्मणांना, बहुजनांना तुमची मुलगी चाललीच असती हे कशावरून ? बऱ्याच चर्चेनंतर रेखाचे वडील म्हणतात,  “मी मेलो तरी बेहत्तर, पण मी माझी मुलगी त्या मुसड्यांच्या घरात देणार नाही. तो धर्मच मला आवडत नाही.’’

००

अरुणा सबाने यांची ही अनप्लँड ट्रीप म्हणजे ग्रामीण भारताचा एक लहानसा एक्सरेच वाटतो. एकूण भारताचे सिटी स्कॅन कसे असेल, यावरून कल्पना येते.  धर्म आणि जातीच्या भयंकर चिवट विषवल्लीची मुळे किती खोलात रुतली आहेत, ते दिसतात. आजही स्वातंत्र्य-समता-बंधुता या गोष्टी केवळ पुस्तकात वाचण्यासाठीच का असे अनेक प्रश्न इथे निर्माण होतात.

त्या आठ दिवसात लेखिकेला ज्या प्रसंगाना सामोरे जावे लागते, ते सर्व तिच्या आजवरच्या  चळवळीच्या ध्येयवादाला छेद देणारे असतात. खेड्यातील सामाजिक जीवनाच्या गुंतागुंतीचा आपण कधी विचारच केला नव्हता असे तिला वाटू लागते. एक प्रकारे आपल्याच समाजाचे सूक्ष्म दर्शन तिला घडू लागते.

(लेखक नामवंत समीक्षक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत)

7709012078

००

‘ते आठ दिवस’ : अरुणा सबाने

मुखपृष्ठ : गिरीश सहस्रबुद्धे

हर्मिस प्रकाशन, पुणे, १७ नोव्हेंबर २०२०

मूल्य : १५०/- संपर्क : 72490 08824 

Online खरेदी – आताच बोलवाhttps://bit.ly/3dT0JQH